व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘गुंडाळी उघडावयास कोण योग्य आहे?’

‘गुंडाळी उघडावयास कोण योग्य आहे?’

अध्याय १५

‘गुंडाळी उघडावयास कोण योग्य आहे?’

१. आता योहानाच्या दृष्टांतात काय घडते?

 अत्युत्कृष्ट! भयप्रेरित! असा हा यहोवाच्या राजासनाचा थरारक दृष्टांत आहे. या राजासनाची रचना अग्निरुपी मशाली, करुब, २४ वडील आणि काचेचा समुद्र याच्या मध्यभागी आहे. पण हे योहाना, आता तुला काय दिसते? या स्वर्गीय दृश्‍याच्या अगदी केंद्रभागी योहान बघतो व आम्हास कळवतो: “जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली व सात शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि, ‘गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडावयास कोण योग्य आहे,’ असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीहि ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले.”—प्रकटीकरण ५:१-४.

२, ३. (अ) पुस्तकाची गुंडाळी उघडावयास कोणी आढळावा याबद्दल योहान इतका का उत्सुक आहे पण त्याबद्दल कोणती संभाव्यता आढळून येते? (ब) आमच्या काळी देवाचे अभिषिक्‍त लोक कशाची इतक्या उत्सुकतेने वाट पाहात होते?

सर्व निर्मितीचा सेनाधीश प्रभू यहोवा स्वतःच ती गुंडाळी धरून आहे. ती महत्त्वपूर्ण माहितीने भरलेली असली पाहिजे, कारण तिचे लिखाण पाठपोट करण्यात आलेले होते. आमची उत्सुकता वाढली आहे. त्या गुंडाळीत काय आहे? योहानाला यहोवाने दिलेले निमंत्रण आपल्याला आठवत असेल: “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्‍यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.” (प्रकटीकरण ४:१) यामुळे आता शिरशिरी येणाऱ्‍या अपेक्षेने आम्ही त्या गोष्टीकडे आपली नजर रोखून आहोत. पण अरेरे, ती गुंडाळी सात शिक्के मारून घट्ट बंद केलेली आहे!

मग, त्या बलवान देवदूताला ती गुंडाळी उघडावयास कोणी योग्य असा आढळेल काय? किंग्डम इंटरलिनियर याच्या मते ही गुंडाळी, यहोवा देवाच्या “उजव्या हातात” आहे. याचा अर्थ हा की, ती गुंडाळी तो आपल्या तळहातावर धरुन आहे. पण असे दिसते की, स्वर्गात व पृथ्वीवर ती गुंडाळी स्वीकारुन तिला उघडण्यास कोणीही योग्य नाही. पृथ्वीखालीही, जेथे देवाचे विश्‍वासू सेवक मृतवत्‌ आहेत त्यापैकी कोणीही या सन्मानास पात्र नाही. यामुळे योहान अस्वस्थ झालेला दिसतो, हे आश्‍चर्याचे नाही! याचा अर्थ हा की, त्याला बहुधा “ज्या गोष्टी ह्‍यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या” कळून येणार नाहीत. आमच्या काळीही, देवाचे अभिषिक्‍त लोक यहोवाने प्रकटीकरणाबद्दल आपला प्रकाश व सत्य कळविण्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहून होते. हे तो आपल्या नियुक्‍त वेळी, भविष्यवादाच्या पूर्णतेला अनुसरुन प्रगतीशीलपणे करणार होता की, ज्यामुळे त्याला आपल्या लोकांना “तारणाच्या भव्य” मार्गात मार्गदर्शन करता येईल.—स्तोत्र ४३:३, ५NW.

योग्य असणारा

४. (अ) गुंडाळी व त्यावरील शिक्के उघडण्यास योग्य असलेला असा कोण आढळला? (ब) योहान वर्ग व त्याचे सोबती आता कोणत्या बक्षीसाचा व हक्काचा आनंद अनुभवीत आहेत?

