व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २

तुम्हाला चांगला विवेक कसा बाळगता येईल?

तुम्हाला चांगला विवेक कसा बाळगता येईल?

‘चांगला विवेक बाळगा.’—१ पेत्र ३:१६, पं.र.भा.

१, २. अंधारात रस्त्यावरून चालताना हातात बॅटरी असणे महत्त्वाचे का आहे व या बॅटरीची तुलना आपण विवेकाशी कशी करू शकतो?

समजा, एक मनुष्य रस्त्याने चालला आहे आणि रात्र होते. अशा वेळी, त्याला ठेच लागून किंवा खड्ड्‌यात पडून त्याचे काही बरे-वाईट होऊ नये म्हणून त्याच्याजवळ कोणती गोष्ट असायला हवी? रस्ता नीट दिसावा म्हणून त्याच्याकडे बॅटरी असणे महत्त्वाचे आहे.

तुमच्याजवळ बॅटरी नसेल तर तुम्हाला रस्ता नीट दिसणार नाही. तुम्ही ठेचकाळून पडू शकता किंवा तुम्हाला दुखापत होऊ शकते. पण बॅटरीच्या उजेडामुळे रस्त्यावरील खाचखळगे तुम्हाला दिसतील व यामुळे तुम्ही होणारा अनर्थ टाळू शकाल. त्याअर्थी काही प्रमाणात, या बॅटरीची तुलना यहोवाने आपल्या सर्वांना दिलेल्या एका अमूल्य देणगीशी करता येऊ शकेल. ही देणगी म्हणजे आपला विवेक. (याकोब १:१७) आपल्याला विवेक नसता तर आपण जीवनात कोठेही भरकटलो असतो. आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाकडे लक्ष दिल्यास, आपल्याला जीवनात दिशा मिळते व आपण जीवनाच्या योग्य मार्गावर चालू शकतो. पण हा विवेक म्हणजे नेमका आहे तरी काय व तो कसे कार्य करतो, हे आपण आधी पाहूया. त्यानंतर मग, आपण पुढील तीन मुद्द्‌यांवर चर्चा करूया, जसे की (१) आपण आपला विवेक प्रशिक्षित कसा करू शकतो (२) आपण इतरांच्याही विवेकाचा विचार का केला पाहिजे आणि (३) चांगला विवेक बाळगल्याने आपल्याला कोणते फायदे होतात?

विवेक काय आहे व तो कसे कार्य करतो

३. “विवेक” असे भाषांतर करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ काय आहे व इतर कोणत्याही प्राणीमात्रात नसणाऱ्या कोणत्या अनोख्या क्षमतेला तो सूचित करतो?

बायबलमध्ये, “विवेक” असे ज्या ग्रीक शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे त्याचा अक्षरशः अर्थ, “स्वतःविषयीचे ज्ञान” असा होतो. इतर कोणत्याही प्राणीमात्रात नसणारी क्षमता अर्थात स्वतःला जाणून घेण्याची क्षमता आपल्याला देवाकडून मिळाली आहे. जसे की, आपण दोन मिनिटे थांबून विचार करू शकतो, की मी नैतिकरीत्या शुद्ध आहे का? आपला विवेक जणू एका न्यायाधीशाप्रमाणे आपल्या कार्यांचे, आपल्या प्रवृत्तींचे व आपल्या आवडी-निवडींचे परीक्षण करतो. तो आपल्याला योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो अथवा चुकीचा निर्णय घेण्यापासून सावध करतो. आपण जर योग्य निर्णय घेतला तर तो आपल्याला दिलासा देतो आणि चुकीचा निर्णय घेतला तर सतत बोचत राहतो.

