पहिला अनर्थ—टोळ
अध्याय २२
पहिला अनर्थ—टोळ
१. देवदूत कर्ण्याचा नाद करतात तेव्हा त्याचा पाठपुरावा कोण करतात आणि पाचव्या कर्ण्याचा निनाद काय घोषित करतो?
आता पाचवा देवदूत त्याचा कर्णा वाजविण्यासाठी सिद्ध होतो. चार स्वर्गीय कर्णे तर आधीच निनादले आहेत व त्या चार पीडा पृथ्वीच्या तिसऱ्या भागावर, ज्याला यहोवा अत्यंत दोषास्पद मानतो त्या ख्रिस्ती धर्मजगतावर ओतण्यात आल्या आहेत. त्याचा मृतप्राय आजार उघडा करण्यात आला आहे. स्वर्गातील देवदूत आपल्या कर्ण्याचा निनाद करतात तसे मानवी घोषक त्याचा पृथ्वीवर पाठपुरावा करतात. आता पाचव्या देवदूताचा कर्णा वाजण्याच्या बेतात आहे व तो पहिला अनर्थ घोषित करणार आहे. हा अनर्थ आधी घडलेल्या अनर्थांपेक्षा भयानक आहे. तो भयंकर टोळांच्या पीडेशी संबंधित आहे. तरीपण आपण आधी इतर काही शास्त्रवचनांचे परीक्षण करून पाहू म्हणजे आपल्याला या पीडेची चांगली समज होऊ शकेल.
२. योहान बघतो तशीच टोळांची पीडा बायबलमधील कोणते पुस्तक सांगते आणि तिचा प्राचीन इस्राएलावर कसा परिणाम झाला?
२ योएल हे सा. यु. पूर्वी नवव्या शतकात लिहिण्यात आलेले बायबलमधील पुस्तक, प्रकटीकरणात योहान बघतो तशाच किड्यांच्या व टोळांच्या पीडेचे वर्णन देते. (योएल २:१-११, २५) * त्यामुळे धर्मत्यागी इस्राएलांना खूपच अस्वस्थ केले जाणार होते; पण हेच काही विशिष्ट यहूद्यांच्या पश्चात्तापास कारणीभूत होऊन त्यांना यहोवाच्या कृपेत परतण्याची चालना देणारे ठरणार होते. (योएल २:६, १२-१४) ती वेळ आली म्हणजे, यहोवा आपला आत्मा “मनुष्यमात्रावर” पाठविणार होता; तेव्हा “परमेश्वराचा [यहोवा, NW] महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी” भयानक चिन्हे व धोक्याच्या सूचना देणारी लक्षणे दिसणार होती.—योएल २:११, २८-३२.
पहिल्या शतकातील पीडा
३, ४. (अ) योएलच्या २ ऱ्या अध्यायाची पूर्णता केव्हा झाली व कशी? (ब) पहिल्या शतकात टोळधाडीसारखी पीडा कशी आली व ती पीडा किती काळ चालू राहिली?
३ योएलच्या २ ऱ्या अध्यायाची पूर्णता पहिल्या शतकात झाली. सा. यु. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या वेळी पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊन पहिल्या ख्रिश्चनांचा अभिषेक होऊन त्यांना “देवाची महत्कृत्ये” पुष्कळ भाषेत वदविण्यास समर्थ केले गेले. यामुळे, मोठा जमाव एकत्रित झाला. त्या विस्मित जमावाला संबोधून प्रेषित पेत्राने योएल २:२८, २९ चा उल्लेख करुन, ते त्याची पूर्णता पाहात असल्याचे स्पष्ट केले. (प्रेषितांची कृत्ये २:१-२१) पण त्या वेळी, कोणा खरोखरीच्या किड्यांची पीडा उद्भवून त्यामुळे काहींना अस्वस्थ बनविण्यात आले व काहींना पश्चात्तापाप्रत निरवले गेले असा अहवाल नाही.
