देवाचा न्यायाचा दिवस —त्याचा आनंदी परिणाम!
अध्याय ४१
देवाचा न्यायाचा दिवस —त्याचा आनंदी परिणाम!
दृष्टांत १५—प्रकटीकरण २०:११–२१:८
विषय: सार्वत्रिक पुनरुत्थान, न्यायाचा दिवस आणि नवे आकाश व नव्या पृथ्वीचे आशीर्वाद
पूर्णतेचा काळ: हजार वर्षीय राजवट
१. (अ) आदाम व हव्वेने पाप केल्यावर मानवजातीने काय गमाविले? (ब) देवाचा कोणता उद्देश बदलला नाही व ते आम्हास कसे कळते?
आम्हा मानवांना, चिरकाल जगण्यास निर्माण केले होते. आदाम व हव्वेने देवाच्या नियमांचे पालन केले असते, तर ते कधीच मरण पावले नसते. (उत्पत्ती १:२८; २:८, १६, १७; उपदेशक ३:१०, ११) त्यांनी पाप केल्यामुळे, त्यांचे स्वतःचे व त्यांच्या संततीचे जीवन आणि परिपूर्णता दोन्ही गमावली गेली व अशा तऱ्हेने मनुष्यजातीवर मृत्यू निष्ठुर शत्रुप्रमाणे राज्य करु लागला. (रोमकर ५:१२, १४; १ करिंथकर १५:२६) तरीसुध्दा, पृथ्वीवरील नंदनवनात परिपूर्ण मानवांनी चिरकाल जीवन जगण्याच्या देवाच्या उद्देशात फरक झाला नाही. त्याच्या मनुष्यजातीवरील गाढ प्रेमामुळे त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशूला पृथ्वीवर पाठविले, ज्याने आदामाच्या ‘पुष्कळ’ संततीसाठी त्याचे मानवी परिपूर्ण जीवन बहाल केले. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) विश्वास धरणाऱ्या मानवांना येशू आता त्याच्या बलिदानाच्या कायदेशीर प्रमाणास लागू करुन पृथ्वीवरील नंदनवनात परिपूर्ण जीवन देऊ शकतो. (१ पेत्र ३:१८; १ योहान २:२) मानवजातीस “उल्हास व हर्ष” करण्यासाठी किती हे भव्य कारण!—यशया २५:८, ९.
२. प्रकटीकरण २०:११ मध्ये योहान काय कळवितो व “मोठे पांढरे राजासन” काय आहे?
२ सैतानाला अथांग डोहात टाकल्यावर येशूच्या हजार वर्षांच्या राजवटीचा आरंभ होतो. आता तो “दिवस” आहे, जेव्हा देव “आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:३१; २ पेत्र ३:८) योहान सांगतो: “नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली; त्याकरिता ठिकाण उरले नाही. (प्रकटीकरण २०:११) हे “मोठे पांढरे राजासन” काय आहे? ते “सर्वांचा न्यायाधीश देव [यहोवा, NW]” याच्या शिवाय इतर कोणाचे असू शकत नाही. (इब्री १२:२३) आता येशूच्या खंडणी बलिदानाचा कोणाला फायदा मिळेल यासाठी मानवजातीचा तो न्याय करणार आहे.—मार्क १०:४५.
३. (अ) देवाचे राजासन “मोठे” व “पांढरे” आहे याचा काय अर्थ होतो? (ब) न्यायाच्या दिवशी कोण न्याय करतील व कशाच्या आधारावर?
३ देवाचे सिंहासन “मोठे” आहे व याद्वारे यहोवा सार्वभौम प्रभु असल्याच्या महानतेवर ते जोर देते, ते “पांढरे” आहे म्हणजे त्याच्या निर्दाष धार्मिकतेकडे लक्ष वेधले जाते. मानवजातीचा तोच काय तो एकमेव न्यायाधीश आहे. (स्तोत्र १९:७-११; यशया ३३:२२; ५१:५, ८) तथापि त्याने न्यायनिवाडा करण्याचे काम येशूकडे सुपूर्त केले आहे, यास्तव “पिता कोणाचाहि न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे.” (योहान ५:२२) येशू बरोबर त्याचे १,४४,००० सोबती आहेत ज्यांना ‘एक हजार वर्षांसाठी . . . न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला आहे.’ (प्रकटीकरण २०:४) असे असले तरी, न्यायाच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचे काय होईल ते यहोवाच्या दर्जानुसार ठरविले जाईल.