होय, ती गुंडाळी उघडू शकेल असा कोणीतरी आहे! योहान सांगतो: “तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला: ‘रडू नको; पाहा, यहूदा वंशाचा सिंह, दावीदाचा अंकुर ह्‍याने जय मिळविला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.’” (प्रकटीकरण ५:५) तर हे योहाना, आता अश्रू पुस! योहान वर्ग तसेच त्याचे निष्ठावंत सोबती यांनी कित्येक दशके खडतर परीक्षांना सहन केले आणि ती समज मिळण्यासाठी धीराने थांबून राहिले. तर आता, आम्हाला या दृष्टांताची समज मिळण्यात केवढे सांत्वनदायक बक्षीस मिळाले आहे आणि याचा संदेश इतरांना सांगण्यात सहभाग घेता येतो हा केवढा मोठा हक्क आहे!

५. (अ) यहूदाबद्दल कोणता भविष्यवाद उच्चारण्यात आला आणि यहूदाच्या वंशातील लोकांनी कोठे राज्य केले? (ब) शिलो कोण आहे?

अहा! तो “यहूदा वंशाचा सिंह”! यहूदी वंशाचा पूर्वज याकोब याने आपला चौथा पुत्र यहूदा याच्यासंबंधाने जो भविष्यवाद घोषित केला होता तो योहानाला परिचित आहे: “यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबून बसला आहे, त्याला कोण छेडणार? यहूदाकडचे राजवेत्र शिलो येईपर्यंत ते त्याजकडून जाणार नाही; राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.” (उत्पत्ती ४९:९, १०) देवाच्या लोकांचा बादशाही वंश यहूदामधून पुढे आला. दाविदापासून सुरवात होऊन यरूशलेमेचा बाबेलोन्यांनी नाश करीपर्यंत तेथे ज्या राजांनी राज्य केले ते सर्व यहूदाचे वंशज होते. पण यापैकी एकहीजण याकोबाने ज्याबद्दल भाकीत केले होते तो शिलो ठरला नाही. शिलो याचा अर्थ “ज्याचे [हक्काचे] आहे तो.” हे नाव भविष्यवादितपणे येशूकडे निदर्शित करीत होते; तोच आता दाविदाच्या राज्याचा कायमचा वारस आहे.—यहेज्केल २१:२५-२७; लूक १:३२, ३३; प्रकटीकरण १९:१६.

६. येशू कोणत्या अर्थाने इशायचा ‘बुंध’ आणि “दाविदाचा अंकुर” होता?

“दाविदाचा अंकुर” हा संदर्भ कोणाला अनुलक्षून आहे हे योहानाला लगेच कळते. वचन दिलेल्या मशीहाला भविष्यवादितपणे “इशायाच्या [दाविदाचा बाप] बुंधाला (फुटलेला) धुमारा . . . शाखा” आणि ‘राष्ट्रांकरिता ध्वजवत्‌ उभारलेला इशायाचा धुमारा’ असे म्हणण्यात आले आहे. (यशया ११:१, १०) येशू हा इशायची शाखा होता, त्याचा जन्म इशाय पुत्र दाविदाच्या बादशाही कुळातून झाला. याशिवाय इशायचे मूळ या अर्थी यानेच दाविदाचा राजवंश पुन्हा फुलवला व त्याला सदासर्वकाळासाठी जीवन तसेच संगोपन दिले.—२ शमुवेल ७:१६.

७. राजासनावर बसलेल्याच्या हातातून गुंडाळी घेण्यास येशू कशामुळे पात्र ठरतो?

येशू, परिपूर्ण मानव या नात्याने सचोटी राखून व अत्यंत कठीण परीक्षातही यहोवाची सेवा करणाऱ्‍यांमध्ये सर्वात पहिला आहे. त्यानेच सैतानाच्या आव्हानांना परिपूर्ण उत्तर दिले. (नीतीसूत्रे २७:११) या कारणामुळे, तो आपल्या यज्ञार्पित मरणाआधीच्या रात्री असे म्हणू शकला: “मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) यामुळेच, यहोवाने पुनरुत्थित येशूला “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” सोपवून दिला आहे. देवाच्या सर्व सेवकांमध्ये केवळ तोच गुंडाळी घेऊन त्यातील महत्त्वाचा संदेश कळवण्यास योग्य आहे.—मत्तय २८:१८.

८. (अ) राज्याच्या बाबतीत येशूची योग्यता कशी दिसते? (ब) ती गुंडाळी उघडण्यास कोण योग्य आहे हे योहानाला २४ वडिलांपैकी एकाने सांगावे हे योग्य का आहे?