४, ५. (क) आदाम व हव्वा यांना विवेकबुद्धी होती हे आपल्याला कसे कळते व त्यांनी देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे काय झाले? (ख) प्राचीन काळातील विश्वासू लोकांचा विवेक कार्य करत होता हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

मानवाला ही क्षमता उपजतच मिळाली आहे. आदाम व हव्वा या पहिल्या मानवांनी दाखवून दिले की त्यांना देखील विवेकबुद्धी होती. याचे एक उदाहरण म्हणजे, पाप केल्यानंतर त्यांना स्वतःची लाज वाटली. (उत्पत्ति ३:७, ८) त्या प्रसंगी त्यांचा विवेक त्यांना बोचू लागला खरा, पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यांनी जाणूनबुजून देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले. यामुळे ते स्वतःहून बंडखोर व यहोवा देवाचे विरोधक बनले. ते परिपूर्ण असल्यामुळे, आपण काय करतोय हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होते. त्यामुळे आता पुन्हा देवाकडे वळणे त्यांना शक्य नव्हते.

आदाम व हव्वा परिपूर्ण असूनही त्यांनी मुद्दाम वाईट निवड केली. पण याउलट, अनेक अपरिपूर्ण मानवांनी आपल्या विवेकाचे ऐकून योग्य निवड केली. जसे की, विश्वासू ईयोब. तो स्वतःविषयी असे म्हणू शकला: “मी धार्मिक आहे हे माझे म्हणणे मी धरून राहणार, ते मी सोडावयाचा नाही; माझ्या आयुष्यातील कोणत्याहि दिवसाविषयी माझे मन मला खात नाही.” * (ईयोब २७:६) ईयोब खरोखरच एक विवेकनिष्ठ मनुष्य होता. तो आपल्या विवेकाचे ऐकून त्यानुसार अगदी काळजीपूर्वक वागत होता. म्हणूनच तर तो समाधानकारकपणे म्हणू शकला की त्याचे “मन त्याला खात नाही”; म्हणजेच त्याचा विवेक त्याला अपराधी भावनेमुळे दोषी ठरवत नाही. आता दाविदाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्याची प्रतिक्रिया ईयोबापेक्षा वेगळी होती. एकदा, यहोवाने अभिषिक्त केलेल्या राजा शौलाचा त्याने अनादर केला तेव्हा त्याचे “मन त्याला खाऊ लागले.” (१ शमुवेल २४:५) पण यामुळेच तर तो, पुन्हा कधीही असे अनादराचे कृत्य करू नये हा महत्त्वाचा धडा शिकला.

६. सर्व मानवजातीला विवेकाची देणगी मिळाली आहे हे कशावरून म्हणता येते?

पण मग, फक्त यहोवाच्या सेवकांनाच विवेकाची देणगी मिळाली आहे का? प्रेषित पौलाने ईश्वरप्रेरणेने लिहिलेल्या शब्दांकडे लक्ष द्या: “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्‌सद्विवेकबुद्धिहि त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.” (रोमकर २:१४, १५) यहोवाच्या नियमांची कसलीच माहिती नसलेले लोकसुद्धा कधीकधी, आपल्या सद्‌सद्विवेकबुद्धीमुळे अर्थात विवेकामुळे देवाच्या तत्त्वांच्या अनुषंगाने कार्य करण्यास प्रवृत्त होतात.

७. कधीकधी आपला विवेक आपली दिशाभूल कशी करू शकतो?

परंतु काही वेळा आपला विवेक आपली दिशाभूल करू शकतो. तो कसा? वर चर्चा केलेल्या बॅटरीच्या उदाहरणाचा पुन्हा विचार करा. बॅटरीतले सेल गेले असतील तर बॅटरीतून उजेड येणार नाही. आपल्या विवेकाच्या बाबतीतही असेच आहे. आपण जर देवाच्या वचनाचा अभ्यास केला नाही तर आपला विवेक कार्य करणार नाही. यामुळे बरोबर व चूक यातला फरक आपल्याला कळणार नाही. तसेच, आपल्या अंतःकरणाच्या स्वार्थी इच्छांचा आपल्यावर प्रभाव झाला असेल तर आपला विवेक आपली दिशाभूल करेल. देवाच्या वचनातील भरवशालायक मार्गदर्शनाविना आपला विवेक कार्य करत असेल तर, अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींत आपल्याला बऱ्यावाईटातला फरक करता येणार नाही. तेव्हा, आपल्या विवेकाने नीट कार्य करावे म्हणून यहोवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन हे हवेच. पौलाने लिहिले: “माझी सद्‌सद्विवेकबुद्धीहि पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते.” (रोमकर ९:१) पण मग आपल्या विवेकाने यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या अनुषंगाने कार्य करण्याकरता आपण काय करू शकतो? आपण त्याला प्रशिक्षित करू शकतो.

