कथा ८८
योहान येशूला बाप्तिस्मा देतो
त्या माणसाच्या डोक्यावर उतरणारं कबुतर पाहा. तो माणूस येशू आहे. तो आता जवळपास ३० वर्षांचा आहे. आणि त्याच्या सोबतचा माणूस आहे योहान. आपण अगोदरच त्याच्याबद्दल थोडं शिकलो आहोत. मरीया तिच्या नात्यातल्या अलीशिबेला भेटायला गेली आणि अलीशिबेच्या पोटातल्या बाळानं आनंदाने उडी मारली, हे तुम्हाला आठवतं का? ते पोटातलं बाळ होतं, योहान. पण आता येशू आणि योहान काय करताहेत?
योहानानं येशूला नुकतंच जॉर्डन नदीत बुडवून काढलं आहे. अशा रितीनं एखाद्या व्यक्तीला बाप्तिस्मा दिला जातो. प्रथम त्याला पाण्याखाली बुडवलं जातं, आणि मग परत बाहेर काढलं जातं. योहान लोकांना हेच करत असल्यानं, त्याला बाप्तिस्मा देणारा योहान म्हणतात. पण योहानानं येशूला बाप्तिस्मा का दिला आहे?
येशूनं येऊन, आपल्याला बाप्तिस्मा देण्याची विनंती त्याला केली, म्हणून योहानानं तसं केलं. आपण केलेल्या दुष्ट गोष्टींबद्दल पश्चात्ताप झाल्याचं ज्यांना दाखवायचं आहे, अशा लोकांना योहान बाप्तिस्मा देतो. पण पश्चात्ताप व्हावा अशी वाईट गोष्ट येशूनं कधी केली का? नाही, येशूनं कधीही केली नाही. कारण तो स्वर्गातून आलेला खुद्द देवाचा पुत्र आहे. त्यामुळे त्यानं वेगळ्याच कारणासाठी आपल्याला बाप्तिस्मा द्यायला योहानाला सांगितलं. ते कारण काय होतं, हे आपण पाहू या.
इथे योहानाकडे येण्याच्या आधी, येशू एक सुतार होता. लाकडापासून टेबलं, खुर्च्या आणि बाकासारख्या गोष्टी बनवणाऱ्या माणसाला सुतार म्हणतात. मरीयेचा नवरा योसेफ हा सुतार होता, आणि त्यानं येशूलाही सुतार व्हायला शिकवलं. पण यहोवानं आपल्या पुत्राला सुतार बनण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं नव्हतं. त्यानं त्याच्यासाठी विशेष काम ठरवलं आहे, आणि येशूनं त्याची सुरवात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, त्याच्या वडिलांची इच्छा करण्यासाठी तो आता आला आहे, हे दाखवण्यासाठी आपल्याला बाप्तिस्मा द्यायची विनंती येशू योहानाला करतो. हे देवाला आवडलं आहे का?
होय. कारण येशू पाण्यातून वर आल्यावर, आकाशातून एक आवाज म्हणतो: ‘हा माझा पुत्र. याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’ तसंच, आकाश उघडल्यासारखं वाटतं, आणि हे कबुतर येशूवर उतरतं. पण ते खरं कबुतर नव्हे. ते फक्त तसं दिसतं. खरं तर, तो देवाचा पवित्र आत्मा आहे.
आता येशूला खूप विचार करायचा आहे. म्हणून तो ४० दिवस एका एकांत जागी निघून जातो. तिथे सैतान त्याच्याकडे येतो. येशूनं देवाच्या नियमाविरुद्ध काहीतरी करावं, असा प्रयत्न सैतान तीनदा करतो. पण येशू तसं करायला तयार होत नाही.
त्यानंतर, येशू परत येतो आणि काही माणसांना भेटतो. ते त्याचे पहिले अनुयायी किंवा शिष्य होतात. त्यांच्यातल्या काहींची नावं आहेत, अंद्रिया, पेत्र (याला शिमोनही म्हणतात), फिलिप्प, आणि नथनेल (याला बर्थलमयही म्हणतात). येशू आणि हे नवे शिष्य गालील प्रांताला जायला निघतात. गालीलात ते नथनेलाच्या गावी, कानाला थांबतात. तिथे येशू लग्नाच्या एका मोठ्या मेजवानीला जातो; आणि आपला पहिला चमत्कार करतो. तो कोणता, हे तुम्हाला माहीत आहे का? तो पाण्याला द्राक्षारसात बदलतो.