भाग १५
बंदिवासात असलेल्या संदेष्ट्याला भविष्यविषयी दृष्टान्त दिले जातात
दानीएल संदेष्टा देवाच्या राज्याबद्दल व मशीहाच्या आगमनाबद्दल भविष्यवाण्या करतो. बॅबिलोनचे पतन होते
दानीएल नावाच्या एका निष्ठावान तरुणाला, जेरूसलेमचा विनाश होण्यापूर्वीच बंदिवान करून बॅबिलोनला नेण्यात आले. यहूदा राज्याचा पराजय झाल्यानंतर ज्यांना बंदी बनवून नेण्यात आले होते त्या दानीएलाला व इतर काही यहुद्यांना बॅबिलोनमध्ये थोडेफार स्वातंत्र्य देण्यात आले. बॅबिलोनमध्ये घालवलेल्या आपल्या दीर्घायुष्यात दानीएलाने देवाकडून अनेक आशीर्वाद अनुभवले. देवाने त्याला सिंहांच्या गुहेतून वाचवले व त्याला अनेक दृष्टान्त दाखवले. या दृष्टान्तांतून दानीएलाला दूरवरच्या भविष्यातील घटनांचे दर्शन घडले. दानीएलाने केलेल्या अनेक भविष्यावाण्यांपैकी, मशीहाविषयी व त्याच्या शासनाविषयी केलेल्या भविष्यवाण्या सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत.
मशीहा केव्हा येईल याबद्दल दानीएलाला समजते. देवाचे लोक अनेक वर्षांपासून ज्या ‘अभिषिक्त अधिपतीची’ आतुरतेने वाट पाहत होते त्याचे आगमन केव्हा होईल याची अचूक माहिती दानीएलाला देण्यात आली होती—जेरूसलेम शहराची पुनर्स्थापना व शहराच्या तटबंदीची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा होण्यापासून ६९ सप्तकांच्या वर्षांनंतर मशीहाचे आगमन होणार होते. एका सप्तकात सात दिवस असतात. त्याअर्थी, एक सप्तकाचे वर्ष म्हणजे सात वर्षे. जेरूसलेम शहराची पुनर्स्थापना व शहराच्या तटबंदीची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा, दानीएलाच्या बऱ्याच काळानंतर म्हणजे इ.स.पू. ४५५ मध्ये देण्यात आली. तेव्हापासून मोजायला सुरुवात केल्यास ६९ ‘सप्तके’ ४८३ वर्षांपर्यंत चालली आणि इ.स. २९ मध्ये संपली. त्या वर्षी नेमके काय घडले ते या माहितीपत्रकाच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. याशिवाय, मानवांच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून मशीहाचा “वध होईल” हे देखील दानीएलाने दृष्टान्तात पाहिले होते.—दानीएल ९:२४-२६.
मशीहा स्वर्गात राजा बनेल. स्वर्गाच्या एका विलक्षण दृष्टान्तात दानीएलाने मशीहाला—ज्याला “मानवपुत्रासारखा कोणी” असे संबोधले आहे—यहोवाच्या सिंहासनाजवळ येत असल्याचे पाहिले. यहोवाने त्याला “प्रभुत्व, वैभव व राज्य” बहाल केले. त्याचे हे राज्य सदा सर्वकाळ टिकणारे राज्य असेल. मशीही राज्याबद्दल दानीएलाला आणखीन एक रोमांचक गोष्ट समजली आणि ती म्हणजे मशीही राजाबरोबर इतरही काही जण राज्य करतील. त्यांना ‘परात्पर देवाचे पवित्र जन’ असे म्हटले आहे.—दानीएल ७:१३, १४, २७.
मशीही राज्य जगाच्या सर्व सरकारांचा अंत करेल. बॅबिलोनच्या नबुखदनेस्सर राजाला अस्वस्थ करणाऱ्या एका स्वप्नाचा उलगडा करण्याची क्षमता देवाने दानीएलाला दिली. या स्वप्नात राजाने एक भव्य पुतळा पाहिला होता. पुतळ्याचे डोके सोन्याचे, छाती व हात रुप्याचे, पोट व मांड्या पितळेच्या, पाय लोखंडाचे व पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही भाग मातीचा होता. मग डोंगरातून एक मोठा दगड आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या ठिसूळ पावलांवर आदळून पुतळ्याचा चुराडा झाला. दानीएलाने स्पष्टीकरण दिले, की पुतळ्याचे हे निरनिराळे भाग, एकापाठोपाठ एक येणाऱ्या अनेक जागतिक साम्राज्यांना सूचित करतात. त्यांपैकी पहिला भाग अर्थात सोन्याचे डोके बॅबिलोनला सूचित करते. दानीएलाने दृष्टान्तात पाहिले की, या दुष्ट जगावर शासन करणाऱ्या शेवटच्या साम्राज्याच्या शासनकाळादरम्यान देवाचे राज्य हस्तक्षेप करेल व जगातल्या सर्व सरकारांना चिरडून टाकेल. त्यानंतर ते सदासर्वकाळ राज्य करेल.—दानीएल अध्याय २.
अतिशय वृद्ध झालेला दानीएल बॅबिलोनच्या पतनाचा साक्षीदार होता. संदेष्ट्यांनी भाकीत केल्याप्रमाणे कोरेश राजाने बॅबिलोन शहर उलथवून टाकले. याच्या काही काळानंतरच, यहुद्यांची अखेरीस बंदिवासातून सुटका झाली. ७० वर्षांपर्यंत त्यांचा मायदेश ओसाड राहील व त्यानंतर त्यांची सुटका होईल असे जे भाकीत करण्यात आले होते त्यानुसार अगदी नेमक्या वेळी त्यांची सुटका झाली. अनेक विश्वासू प्रांताधिकारी, याजक व संदेष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली यहुद्यांनी शेवटी जेरूसलेम शहराची पुनर्बांधणी केली आणि तेथील यहोवाच्या मंदिराचीही पुनर्स्थापना केली. पण, भविष्यवाणीतील ४८३ वर्षांच्या समाप्तीस काय घडणार होते?
—दानीएल या पुस्तकावर आधारित.