आपण आपला विवेक प्रशिक्षित कसा करू शकतो?

८. (क) आपल्या अंतःकरणाचा आपल्या विवेकावर प्रभाव कसा पडू शकतो आणि निर्णय घेताना आपण प्रथम कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? (ख) एका ख्रिश्चन व्यक्तिच्या बाबतीत शुद्ध विवेक असणे नेहमीच पुरेसे का नाही? (तळटीप पाहा.)

तुम्ही विवेकाच्या आधारावर निर्णय कसा घेता? असे दिसते की काहीजण फक्त, एखाद्या गोष्टीबाबत त्यांना काय वाटते यावर विचार करतात आणि मग, ‘मला तर या अमूक गोष्टीत काहीच चूक वाटत नाही,’ अशी स्वतःची समजूत घालतात. परंतु, आपल्या अंतःकरणातील इच्छा कधीकधी इतक्या प्रबळ असू शकतात की त्यांचा आपल्या विवेकावरही जबरदस्त प्रभाव पडू शकतो. बायबलमध्ये म्हटले आहे: “हृदय सर्वात कपटी आहे; . . . त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९) यास्तव, आपला निर्णय आपले अंतःकरण आपल्याला जे सांगते त्यानुसार नसावा. तर, यहोवा देवाला आपण संतुष्ट कसे करू शकतो, हे आपण प्रथम पाहिले पाहिजे. *

९. देवाबद्दलचे भय म्हणजे काय व या भयाचा आपल्या विवेकावर कोणता प्रभाव पडू शकतो?

प्रशिक्षित विवेकाच्या आधारावर जर आपण निर्णय घेतला तर त्यावरून आपल्यामध्ये स्वार्थी वृत्ती नव्हे तर देवाबद्दलचे भय आहे हे दिसून येईल. याबाबतीत, विश्वासू राज्यपाल नहेम्या याचे अगदी योग्य उदाहरण आहे. जेरुसलेमच्या लोकांकडून विशिष्ट थकबाकी व कर वसूल करण्याचा त्याला अधिकार होता. तरीपण त्याने तसे केले नाही. का? कारण यहोवाच्या लोकांवर जुलूम करून यहोवाची नापसंती पत्करण्याचा विचारही त्याला नकोसा वाटत होता. त्याने म्हटले: “मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते.” (नहेम्या ५:१५) आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल आपल्याला मनापासून असलेले भय अर्थात त्याला कोणत्याही प्रकारे नाराज न करण्याचे भय आपण बाळगणे आवश्यक आहे. आपल्याला कोणतेही निर्णय घ्यावे लागतात तेव्हा देवाबद्दलचे हे आदरयुक्त भय, त्याच्या वचनातून मार्गदर्शन मिळवण्यास आपल्याला प्रवृत्त करेल.

१०, ११. मद्यपानाविषयी बायबलमध्ये कोणती तत्त्वे दिली आहेत व या तत्त्वांचा अवलंब करताना आपण देवाचे मार्गदर्शन कसे मिळवू शकतो?

१० उदाहरणार्थ, मद्यपानाचा विचार करा. चारचौघांत असताना मद्य घ्यावे की नाही, हा निर्णय आपल्यातील बहुतेकांना घ्यावा लागतो. त्यासाठी, आपण स्वतःला प्रथम प्रशिक्षित केले पाहिजे. याबाबतीत बायबल काय सांगते? बायबलमध्ये, योग्य प्रमाणात मद्यपान करण्यास मनाई नाही. उलट, द्राक्षारसाची देणगी दिल्याबद्दल बायबल यहोवाची स्तुती करते. (स्तोत्र १०४:१४, १५) परंतु दारूबाजीचा व पिऊन गोंधळ घालण्याचा बायबल निषेध करते. (लूक २१:३४; रोमकर १३:१३) शिवाय, ते दारूबाजीला लैंगिक अनैतिकता सारख्या गंभीर पापामध्ये गणते. *१ करिंथकर ६:९, १०.

