पाठ ६
आठ जण वाचतात
नोहा, त्याचं कुटुंब आणि प्राणी जहाजात गेले. यहोवाने त्या जहाजाचं दार बंद केलं. बाहेर पाऊस पडू लागला. इतका पाऊस पडला की पूर आला आणि जहाज पाण्यावर तरंगू लागलं. हळूहळू पूर्ण पृथ्वी पाण्याने भरून गेली. बाहेर असलेले सर्व वाईट लोक मेले. पण नोहा आणि त्याचं कुटुंब, आत जहाजात सुरक्षित होतं. यहोवाचं ऐकल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला असेल, नाही का?
४० दिवस आणि ४० रात्री पाऊस पडला आणि मग थांबला. पाणी कमी होऊ लागलं. शेवटी जहाज डोंगरावर येऊन थांबलं. पण अजूनही पृथ्वीवर बरंच पाणी होतं. त्यामुळे नोहा आणि त्याचं कुटुंब लगेच जहाजाबाहेर येऊ शकत नव्हतं.
त्यांना जहाजात एका वर्षापेक्षा जास्त काळ झाला होता. हळूहळू पाणी आटू लागलं. मग शेवटी यहोवाने त्यांना बाहेर यायला सांगितलं. आता पृथ्वीवर एकही वाईट व्यक्ती नव्हती. यहोवाने नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा जीव वाचवल्यामुळे त्यांना त्याचे आभार मानायचे होते. त्यामुळे त्यांनी यहोवाला अर्पण दिलं.
या अर्पणामुळे यहोवा खूश झाला. त्याने वचन दिलं, की तो परत कधीच पूर आणून पृथ्वीवर असलेल्या गोष्टींचा नाश करणार नाही. यासाठी यहोवाने त्यांना एक चिन्ह दिलं. ते होतं मेघधनुष्य, म्हणजे रेनबो. आकाशात ते पहिल्यांदाच दिसलं. तू कधी रेनबो पाहिला आहेस का?
त्यानंतर यहोवाने नोहा आणि त्याच्या कुटुंबाला सांगितलं, की तुमचं कुटुंब वाढवा आणि ही पृथ्वी भरून टाका.
“नोहा जहाजात गेला . . . आणि जलप्रलय येऊन ते सर्व त्यात वाहून जाईपर्यंत [लोकांनी] लक्ष दिलं नाही.”—मत्तय २४:३८, ३९