कथा ४४
राहाब हेरांना लपवते
ही माणसं संकटात आहेत. त्यांनी निसटलं पाहिजे, नाही तर मारले जातील. ते इस्राएली हेर असून, त्यांना मदत करणारी ती स्त्री राहाब आहे. इथे यरीहो शहराच्या वेशीवरल्या एका घरात राहाब राहते. ही माणसं संकटात का आहेत, ते आपण पाहू या.
इस्राएल लोक कनान देशात जाण्यासाठी यार्देन नदी पार करायला तयार आहेत. पण तसं करण्यापूर्वी, यहोशवा या दोन हेरांना पाठवतो. तो त्यांना सांगतो: ‘जा, आणि तो देश व यरीहो शहर हेरून या.’
यरीहोत आल्यावर ते हेर राहाबेच्या घरी जातात. पण कोणी तरी यरीहोच्या राजाला सांगतं: ‘देश हेरण्यासाठी दोन इस्राएली आज सायंकाळी इथे आले होते.’ ते ऐकल्यावर, राजा राहाबेकडे माणसं रवाना करतो. ते तिला आज्ञा करतात: ‘तू घरात ठेवून घेतलेल्या त्या माणसांना बाहेर आण!’ परंतु राहाबेने हेरांना धाब्यावर लपवून ठेवलं आहे. त्यामुळे ती म्हणते: ‘काही माणसं माझ्या घरी आली खरी. पण ती कोठली होती ते मला माहीत नाही. अंधार पडायला लागला असताना, वेशीचे दरवाजे बंद होण्यापूर्वीच ते गेले. तुम्ही घाई केलीत तर त्यांना गाठू शकाल!’ तेव्हा, ती माणसं त्यांच्या पाठलागावर जातात.
ते गेल्यावर, राहाब लगबगीनं धाब्यावर जाते. ती त्या हेरांना सांगते: ‘यहोवा हा देश तुम्हाला देईल, हे मला ठाऊक आहे. तुम्ही मिसर (इजिप्त) देश सोडलात तेव्हा, त्यानं तांबडा समुद्र कोरडा केल्याचं नि सिहोन आणि ओग या राजांना तुम्ही कसं मारलंत ते, आम्ही ऐकलं आहे. मी तुमच्यावर दया दाखवली आहे, म्हणून कृपा करून माझ्यावर दया दाखवण्याचं वचन द्या. माझ्या आई-वडिलांना आणि बहीण-भावांना वाचवा.’
हेर तसं वचन देतात. पण राहाबेला काही तरी केलं पाहिजे. हेर म्हणतात: ‘ही लाल दोरी घे नि तुझ्या खिडकीला बांध. आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना तुझ्या घरात गोळा कर. यरीहो सर करण्यासाठी आम्ही येऊ तेव्हा, तुझ्या खिडकीत ही दोरी आम्हाला दिसेल. मग आम्ही तुझ्या घरातल्या कोणालाही मारणार नाही.’ यहोशवाकडे परतल्यावर घडलेल्या सर्व गोष्टी हेर त्याला सांगतात.