मद्यपान करण्यात काय चूक आहे?
अध्याय ३३
मद्यपान करण्यात काय चूक आहे?
‘मद्यपान करण्यात काही गैर आहे का? ते खरोखरच हानीकारक आहे का? की ते केवळ माझ्यासाठीच गैर आहे आणि बाकी सर्व प्रौढांकरता ठीक आहे?’ असे प्रश्न निश्चितच तुम्हाला भेडसावत असतील. तुमचे पालक मद्यपान करत असतील. तुमच्या वयाचे (कायदेशीर वयोमर्यादा न जुमानता) अनेक तरुण लोक पितात. टीव्हीतील कार्यक्रम आणि चित्रपटांद्वारे ते आकर्षक दिसते.
मर्यादशीलतेने वापर केल्यास मद्याने खरोखर आनंद मिळू शकतो. द्राक्षारसाने एखाद्याला आनंद मिळतो किंवा भोजनाचा स्वाद अधिक वाढतो हे बायबल मान्य करते. (उपदेशक ९:७) तथापि, मद्याचा दुरुपयोग केल्यास पालक, शिक्षक आणि पोलिसांसोबत झगडे ते अकाली मृत्यूपर्यंतच्या गंभीर समस्या उद्भवतात. बायबल म्हणते त्यानुसार: “द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.” (नीतिसूत्रे २०:१) यास्तव, मद्यपानाबाबत तुम्ही जबाबदार निर्णय घ्यावा हे महत्त्वाचे आहे.
पण मद्यपान आणि त्याच्या परिणामांविषयी तुम्हाला खरोखरच किती माहिती आहे? खालील परीक्षा तुम्हाला ते शोधून काढण्यास मदत करील. फक्त खाली खरे किंवा खोटे हे सांगा:
१. मादक पेये मुख्यतः उत्तेजक असतात ____
२. मद्याची कोणतीही मात्रा मानवी शरीराला हानीकारक आहे ____
३. सर्व मादक पेये—दारू, वाईन, बीयर—रक्तप्रवाहात शोषली जाण्यास तितकाच वेळ लागतो ____
४. ब्लॅक कॉफी किंवा अंगावर थंड पाणी घेतल्यावर एखादी व्यक्ती लवकर शुद्धीवर येऊ शकते ____
५. मद्याच्या विशिष्ट मात्रेचा सर्वांवर सारखाच परिणाम होतो ____
६. दारूबाजी आणि मद्यासक्ती हे दोन्ही एकच आहेत ____
७. मद्य आणि इतर शामके (जसे की बार्बिच्यूरेट औषधे) एकसाथ घेतल्यावर एकमेकांचा परिणाम वाढतो ____
८. मद्याचे प्रकार बदलत राहिल्यास एखाद्या व्यक्तीला नशा चढत नाही ____
९. अगदी अन्नाप्रमाणे मद्यही पचवले जाते ____
आता पृष्ठ २७० वर दिलेल्या उत्तरांशी तुमची उत्तरे पडताळून पाहा. मद्याबाबतचे तुमचे काही दृष्टिकोन चुकीचे ठरले का? असे असल्यास, मद्याबद्दल अज्ञानता घातक ठरू शकते हे जाणून घ्या. बायबल इशारा देते, की अनुचित वापर केल्यास मद्य ‘सर्पासारखा दंश करते, फुरश्याप्रमाणे झोंबते.’—नीतिसूत्रे २३:३२.
उदाहरणार्थ, जॉनने किशोरावस्थेतच विवाह केला. एका रात्री आपल्या पत्नीशी भांडल्यावर तो घराबाहेर पडला आणि दारू पिण्याचा ठाम निश्चय केला. अर्धा लिटर वोडका ढोसल्यावर तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी आणि नर्सेसनी प्रयत्न केले नसते, तर जॉनने आपले प्राण गमावले असते. स्पष्टतः, जास्त मद्य गटागट पिणे घातक ठरू शकते हे त्याला समजले नाही. अज्ञानतेमुळे त्याला जवळजवळ आपल्या जिवाची किंमत मोजावी लागली.
उलट परिणाम
हा मद्याचा सर्वात नकळत हानीकारक परिणाम आहे. मद्य हे उद्दीपक नसून मंद करणारे पेय आहे. पेय घेतल्यावर तुम्हाला जो सुखद अनुभव वाटतो तो यासाठी, कारण मद्यामुळे तुमची चिंता कमी होते किंवा मंदावते. आधीपेक्षा तुम्हाला आता आराम वाटतो, कमी व्याकुळता आणि चिंता वाटते. यास्तव, मर्यादशील प्रमाणात घेतल्यास, मद्य काही प्रमाणात एखाद्या व्यक्तीला ‘आपल्या हालाकीचे विस्मरण’ व्हावयास मदत करते. (नीतिसूत्रे ३१:६, ७) उदाहरणार्थ, पॉल नामक एक युवक कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी पीत होता. “मला लहान वयातच हे कळालं की, पिऊन मी आपला ताणतणाव विसरू शकतो,” असे तो आठवून सांगतो. “माझं डोकं शांत व्हायचं.”
