पाठ १००
पौल आणि तीमथ्य
लुस्त्रमध्ये एका मंडळीत एक तरुण बांधव होता. त्याचं नाव होतं तीमथ्य. त्याचे वडील ग्रीक होते आणि आई यहुदी होती. त्याच्या आईचं नाव युनीके आणि आजीचं नाव लोईस होतं. तीमथ्य लहान होता तेव्हापासून त्या दोघींनी त्याला यहोवाविषयी शिकवलं.
प्रचाराच्या दुसऱ्या दौऱ्यात पौल लुस्त्रला गेला. तिथे त्याने तीमथ्यला पाहिलं. तीमथ्यचं बांधवांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना मदत करण्याची त्याची मनापासून इच्छा आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. म्हणून पौलने तीमथ्यला त्याच्यासोबत प्रचार दौऱ्यावर यायला सांगितलं. मग हळूहळू पौलने तीमथ्यला एक चांगला प्रचारक आणि चांगला शिक्षक बनण्यासाठी मदत केली.
पौल आणि तीमथ्य जिथे कुठे गेले, तिथे पवित्र आत्म्याने त्यांचं मार्गदर्शन केलं. एका रात्री पौलने एक दृष्टान्त पाहिला. त्यात एका माणसाने त्याला मासेदोनियात येऊन, तिथल्या लोकांची मदत करायला सांगितलं. त्यामुळे, प्रचार करण्यासाठी आणि नवीन मंडळ्या बनवण्यासाठी पौल, तीमथ्य, सीला आणि लूक मासेदोनियाला गेले.
मासेदोनियामधल्या थेस्सलनीका शहरात, अनेक पुरुषांनी आणि स्त्रियांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पण काही यहुदी लोक पौल आणि त्याच्या सोबत्यांवर जळायचे. मग एकदा या यहुद्यांनी खूप लोकांना जमा केलं आणि या बांधवांना शहराच्या अधिकाऱ्यांपुढे खेचत नेलं. या लोकांनी ओरडून म्हटलं: ‘ही माणसं रोमी सरकारचे शत्रू आहेत!’ आता या शहरात पौल आणि तीमथ्यच्या जीवाला धोका होता. आणि म्हणून ते रात्री बिरुया इथे पळून गेले.
बिरुयातल्या लोकांनी आनंदाच्या संदेशाबद्दल शिकून घेण्याविषयी खूप आवड दाखवली. तिथले ग्रीक आणि यहुदी लोक ख्रिस्ती बनले. पण जेव्हा थेस्सलनीकाहून काही यहुदी बिरुयाला आले, तेव्हा त्या यहुद्यांनी तिथेही गोंधळ घातला आणि बांधवांचा विरोध केला. यामुळे पौल अथेन्सला निघून गेला. पण तीमथ्य आणि सीला हे बिरुयातच राहिले. कारण त्यांना तिथल्या बांधवांचा विश्वास मजबूत करायचा होता. मग काही काळाने पौलने तीमथ्यला थेस्सलनीकाला पाठवलं. कारण तिथले बांधव तीव्र छळाचा सामना करत होते आणि त्यांना मदतीची गरज होती. त्यानंतर बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी पौलने तीमथ्यला इतर अनेक मंडळ्यांमध्येही पाठवलं.
पौलने तीमथ्यला सांगितलं: ‘ज्याला यहोवाची सेवा करायची आहे, त्याचा छळ केला जाईल.’ तीमथ्यलाही छळाचा सामना करावा लागला. त्याला जेलमध्येदेखील टाकण्यात आलं. पण यहोवासाठी आपली एकनिष्ठा दाखवण्याची त्याला जी संधी मिळाली होती, त्यासाठी तो खूश होता.
पौल फिलिप्पैमधल्या बांधवांना म्हणाला: ‘मी तीमथ्यला तुमच्याकडे पाठवत आहे. यहोवाचे सेवक या नात्याने आपण कसं जगलं पाहिजे, हे तो तुम्हाला शिकवेल. तसंच, सेवाकार्य कसं करावं हेसुद्धा तो तुम्हाला शिकवेल.’ तीमथ्यला दिलेली जबाबदारी तो पूर्ण करेल असा भरवसा पौलला होता. त्या दोघांनी सोबत मिळून अनेक वर्षं अगदी मित्रांप्रमाणे देवाची सेवा केली.
“जो तुमची अगदी मनापासून काळजी घेईल, असा त्याच्या स्वभावाचा दुसरा कोणीही माझ्याजवळ नाही. कारण बाकीचे सर्व जण येशू ख्रिस्ताच्या नाही, तर स्वतःच्याच हिताचा विचार करत आहेत.” —फिलिप्पैकर २:२०, २१