४. “पृथ्वी व आकाश पळाली” याचा काय अर्थ आहे?
४ पण “पृथ्वी व आकाश ही पळाली” हे कसे? हे तेच आकाश आहे जे सहावा शिक्का फोडण्याच्या वेळी गुंडाळीप्रमाणे निघून गेले—म्हणजेच त्या मानवी सत्ता ‘अग्नीसाठी राखलेल्या आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याच्या व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेविलेल्या आहेत.’ (प्रकटीकरण ६:१४; २ पेत्र ३:७) ह्या अधिपत्याखाली अस्तित्वात असणारी पृथ्वी ही संघटित व्यवस्था आहे. (प्रकटीकरण ८:७) आकाश व पृथ्वीचे पळून जाणे याचा अर्थ श्वापद व पृथ्वीवरील राजांचा त्यांच्या सैन्यांसोबत तसेच मूर्तीची भक्ती करणाऱ्यांचा आणि श्वापदाचे चिन्ह धारण करणाऱ्यांचा नाश होय. (प्रकटीकरण १९:१९-२१) सैतानाच्या आकाश व पृथ्वीवर न्यायदंड बजावल्यावर, महान न्यायाधीश आणखी एका न्यायाच्या दिवसाचा हुकूम देतो.
हजार वर्षीय न्यायाचा दिवस
५. जुने आकाश व जुनी पृथ्वी पळून गेल्यावर कोणाचा न्याय करणे बाकी आहे?
५ जुने आकाश व जुनी पृथ्वी पळून गेल्यावर न्यायासाठी कोण बाकी उरले आहेत? १,४४,००० चे अभिषिक्त शेष तर मुळीच नाहीत, कारण त्यांचा न्याय पूर्वीच होऊन त्यांच्यावर शिक्कामोर्तबही झाला आहे. हर्मगिदोनानंतरही जे पृथ्वीवर अजून जिवंत असतील त्यांचा लवकरच मृत्यू होईल व पुनरुत्थानाकरवी त्यांना त्यांच्या स्वर्गीय जीवनाचे बक्षीस मिळेल. (१ पेत्र ४:१७; प्रकटीकरण ७:२-४) तथापि, मोठ्या समुदायातील लक्षावधी लोक मोठ्या संकटातून पार झाले आहेत व ते “राजासनासमोर” उभे आहेत हे स्पष्ट आहे. येशूच्या वाहिलेल्या रक्तावर त्यांनी विश्वास दाखवल्यामुळे बचावासाठी धार्मिक असे ते गणले गेले आहेत; पण हजार वर्षांच्या काळातही येशू त्यांना “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ” निरवित असताना त्यांचा न्याय पुढे चालू राहील. यानंतर, मानवी परिपूर्णता प्राप्त झाल्यावर व परीक्षा घेतल्यावर, त्यांना पूर्ण अर्थाने धार्मिक म्हणून जाहीर केले जाईल. (प्रकटीकरण ७:९, १०, १४, १७) मोठे संकट पार केलेल्या मुलांना व हजार वर्षीय राजवटीत जन्मलेल्या मुलांचा हजार वर्षामध्ये याप्रमाणेच न्याय केला जाईल.—पडताळा उत्पत्ती १:२८; ९:७; १ करिंथकर ७:१४.
६. (अ) योहान कोणता मोठा जमाव पाहतो व ‘लहानथोर’ या शब्दाचा अर्थ काय होतो? (ब) देवाच्या स्मरणात असलेल्या अगणित लाखो लोकांना पुन्हा कसे जिवंत केले जाईल?
६ तथापि, योहान, बचावलेल्या मोठ्या लोकसमुदायापेक्षाही मोठा जमाव पाहतो. त्यांची गणना हजारो लाखों इतकी असेल! “मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले, त्या वेळी पुस्तके उघडली गेली.” (प्रकटीकरण २०:१२अ) गेल्या ६,००० हजार वर्षात जे कोणी प्रसिद्ध वा साधारण मानव पृथ्वीवर राहिले व मरण पावले ते सर्व या ‘लहानथोरांमध्ये’ येतात. प्रकटीकरणानंतर लवकरच योहानाने लिहिलेल्या शुभवर्तमानात येशू त्याच्या पित्याबद्दल असे म्हणतो: “आणि तो [येशू] मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारहि त्याला [येशूला] दिला. ह्याविषयी आश्चर्य करु नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२७-२९) संपूर्ण इतिहासातील कबरांचा व मृत्यूचा समूळ नाश—किती विशाल हा प्रकल्प! देवाच्या स्मरणातील असंख्य करोडो लोकांना हळूवारपणे उठविण्यात येईल की ज्यामुळे मोठा लोकसमुदाय—त्यांच्याशी तुलना केल्यावर अल्प असे आहेत—पुनरुत्थित झालेल्यांच्या समस्यांना सोडवू शकतील, कारण हे पुनरुत्थित झालेले अजूनही त्यांच्या त्याच शारीरिक कमतरता व दृष्टिकोन बाळगून, जुन्या चालीरिती अनुसरण्याचे इच्छितील.
