कथा ४६
यरीहोचा तट
यरीहोचा हा तट कशामुळे कोसळत आहे? त्याच्यावर जणू बॉम्ब पडल्यासारखं दिसत आहे. पण त्या काळी बॉम्ब नव्हते, आणि बंदुकाही नव्हत्या. तो यहोवाचा आणखी एक चमत्कार होता! तो कसा झाला पाहू या.
ऐका, यहोवा यहोशवाला काय सांगतो: ‘तू आणि तुझी लढाऊ माणसं शहराभोवती प्रदक्षिणा घाला. सहा दिवस त्याच्या भोवती रोज एक प्रदक्षिणा घाला. कराराचा कोश तुमच्या बरोबर न्या. सात याजकांनी त्याच्यापुढे चालत शिंगं फुंकावी.
‘सातव्या दिवशी तुम्ही शहराभोवती सात प्रदक्षिणा घालाव्या. मग शिंगं बराच वेळ वाजवा नि सर्वांचा मोठा रणघोष करवा. म्हणजे तट भुईसपाट होईल!’
यहोशवा आणि सर्व लोक यहोवानं सांगितल्याप्रमाणे करतात. प्रदक्षिणा घालत असताना सर्व जण अगदी गप्प असतात. कोणी चकार शब्द बोलत नाही. फक्त शिंगांचा आणि चालणाऱ्या पायांचा आवाज ऐकू येतो. यरीहोतल्या, देवाच्या लोकांच्या शत्रूंची घबराट उडाली असेल. एका खिडकीतून लटकणारी लाल दोरी तुम्हाला दिसते का? ती कोणाची खिडकी आहे बरं? होय, त्या दोन हेरांनी सांगितलेली गोष्ट राहाबेनं केली आहे. तिचं सर्व कुटुंब आत आहे आणि तिच्याबरोबर, घडणाऱ्या गोष्टी पाहात आहे.
शेवटी, सातव्या दिवशी, शहराभोवती सात वेळा प्रदक्षिणा घातल्यावर शिंगं वाजतात, लोक आरोळी ठोकतात; आणि तट कोसळतो. मग यहोशवा म्हणतो: ‘शहरातल्या प्रत्येकाला ठार करा आणि शहर जाळून टाका. सर्व काही जाळून टाका. फक्त सोनं, रुपं तांबं आणि लोखंड जपा नि यहोवाच्या मंडपाच्या भांडारात जमा करा.’
त्या दोन हेरांना यहोशवा म्हणतो: ‘राहाबेच्या घरात जाऊन, तिला आणि तिच्या सर्व कुटुंबाला बाहेर आणा.’ हेरांनी वचन दिल्याप्रमाणे राहाब आणि तिचं कुटुंब वाचतं.