११ एक ख्रिस्ती व्यक्ती बायबलमधील अशा तत्त्वांचा आपल्या जीवनात अवलंब करून आपला विवेक प्रशिक्षित करते. यामुळे तिचा विवेक संवेदनशील बनतो. अर्थात, योग्य आणि अयोग्य गोष्टींची तिला जाणीव करून देतो. म्हणून, चारचौघांत असताना आपल्याला मद्यपानाविषयी निर्णय घ्यावा लागतो तेव्हा आपण पुढील प्रश्न स्वतःला विचारू शकतो: ‘ही पार्टी कशाची आहे? ही पार्टी कदाचित बेताल होण्याची शक्यता आहे का? माझ्या स्वतःच्या कमतरता काय आहेत? मला, सारखे सारखे मद्य घ्यावेसे वाटते का? मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही का? माझ्या समस्या विसरून जाण्यासाठी मी मद्य घेतो का? प्रमाणात मद्यपान करण्याचा संयम मी बाळगतो का?’ बायबल तत्त्वांवर आणि त्यामुळे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आपण मनन करतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी आपण यहोवाला प्रार्थना करतो. (स्तोत्र १३९:२३, २४) असे केल्याने, आपल्याला यहोवाची मदत मिळेल आणि त्याच्या तत्त्वांनुसार जगण्याकरता आपण आपला विवेक प्रशिक्षित करू. परंतु, आणखी एक गोष्ट आहे जिचा निर्णय घेताना आपण बारकाईने विचार केला पाहिजे.

आपण इतरांच्याही विवेकाचा विचार का केला पाहिजे

बायबल प्रशिक्षित विवेक तुम्ही मद्य घ्यावे की न घ्यावे हे ठरवण्यास मदत करेल

१२, १३. प्रत्येक ख्रिस्ती बंधूभगिनीच्या विवेकात तफावत का आहे आणि या तफावतींबद्दल आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे?

१२ प्रत्येक ख्रिस्ती बंधूभगिनीच्या विवेकात तफावत आहे हे जाणून तुम्हाला नवल वाटेल. एखाद्याला, एखादी प्रथा अथवा रीतिरीवाज आक्षेपार्ह वाटेल; तर दुसऱ्याला ती आवडेल व त्यात त्याला चुकीचे असे काहीच वाटणार नाही. जसे की, चारचौघांत मद्य घेण्याविषयीचेच उदाहरण पाहा. एखाद्याला कदाचित आपल्या काही मित्रांसोबत कुठल्यातरी संध्याकाळी निवांत बसलेले असताना मद्य घ्यायला आवडेल. पण तेच दुसऱ्याला आवडणार नाही. असा फरक का? प्रत्येकाच्या विवेकात असलेल्या या तफावतींचा आपल्या निर्णयांवर कसा प्रभाव पडला पाहिजे?

१३ लोकांची मते वेगवेगळी असतात कारण त्यांचे संगोपन भिन्न परिस्थितींत झालेले असते. जसे की, काहींना आपल्या मनाच्या पीडेची अर्थात आपल्या कमतरतेची चांगलीच जाणीव असते. या कमतरतेवर मात करण्याचा त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केला असेल पण कधीकधी कदाचित त्यांना यश मिळाले नसेल. (१ राजे ८:३८, ३९, पं.र.भा.) मद्यपानाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्यास अशा लोकांचा विवेक कदाचित त्यांना प्रवृत्त करेल. जर अशी एखादी व्यक्ती तुमच्या घरी येते आणि तुम्ही तिला मद्य घेणार का, असे विचारता तेव्हा ती नकार देते. यामुळे तुम्हाला वाईट वाटेल का? तुम्ही तिला गळ घालाल का? मुळीच नाही. ती व्यक्ती मद्य का घेत नाही, याचे कारण कदाचित ती सांगणार नाही. ही कारणे तुम्हाला माहीत असोत अथवा नसोत, बंधुप्रेम मात्र तुम्हाला तिच्या भावनांचा विचार करण्यास प्रवृत्त करेल.

