कथा ६२
दाविदाच्या घराण्यात संकटं
दाविदानं जेरूसलेममध्ये राज्य करायला सुरवात केल्यानंतर, यहोवा त्याच्या सैन्याला त्याच्या शत्रूंवर अनेक विजय मिळवून देतो. कनान देश इस्राएलांना देण्याचं वचन यहोवानं दिलं होतं. आता, यहोवाच्या मदतीनं, त्यांना देण्याचं वचन दिलेला सर्व प्रदेश त्यांचा होतो.
दावीद चांगला शासक आहे. त्याचं यहोवावर प्रेम आहे. त्यामुळे, जेरूसलेम काबीज केल्यानंतर लवकरच तो, यहोवाच्या कराराचा कोश तिथे आणतो. त्याला ठेवण्यासाठी, एक मंदिर बांधण्याची त्याची इच्छा आहे.
उतार वयात दावीद एक मोठी चूक करतो. इतर कोणाच्या मालकीची वस्तू घेणं चूक असल्याचं दाविदाला माहीत आहे. पण एका संध्याकाळी, राजवाड्याच्या गच्चीवर असताना, त्याला खाली एक अतिशय सुंदर स्त्री दिसते. तिचं नाव बथशेबा आहे. तिचा नवरा उरीया, त्याचा एक सैनिक आहे.
दाविदाला बथशेबा इतकी हवीशी वाटते की, तो तिला आपल्या राजवाड्यात आणवतो; आणि तिच्याशी समागम करतो. तिचा नवरा लढाईवर गेलेला आहे. त्यानंतर, आपल्याला बाळ होणार आहे, असं तिला दिसून येतं. दाविदाला चिंता पडते. तो आपल्या सेनापतीला निरोप पाठवतो की, उरीयाला लढाईच्या तोंडाशी ठेवावा, म्हणजे तिथे तो मारला जाईल. उरीया मेल्यावर, दावीद बथशेबेशी लग्न करतो.
यहोवा दाविदावर फार रागावला आहे. त्यामुळे दाविदाला त्याच्या अपराधाबद्दल सांगण्यासाठी तो, नाथान नावाच्या आपल्या दासाला पाठवतो. इथे दाविदाशी बोलत असलेला नाथान तुम्हाला दिसतो. आपण केलेल्या कामाचा दाविदाला मोठा पश्चात्ताप होतो. त्यामुळे यहोवा त्याला जिवे मारत नाही, पण म्हणतो: ‘तू अशी वाईट गोष्ट केल्यामुळे, तुझ्या घराण्यात खूप संकटं येतील.’ आणि खरोखरच दाविदावर किती संकटं येतात!
प्रथम, बथशेबेचा मुलगा मरतो. मग दाविदाचा सर्वात मोठा मुलगा अम्नोन, तामार नावाच्या आपल्या बहिणीला एकांतात घेऊन तिच्यावर बळजबरी करतो. याचा, दाविदाचा मुलगा अबशालोम याला इतका राग येतो की, तो अम्नोनाला ठार करतो. पुढे, अबशालोम अनेक लोकांचा पाठिंबा मिळवून स्वत: राजा होतो. अखेरीस दावीद अबशालोमाविरुद्ध लढाई जिंकतो. पण अबशालोम मारला जातो. खरोखर, दाविदावर अनेक संकटं येतात.
या सर्वाच्या दरम्यान, बथशेबा शलमोन नावाच्या मुलाला जन्म देते. दावीद म्हातारा आणि आजारी असताना, त्याचा मुलगा अदोनीया, राजा होण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा, शलमोन राजा होईल हे दाखवण्यासाठी दावीद, सादोक नावाच्या याजकाकडून शलमोनाच्या डोक्यावर तेलाचा अभ्यंग करवतो. लवकरच, वयाच्या ७० व्या वर्षी दावीद मरण पावतो. त्यानं ४० वर्षे राज्य केलं. पण आता शलमोन इस्राएलचा राजा आहे.