४ पण त्या काळी लाक्षणिक पीडा घडली का? होय, घडली! ती नव्या अभिषिक्त जणांच्या पराकाष्ठेच्या प्रचारकार्यामुळे उद्भवली. * त्यांच्याद्वारे यहोवाने यहूद्यांना ऐकण्याचे, पश्चात्तापी होण्याचे व त्याच्या आशीर्वादांचा आनंद मिळवून घेण्याचे निमंत्रण दिले. (प्रेषितांची कृत्ये २:३८-४०; ३:१९) ज्यांनी असा प्रतिसाद दाखविला त्यांना त्याच्या कृपेचा अपूर्व लाभ मिळाला. पण ज्यांनी या निमंत्रणाचा धिक्कार केला अशांना पहिल्या शतकातील ख्रिस्ती, उद्ध्वस्त करुन टाकणाऱ्या टोळधाडीसारखे झाले. ते यरुशलेमेपासून आरंभ करुन सर्व यहूदीया व शोमरोन येथे पसरले. लवकरच ते सर्वत्र गेले आणि येशूचे पुनरुत्थान व त्यामागील अर्थसूचकता याची जाहीर घोषणा करून विश्वास न राखणाऱ्या यहूद्यांना पीडा देत राहिले. (प्रेषितांची कृत्ये १:८; ४:१८-२०; ५:१७-२१, २८, २९, ४०-४२; १७:५, ६; २१:२७-३०) ही पीडा सा. यु. ७० मध्ये ‘भयप्रेरित’ दिवस येईपर्यंत चालू राहिली. तेव्हा यहोवाने यरुशलेमेवर रोमी सैन्य आणून त्याचा नाश केला. अशावेळी ज्यांनी यहोवाचे नाव घेऊन त्याचा विश्वासाने धावा केला अशा ख्रिश्चनांचाच बचाव झाला.—योएल २:३२; प्रेषितांची कृत्ये २:२०, २१; नीतीसूत्रे १८:१०.
२० व्या शतकातील पीडा
५. योएलच्या भविष्यवादाची पूर्णता १९१९ पासून कशी झाली?
५ योएलच्या भविष्यवादाची या शेवटल्या काळी अंतिम पूर्णता होण्याचे आम्हाला व्यवहार्यपणे अपेक्षिता येईल. हे केवढे खरे शाबीत झाले! अमेरिकेत सीडर पॉईंट, ओहायो येथे सप्टेंबर १-८, १९१९ दरम्यान बायबल विद्यार्थ्यांच्या अधिवेशनात, यहोवाच्या आत्म्याचा वर्षाव लक्षवेधकरीतीने त्याच्या लोकांवर घडला जाऊन त्यांना पृथ्वीव्यापी प्रचाराच्या मोहीमेसाठी संघटित करण्यात आले. ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्यांमध्ये केवळ यांनीच येशूला स्वर्गीय राजा नियुक्त केले असल्याचे जाणून घेतल्यामुळे, ही सुवार्ता सर्वत्र घोषित करण्यामध्ये कोणताही प्रयत्न मागे सोडला नाही. भविष्यवादाच्या पूर्णतेला अनुलक्षून त्यांचे पराकाष्ठेचे प्रचारकार्य धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताला यातनाकारक पीडा देणारे ठरले.—मत्तय २४:३-८, १४; प्रेषितांची कृत्ये १:८.
६. (अ) पाचव्या देवदूताने कर्णा वाजविल्यावर योहानाने काय बघितले? (ब) हा “तारा” कोणास सूचित करतो व का?
