कथा २७
एक दुष्ट राजा इजिप्तवर राज्य करतो
इथं माणसं लोकांवर कामाची बळजबरी करत आहेत. एका कामकऱ्याला चाबकानं बडवणाऱ्या माणसाकडे पाहा! ते कामकरी याकोबाच्या कुटुंबाचे आहेत. त्यांना इस्राएली म्हणतात. आणि त्यांच्यावर कामाची बळजबरी करणारी माणसं ईजिप्शियन आहेत. इस्राएली ईजिप्शियनांचे गुलाम झाले आहेत. असं कसं झालं?
याकोबाचं मोठं कुटुंब इजिप्तमध्ये अनेक वर्षं सुखासमाधानानं राहिलं. फारो राजाच्या खालोखाल, इजिप्तमध्ये सर्वात महत्त्वाच्या असलेल्या योसेफानं त्यांची देखभाल केली. पण मग योसेफ मरण पावला. आणि ज्याला इस्राएली लोक आवडत नसत, असा नवा फारो इजिप्तचा राजा झाला.
त्यामुळे या दुष्ट फारोनं इस्राएलांना गुलाम केलं. नीच व क्रूर माणसांना त्यानं त्यांच्यावर नेमलं. फारोकरता शहरं बांधण्यासाठी त्यांनी इस्राएलांना खूप कष्ट करायला भाग पाडलं. तरीही इस्राएली लोक संख्येनं वाढतच राहिले. काही काळानं ईजिप्शियनांना भीती वाटायला लागली की, इस्राएली संख्येनं आणि बळानं वरचढ होतील.
फारोनं काय केलं, ते तुम्हाला ठाऊक आहे का? इस्राएली आयांना बाळंतपणात मदत करणाऱ्या बायकांशी तो बोलला आणि म्हणाला: ‘जन्माला येणारा प्रत्येक तान्हा मुलगा तुम्ही मारा.’ पण त्या बायका चांगल्या होत्या. त्या बाळांना मारीनात.
त्यामुळे फारोनं आपल्या लोकांना आज्ञा दिली: ‘तान्ह्या इस्राएली मुलांना न्या आणि मारुन टाका. फक्त तान्ह्या मुलींना जगू द्या.’ अशी आज्ञा देणं भयंकर नव्हतं का? एक तान्हा मुलगा कसा वाचला, ते पाहू या.