कथा ५
खडतर जीवनाची सुरुवात होते
एदेन बागेच्या बाहेर आदाम आणि हव्वेला खूप कष्ट झाले. अन्नाकरता त्यांना अतिशय मेहनत करावी लागली. सुंदर फळझाडांऐवजी त्यांच्या भोवती काटे व कुसळे वाढत असलेली त्यांना दिसली. आदाम आणि हव्वेनं देवाची अवज्ञा करून त्याच्याशी मैत्री तोडल्यावर, त्यांच्यावर अशी वेळ आली.
परंतु त्याहूनही वाईट म्हणजे, आदाम आणि हव्वा मरणाच्या पंथाला लागले. एका विशिष्ट झाडाचं फळ खाल्यास ते मरतील, असा इशारा देवानं त्यांना दिला होता, याची आठवण करा. तेव्हा, ज्या दिवशी त्यांनी फळ खाल्लं, त्याच दिवसापासून ते मरायला लागले. देवाचं न ऐकण्यात त्यांनी किती मूर्खपणा केला होता!
आदाम आणि हव्वेची सर्व मुलं, देवानं त्यांच्या आई-वडिलांना एदेन बागेतून बाहेर घालवून दिल्यावर जन्मली होती. याचा अर्थ, त्या मुलांनाही म्हातारं होऊन मरावं लागणार.
खरोखर, आदाम आणि हव्वेनं यहोवाची आज्ञा मानली असती, तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं जीवन आनंदी झालं असतं. ते सर्व अनंत काळ आनंदात पृथ्वीवर राहिले असते. कोणालाही म्हातारं वा आजारी व्हावं लागलं नसतं अथवा मरावं लागलं नसतं.
लोकांनी अनंत काळ आनंदात जगावं, अशी देवाची इच्छा आहे. आणि एका दिवशी ते तसे राहतील, असं वचन तो देतो. सर्व पृथ्वी सुंदर असेल एवढंच नव्हे, तर सर्व लोकही सुदृढ असतील. तसंच पृथ्वीवरचा प्रत्येक जण इतर प्रत्येकाचा आणि देवाचा चांगला मित्र असेल.
परंतु हव्वेची देवाशी मैत्री राहिली नाही. त्यामुळे, तिनं मुलांना जन्म दिला तेव्हा, ते तिला अवघड गेलं. तिला यातना झाल्या. यहोवाची अवज्ञा करणारी झाल्यामुळे, तिला खचितच खूप दुःखं भोगावी लागली, नाही का?
आदाम आणि हव्वेला अनेक मुलगे व मुली झाल्या. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा, त्यांनी त्याचं नाव काईन असं ठेवलं. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव हाबेल ठेवलं. त्यांचं काय झालं? तुम्हाला माहीत आहे का?