६ यरुशलेमेच्या नाशाच्या २६ वर्षानंतर लिहिण्यात आलेले प्रकटीकरण देखील अशा पीडेचा उल्लेख करते. हा अहवाल, योएलने ज्याबद्दलचे वर्णन दिले त्यामध्ये आणखी कशाची भर घालतो? आपण ते पाहू या. योहानाने कळवलेला तो अहवाल म्हणतो: “पाचव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली.” (प्रकटीकरण ९:१) हा “तारा,” योहानाने प्रकटीकरण ८:१० मध्ये पाहिलेल्या, खाली पडत असणाऱ्या ताऱ्यापेक्षा भिन्न आहे. तो आताचा “तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला” बघतो ते या अर्थी की, त्याला या पृथ्वीसंबंधाने काही कामगिरी देण्यात आलेली आहे. ही आत्मिक की, शारीरिक व्यक्ती आहे? त्याच्याजवळ “अथांग डोहाची किल्ली” आहे असे सांगितले गेले आहे तोच, नंतर सैतानाला या “अथांग डोहात” टाकीत असल्याचे वर्णन दिलेले आहे. (प्रकटीकरण २०:१-३) या कारणास्तव, ती महाप्रबळ आत्मिक व्यक्ती असली पाहिजे. प्रकटीकरण ९:११ मध्ये योहान आम्हास सांगतो की, टोळांवर “अथांग डोहाचा दूत” हा राजा आहे. ही दोन्ही वचने एकाच व्यक्तीला अनुलक्षून असली पाहिजेत, कारण ज्याच्यापाशी अथांग डोहाची किल्ली आहे, तोच अथांग डोहाचा दूतही असू शकतो हे साहजिक आहे. या कारणास्तव, तो तारा यहोवाच्या नियुक्त राजाला सूचित असला पाहिजे, कारण अभिषिक्त ख्रिस्तीजन, येशू ख्रिस्त या एकाच देवदूतीय राजाला आपली मान्यता दर्शवून आहेत.—कलस्सैकर १:१३; १ करिंथकर १५:२५.
७. (अ) “अथांग डोह” उघडल्यावर काय घडते? (ब) “अथांग डोह” म्हणजे काय व तेथे कोणी थोडा वेळ घालविला?
७ अहवाल पुढे सांगतो: “त्याने अथांग डोह उघडला, तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले; त्यांस पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ति देण्यात आली.” (प्रकटीकरण ९:२, ३) “अथांग डोह” हे शास्त्रवचनीय दृष्ट्या अक्रियाक स्थितीचे स्थळ, मृतांची स्थिती आहे. (पडताळा रोमकर १०:७; प्रकटीकरण १७:८; २०:१, ३.) पहिल्या महायुद्धाची समाप्ती (१९१८-१९) झाली तेव्हा येशूच्या भावांच्या छोट्या गटाला ही ‘अथांग डोहासारखी’ अक्रियाक स्थिती तात्पुरती अनुभवण्यास मिळाली. पण १९१९ मध्ये यहोवाने पश्चात्तापी सेवकांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव केला तेव्हा, ते पुढे उभे ठाकलेल्या कामाच्या आव्हानास तोंड देण्यास पुढे सरसावले.
८. टोळांची सुटका ‘धुराच्या’ लोटासोबत होते हे कसे काय?
८ योहान बघतो त्याप्रमाणे, टोळ पुष्कळ धुरासकट बाहेर पडतात. हा धूर “भट्टीच्या धुरासारखा” होता. * तेच १९१९ मध्ये दिसून आले. ख्रिस्ती धर्मजगत तसेच सर्वसाधारण जगाची स्थिती एकंदरीत अंधकारमय झाली. (पडताळा योएल २:३०, ३१.) टोळ म्हणजे योहान वर्गाची सुटका ही ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्यांचा पराजय ठरला; कारण या धर्मपुढाऱ्यांनी राज्याचे काम कायमचे बंद पाडायचे ठरवले होते व त्यांचा देवाच्या राज्याला विरोध होता. त्या छोट्या टोळगटाला ईश्वरी अधिकार मिळाले व त्याचा उपयोग त्याने प्रभावी न्यायदंड घोषित करण्यासाठी केला तेव्हा धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगतावर जणू धूर चढू लागला. ख्रिस्ती धर्मजगताचा “सूर्य”—त्याचा प्रज्वलितपणा—याला ग्रहण लागले आणि जेव्हा ख्रिस्ती धर्मजगताचा देव हा या जगाच्या “अंतरिक्षातील राज्याचा अधिपती” आहे असे ईश्वरी न्यायदंडाच्या घोषणेद्वारे कळविले गेले तेव्हा ख्रिस्ती धर्मजगताचे ‘अंतरिक्ष’ अधिकच काळोखी बनले.—इफिसकर २:२; योहान १२:३१; १ योहान ५:१९.
ते पीडा देणारे टोळ!