कोणास उठविले जाईल व न्याय केला जाईल?
७, ८ (अ) कोणते पुस्तक उघडले जाते व यानंतर काय घडते? (ब) कोणास पुनरुत्थान नसेल?
७ योहान पुढे म्हणतो: “तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते; त्यावरुन मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यु व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.” (प्रकटीकरण २०:१२ब, १३) खरोखर श्वास रोखून धरणारे दृश्य! समुद्र, मरणावस्था व अधोलोक प्रत्येक आपापला भाग पार पाडतात पण लक्ष द्या की ह्या संज्ञा परस्परांमध्ये फक्त सर्वतोपरि नाहीत. * योना, माशाच्या पोटात म्हणजेच समुद्रात होता तेव्हा स्वतःबद्दल म्हणतो की तो शिओल किंवा हेडीजमध्ये होता. (योना २:२) जर एखादा आदामापासून आलेल्या मरणाच्या पकडीत सापडला असेल तर तो हेडीजमध्ये असल्यासारखे आहे. हे भविष्यसूचक शब्द दृढ हमी पुरवितात की कोणाकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही.
८ अर्थातच, अगणित व्यक्तींचे पुनरुत्थान होणार नाही. यामध्ये ज्यांनी येशूला व इतर प्रेषितांना नाकारले ते पश्चात्तापहीन शास्त्री व परुशी, धार्मिक ‘धर्मत्यागी पुरूष’ व जे अभिषिक्त ख्रिश्चन “पतित झाले” यांचाही समावेश आहे. (२ थेस्सलनीकाकर २:३; इब्रीयांस ६:४-६; मत्तय २३:२९-३३) येशूने शेरडांसमान लोकांबद्दलही असे म्हटले की ते जगाच्या अंतसमयी “सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे,” त्यात जातील, म्हणजेच “सार्वकालिक शिक्षा” भोगतील. (मत्तय २५:४१, ४६) यांच्यासाठी पुनरुत्थान नाही!
९. पुनरुत्थानाच्या वेळी काहींना खास मर्जी प्राप्त होईल हे प्रेषित पौल कसे दाखवतो व ह्यात कोणाचा समावेश आहे?
९ दुसऱ्या बाजूला, काहींना पुनरुत्थानाची खास मर्जी प्राप्त होईल. प्रेषित पौलाने हे सूचित केले तेव्हा म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.” (प्रे. कृत्ये २४:१५) पार्थिव पुनरुत्थानाच्या अनुषंगाने, ‘नीतिमानांमध्ये’ प्राचीन समयातील विश्वासू स्त्री व पुरुष—अब्राहाम, राहाब व इतर काही—ज्यांना देवाचे मित्र या नात्याने धार्मिक असे घोषित केले होते त्यांचा समावेश आहे. (याकोब २:२१, २३, २५) सध्याच्या आधुनिक काळात मरेपर्यंत यहोवाला विश्वासू राहिली अशी धार्मिक दुसरी मेंढरे ह्याच गटात असतील. अशाप्रकारे हे सर्व सचोटी रक्षक येशूच्या हजार वर्षीय राजवटीच्या आरंभीच्या काळात पुनरुत्थित केले जातील. (ईयोब १४:१३-१५; २७:५; दानीएल १२:१३; इब्रीयांस ११:३५, ३९, ४०) नंदनवनातील विशाल कामांवर देखरेखीचा विशेषाधिकार त्या पुनरुत्थित धार्मिक लोकांपैकी पुष्कळांना मिळेल यात काही शंका नाही.—स्तोत्र ४५:१६; पडताळा यशया ३२:१, १६-१८; ६१:५; ६५:२१-२३.
१०. ज्यांचे पुनरुत्थान केले जाईल त्यामध्ये ‘अनीतिमान’ लोक कोण असतील?