येशूने ती गुंडाळी उघडावी हे योग्यच आहे. १९१४ पासून त्याला देवाच्या मशीही राज्याचा राजा म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे व ती गुंडाळी राज्य आणि ते ज्या गोष्टींची पूर्तता करणार आहे त्याबद्दलच पुष्कळ काही सांगते. येशूने, पृथ्वीवर असताना या राज्याच्या सत्यतेबद्दल विश्‍वासूपणे साक्ष दिली. (योहान १८:३६, ३७) त्याने आपल्या अनुयायांना या राज्याच्या येण्याबद्दल प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९, १०) ख्रिस्ती युगाच्या आरंभाला त्याने राज्याची सुवार्ता प्रचार करण्याच्या कामाला सुरवात केली आणि हे प्रचारकार्य अंतसमयात संपण्याबद्दल भाकीत केले. (मत्तय ४:२३; मार्क १३:१०) येशू ती गुंडाळी घेऊन उघडण्यास पात्र आहे, हे २४ वडिलांपैकी एकाने योहानाला सांगावे हे योग्यच आहे. का बरे? कारण हे वडील राजासनावर बसले आहेत, त्यांनी मुकुट घातले आहेत व ते ख्रिस्तासोबत त्याच्या राज्यात सहवारीस आहेत.—रोमकर ८:१७; प्रकटीकरण ४:४.

“वध करण्यात आला होता असा कोकरा”

९. योहान ‘राजासनापुढे’ सिंहाऐवजी काय उभा असल्याचे बघतो, व तो त्याचे कसे वर्णन देतो?

योहान आता त्या ‘यहूदा वंशाच्या सिंहाकडे’ बघतो. पण किती विस्मयकारक! पूर्णतयः वेगळीच अशी एक लाक्षणिक आकृती सामोरी येते: “तेव्हा राजासन व चार प्राणी ह्‍यांच्यामध्ये आणि वडीलमंडळ ह्‍यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला सात शिंगे व सात डोळे होते; ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत.”—प्रकटीकरण ५:६.

१०. योहानाने पाहिलेला “कोकरा” कोण आहे, व ही संज्ञा योग्य का आहे?

१० तेथे, राजासनाच्या एका बाजूला चार प्राणी व २४ वडील यांच्या वर्तुळाच्या अगदी मध्याला, कोकरा उभा आहे! “यहूदा वंशाचा सिंह,” तसेच “दाविदाचा अंकुर” असणाऱ्‍या त्या कोकऱ्‍यास योहान निःशंकपणे लगेच ओळखतो. साधारण ६० पेक्षा अधिक वर्षांआधी, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने समोर उभ्या असणाऱ्‍या यहूद्यांपुढे येशूची “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” अशी प्रस्तावना करून दिली होती हे योहानाला चांगले आठवते! (योहान १:२९) पृथ्वीवरील आपल्या सर्व आयुष्यात, येशू, जागतिक कलंकाने न डागलेला असा, निर्दोष कोकऱ्‍यासारखा राहिला व यामुळेच त्याला आपले निष्कलंक जीवन मानवजातीसाठी यज्ञार्पण म्हणून देता आले.—१ करिंथकर ५:७; इब्रीयांस ७:२६.

११. वैभवी येशूचे, “वध करण्यात आला होता असा कोकरा” म्हणून वर्णन करणे हे अपमान व मानहानीकारक का नाही?

११ वैभवी येशूला “वध करण्यात आला होता असा कोकरा” म्हणून वर्णन करणे हे अपमानकारक व मानहानीकारक आहे का? मुळीच नाही! येशू आपल्या मरणापावेतो विश्‍वासू राहिला ही गोष्ट सैतानाचा मोठा पराभव करणारी व यहोवा देवाला मोठा विजय मिळवून देणारी ठरली. तद्वत, येशूचे अशाप्रकारे वर्णन देणे हे त्याने सैतानाच्या जगाविरुद्ध दिलेली लढत याचे सविस्तर वर्णन देते आणि यहोवा तसेच येशूठायी मानवजातीबद्दल किती कळकळीचे प्रेम आहे त्याचे स्मरण पुरविते. (योहान ३:१६; १५:१३; पडताळा कलस्सैकर २:१५.) या सर्व कारणांमुळे येशूला वचनयुक्‍त संतान, गुंडाळी उघडण्यास खरोखरी पात्र असल्याचे निदर्शित करते.—उत्पत्ती ३:१५.