काहीच नुकसान झालेले नाही का? चूक, नुकसान झाले आहे! मद्याचा उलट परिणाम होतो. मद्याची गुंगी उतरल्यावर काही तासांनी तुमची चिंता पुन्हा वाढते—पण नेहमीइतकी नाही. तर ती पूर्वीपेक्षाही अधिक होते! तुम्ही अधिक चिंतातूर होता किंवा अधिक तणावग्रस्त होता. मद्याचा व्यसननिवृत्ती परिणाम तब्बल १२ तासांपर्यंत टिकू शकतो. हे खरे की, तुम्ही पुन्हा प्यायल्यावर तुमची चिंता कमी होईल. पण, काही तासांनी ती वाढेल आणि यावेळेस तर आधीपेक्षा आणखी जास्त वाढेल! अशाप्रकारे फसवा परमानंद आणि अधिकाधिक उद्विग्नतेचे हे घातक चक्र चालतच राहते.
म्हणून दीर्घकाळानंतर, मद्यामुळे तुमची व्याकुळता खरे पाहता कमी होणारच नाही. तर त्याउलट ती वाढेलच. मग, मद्याची नशा उतरल्यावर तुमची समस्या जशाच्या तशाच असतात.
भावनिकरित्या खुंटलेले
इतरांचा असा दावा आहे की, मद्यामुळे कार्यकुशलता वाढते. उदाहरणार्थ, डेनीस अत्यंत बुजऱ्या स्वभावाचा होता आणि त्याला साधीसुधी चर्चा करणेही जड वाटायचे. पण मग त्याने एक नवीन मार्ग शोधून काढला. “थोडीफार घेतल्यावर मी ठीक व्हायचो,” असे तो म्हणाला.
पण, समस्या अशी आहे की डेनीसप्रमाणे अडीअडचणींपासून पळ काढून नव्हे तर त्यांना सामोरे जाऊन प्रौढता येते. युवक असताना समस्यांना तोंड देण्याचे शिकून घेणे एका दृष्टीने प्रौढपणातील परीक्षांकरता एकप्रकारची तालीम आहे. डेनीसला काही काळानंतर कळाले की, मद्याच्या तात्पुरत्या परिणामांनी त्याला बुजरेपणावर मात करण्यास मदत केली नाही. “मद्याची धुंदी उतरल्यावर मी पुन्हा पहिल्यासारखा व्हायचो,” असे तो सांगतो. आता इतक्या वर्षांनंतर काय स्थिती आहे? डेनीस म्हणतो: “स्वतःच्या परीने मी लोकांशी बोलायला कधीच शिकलो नाही. मला वाटतं अशातऱ्हेने माझी वाढ खुंटली.”
तणावाचा सामना करताना मद्याचा आधार घेतल्यासही हे खरे ठरते. किशोरवयीन असताना असे केलेला जोएन कबूल करतो: “अलीकडेच, एका तणावपूर्ण स्थितीत मी विचार केला: ‘या क्षणी एक ड्रिंक मिळाली तर किती बरं होईल.’ थोडीशी घेतल्यावर स्थिती नियंत्रणात आणता येते असं वाटू लागतं.” पण तसे नसते!
न्यूयॉर्क स्टेट जर्नल ऑफ मेडिसीन यात प्रकाशित झालेला लेख म्हणतो: “जेव्हा औषधे [मद्य देखील] कठीण परिस्थितींचा—शैक्षणिक, सामाजिक किंवा आपापसातील—तणाव कमी करण्याचे साधन ठरते तेव्हा तोंड देण्याची निकोप कौशल्ये शिकण्याची आवश्यकता नष्ट होते. ह्याचे परिणाम प्रौढ होईपर्यंत कदाचित जाणवणार नाहीत पण प्रौढ झाल्यावर मात्र निकटचे व्यक्तिगत नातेसंबंध स्थापित करणे सहसा कठीण होऊन बसते आणि ती व्यक्ती भावनिकरित्या एकाकी होते.” म्हणून समस्या व अडीअडचणींना थेट सामोरे जाऊन त्यांना तोंड देणे सर्वात उत्तम!