९. त्या टोळांना लढाईच्या कसल्या सूचना मिळाल्या?
९ त्या टोळांना लढाईसंबंधाने कोणत्या सूचना मिळतात? योहान कळवतो: “त्यांस असे सांगण्यात आले की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याहि हिरवळीला व कोणत्याहि झाडाला उपद्रव करु नये; तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना जिवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते; त्यापासून होणारी पीडा, विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती. त्या दिवसात माणसे मरणाची संधि शोधतील तरी ती त्यांना येणार नाही; मरावयाची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.”—प्रकटीकरण ९:४-६.
१०. (अ) ही पीडा प्रामुख्यत्वे कोणाविरुद्ध फर्मावण्यात आली आहे आणि याचा त्यांजवर कोणता परिणाम घडला? (ब) यात कोणत्या यातनेचा समावेश आहे? (तळटीप देखील बघा.)
१० ही पीडा प्रथम लोक किंवा प्रमुख जनांविरुद्ध—‘पृथ्वीवरील हिरवळ किंवा झाड’—यांच्याविरुद्ध फर्मावण्यात आली नाही, हे लक्षात घ्या. (पडताळा प्रकटीकरण ८:७.) तर ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही, जे ख्रिस्ती धर्मजगतामध्ये आहेत आणि आपणावर शिक्का झाल्याचे म्हणतात; पण ज्यांचा दावा खोटा आहे अशा लोकांना पीडित करण्याचे टोळांना सांगण्यात आले. (इफिसकर १:१३, १४) अशाप्रकारे आधुनिक काळातील टोळांनी आपला यातनामय संदेश प्रथम ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्यांविरुद्ध वदविला. आपल्या कळपाला स्वर्गाप्रत निरवण्याला हे धर्मपुढारी अपयशी ठरले आहेत, इतकेच नव्हे तर ते स्वतः देखील तेथे नसणार हा जाहीरपणे वदविलेला संदेश ऐकून त्या स्वमताभिमानी लोकांना केवढ्या यातना झाल्या असतील! * खरेच, ही गोष्ट म्हणजे, ‘अंधळ्याला अंधळा घेऊन जाण्यासारखी’ आहे!—मत्तय १५:१४.
११. (अ) ते टोळ देवाच्या शत्रूंना किती काळ पीडा देणार आणि हा थोडा काळ का नाही? (ब) ही पीडा केवढी तीव्र आहे?
११ ती पीडा पाच महिन्यासाठी होती असे सांगण्यात आले. तुलनात्मकरित्या हा खूपच कमी काळ वाटतो का? खरोखरीच्या टोळाच्या दृष्टीने पाहिल्यास, तो तसा वाटत नाही. पाच महिने या किटकांचा सर्वसाधारण आयुष्याचा काळ असतो. या कारणास्तव, आधुनिक टोळ आपल्या हयातीभर देवाच्या शत्रूंना दंश देत राहतात. ही पीडा इतकी तीव्र आहे की, लोकांना मरण कधी येईल असे वाटते. हे खरे की, ज्यांना टोळांनी बाधा केली आहे अशांनी खरोखरीच आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असा कसलाही अहवाल नाही. पण हा दाखला त्या पीडेची तीव्रता आपल्या लक्षात आणतो—तो दंश जणू विंचवांनी पराकाष्ठेने केलेला दंश होय. ही पीडा, यिर्मया संदेष्ट्याने अविश्वासू इस्राएल लोकांना मिळणाऱ्या त्रासाबद्दल जे पूर्वदृश्य पाहिले होते, त्यासारखी आहे. त्यांची बाबेलोनी विजेत्यांमार्फत पांगापांग केली जाणार होती आणि त्यांना जगण्यापेक्षा मरणे बरे, असे वाटणार होते.—यिर्मया ८:३; तसेच उपदेशक ४:२, ३ देखील पहा.
१२. टोळांना, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्यांना आध्यात्मिक अर्थाने पीडा देण्याचे, पण ठार न मारण्याचे का सांगण्यात आले?