१४, १५. पहिल्या शतकातील मंडळीतल्या काही बंधूभगिनींच्या विवेकात कोणत्या बाबतीत तफावती होत्या व यावर पौलाने काय सुचवले?

१४ पहिल्या शतकातील ख्रिस्ती बंधूभगिनींच्या विवेकांतही तफावती होत्या हे प्रेषित पौलाच्याही लक्षात आले. काही बांधवांचा विवेक त्यांना, मूर्तींना अर्पिलेले अन्नपदार्थ खावयास परवानगी देत नव्हता. (१ करिंथकर १०:२५) पौलाच्या विवेकानुसार, बाजारात विकले जाणारे असे अन्नपदार्थ खाण्यास काही हरकत नव्हती. त्याच्या मते, भक्तजन मूर्तींपुढे ठेवत असलेले अन्नपदार्थ कधीही या मूर्तींच्या मालकीची नसतात. उलट ती यहोवाच्या मालकीची आहेत. तरीपण, पौलाने इतरांच्या विवेकाचा विचार केला. इतरजण आपल्यासारखा विचार करत नाहीत, हे त्याने समजून घेतले. ख्रिस्ती बनण्याआधी काही जण कदाचित मूर्तिपूजेत पार बुडाले होते. त्यांच्या मते, मूर्तिपूजेशी पूर्वी संबंधित असलेले सर्वकाही निषिद्ध होते. मग पौलाने काय केले?

१५ त्याने म्हटले: “आपण जे सशक्त आहो त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. कारण ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” (रोमकर १५:१, ३) पौलाने म्हटले, की आपण ख्रिस्ताप्रमाणे स्वतःच्या सुखांऐवजी इतरांच्या सुखांचा विचार केला पाहिजे. याच विषयावरील आणखी एका चर्चेत पौलाने म्हटले, की ख्रिस्ताने ज्या मौल्यवान मेंढरासाठी आपले बहुमूल्य रक्त वाहिले आहे त्या मेंढराला अर्थात भावाला अथवा बहिणीला अडखळण ठरण्याऐवजी मला मांसाहार वर्ज्य करणे परवडेल.—१ करिंथकर ८:१३; १०:२३, २४, ३१-३३.

१६. ज्यांचा विवेक त्यांना काही गोष्टी करू देत नाही त्यांनी, त्यांच्यापेक्षा वेगळा विवेक असलेल्यांच्या बाबतीत काय करण्याचे टाळावे?

१६ दुसऱ्या बाजूला पाहता, ज्यांचा विवेक त्यांना काही गोष्टी करू देत नाही त्यांनी इतरांची टीका करू नये. आपल्या विवेकाला ज्या गोष्टी पटतात त्या इतरांनाही पटल्याच पाहिजेत, असा अट्टहास त्यांनी करू नये. (रोमकर १४:१०) होय, आपण आपल्या विवेकाचा उपयोग स्वतःचे परीक्षण करण्याकरता केला पाहिजे, दुसऱ्यांचा न्याय करण्याकरता नव्हे. येशूचे शब्द लक्षात ठेवा: “तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका.” (मत्तय ७:१, पं.र.भा.) मंडळीतल्या सर्वांनी, त्यांच्या विवेकाला काय पटते किंवा काय पटत नाही, याला चर्चेचा विषय बनवू नये. उलट, आपण मंडळीतले प्रेम व ऐक्य टिकवून कसे ठेवू शकतो ते पाहिले पाहिजे व एकमेकांचा पाय ओढण्याऐवजी एकमेकांना उत्तेजन दिले पाहिजे.—रोमकर १४:१९.

चांगला विवेक बाळगल्याने आपल्याला कोणते फायदे होतात

चांगला विवेक आपल्याला जीवन मार्गावर मार्गदर्शित करेल यामुळे आपल्याला आनंद व आंतरिक शांती मिळेल

१७. आज बहुतेक लोकांचा विवेक कसा झाला आहे?