“त्याने तो घेतला नाही”
येशू ख्रिस्ताचे उदाहरण विचारात घ्या. आपल्या पार्थिव जीवनाच्या शेवटल्या रात्री येशूने अतिशय तणावपूर्ण परीक्षा सहन केली. विश्वासघात आणि मग अटक झाल्यावर येशूच्या अनेक वेळा चौकशा घेण्यात आल्या ज्यांमध्ये त्यावर खोटे आरोप लावण्यात आले. शेवटी, संपूर्ण रात्र जागरण केल्यावर, त्याला स्तंभावर खिळण्यासाठी हवाली करण्यात आले.—मार्क १४:४३–१५:१५; लूक २२:४७–२३:२५.
मग येशूला गुंगी आणविणारे काही देण्यात आले—तो मनःस्थितीत बदल करणारा पदार्थ होता ज्यामुळे त्या कठीण परिस्थितीचा सामना करावयास त्याला सोपे गेले असते. बायबल म्हणते: “त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही.” (मार्क १५:२२, २३) येशूला पूर्णतः शुद्धीवर राहायचे होते. त्याला या कठीण परिस्थितीचा सामना संपूर्णपणे शुद्धीवर राहून करायचा होता. त्याने काही पळ काढला नाही! तथापि, स्पष्टतः, तहान भागवण्यासाठी नंतर मर्यादशील प्रमाणात मादक नसलेला द्राक्षारस देण्यात आला तेव्हा त्याने तो स्वीकारला.—योहान १९:२८-३०.
याच्या तुलनेत तुमच्या समस्या, दबाव किंवा तणाव क्षुल्लक
वाटतात. तरीपण, तुम्ही येशूच्या अनुभवावरून एक मौल्यवान धडा शिकू शकता. समस्या, दबाव आणि अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितींचा सामना करण्यासाठी मनःस्थितीत बदल करणारा पदार्थ (जसे की मद्य) घेण्याऐवजी त्यांना थेट सामोरे गेल्यास अधिक उत्तम. जीवनातील समस्यांना तोंड देण्यामध्ये तुम्हाला जितका अधिक अनुभव लाभेल तितक्याच कुशलतेने तुम्ही त्या सोडवाल. तुमची भावनिक मनःस्थिती सदृढ होईल.कायदेशीर वय गाठल्यावर, कधीतरी एकदा—आणि मर्यादशीलतेने—पेय घ्यावे किंवा घेऊ नये हा निर्णय तुमच्यावर (आणि कदाचित तुमच्या पालकांवर) अवलंबून असेल. हा माहितीपूर्वक, सुज्ञ निर्णय असू द्या. तुम्ही मद्यप्राशन करायचे नाही असे ठरवल्यास वाईट वाटण्याचे काहीएक कारण नाही. पण, तुम्ही कायदेशीर वयाचे झालात आणि ड्रिंक्स घेण्याचे ठरवले तर जबाबदारीची जाणीव ठेवून प्या. पळवाट म्हणून किंवा नकली धैर्य मिळवण्याकरता पिऊ नका. बायबलचा सल्ला सरळसोपा आहे: “द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारा आहे. त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.”—नीतिसूत्रे २०:१.
चर्चेसाठी प्रश्न
◻ पुष्कळसे युवक मादक पेये का घेतात?
◻ मद्याविषयी काही सर्वसामान्य गैरसमज कोणते आहेत?
◻ मद्य पिऊन गाडी चालवण्यामध्ये कोणते धोके आहेत?
◻ समस्यांपासून पळ काढण्याकरता मद्याचा उपयोग करण्यामधील काही धोके कोणते आहेत?
◻ समस्या आल्यावर एका युवकाने काय करावे आणि का?
[२६८ पानांवरील संक्षिप्त आशय]
मद्यपान एका तरुण व्यक्तीला फसवा परमानंद आणि अधिकाधिक उद्विग्नतेच्या घातक चक्रात अडकवू शकते
[२७१ पानांवरील संक्षिप्त आशय]
“स्वतःच्या परीने मी लोकांशी बोलायला कधीच शिकलो नाही. मला वाटतं अशा तऱ्हेने माझी वाढ खुंटली.”—किशोरावस्थेत असताना मद्याचा दुरुपयोग केलेला एक तरुण
[Box on page 264]
‘आम्ही का प्यायला लागलो’
पूर्वी मद्यपान करत असलेल्या काही किशोरवयीनांसोबत मुलाखत
मुलाखत घेणारा: तू मद्यपान का करत होतास?
संजय: सुरवातीला माझ्या मित्रमंडळीमुळे. त्यावेळची ती “फॅशन” होती, विशेषतः शनिवार-रविवारी.
डेनीस: मी १४ वर्षांचा की काय असताना मद्यपान करू लागलो. माझे वडील दारूडे होते. घरी नेहमी कॉकटेल पार्ट्या असायच्या. पिणं ही समाजमान्य गोष्ट आहे असं लहान असताना मी पाहिलं. मग, मी मोठा झाल्यावर टवाळकी करणाऱ्यांच्या गटात सामील झालो. दुसऱ्या मुलांनी मला आपल्यात सामावून घ्यावं म्हणून मी पिऊ लागलो.