१२. कोकऱ्‍याची सात शिंगे कशाला चित्रित करतात?

१२ ‘कोकऱ्‍यासंबंधीच्या’ आमच्या रसिकतेमध्ये आणखी कशामुळे भर पडते? त्याला सात शिंगे आहेत. बायबलमध्ये शिंगांना वेळोवेळी सामर्थ्य किंवा अधिकार या अर्थी दर्शविले आहे आणि सात ही गोष्ट पूर्णतादर्शक आहे. (पडताळा १ शमुवेल २:१, १०; स्तोत्र ११२:९; १४८:१४.) यामुळे, कोकऱ्‍याची सात शिंगे ही यहोवाने येशूला पूर्ण स्वरुपाचे सामर्थ्य बहाल केल्याचे सूचित करतात. तो “सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेहि नाव घ्या, त्या सर्वांहून . . . उंच” आहे. (इफिसकर १:२०-२३; १ पेत्र ३:२२) यहोवाने येशूला १९१४ मध्ये स्वर्गीय राजा या अर्थाने सिंहासनाधिष्ठ केले तेव्हापासून येशू अधिकार, सरकारी सत्ता गाजवू लागला आहे.—स्तोत्र २:६.

१३. (अ) कोकऱ्‍याचे सात डोळे कशाला चित्रित करतात? (ब) कोकरा काय करण्यास पुढे होतो?

१३ याखेरीज, येशू हा पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरलेला आहे, हे कोकऱ्‍याचे सात डोळे आहेत याद्वारे चित्रित आहे, त्याचा अर्थ “देवाचे सात आत्मे” असा आहे. येशू हा यहोवाची क्रियाशील शक्‍ती पूर्णतेने त्याच्या पृथ्वीवरील सेवकांपर्यंत पोहंचविण्याचे माध्यम आहे. (तीतास ३:६) यास्तव, याच आत्म्याच्याद्वारे तो येथे या पृथ्वीवर काय चालले आहे ते बघू शकतो हे उघड आहे. आपल्या पित्याप्रमाणे येशूला पूर्ण समज आहे. काहीही त्याच्या नजरेतून सुटू शकत नाही. (पडताळा स्तोत्र ११:४; जखऱ्‍या ४:१०.) यास्तव, आपली सचोटी राखून जगास जिंकणारा; यहूदा वंशाचा सिंह; दाविदाचा अंकुर; ज्याने मानवजातीसाठी आपले जीवन दिले; ज्याला पूर्ण अधिकार आहे, पवित्र आत्म्याची पूर्णता व यहोवा देवाकडून पूर्ण समज लाभली आहे—होय, हाच तो यहोवाच्या हातून ती गुंडाळी घेण्यास खरोखरी पात्र आहे. यहोवाच्या भव्य संघटनेमधील ही कामगिरी स्वीकारण्यास तो मागेपुढे पाहात आहे का? नाही! उलट “त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.” (प्रकटीकरण ५:७) स्वेच्छेने मान्यता दाखविण्याचे हे केवढे उत्तम उदाहरण आहे!

स्तुतीगीते

१४. (अ) येशूने गुंडाळी हाती घेण्याबद्दल चार प्राणी व २४ वडिलांची प्रतिक्रिया काय आहे? (ब) योहानाला २४ वडिलांबद्दल जी माहिती मिळालेली आहे ती त्यांची ओळख व त्यांच्या पदाबद्दल काय पुष्टी देते?

