पाठ ५९
चार मुलं यहोवाला विश्वासू राहतात
नबुखद्नेस्सरने यहूदामधल्या राजकुमारांना बाबेलमध्ये नेलं. मग त्याने महालातल्या अश्पनज नावाच्या एका अधिकाऱ्याला त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी नेमलं. नबुखद्नेस्सरने अश्पनजला त्यांच्यामधून सर्वात हुशार आणि तब्येतीने चांगले असलेल्या मुलांना निवडायला सांगितलं. या तरुण मुलांना तीन वर्षांसाठी शिकवण्यात येणार होतं. यामुळे ती बाबेलमध्ये महत्त्वपूर्ण अधिकारी बनण्यासाठी तयार होणार होती. या मुलांना बाबेलमधली भाषा वाचायला, लिहायला आणि बोलायला शिकावी लागणार होती. यासोबतच, राजा आणि त्याच्या दरबारातले लोक ज्या प्रकारचं अन्न खायचे, त्याच प्रकारचं अन्न त्यांनाही खावं लागणार होतं. या मुलांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या हेदेखील होते. अश्पनजने त्यांना बाबेलमधली नावं दिली. ती नावं म्हणजे: बेल्टशस्सर, शद्रख, मेशख आणि अबेद्नगो. पण, या मुलांना जे शिक्षण मिळणार होतं त्यामुळे ते यहोवाची उपासना करण्याचं थांबवणार होते का?
या चारही मुलांनी यहोवाला विश्वासू राहण्याचं मनापासून ठरवलं होतं. राजा ज्या प्रकारचं अन्न खातो ते अन्न आपण खाऊ शकत नाही हे त्यांना माहीत होतं. कारण, यहोवाच्या नियमांमध्ये ज्या प्राण्यांचं मांस खाण्याची मनाई होती तेही या राजदरबाराच्या अन्नात असायचं. त्यामुळे या मुलांनी अश्पनजला सांगितलं: ‘कृपा करून आम्हाला खाण्यासाठी ते अन्न देऊ नका.’ अश्पनज त्यांना म्हणाला: ‘तुम्ही जर हे अन्न खाल्लं नाही आणि कमजोर दिसू लागलात, तर राजा मला मारून टाकेल!’
मग यावर दानीएलला एक युक्ती सुचली. तो त्यांची देखभाल करणाऱ्याला म्हणाला: ‘दहा दिवसांसाठी आम्हाला खायला फक्त भाज्या आणि प्यायला पाणी द्या. मग जी मुलं राजदरबाराचं अन्न खातात त्यांच्याशी आमची तुलना करून पाहा.’ देखभाल करणाऱ्याला ही गोष्ट पटली.
दहा दिवसांनंतर दानीएल आणि त्याचे तीन मित्र कमजोर नाही, तर तब्येतीने इतरांपेक्षा जास्त चांगले दिसत होते. मुलांनी यहोवाचं ऐकलं होतं आणि त्यामुळे यहोवा त्यांच्यावर खूश होता. त्याने दानीएलला अशी बुद्धी दिली, ज्यामुळे तो स्वप्नांचा आणि दृष्टान्तांचा अर्थ समजू शकत होता.
शिक्षण संपल्यानंतर अश्पनजने सर्व मुलांना नबुखद्नेस्सरकडे आणलं. राजा त्यांच्याशी बोलला. त्याने पाहिलं की दानीएल, हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या हे दुसऱ्या मुलांपेक्षा जास्त हुशार होते. म्हणून त्याने या मुलांना राजदरबारात काम करण्यासाठी निवडलं. महत्त्वाचा निर्णय घेताना राजा सहसा त्यांचा सल्ला घ्यायचा. यहोवाने या मुलांना राजदरबारातल्या सर्व बुद्धिमान पुरुषांपेक्षा आणि जादूगारांपेक्षा जास्त हुशार बनवलं होतं.
दानीएल, हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या हे एका दुसऱ्या देशात होते. असं असलं तरी, ते यहोवाचे लोक आहेत ही गोष्ट ते विसरले नाहीत. मग तुझे मम्मी-पप्पा तुझ्यासोबत नसले, तेव्हाही तू यहोवाचं ऐकशील ना?
“तुझ्या तरुण वयामुळे कोणीही तुला तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे. त्याऐवजी, बोलण्यात व वागण्यात, तसेच प्रेम, विश्वास व शुद्धता या बाबतींत विश्वासू जनांसाठी एक चांगले उदाहरण हो.”—१ तीमथ्य ४:१२