भाग १४
देव आपल्या भविष्यवक्त्यांद्वारे संदेश कळवतो
न्यायदंडाविषयी, शुद्ध उपासनेविषयी आणि मशीहाद्वारे मिळणाऱ्या आशीर्वादांविषयी संदेश देण्यासाठी यहोवा भविष्यवक्त्यांना नेमतो
इस्राएल व यहूदातील राजांच्या कारकीर्दीत, यहोवाने एका खास गटाचा—भविष्यवक्ते किंवा संदेष्टे यांचा उपयोग केला. हे देवावर उल्लेखनीय विश्वास असलेले निर्भय पुरुष होते व त्यांनी लोकांना देवाचे न्यायसंदेश कळवले. ज्या चार मुख्य विषयांसंबंधी देवाच्या संदेष्ट्यांनी भविष्यवाण्या केल्या होत्या त्यांविषयी पाहू या.
१. जेरूसलेमचा नाश. फार पूर्वीच, देवाच्या संदेष्ट्यांनी, खासकरून यशया आणि यिर्मया यांनी जेरूसलेमला उद्ध्वस्त केले जाईल व हे शहर ओसाड होईल अशी चेतावणी देण्यास सुरुवात केली. या शहरावर देवाचा रोष का ओढवला होता याबद्दल त्यांनी अतिशय बोलक्या शब्दांत वर्णन केले. या शहरातील लोक स्वतःला देवाचे लोक म्हणवत. पण, त्यांच्या खोट्या धार्मिक प्रथा, भ्रष्टाचार आणि हिंसा यांतून मात्र हे साफ खोटे असल्याचे त्यांनी दाखवले.—२ राजे २१:१०-१५; यशया ३:१-८, १६-२६; यिर्मया २:१–३:१३.
२. शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना. सत्तर वर्षे बॅबिलोनमध्ये बंदिवासात राहिल्यावर, देवाच्या लोकांना तेथून मुक्त करण्यात येईल. ते ओसाड पडलेल्या आपल्या देशात परत येतील आणि जेरूसलेममधील देवाच्या मंदिराची पुनर्बांधणी करतील. (यिर्मया ४६:२७; आमोस ९:१३-१५) बॅबिलोनचा पाडाव करून देवाच्या लोकांना शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना करण्याची अनुमती देणाऱ्या विजयी राजाचे नाव कोरेश असेल हे देखील यशयाने २०० वर्षांआधीच सांगितले होते. जेरूसलेम शहरावर कब्जा करण्यासाठी कोरेश कोणती युक्ती करेल हे देखील यशयाने तपशीलवार सांगितले.—यशया ४४:२४–४५:३.
३. मशीहाचे प्रकट होणे व त्याला येणारे अनुभव. मशीहाचा जन्म बेथलेहेम या नगरात होईल. (मीखा ५:२) तो नम्र असेल आणि गाढवावर बसून जेरूसलेम शहरात प्रवेश करेल. (जखऱ्या ९:९) तो सौम्य व दयाळू असला तरीही त्याचा द्वेष केला जाईल व अनेक जण मशीहा म्हणून त्याचा स्वीकार करणार नाहीत. (यशया ४२:१-३; ५३:१, ३) त्याला क्रूरपणे जिवे मारण्यात येईल. याचा अर्थ मशीहा कायमचा काळाच्या पडद्याआड जाईल का? नाही, कारण त्याच्या बलिदानाद्वारे अनेकांच्या पापांची क्षमा होणार होती. (यशया ५३:४, ५, ९-१२) आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी त्याचे पुनरुत्थान होणे म्हणजेच तो पुन्हा जिवंत होणे आवश्यक होते.
४. पृथ्वीवरील प्रजाजनांवर मशीहाचे राज्य. अपरिपूर्ण असल्यामुळे मानव शांतीने जगाचा कारभार चालवण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. पण, त्या उलट मशीही राजाला मात्र शांतीचा अधिपती म्हटले जाईल. (यशया ९:६, ७; यिर्मया १०:२३) त्याच्या राज्यात सर्व मानव एकमेकांशी, इतकेच काय तर प्राण्यांशीही शांती व सलोख्याने राहतील. (यशया ११:३-७) रोगराईचे अस्तित्व मिटून जाईल. (यशया ३३:२४) मृत्यूचेही नामोनिशाण कायमचे मिटवले जाईल. (यशया २५:८) मशीहाच्या शासनादरम्यान मृतांना पृथ्वीवर जगण्यासाठी पुन्हा जिवंत केले जाईल.—दानीएल १२:१३.
—यशया, यिर्मया, दानीएल, आमोस, मीखा आणि जखऱ्या या पुस्तकांवर आधारित.