१७ प्रेषित पेत्राने असे लिहिले: ‘चांगला विवेक बाळगा.’ (१ पेत्र ३:१६, पं.र.भा.) यहोवा देवाच्या नजरेत आपला विवेक शुद्ध असणे खरेतर एक उत्कृष्ट वरदानच आहे. कारण आपला विवेक आज बहुतेक लोकांचा आहे तसा नाही. पौलाने अशा काही लोकांबद्दल सांगितले ज्यांची “सद्‌सद्विवेकबुद्धि तर डाग दिल्यासारखीच” होती. (१ तीमथ्य ४:२) तापलेल्या लोखंडाने जेव्हा शरीरावर डाग दिला जातो तेव्हा तिथली त्वचा जळते आणि तेथे व्रण कायम राहतो. शिवाय त्या त्वचेवर संवेदना राहत नाहीत. पुष्कळ लोकांचा विवेक डाग दिलेल्या त्वचेसारखा मृत झाला आहे. त्यावर इतके व्रण आहेत व तो इतका असंवेदनशील बनला आहे की तो त्यांना सावधगिरीचा इशारा देत नाही, तो कशाचाही निषेध करत नाही व त्यामुळे त्यांच्या मनात अपराधीपणाची किंवा दोषी भावना येत नाहीत.

१८, १९. (क) अपराधी किंवा दोषी भावनांचे कोणते फायदे आहेत? (ख) आपल्या हातून घडलेल्या एखाद्या गंभीर पापाबद्दल पश्‍चात्ताप केल्यानंतरही आपला विवेक आपल्याला दोषी ठरवत असेल तर आपण काय करू शकतो?

१८ खरे तर, आपल्या मनात अपराधीपणाची भावना येते म्हणजेच, आपण काहीतरी चूक केली आहे असा आपला विवेक आपल्याला सांगत असतो. यामुळे जेव्हा एक पापी, पश्‍चात्ताप करतो तेव्हा त्याची सर्वात घोर पातकेही क्षमा केली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, राजा दावीद याच्या हातून एकदा खूप मोठे पाप घडले. पण त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे त्याला क्षमा करण्यात आली. त्याने केलेल्या पापाची त्याला किळस वाटू लागली व इथून पुढे आपण यहोवाच्या नियमांचे पालन करू असा निर्धार केल्यामुळे, यहोवा “उत्तम व क्षमाशील” आहे हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले. (स्तोत्र ५१:१-१९; ८६:५) पण, पश्‍चात्ताप केल्यानंतरही आपल्या मनात अपराधीपणाच्या व दोषी भावना येतच राहिल्या तर काय?

१९ कधीकधी, काहींचा विवेक त्यांना खूपच दोषी ठरवत असतो. पण या भावनांचा आता काही उपयोग नसतो. अशा वेळी, यहोवा सर्व मानवी भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी आपण आपल्या मनाची समजूत घातली पाहिजे. आपण जसे इतरांना उत्तेजन देऊ त्याचप्रमाणे आपण स्वतःही यहोवाचे प्रेम आणि त्याने केलेली क्षमा पूर्ण भरवशाने स्वीकारली पाहिजे. (१ योहान ३:१९, २०) दुसऱ्या बाजूला पाहता, आपला विवेक शुद्ध असेल तर आपल्याला आंतरिक शांती मिळेल, आपले चित्त शांत राहील आणि या जगात अभावानेच आढळणारा खरा आनंद आपल्याला मिळेल. ज्यांच्या हातून गंभीर पाप घडले होते त्यांनी पश्‍चात्ताप केल्यानंतर अशा प्रकारची मानसिक शांती व आनंद अनुभवला आहे. असे लोक आज चांगल्या विवेकाने यहोवा देवाची सेवा करत आहेत.—१ करिंथकर ६:११.

२०, २१. (क) हे पुस्तक तुम्हाला कोणती मदत देण्याकरता तयार करण्यात आले आहे? (ख) ख्रिस्ती या नात्याने आपल्या सर्वांना कोणते स्वातंत्र्य आहे व या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग आपण कसा केला पाहिजे?