१४ हे सर्व बघून यहोवाच्या राजासनापुढे बसलेले कशी प्रतिक्रिया दाखवतात? “त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकऱ्‍याच्या पाया पडले; त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत.” (प्रकटीकरण ५:८) देवाच्या राजासनापुढे असणाऱ्‍या त्या चार करुबी प्राण्यांप्रमाणे ते २४ वडील देखील येशूच्या पाया पडून त्याच्या अधिकाराविषयी आपली मान्यता देतात. पण केवळ या वडिलांपाशीच वीणा व धूपाने भरलेली धुपाटणी आहेत. * केवळ तेच आता एक नवे गीत गात आहेत. (प्रकटीकरण ५:९) अशाप्रकारे ते ‘देवाचा इस्राएल’ असणाऱ्‍या १,४४,००० बरोबर सदृश्‍य आहेत, ज्यांच्यापाशीही वीणा असून ते नवे गीत गात आहेत. (गलतीकर ६:१६; कलस्सैकर १:१२; प्रकटीकरण ७:३-८; १४:१-४) याखेरीज, या २४ वडिलांना स्वर्गीय, याजकीय सेवा पूर्ण करीत असलेले दाखवले आहे. हे प्राचीन इस्राएलात जे याजक यहोवाला निवासमंडपात धूप जाळीत त्यांची प्रतिमा आहेत. तथापि, ती पृथ्वीवरील याजकीय सेवा, देवाने मोशेचे नियमशास्त्र येशूच्या वधस्तंभावर खिळून रद्द केले तेव्हा संपुष्टात आली. (कलस्सैकर २:१४) या सर्व गोष्टींकडून आम्हाला कोणता निर्वाळा मिळतो? हाच की, अभिषिक्‍त विजेत्यांना त्यांच्या सर्वतोपरी व अंतिम नेमणूकीत असल्याचे येथे दाखवण्यात आले आहे व ती म्हणजे, ‘देवाचे व ख्रिस्ताचे याजक, जे त्याच्यासहित हजार वर्षे राज्य करतील.’—प्रकटीकरण २०:६.

१५. (अ) इस्राएलात निवासमंडपातील परमपवित्र स्थानात केवळ कोण जाऊ शकत होता? (ब) परमपवित्र स्थानात जाण्याआधी धूप जाळणे, हा त्या प्रमुख याजकासाठी जीवन-मरणाचा प्रश्‍न का होता?

१५ प्राचीन इस्राएलात, परमपवित्र स्थानात यहोवाच्या लाक्षणिक सान्‍निध्यापुढे केवळ प्रमुख याजकाला प्रवेश असे. त्याचे धूप घेऊन जाणे ही त्याच्यासाठी जीवन-मरणाची बाब होती. यहोवाचा नियम सांगतो: “परमेश्‍वरासमोर [यहोवा, NW] असलेल्या वेदीवरील निखाऱ्‍यांनी भरलेले धुपाटणे [अहरोनाने] घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा; तो धूप परमेश्‍वरासमोर [यहोवा, NW] अग्नीवर असा घालावा की, त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरावयाचा नाही.” (लेवीय १६:१२, १३) परमपवित्र स्थानात धूप जाळत नेल्याशिवाय त्या प्रमुख याजकाला आत डोकावून बघता येणे शक्य नव्हते.

१६. (अ) ख्रिस्ती व्यवस्थेत प्रतिनमुनेदार परमपवित्र स्थानात कोण जाऊ शकतो? (ब) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी ‘धूप का जाळला पाहिजे’?

१६ ख्रिस्ती व्यवस्थेमध्ये केवळ प्रतिनमुनेदार प्रमुख याजक येशू ख्रिस्तच नव्हे तर १,४४,००० सहयाजकाच्या प्रत्येकास ओघाओघाने प्रतिनमुनेदार परमपवित्रस्थान, स्वर्गातील यहोवाच्या सान्‍निध्यात प्रवेश मिळतो. (इब्रीयांस १०:१९-२३) त्या २४ वडिलांद्वारे चित्रित केलेल्या याजकांसाठी या परमपवित्र जागेत प्रवेश अशक्य कोटीतला आहे. त्यांनी ‘धूप जाळला पाहिजे,’ म्हणजे यहोवाला सतत प्रार्थना व याचना सादर केल्या पाहिजेत.—इब्रीयांस ५:७; यहूदा २०, २१; पडताळा स्तोत्र १४१:२.

नवे गीत

१७. (अ) चोवीस वडील कोणते नवे गीत गात आहेत? (ब) “नवे गीत” ही संज्ञा बायबलमध्ये कोणत्या अर्थाने उपयोगात आणली आहे?