१२ त्यांना आध्यात्मिक रितीने केवळ पीडा देण्याचे व ठार न करण्याचे का सोपवले होते? हा तर केवळ सुरवातीचा अनर्थ आहे, ज्यात ख्रिस्ती धर्मजगताच्या लबाड्या व त्याचे अपयश हे उघड करण्यात आले आहे; नंतर, प्रभूच्या दिवसात पुढे गेल्यावर त्याची मरणप्राय आध्यात्मिक स्थिती पूर्णपणे जाहीर केली जाणार होती. दुसऱ्या अनर्थाच्या वेळी एकतृतीयांश माणसांचा संहार होतो.—प्रकटीकरण १:१०; ९:१२, १८; ११:१४.
टोळांची लढाईसाठी सज्जता
१३. त्या टोळांचे स्वरुप कसे आहे?
१३ या टोळांचे स्वरुप देखील केवढे अप्रतिम आहे! योहान त्याचे असे वर्णन देतो: “त्या टोळांचे स्वरूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुगुटासारखे काहीतरी दिसत होते. त्यांचे तोंडवळे माणसांसारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि त्यांचे दात सिंहांच्या दातांसारिखे होते. त्यांस उरस्त्राणे होती ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता.”—प्रकटीकरण ९:७-९.
१४. योहानाने टोळांचे केलेले वर्णन १९१९ मध्ये पुनरुज्जीवित झालेल्या ख्रिश्चनांच्या गटाला का जुळणारे आहे?
१४ हे १९१९ मध्ये पुनरुज्जीवित झालेल्या ख्रिश्चनांच्या निष्ठावंत गटाला हुबेहुब सादर करते. घोड्यांप्रमाणेच ते लढाईसाठी तयार होते आणि प्रेषित पौलाने वर्णिल्याप्रमाणे सत्यासाठी लढत देण्याला उत्सुक होते. (इफिसकर ६:११-१३; २ करिंथकर १०:४) त्यांच्या डोक्यावर योहान बघतो की, जणू सोन्या सारखे दिसणारे मुकुट होते. ते अद्याप पृथ्वीवर असताना राज्य करण्याचे सुरु करीत नसल्यामुळे त्यांच्यासाठी खरोखरीचे मुकुट घालणे योग्यतेचे नव्हते. (१ करिंथकर ४:८; प्रकटीकरण २०:४) पण १९१९ मध्ये त्यांनी आधीच आपले बादशाही स्वरुप घेतले होते. ते राजाचे भाऊ होते आणि शेवटपर्यंत विश्वासू राहिल्यास त्यांच्यासाठी स्वर्गीय मुकुट राखून ठेवण्यात आलेले होते.—२ तीमथ्य ४:८; १ पेत्र ५:४.
१५. टोळांची (अ) लोखंडी उरस्त्राणे, (ब) माणसांसारखे तोंडवळे, (क) स्त्रियांसारखे केस, (ड) सिंहांसारखे दात आणि (ई) आवाज करणे याद्वारे काय सूचित होते?
१५ दृष्टांतात टोळांना लोखंडी उरस्त्राण आहेत, जे त्यांच्या अतूट नीतीमत्तेला सूचित करते. (इफिसकर ६:१४-१८) त्यांना माणसासारखा तोंडावळा आहे जो, प्रेमाच्या गुणाकडे निर्देश करतो, कारण माणसाची घडण प्रेमस्वरुप देवाच्या प्रतिमेप्रमाणे झाली आहे. (उत्पत्ती १:२६; १ योहान ४:१६) त्यांचे केस स्त्रियांच्या केसाप्रमाणे लांब आहेत, हे ते, राजास, अथांग डोहाच्या दूताला आपली अधीनता दाखवून असल्याचे चांगले चित्रित करते. त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे आहेत. सिंह आपल्या दातांचा उपयोग मांस फाडण्यासाठी करतो. योहान वर्ग १९१९ पासून पुढे, पुन्हा आध्यात्मिक जडान्न घेऊ लागला. यामध्ये “यहूदा वंशाचा सिंह,” येशू ख्रिस्ताद्वारे वर्चस्व केल्या जाणाऱ्या देवाच्या राज्याचे सत्य खासपणे समाविष्ट आहे. सिंह धैर्याचे प्रतीक आहे तसे हा कठीण संदेश पचविण्यासाठी आणि ते प्रकाशनात लिखाणाद्वारे उतरवून व सबंध पृथ्वीभर वितरीत करण्यासाठीदेखील मोठे धैर्य जरुरीचे भासले. त्या लाक्षणिक टोळांनी “लढाईत धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा” आवाज केला. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांच्या उदाहरणानुरुप ते आता शांत बसत नाहीत.—१ करिंथकर ११:७-१५; प्रकटीकरण ५:५.