१० प्रेषितांची कृत्ये २४:१५ मध्ये उद्धृत केलेले ‘अनीतिमान’ नक्की कोण आहेत? ह्यात संपूर्ण इतिहासात मरण पावलेल्या मनुष्यजातीच्या मोठ्या समुदायाचा, विशेषकरून जे ‘अज्ञानाच्या काळामध्ये’ जिवंत होते अशांचा समावेश असेल. (प्रेषितांची कृत्ये १७:३०) ह्या व्यक्तींना कदाचित जेथे ते जन्माला आले किंवा जेथे ते राहत होते तेथे यहोवाच्या इच्छेला आज्ञाधारकपणा दाखवण्याची संधी मिळाली नसेल. असेही काही असतील की ज्यांनी तारणाचा संदेश ऐकला असेल पण त्याकडे पूर्णपणे लक्ष दिले नसेल किंवा समर्पण व बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्याआधीच मरण पावले असतील. मग पुनरुत्थानाच्या वेळी अशा व्यक्तींना जर अनंत काळ जीवनाच्या संधीचा फायदा मिळवायचा असेल तर त्यांच्या विचारसरणीत व जीवन शैलीत आणखी बदल करावा लागेल.
जीवनाचे पुस्तक
११. (अ) ‘जीवनाचे पुस्तक’ काय आहे व ह्यात कोणाची नावे लिहिली आहेत? (ब) हजार वर्षांच्या राजवटीत जीवनाचे पुस्तक का उघडले जाईल?
११ योहान ‘जीवनाचे पुस्तक’ याबद्दल बोलतो. यहोवाकडून अनंतकालिक जीवन मिळविणाऱ्यांची नोंद ह्यात आहे. येशूचे अभिषिक्त बांधव, मोठा लोकसमुदाय, पुरातन काळच्या विश्वासू जनांचे, जसे की मोशे, या सर्वांची नावे ह्या पुस्तकात नोंदविली आहेत. (निर्गम ३२:३२, ३३; दानीएल १२:१; प्रकटीकरण ३:५) अजूनपर्यंत, पुनरुत्थित “अनीतिमान” यांजमधील कोणाचेही नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. यास्तव, जीवनाचे पुस्तक हजार वर्षांच्या राजवटीत उघडले जाईल म्हणजे ज्या व्यक्ती लायक बनल्या आहेत त्यांची नावे त्यात लिहिली जातील. ज्या कोणाची नावे ह्या जीवनाच्या पुस्तकात किंवा त्या गुंडाळीत नाहीत अशांना “अग्नीच्या सरोवरात” टाकले जाते.—प्रकटीकरण २०:१५; पडताळा इब्रीयांस ३:१९.
१२. जीवनाच्या उघडलेल्या पुस्तकात एखाद्या व्यक्तीचे नाव लिहिण्यात येईल हे कशावरुन ठरवण्यात येईल व यहोवाच्या नियुक्त न्यायाधिशाने आपले उदाहरण कसे मांडले आहे?
१२ त्या समयी एखाद्या व्यक्तीचे नाव ह्या जीवनी पुस्तकात लिहिण्यात येईल हे कशावरुन ठरवले जाईल? आदाम व हव्वेच्या काळासारखीच मुख्य गोष्ट येथेही असेल व ती आहे: यहोवास आज्ञाधारकपणा दाखवणे. जसे प्रेषित योहानाने प्रिय सहख्रिश्चनांना लिहिले: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:४-७, १७) आज्ञाधारकतेच्या संबंधाने, यहोवाच्या नियुक्त न्यायाधीशाने स्वतःचे उदाहरण मांडले: “तो [येशू] पुत्र असूनहि त्याने जे दुःख सोसले तेणेकरुन तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला.”—इब्रीयांस ५:८, ९.
इतर पुस्तकांना उघडणे
१३. पुनरुत्थित जनांनी त्यांची आज्ञाधारकता कशी प्रदर्शित केली पाहिजे व त्यांनी कोणती तत्त्वे आचरली पाहिजेत?
१३ पुनरुत्थित झालेल्यांनी त्यांची आज्ञाधारकता कशी दाखवली पाहिजे? येशूने स्वतः दोन आज्ञांकडे लक्ष निदर्शिले, तो म्हणाला: “पहिली ही आहे की, ‘हे इस्राएला ऐक; आपला देव परमेश्वर [यहोवा, NW] हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर [यहोवा, NW] ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’ दुसरी ही की ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’” (मार्क १२:२९-३१) एवढेच नव्हे तर चोरी, लबाडी, खून व अनैतिक काम करण्यास नकार दर्शवणे ह्या यहोवाच्या प्रस्थापित अशा उत्तम कायद्यांचे पालन देखील त्यांनी केले पाहिजे.—१ तीमथ्य १:८-११; प्रकटीकरण २१:८.