१७ आता एक सुमधूर गीत गाण्याचा आवाज येतो. हे गीत, कोकऱ्‍याला उद्देशून त्याचे याजकीय सोबती, २४ वडिलांकरवी गायिले जाते: “ते नवे गीत गाऊन म्हणतात: ‘तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस; कारण तू वधिला गेला होतास आणि तू आपल्या रक्‍ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्‍यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत.’” (प्रकटीकरण ५:९) “नवे गीत” ही संज्ञा बायबलमध्ये अनेकदा आढळते व ती बहुधा, यहोवाने मुक्‍ततेची जी महत्‌कर्मे केली आहेत त्याच्या स्तुतीखातर गायिली गेली आहेत. (स्तोत्र ९६:१; ९८:१; १४४:९) अशाप्रकारे गीत नवे आहे ते या अर्थी की, गायक या गाण्यात यहोवाने केलेली अधिक आश्‍चर्यावह कृत्ये कथित करून त्याच्या वैभवी नामाची नवी गुणग्राहकता जोडू शकतात.

१८. चोवीस वडील नवे गीत गाऊन येशूची कशासंबंधाने स्तुती करतात?

१८ तथापि, येथे २४ वडील हे नवे गीत यहोवापुढे गाण्याऐवजी येशूपुढे गात आहेत. तरीही तत्त्व तेच आहे. ते येशूची स्तुती, त्याने देवाचा पुत्र या नात्याने त्यांच्यासाठी ज्या नव्या गोष्टी केल्या आहेत त्याला अनुलक्षून करीत आहेत. आपल्या रक्‍ताद्वारे त्याने नवा करार घडवून आणला आहे व यामुळे यहोवाचा खास निधी या अर्थाने एका नव्या राष्ट्राला सामोरा आणू शकला. (रोमकर २:२८, २९; १ करिंथकर ११:२५; इब्रीयांस ७:१८-२५) या नव्या आध्यात्मिक राष्ट्राचे सदस्य अनेक दैहिक राष्ट्रांमधून आले आहेत; पण येशूने त्यांना एक मंडळी असे एका राष्ट्रात संघटित केले आहे.—यशया २६:२; १ पेत्र २:९, १०.

१९. (अ) दैहिक इस्राएलांना त्यांच्या अविश्‍वासूपणामुळे कोणता आशीर्वाद मिळू शकला नाही? (ब) यहोवाच्या नव्या राष्ट्राला कोणत्या आशीर्वादांचा आनंद अनुभवण्यास मिळतो?

१९ मागे, मोशेच्या काळी यहोवाने इस्राएलांना एका राष्ट्रात संघटित केले होते तेव्हा, त्याने त्यांच्याशी करार केला होता आणि म्हटले की, ते जर या करारास विश्‍वासू राहिले तर ते त्याच्यासाठी याजकराष्ट्र होतील. (निर्गम १९:५, ६) इस्राएलांनी विश्‍वास दाखवला नाही, त्यामुळे त्यांना या अभिवचनाची पूर्णता अनुभवण्यास मिळाली नाही. उलटपक्षी, येशूच्या मध्यस्तीद्वारे अस्तित्वात आलेल्या नव्या कराराच्या सद्‌गुणामुळे जे नवे राष्ट्र उदयास आले ते विश्‍वासू राहिले. या कारणामुळे या राष्ट्राच्या सदस्यांना राजे म्हणून पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार मिळतो, तसेच ते याजक या अर्थीही सेवा करतात व मानवजातीतील सरळहृदयी लोकांना यहोवासोबत समेट घडवून आणण्यात मदत देतात. (कलस्सैकर १:२०) नव्या गीतात देखील हेच म्हटले आहे: “आमच्या देवासाठी त्यांस राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:१०) वैभवी येशू ख्रिस्ताची स्तुती नव्या गाण्यामध्ये गाण्यात २४ वडिलांना केवढा आनंद होत आहे!

स्वर्गातील सांघिक गीत

२०. आता कोकऱ्‍याच्या स्तुतीचे कोणते गीत गायिले जाते?