१६. टोळांना “विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत,” यात कसली अर्थसूचकता दिसते?
१६ अशा प्रचारात केवळ बोललेल्या शब्दांपेक्षा अधिक गोवलेले आहे! “त्यांस विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसांस पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ति त्यांच्या शेपटात आहे.” (प्रकटीकरण ९:१०) याचा काय अर्थ होतो? ते आपले राज्याचे प्रचार कार्य करीत असताना यहोवाचे साक्षीदार आपणामागे पुस्तके, नियतकालिके, माहितीपत्रके, समयोचित पत्रिका सोडतात. यात, लोकांनी आपल्या घरी बसून वाचावीत अशी देवाच्या वचनावर आधारित अधिकारयुक्त विधाने आहेत. त्यांना विंचवांसारख्या नांग्या आहेत कारण ते यहोवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करतात. (यशया ६१:२) या आध्यात्मिक टोळांच्या सध्याच्या पीढीचे आयुष्यमान संपण्याआधीच त्यांचे यहोवाचे न्यायदंड घोषित करण्याचे ईश्वरनियुक्त कार्य पूर्ण होईल व ते सर्व ताठ मानेच्या निंदकांना मोठी इजा देईल.
१७. (अ) बायबल विद्यार्थ्यांच्या १९१९ मधील अधिवेशनात कशाची घोषणा झाली, ज्यामुळे त्यांच्या साक्षकार्याच्या दंशाची तीव्रता अधिकच प्रखर बनली? (ब) पाळकांना कशा यातना दिल्या गेल्या व त्यांनी कोणती प्रतिक्रिया दाखवली?
१७ टोळांच्या १९१९ मधील अधिवेशनात द गोल्डन एज हे नवे नियतकालिक प्रकाशित करण्यात आले तेव्हा त्यांच्या तुकडीला खूप आनंद झाला. हे आठवड्यातून दोनदा निघणारे नियतकालिक होते, ज्याचा हेतू त्यांच्या साक्षकार्यातील दंशाची तीव्रता अधिक वाढविणे हा होता. * सप्टेंबर २९, १९२० च्या त्याच्या २७ व्या अंकात अमेरिकेत १९१८-१९ दरम्यान बायबल विद्यार्थ्यांचा छळ करण्यामागील धर्मपुढाऱ्यांचा दुटप्पीपणा उघड करण्यात आला. १९२० ते १९३० शतकातील काळात या द गोल्डन एज नियतकालिकाने धर्मपुढाऱ्यांना दंशपूर्ण लेख व व्यंगचित्रांद्वारे जबर यातना दिल्या; याद्वारे त्यांचे राजकारणात लुडबुडणे, खासपणे फॅसिस्ट व नात्सी हुकुमशहांसोबत कॅथलिक साम्राज्याने जे संगनमत राखले होते ते उघड करण्यात आले. यामुळे क्रोधित होऊन धर्मपुढाऱ्यांनी ‘कायद्याकरवी कुरापती’ काढल्या आणि देवाच्या लोकांविरुद्ध जमावांचा हिंसाचार संघटित केला.—स्तोत्र ९४:२०, किंग जेम्स व्हर्शन.
जागतिक नेत्यांना नोटिसा दिल्या गेल्या
१८. टोळांना कोणते काम करायचे होते आणि पाचव्या कर्ण्याच्या नादास अनुलक्षून काय घडले?