१४. इतर कोणती पुस्तके उघडली जातात व त्यात काय समाविष्ट आहे?
१४ तथापि, योहानाने हजार वर्षीय राजवटीत इतर पुस्तकांना उघडले जाईल असे नुकतेच म्हटले होते. (प्रकटीकरण २०:१२) ती कोणती असतील बरे? काही वेळा, यहोवाने विशिष्ट परिस्थितींसाठी निश्चित सूचना दिल्या आहेत. उदाहरणार्थ, मोशेच्या दिवसात, त्याने तपशीलवारपणे नियमांची मालिका पुरविली होती की जेणेकरुन इस्राएलांनी ती पाळली तर त्यांना जीवन लाभेल असे समजले जात होते. (अनुवाद ४:४०; ३२:४५-४७) पहिल्या शतकात, ख्रिस्ती व्यवस्थेखाली विश्वासूजणांना यहोवाच्या दर्जानुसार चालण्याकरिता मदत म्हणून नव्या सूचना दिल्या होत्या. (मत्तय २८:१९, २०; योहान १३:३४; १५:९, १०) योहान आता सांगतो की “त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरुन मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.” यास्तव, पुस्तके उघडल्यावर हजार वर्षात मानवजातीकरिता यहोवाने अपेक्षिलेल्या गोष्टी तपशीलवारपणे जाहीर केल्या जातील हे उघड आहे. पुस्तकातील नियमांचे व आज्ञांचे पालन केल्यावर, आज्ञाधारक मानव त्यांचे आयुष्य वाढवू शकतील व शेवटी अनंत काळचे जीवन प्राप्त करु शकतील.
१५. पुनरुत्थानाच्या काळामध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षण मोहिमेची गरज आहे व पुनरुत्थान कदाचित कसे पुढे चालू राहील?
१५ ईश्वरशासित शिक्षणाची केवढी ती विस्तृत मोहीम जरुरीची आहे! १९९३ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी सरासरी, ४५,००,००० पेक्षा अधिक बायबल अभ्यास विविध ठिकाणी चालवले. पण पुनरुत्थानाच्या वेळी, असंख्य बायबल अभ्यास, बायबलवर व नव्या पुस्तकांवर आधारित चालवले जातील यात काही शंका नाही! देवाच्या सर्व लोकांना शिक्षक व्हावे लागेल व परिश्रमी बनावे लागेल. पुनरुत्थित लोकांनी प्रगती केल्यावर ते देखील शिक्षणाच्या या भव्य कार्यक्रमात सामील होतील. कदाचित, पुनरुत्थान अशा मार्गाने होईल की जे जिवंत आहेत ते आधीच्या कौटुंबिक सदस्यांचे व इतर ओळखीच्या लोकांचे स्वागत करतील व त्यांना शिक्षण देतील व मग हेच लोक इतरांचे स्वागत करतील व त्यांना शिक्षण देतील. (पडताळा १ करिंथकर १५:१९-२८, ५८.) ४० लाखापेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार जे सत्याचा प्रसार करण्यात कार्यशील आहेत ते पुनरुत्थानाच्या वेळी त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकाराच्या आशेसाठी उत्तम पाया घालत आहेत.—यशया ५०:४; ५४:१३.
१६. (अ) जीवनी पुस्तकात कोणाची नावे लिहिली जाणार नाहीत? (ब) कोणास ‘जीवनासाठी’ पुनरुत्थान प्राप्त झाल्यासारखे होईल?
१६ पार्थिव पुनरुत्थानासंबंधी, येशूने म्हटले की, ‘ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतात.’ येथे ‘जीवन’ व ‘न्याय’ परस्पर विरोधात आहेत, जे पुनरुत्थित जन प्रेरित वचनातून व पुस्तकांतून शिक्षण घेतल्यावर ‘दुष्कर्मे करतील’ ते जीवनास अपात्र ठरवून त्यांचा तसा न्याय केला जाईल असे दिसते. त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात किंवा गुंडाळीत लिहिली जाणार नाहीत. (योहान ५:२९) हे, पूर्वी विश्वासू होते पण नंतर काही कारणास्तव हजार वर्षांच्या राजवटीत मागे पडतात त्यांच्या बाबतीतही खरे होऊ शकते. नावे खोडली जाऊ शकतात. (निर्गम ३२:३२, ३३) दुसऱ्या बाजूला, पुस्तकात जे काही लिहिले आहे ते आज्ञाधारकतेने पाळतात त्यांची नावे लेखी अहवालामध्ये जीवनी पुस्तकात असतील व ते सदासर्वकाळ जिवंत राहतील. त्यांच्यासाठी ते ‘जीवनाचे’ पुनरुत्थान होईल.