२० यहोवाच्या विशाल संघटनेतील इतर उपस्थित या नव्या गीताबद्दल कशी प्रतिक्रिया दर्शवतात? त्यांचा अंतःकरणातील एकसूत्रीपणा बघून योहानाला शिरशिरी भरते: “तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्‍यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते: ‘वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे.’” (प्रकटीकरण ५:११, १२) स्तुतीचे हे केवढे प्रभावकारी गायन!

२१. कोकऱ्‍याची स्तुती गाण्यामुळे यहोवाचे सार्वभौमत्व किंवा पद याकडून लक्ष दूर नेले जाते का? स्पष्ट करा.

२१ याचा अर्थ हा होतो का की येशूने कशीतरी यहोवा देवाची जागा मिळविली आहे व आता सर्व निर्मिती पित्यापेक्षा त्याची स्तुती करू लागली आहे? याची कल्पनाही येत नाही! उलट, स्तुतीचे हे गीत, प्रेषित पौलाने जे काही लिहिले, त्याच्या एकमतात आहे: “देवाने [येशूला] अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्‍यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.” (फिलिप्पैकर २:९-११) सर्व सृष्टिपुढे असलेला मूलभूत वादविषय—यहोवाची कायदेशीर सार्वभौमता गौरवणे, यात आपला कार्यभाग पूर्ण केल्यामुळे येशूला येथे उंचावण्यात आले आहे. यामुळे त्याच्या पित्याला खरोखरी केवढे गौरव मिळाले आहे!

वाढते धार्मिक गीत

२२. कोणत्या धार्मिक गाण्यात पृथ्वीवरील आसमंतातून वाणी येऊन मिळतात?

२२ योहानाने वर्णिलेल्या दृश्‍यात स्वर्गातील उपस्थित मंडळी येशूच्या विश्‍वासूपणाप्रीत्यर्थ तसेच त्याच्या स्वर्गातील अधिकाराबद्दल त्याची संगीतमय स्तुती गात आहेत. यांना पृथ्वीवरील आसमंतातून येणाऱ्‍या गीतातून पित्याच्या व पुत्राच्या स्तुतीची जोड मिळाली आहे. कोणा मानवी पुत्राने मिळवलेल्या यशस्वीतेमुळे जसे पालकांना मोठे श्रेय लाभते तसेच येशूचे निष्ठावंत मार्गाक्रमण सर्व निर्मितीत ‘देवपित्याचे गौरव’ निनादवीत आहे. यामुळेच, योहान पुढे म्हणतो: “आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो, आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्‍यांस मी असे म्हणताना ऐकले: ‘राजासनावर बसलेला ह्‍याला व कोकऱ्‍याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानुयुग आहेत.’”—प्रकटीकरण ५:१३.

२३, २४. (अ) हे धार्मिक गीत स्वर्गात तसेच पृथ्वीवर केव्हा सुरु होईल हे कशामुळे सूचित होते? (ब) वर्षामागून वर्षे जात असता या धार्मिक गीताचा आवाज कसा अधिक भरदार होत आहे?

२३ हे श्रेष्ठ धार्मिक गीत केव्हा गायिले जाते? ते प्रभुच्या दिवसाच्या आरंभाला सुरु झाले. स्वर्गातून सैतान व त्याच्या दुरात्म्यांना काढून टाकल्यावर “स्वर्गात [असणारा] . . . प्रत्येक सृष्ट प्राणी” या स्तुतीगायनात सहभाग घेऊ शकत होता. शिवाय अहवाल दाखवितो तसे १९१९ पासून पृथ्वीवरील वाढत्या संख्येने आपले सूर यहोवाची स्तुती करण्यात उंचावले आहेत. यांची वृद्धी काही हजारांपासून ते १९९० च्या आरंभापर्यंत चाळीस लाखापेक्षा जास्त झाली आहे. * सैतानाची पृथ्वीवरील प्रत्येक व्यवस्था नष्ट झाल्यावर “पृथ्वीवर . . . (असणारा) प्रत्येक सृष्ट प्राणी” यहोवाची व त्याच्या पुत्राची स्तुती गाईल. यहोवाच्या स्वतःच्या नियुक्‍त समयी जेव्हा अगणित लाखोंचे पुनरुत्थान होणार तेव्हा, [देवाच्या स्मरणात] “पृथ्वीच्या खाली . . . जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे” त्याला या धार्मिक गाण्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