१८ आधुनिक काळातील टोळांना एक काम करायचे होते. राज्याच्या सुवार्तेचा त्यांना प्रचार करायचा होता. चुका उघड करुन दाखवायच्या होत्या. हरवलेल्या मेंढरांचा शोध घ्यायचा होता. हे टोळ आपल्या कामासाठी दूरवर भ्रमण करू लागले तेव्हा जगाला बसून त्याची दखल घ्यावी लागली. देवदूताच्या कर्ण्याच्या नादास अनुलक्षून योहान वर्गाने ख्रिस्ती धर्मजगताविरुद्ध यहोवाचे प्रतिकूल न्यायदंड घोषित करण्याचे चालूच ठेवले. या पाचव्या कर्ण्याला प्रतिसाद म्हणून मे २५-३१, १९२६ मध्ये लंडन, इंग्लंड येथील बायबल विद्यार्थ्यांच्या अधिवेशनात या न्यायदंडाच्या एका विशिष्ट पैलूवर जोर देण्यात आला. यामध्ये “ए टेस्टमनी टू द रुलर्स ऑफ द वर्ल्ड” हा ठराव प्रस्तुत करण्यात आला व रॉबर्ट अल्बर्ट हॉलमध्ये “जागतिक सत्ता का कोलमडत आहेत—उपाय” हे जाहीर भाषण दिले गेले. या दोहोचा संपूर्ण मजकूर दुसऱ्या दिवशी लंडनच्या प्रमुख वर्तमानपत्रात छापण्यात आला. नंतर त्या टोळाच्या तुकडीने जगभर त्या ठरावाच्या ५ कोटी प्रतींचे वितरण केले—ही धर्मपुढाऱ्यांना केवढी यातना मिळाली! कित्येक वर्षानंतर देखील इंग्लंडमधील लोक अद्याप त्या दंशपूर्ण यातनेबद्दल बोलत होते.
१९. लाक्षणिक टोळांना लढाईचे आणखी कोणते उपकरण मिळाले, त्यात लंडन जाहीरनाम्याबद्दल काय म्हणण्यात आले?
१९ याच अधिवेशनात त्या लाक्षणिक टोळांना लढाईचे आणखी एक उपकरण एका लक्षवेधी नव्या पुस्तकाच्या रुपात मिळाले, त्याचे नाव मुक्तता (इंग्रजी) असे होते. या पुस्तकात, ‘पुसंतान’ सरकार, ख्रिस्ताचे स्वर्गीय राज्य, याचा जन्म झाल्याचे चिन्ह १९१४ मध्ये पूर्ण झाल्याची स्पष्टता करण्यात आली. (मत्तय २४:३-१४; प्रकटीकरण १२:१-१०) यानंतर त्यात लंडनमध्ये १९१७ मध्ये आठ धर्मपुढाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे अवतरण देण्यात आले. हे धर्मपुढारी “जगातील मोठे प्रचारक” आहेत असे त्यांच्याबद्दल सांगण्यात आले होते. यात बॅप्टिस्ट, काँग्रिगेशनल, प्रेसबिटेरियन, एपिस्कोपेलियन आणि मेथॉडिस्ट या प्रमुख प्रॉटेस्टंट पंथाचे प्रतिनिधी होते. त्या जाहीरनाम्याने घोषित केले की, “सध्याची आणीबाणीची स्थिती विदेश्यांच्या काळाची समाप्ती जवळ आल्याचे सुचविते” आणि “प्रभूचे प्रगट होणे हे कोणत्याही क्षणी घडू शकते.” होय, त्या धर्मपुढाऱ्यांनी येशूच्या उपस्थितीचे चिन्ह ओळखले होते! पण याबद्दल काही करण्याची त्यांची इच्छा होती का? मुक्तता हे पुस्तक कळवते: “यात लक्षणीय मुद्दा असा की, ज्यांनी या जाहीरनाम्यास आपली स्वाक्षरी दिली होती त्यांनीच त्याबद्दल त्याग दर्शविला आणि आम्ही या जगाच्या शेवटाला आलो आहोत व प्रभूच्या दुसऱ्या उपस्थितीचा दिवस आला आहे याचा पुरावा धिक्कारला.”
