कथा ५७
देव दावीदची निवड करतो
काय घडलं आहे, ते तुम्हाला दिसतं का? त्या मुलानं छोट्याशा कोकराला अस्वलापासून वाचवलं आहे. अस्वलानं येऊन कोकराला उचलून नेलं, आणि ते त्याला खाणार होतं. पण तो मुलगा त्यांच्या मागे धावला आणि त्यानं कोकराला अस्वलाच्या जबड्यातून वाचवलं. अस्वल त्याच्यावर उठलं तेव्हा त्या मुलानं त्याला धरुन ठार केलं! आणखी एका वेळेला, एका मेंढराला त्यानं सिंहापासून वाचवलं. तो मोठा धाडसी आहे, नाही का? तो कोण, हे तुम्हाला माहीत आहे का?
हा आहे तरुण दावीद. तो बेथलेहेम गावी राहतो. रूथ आणि बवाज यांचा मुलगा ओबेद, हे त्याचे आजोबा होते. रूथ आणि बवाज तुम्हाला आठवतात का? दाविदाचे वडील आहेत इशाय. दावीद त्याच्या वडिलांच्या मेंढरांची राखण करतो. यहोवानं शौलाला राजा म्हणून निवडल्यानंतर १० वर्षांनी दाविदाचा जन्म झाला.
मग अशी वेळ येते की, यहोवा शमुवेलाला म्हणतो: ‘खास तेलातलं थोडं घे, आणि बेथलेहेमात इशायाच्या घरी जा. राजा होण्यासाठी त्याच्या एका मुलाला मी निवडलं आहे.’ इशायाचा थोरला मुलगा अलीयाब याला पाहून शमुवेल स्वत:शी म्हणतो: ‘यहोवानं निवडलेला नक्की हाच असावा.’ पण यहोवा त्याला सांगतो: ‘त्याच्या चेहऱ्याकडे आणि उंचीकडे पाहू नकोस. राजा होण्यासाठी मी याला निवडलेलं नाही.’
त्यामुळे इशाय त्याचा मुलगा अबीनादाब याला बोलावतो आणि त्याला शमुवेलाकडे आणतो. परंतु शमुवेल म्हणतो: ‘नाही, यहोवानं यालाही निवडलेलं नाही.’ नंतर इशाय त्याचा मुलगा शम्मा याला आणतो. ‘यालाही यहोवानं निवडलेलं नाही,’ शमुवेल म्हणतो. इशाय त्याच्या सात मुलांना शमुवेलाकडे आणतो. पण यहोवा त्यातल्या एकाचीही निवड करत नाही. ‘हेच सर्व मुलगे आहेत का?’ शमुवेल विचारतो.
इशाय म्हणतो: ‘सर्वात धाकटा उरलाय. पण तो बाहेर मेंढरं राखतोय.’ दाविदाला आणलं जातं तेव्हा, तो देखणा मुलगा असल्याचं शमुवेलाला दिसतं. यहोवा म्हणतो: ‘हाच तो. त्याच्यावर तेल ओत.’ शमुवेल तसंच करतो. पुढे अशी वेळ येईल की, दावीद इस्राएलांचा राजा होईल.