कथा ५८
दावीद आणि गल्याथ
फिलिस्टीनी पुन्हा इस्राएलाशी लढायला येतात. आता दाविदाचे तिघे मोठे भाऊ शौलाच्या सैन्यात आहेत. त्यामुळे एका दिवशी इशाय दाविदाला सांगतो: ‘तुझ्या भावांसाठी थोडा हुरडा आणि भाकऱ्या ने. आणि तुझे भाऊ कसे काय आहेत, ते पाहून ये.’
दावीद तळावर येतो तेव्हा, आपल्या भावांना शोधण्यासाठी तो सैन्याकडे धावतो. त्यावेळी, इस्राएलांची थट्टा करण्यासाठी दांडगा फिलिस्टीनी गल्याथ पुढे येतो. तो ४० दिवस सकाळ-संध्याकाळ असं करत आहे. तो गरजतो: ‘माझ्याशी लढण्यासाठी तुमच्यातला एक माणूस निवडा. मला मारून तो जिंकला, तर आम्ही तुमचे दास होऊ. पण त्याला मारून मी जिंकलो, तर तुम्ही आमचे दास व्हाल. तुमच्यात धमक असेल तर माझ्याशी लढण्यासाठी एखाद्याला निवडा.’
दावीद काही सैनिकांना विचारतो: ‘या फिलिस्टीन माणसाला मारून इस्राएलांवरचा हा कलंक दूर करणाऱ्याला काय मिळेल?’
सैनिक म्हणतो: ‘त्या माणसाला शौल खूप धन देईल. तसंच, त्याला आपली मुलगी बायको म्हणून देईल.’
पण गल्याथ एवढा प्रचंड असल्यामुळे सर्व इस्राएलांना त्याची भीती वाटते. तो ९ फुटांहून (जवळपास ३ मीटर) उंच आहे. आणि त्याची ढाल वाहायला आणखी एक सैनिक आहे.
काही सैनिक जाऊन शौल राजाला सांगतात की, दाविदाला गल्याथाशी लढण्याची इच्छा आहे. पण शौल दाविदाला म्हणतो: ‘तू या फिलिस्टीन माणसाशी लढू शकणार नाहीस. तू तर कोवळा पोर आहेस, आणि सैनिकी पेशात त्याची हयात गेलेली आहे.’ दावीद उत्तर देतो: ‘माझ्या वडिलांची मेंढरं नेणाऱ्या एका अस्वलाला आणि सिंहाला मी ठार केलं. या फिलिस्टीन्याची गतही त्यांच्यासारखीच होईल. यहोवा मला मदत करील.’ त्यामुळे शौल म्हणतो: ‘जा. यहोवा तुझ्यासोबत असो.’
दावीद एका ओढ्याच्या काठानं उतरतो. आणि पाच गुळगुळीत गोटे उचलून आपल्या थैलीत टाकतो. मग आपली गोफण घेऊन तो त्या दांडगेश्वराला सामोरा जातो. त्याला पाहून गल्याथाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्याला वाटतं की, दाविदाला मारणं फारच सोपं जाईल.
गल्याथ म्हणतो: ‘जरा माझ्यापुढे तर ये. म्हणजे मी तुझं मांस पक्षांना आणि जनावरांना खायला देईन.’ परंतु दावीद म्हणतो: ‘तू तरवार, भाला आणि बरची घेऊन माझ्याकडे येतोस. पण मी यहोवाच्या नावानं तुझ्याकडे येतोय. आज यहोवा तुला माझ्या हाती देईल आणि मी तुला मारीन.’
तेव्हा दावीद गल्याथाच्या दिशेनं धावू लागतो. तो आपल्या थैलीतून एक गोटा काढून गोफणीत घालतो व आपलं सर्व बळ एकवटून तो फेकतो. गोटा सरळ गल्याथाच्या डोक्यात शिरतो आणि तो खाली कोसळतो! आपला वीर मारला गेलेला पाहून फिलिस्टीनी पाठ दाखवून पळतात. त्यांचा पाठलाग करून इस्राएल लोक लढाई जिंकतात.