मरण व अधोलोक यांचा अंत
१७. (अ) योहान कोणत्या आश्चर्यकारक हालचालीचे वर्णन देतो? (ब) हेडीज कधी रिकामे केले जाईल? (क) आदामापासून आलेले मरण कधी “अग्नीच्या सरोवरात टाकिले” जाईल?
१७ पुढे, योहान काही तरी आश्चर्यकारक वर्णन देतो! “तेव्हा मरण व अधोलोक [हेडीज, NW] ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.” (प्रकटीकरण २०:१४, १५) हजार वर्षांच्या न्यायाच्या दिवसानंतर, “मरण व अधोलोक” पूर्णपणे काढून टाकले जातील. यासाठी हजार वर्ष का लागतील? मानवजातीची सर्वसाधारण कबर, हेडीज, देवाच्या स्मरणातील शेवटच्या व्यक्तीचे पुनरुत्थान झाल्यावर रिकामी होईल. पण जोपर्यंत मानव पापाच्या वारसाने कलंकित आहेत, तोपर्यंत आदामाकडून आलेले मरण त्यांच्या बरोबर आहे. येशूच्या खंडणीचे मूल्य आजार, वृद्धापकाळ व इतर काही अपूर्णता यावर पूर्णपणे लागू होईल तोपर्यंत पृथ्वीवर पुनरुत्थित झालेल्या व हर्मगिदोन पार करुन आलेल्या मोठ्या समुदायातील सर्वांना पुस्तकात जे काही लिहिले आहे त्याचे पालन करावे लागेल. मग आदामाकडून आलेले मरण व हेडीजला, “अग्नीच्या सरोवरात टाकिले” जाईल. ते सर्वकाळासाठी निघून जातील!
१८. (अ) येशूचे राजा या नात्याने यशप्राप्ती मिळवण्याबद्दल प्रेषित पौल कसे वर्णन देतो? (ब) परिपूर्ण मानवी कुटुंबाचे येशू काय करतो? (क) हजार वर्षांच्या अंतास आणखी कोणत्या घटना घडतात?
१८ अशाप्रकारे, प्रेषित पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात वर्णिलेला कार्यक्रम अखेरीस त्याच्या अंतास येईल: “कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत त्याला [येशू] राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो [आदामाकडील] मृत्यु होय.” यानंतर काय घडते? “त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करुन दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रहि होईल.” दुसऱ्या शब्दात म्हणायचे, तर येशू “देवपित्याला राज्य सोपून देईल.” (१ करिंथकर १५:२४-२८) होय, येशू त्याच्या खंडणीरुपी बलिदानाकरवी आदामाकडून आलेल्या मरणावर विजय मिळवून, त्याचा पिता यहोवाला तो परिपूर्ण मानवजात बहाल करील. हजार वर्षांच्या अंतास बरोबर त्याच वेळी सैतानाला पुन्हा एकदा सोडले जाईल व जीवनाच्या पुस्तकात कोणाचे नाव कायमचे राहील हे ओळखण्यासाठी शेवटची परीक्षा घेतली जाईल. यास्तव, तुमचे नाव ह्यातील एक असण्यास “नेटाने यत्न करा!”—लूक १३:२४; प्रकटीकरण २०:५.
[तळटीपा]
^ समुद्रातून पुनरुत्थित झालेल्यांमध्ये नोहाच्या दिवसातील जलप्रलयात नष्ट झालेले पृथ्वीचे भ्रष्ट रहिवासी नसतील; तो नाश अंतिम होता, त्याचप्रमाणे यहोवाच्या न्यायदंडाची बजावणी मोठ्या संकटात होईल.—मत्तय २५:४१, ४६; २ पेत्र ३:५-७.
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९८ पानांवरील चित्रे]
हजार वर्षांच्या राजवटीत पुनरुत्थित झालेले “अधार्मिक” लोक, पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आचरतील तर त्यांची नावे देखील कदाचित जीवनाच्या पुस्तकात लिहिली जातील