२०. (अ) टोळांची तुकडी व त्यांचा राजा यासंबंधाने पाळकांनी कोणती निवड पसंद केली? (ब) टोळांच्या तुकडीवर कोण असल्याचे योहान सांगतो व त्याचे नाव काय आहे?
२० देवाच्या येत असलेल्या राज्याबद्दल घोषणा करण्याऐवजी ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मपुढाऱ्यांनी सैतानी जगाबरोबर राहण्याचे पसंत केले. टोळाची तुकडी व त्यांचा राजा यांजबरोबर कसलाही संबंध ठेवण्याची त्यांनी इच्छा दर्शविली नाही. योहान पुढे कळवतो: “अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे; इब्री भाषेतले त्याचे नाव अबद्दोन [म्हणजे, “नाश”], आणि हेल्लेणी भाषेतले त्याचे नाव अपल्लूओन [म्हणजे, “नाश करणारा”] आहे.” (प्रकटीकरण ९:११) “अथांग डोहाचा दूत” व “नाश करणारा” या नात्याने येशूने खऱ्या अर्थाने ख्रिस्ती धर्मजगतावर पीडादायक अनर्थ येऊ दिला. पण अद्याप पुष्कळ बाकी आहे!
[तळटीपा]
^ योएल २:४, ५, ७ ची तुलना (येथे या किड्यांचे वर्णन घोडे, लोक व समुदायासोबत व रथाच्या आवाजासोबत केलेली आहे) प्रकटीकरण ९:७-९ सोबत करा; तसेच योएल २:६, १० (किड्यांच्या पीडेमुळे होणारे वेदनादायक परिणाम) याची तुलना प्रकटीकरण ९:२, ५ सोबत करा.
^ द वॉचटावर नियतकालिकाच्या डिसेंबर १, १९६१ मधील “युनायटेड अगेन्स्ट नेशन्स इन द वॅली ऑफ डिसिजन” हा लेख पहा.
^ अथांग डोह हा अग्नीनरक असून त्यात आगीचा डोंब आहे हे सिद्ध करण्यासाठी हे शास्त्रवचन वापरता येत नाही. योहान म्हणतो की, त्याने मोठ्या भट्टीच्या धुरा ‘सारखा’ किंवा तसा धूर पाहिला. (प्रकटीकरण ९:२) त्या अथांग डोहात खरोखरीच्या अग्नीज्वाळा दिसल्याचे तो कळवीत नाही.
^ येथे वापरण्यात आलेला ग्रीक शब्द, बासानिझो या मूळ शब्दापासून आहे, ज्याचा कधी कधी खरीखुरी यातना असा अर्थ होतो; तथापि, तो मानसिक यातना दर्शवण्यासाठीही वापरता येऊ शकतो. उदाहरणार्थ, २ पेत्र २:८ मध्ये आम्ही वाचतो की, लोटाने सदोमात जी दुष्टाई बघितली तिजमुळे “त्याचा धर्मशील जीव . . . पीडादायक होत होता.” (NW) प्रेषितांच्या काळात देखील धार्मिक पुढाऱ्यांनी मानसिक पीडा अनुभवली होती; पण ती, अर्थातच, वेगळ्या कारणासाठी होती.
^ सध्या पंधरवड्याला प्रकाशित होणाऱ्या या नियतकालिकाला १९३७ मध्ये काँसोलेशन आणि १९४६ मध्ये अवेक! असे नाव देण्यात आले.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४३ पानांवरील चित्रे]
पाचव्या कर्ण्याच्या नादामुळे पहिले तीन अनर्थ सामोरे येतात
[१४६ पानांवरील चित्रे]
तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात. (स्तोत्र. ४५:५) असे शीर्षक असणाऱ्या या व्यंगचित्रासारख्या १९३०शीच्या काळात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक व्यंगचित्रांनी ‘ज्यावर देवाचा शिक्का नाही अशा माणसांना’ उपद्रव दिला
[१४७ पानांवरील चित्रे]
रॉयल अल्बर्ट हॉल, जेथे मुक्तता पुस्तकाचे प्रकाशन झाले व “ए टेस्टीमनी टू द रुलर्स ऑफ द वर्ल्ड” हा ठराव संमत झाला