२४ आता, आधीपासूनच ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत . . . समुद्र व द्विपांवर’ असलेले लाखो मानव यहोवाच्या जगव्याप्त संघटनेसोबत मिळून नवे गीत गात आहेत. (यशया ४२:१०; स्तोत्र १५०:१-६) हजार वर्षांच्या शेवटाला जेव्हा मानवजातीला परिपूर्णतेप्रत आणण्यात येईल तेव्हा, ही आनंदी स्तुती उत्तरोत्तर उत्कर्षाकडे गतीने वाढत जाईल. यानंतर तो जुनाट साप आणि आद्य फसवेगिरी करणारा स्वतः सैतान याला, उत्पत्ती ३:१५ च्या संपूर्ण पूर्णतेनुरुप व विजयी कळसाद्वारे नष्ट केले जाईल. तेव्हा आत्मिक व मानवी अशी सर्व निर्मिती ऐक्याने म्हणेल: “राजासनावर बसलेला ह्‍याला व कोकऱ्‍याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानुयुग आहेत.” तेव्हा संपूर्ण विश्‍वभरात कोठेही तीव्र मतभेदाचा सूर पुढे ऐकू येणार नाही.

२५. (अ) योहानाने दिलेला सार्वत्रिक धार्मिक गीताचा अहवाल वाचून आम्हाला काय करण्याची चालना मिळते? (ब) चार प्राणी व २४ वडिलांनी हा दृष्टांत संपताना आपणापुढे कोणते भव्य उदाहरण मांडले आहे?

२५ हा केवढ्या आनंदाचा काळ असेल! खरेच, योहानाने येथे जे वर्णन दिले आहे त्यामुळे आमची अंतःकरणे आनंदाने भरुन जातात व आम्हालाही स्वर्गीय मंडळीसोबत यहोवा देव व येशू ख्रिस्ताची स्तुती अंतःकरणपूर्वक गायनाने व्यक्‍त करण्याची चालना मिळते. तर मग, चांगली कामे करीत राहण्यास यामुळे आम्हाला अधिक दृढनिश्‍चय लाभत नाही का? आम्ही तसे केल्यास, आम्हाला यहोवाच्या मदतीने आनंदी कळसाच्या वेळी तेथे राहण्यात आणि सार्वत्रिक सांघिक गीतात आपला सूर मिळवण्याची आशा धरता येईल. चार करुबी प्राणी तसेच पुनरुत्थित झालेले अभिषिक्‍त ख्रिश्‍चन हे एकमेकांच्या पूर्ण एकमतात आहेत, कारण हा दृष्टांत या शब्दांनी संपतो: “तेव्हा ते चार प्राणी म्हणाले: ‘आमेन’ आणि वडीलमंडळाने पाया पडून नमन केले.”—प्रकटीकरण ५:१४.

२६. आम्ही कशावर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि आता कोकरा काय करण्याच्या बेतात आहे?

२६ प्रिय वाचकहो, तुम्ही “योग्य” अशा यज्ञार्पित कोकऱ्‍यावर आपला विश्‍वास ठेवा आणि “राजासनावर बसलेला” यहोवा देव याची भक्‍ती व सेवा करण्याच्या तुमच्या नम्र प्रयत्नांद्वारे आशीर्वाद मिळवा. योहान वर्ग आज, “योग्य वेळी [आध्यात्मिक] शिधासामुग्री” देण्याद्वारे तुम्हाला मदत करो. (लूक १२:४२) पण पाहा! कोकरा आता सात शिक्के फोडण्याच्या बेतात आहे. तर आता, आमच्यासाठी कोणत्या उत्तेजक गोष्टी उघड होण्यासाठी राखून ठेवल्या आहेत?

[तळटीपा]

^ “त्या प्रत्येकाजवळ वीणा व धूपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती,” (NW) हे वाक्य व्याकरणदृष्ट्या पाहू जाता, वडील व चार प्राण्यांना लागू होते. तरीपण संदर्भ हे स्पष्ट करतो की, ते विधान केवळ २४ वडिलांनाच उल्लेखून आहे.

^ पृष्ठ ६४ वरील तक्‍ता बघा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८६ पानांवरील चित्र]