कथा ६३
बद्धिमान राजा शलमोन
शलमोन राजा होता तेव्हा, तो विशीच्या आत असतो. तो यहोवावर प्रीती करतो; आणि त्याचे वडील दावीद यांनी त्याला केलेला सदुपदेश पाळतो. यहोवा शलमोनावर प्रसन्न आहे. त्यामुळे एका रात्री स्वप्नात तो शलमोनाला म्हणतो: ‘शलमोना, तुला काय वर हवा?’
तेव्हा शलमोन उत्तर देतो: ‘माझ्या देवा यहोवा, मी लहान मूल आहे, राज्य कसं करावं, हे मला कळत नाही. म्हणून, तुझ्या लोकांवर यथायोग्य राज्य करण्यासाठी मला बुद्धी दे.’
शलमोनानं मागितलेल्या गोष्टीबद्दल यहोवा प्रसन्न आहे. त्यामुळे तो म्हणतो: ‘तू दीर्घायुष्य किंवा धन न मागता, बुद्धी मागितलीस म्हणून, तुझ्यापूर्वी कोणापाशीही नव्हती इतकी बुद्धी तर मी तुला देईनच, शिवाय, तू न मागितलेलं धन आणि ऐश्वर्य, दोन्हीही देईन.’
त्यानंतर लवकरच, दोन स्त्रिया एक कठीण समस्या घेऊन शलमोनापाशी येतात. त्यातली एक म्हणते: ‘ही स्त्री आणि मी एकाच घरात राहतो. मी एका मुलाला जन्म दिला आणि दोन दिवसांनी तिनंही एका मुलाला जन्म दिला. मग एका रात्री तिचा मुलगा मरण पावला. पण मी झोपलेली असताना, तिनं आपलं मेलेलं मूल माझ्या शेजारी ठेवलं आणि माझं बाळ घेतलं. जागी झाल्यावर मी मेलेलं मूल पाहिलं तो, ते माझे नसल्याचं माझ्या ध्यानात आलं.’
तेव्हा दुसरी स्त्री म्हणते: ‘छे! जिवंत मूल माझं आहे. मेलेलं तिचं आहे!’ पहिली म्हणते: ‘मुळीच नाही! मेलेलं मूल आहे तुझं, आणि जिवंत मूल माझं आहे!’ असा वाद त्या स्त्रिया घालतात. शलमोन काय करील?
तो एक तरवार मागवतो. आणि ती आणल्यावर म्हणतो: ‘जिवंत मुलाचे दोन भाग करा, आणि प्रत्येक स्त्रीला अर्धं द्या.’
खरी आई विव्हळून म्हणते: ‘नका! बाळाला मारू नका. तो तिला द्या!’ परंतु दुसरी स्त्री म्हणते: ‘आमच्यापैकी कोणालाच बाळ देऊ नका. व्हा पुढे, आणि करा त्याचे तुकडे.’
शेवटी शलमोन बोलतो: ‘मूल मारू नका! ते पहिल्या स्त्रीला द्या. ती त्याची खरी आई आहे.’ शलमोनाला हे समजतं, कारण खऱ्या आईचं बाळावर इतकं प्रेम असतं की, ते मारलं जाऊ नये म्हणून दुसऱ्या स्त्रीला द्यायला ती तयार असते. शलमोनानं ही समस्या कशी सोडवली हे लोकांच्या कानावर जातं तेव्हा, असा बुद्धिमान राजा असल्याबद्दल त्यांना आनंद होतो.
शलमोनाच्या कारकीर्दीत, जमिनीत भरपूर गहू, सातू, द्राक्षं, अंजिरं आणि इतर अन्न पिकवून, देव लोकांना आशीर्वाद देतो. लोक उत्तम कपडे घालतात आणि चांगल्या घरांमध्ये राहतात. प्रत्येकासाठी प्रत्येक चांगली गोष्ट विपुलतेनं असते.