२० हा खरा आनंद मिळण्यास तसेच सैतानी व्यवस्थीकरणाच्या उरलेल्या या त्रस्त दिवसांत शुद्ध विवेक बाळगण्यास आपल्याला मदत करण्यासाठी हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. दररोज तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. अशा वेळी बायबलच्या कोणत्या नियमांचा अथवा तत्त्वांचा विचार व अवलंब केला जाऊ शकतो याची सविस्तर चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली नाही. शिवाय, या पुस्तकात विवेकाच्या बाबतीत काय केले पाहिजे आणि काय नाही, अशा लेखी सूचना असतील, अशी अपेक्षा करू नका. तर या पुस्तकाचा हेतू, तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करून व त्यातील तत्त्वांचा अवलंब करून तुमचा विवेक प्रशिक्षित व संवेदनशील बनवण्यास मदत करणे हा आहे. मोशेला दिलेले नियमशास्त्र सरळसोट होते. परंतु “ख्रिस्ताचा नियम” यहोवाच्या उपासकांना लेखी नियमांपेक्षा विवेकानुसार व बायबलमधील तत्त्वांनुसार वागण्यास शिकवतो. (गलतीकर ६:२) अशा प्रकारे यहोवाने ख्रिश्चनांना अनोखे स्वातंत्र्य दिले आहे. पण देवाचे वचन आपल्याला अशी ताकीद देते, की आपण या स्वातंत्र्याचा उपयोग “दुष्टपणा झाकण्यासाठी” करू नये. (१ पेत्र २:१६) तर, या स्वातंत्र्यामुळे आपल्याला, यहोवावर आपले किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याची अद्‌भुत संधी मिळते.

२१ तुम्ही यहोवाबद्दल नव्याने जाणून घेऊ लागला तेव्हा ‘सरावाने तुमच्या ज्ञानेंद्रियांना’ प्रशिक्षित करण्यास तुम्ही सुरुवात केली. (इब्री लोकांस ५:१४) आजही तुम्ही बायबल तत्त्वांचा आपल्या जीवनात सर्वोत्तम अवलंब कसा करायचा यावर प्रार्थनापूर्वक विचार करून निर्णय घेण्याद्वारे हीच पद्धत पुढे चालू ठेवली पाहिजे. प्रत्येक दिवशी तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात तेव्हा या बायबल प्रशिक्षित विवेकाचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या मार्गावर उजेड पाडणाऱ्या त्या बॅटरीप्रमाणे तुमचा विवेक तुम्हाला, तुमच्या स्वर्गीय पित्याला आनंदित करणारे निर्णय घेण्यास मदत करेल. देवाच्या प्रीतीमध्ये राहण्याचा यापेक्षा आणखी चांगला मार्ग कोणता असू शकतो?

^ परि. 5 इब्री शास्त्रवचनांमध्ये “विवेक” यासाठी कोणताही विशिष्ट शब्द वापरण्यात आलेला नाही. पण, या ठिकाणी विवेक हाच शब्द वापरण्यात आला असावा हे स्पष्ट आहे. “मन” हा शब्द सहसा आंतरिक व्यक्तिला सूचित करतो. या उदाहरणात, मन हा शब्द आंतरिक व्यक्तिच्या एका विशिष्ट भागाला अर्थात त्याच्या विवेकाला सूचित करतो. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये, “विवेक” असे भाषांतर करण्यात आलेला ग्रीक शब्द जवळजवळ ३० वेळा आढळतो.

^ परि. 8 नुसताच शुद्ध विवेक असणे पुरेसे नाही, असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, पौलाने म्हटले: “जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभु आहे.” (१ करिंथकर ४:४) पौलाप्रमाणे, ख्रिश्चनांचा छळ करणाऱ्यांना, आपण काही चूक करतोय असे कदाचित वाटणार नाही. आपली कार्ये देवाला मान्य आहेत, असे ते विचार करतील. त्यामुळे, आपला विवेक आपल्या स्वतःच्या आणि देवाच्या नजेरत शुद्ध असला पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये २३:१; २ तीमथ्य १:३.

^ परि. 10 एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे. ती म्हणजे, अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे, की दारुड्या लोकांना प्रमाणात दारू पिणे शक्य नसते. त्यांच्यासाठी “प्रमाणात पिणे” म्हणजे दारूला न शिवणे.