मार्क: मी खेळांत भाग घ्यायचो. मला वाटतं, मी बास्केटबॉल खेळणाऱ्या संघातील मुलांसोबत १५ वर्षांचा असतानाच पिऊ लागलो. माझ्या मते, ते उत्सुकतेमुळेच होतं.
जोएन: टीव्हीवर जे काही पाहत होते त्याचाच माझ्यावर पुष्कळ प्रभाव पडला. त्यातील लोक पीत असताना मी पाहायचे. ग्रेट वाटायचं.
पॉल: माझे वडील मद्यासक्त आहेत. आम्हाला इतक्या समस्या मद्यासक्तीमुळेच होत्या हे मला आता जाणवतं. मी त्यांच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. उपरोधिकपणे, मी पिऊ लागलो त्याचे हे एक कारण होते.
जोएन: माझे पालक सहसा जास्त घेत नव्हते. पण सोशल फंक्शनच्या वेळी माझे वडील आपल्याला किती पिता येतं त्याविषयी बढाई मारायचे हे मला आठवतं. मी तो दृष्टिकोन उचलला—मला वाटलं मी निराळीच आहे. एकदा तर माझ्या मित्रांनी आणि मी पिण्याची स्पर्धाच लावली. कित्येक तास आम्ही पीत होतो. इतरांवर झाला तसा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यावेळी, ‘मी वडिलांसारखीच आहे,’ असा विचार केल्याचं मला आठवतं. मला वाटतं, मद्याविषयी त्यांच्या दृष्टिकोनाचा प्रभाव माझ्यावर खरंच झाला.
मुलाखत घेणारा: पण अनेकजण नशा चढेपर्यंत का पितात?
मार्क: आम्ही त्यासाठीच तर प्यायचो—नशा चढायला. चवीची मला कधीच पर्वा नव्हती.
मुलाखत घेणारा: म्हणजे तू परिणामासाठी पीत होतास तर?
मार्क: हो.
हॅरी: मी सुद्धा तेच म्हणेन. पिणं म्हणजे शिडीवर चढण्यासारखं आहे. प्रत्येक वेळी घेतल्यावर माणूस आणखी उंच जात असतो—शिडीच्या पुढच्या पायरीवर.
[Box on page 270]
खरे किंवा खोटे परीक्षेची उत्तरे (पृष्ठ २६३)
१. खोटे. मद्य हे प्रामुख्याने मंदावणारे पेय आहे. पेय घेतल्यावर तुम्हाला सुखद अनुभव यासाठी वाटतो कारण मद्यामुळे तुमची चिंता कमी होते किंवा मंदावते व आधीपेक्षा तुम्हाला आता आराम वाटतो, व्याकुळता आणि चिंता कमी वाटते.
२. खोटे. मर्यादशील अथवा कमी प्रमाणात मद्यप्राशन केल्याने शरीराला कोणतीही गंभीर दुखापत होत नसल्याचे आढळते. तथापि, दीर्घकाळापर्यंत घेत राहिल्याने आणि अत्यधिक मद्यपान केल्याने हृदय, मेंदू, यकृत आणि इतर अवयवांना हानी पोहंचू शकते.
३. खोटे. सहसा दारू अथवा मद्यार्क हे वाईन किंवा बीयरपेक्षा लवकर शोषले जातात.
४. खोटे. कॉफीने तुम्ही शुद्धीवर येऊ शकता आणि थंड पाण्याच्या आंघोळीने तुम्ही ओले होऊ शकता पण यकृत दर तासाला अर्धा आऊन्स या प्रमाणात मद्याचे चयापचय करेपर्यंत ते तुमच्या रक्तप्रवाहातच असते.
५. खोटे. पुष्कळशी कारणे जसे की, तुमचे वजन आणि तुम्ही काही खाल्ले आहे की नाही यांचा प्रभाव मद्याच्या परिणामावर होऊ शकतो.
६. खोटे. दारूबाजी अतिप्राशनाच्या परिणामाचे वर्णन करते. पिण्यावरील ताबा सुटणे हे मद्यासक्तीचे गुणलक्षण आहे. तथापि, नशा चढणारे सर्वचजण मद्यासक्त नसतात आणि सर्वच मद्यासक्त लोकांना नशा चढत नसते.
७. खरे. काही औषधे मद्यासोबत घेतल्यास, मद्याच्या अथवा केवळ त्या औषधाच्या सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया आणखीनच वाढतात. उदाहरणार्थ, ट्रँक्वीलायझर्स किंवा शामके आणि मद्य एकसाथ घेतल्याने गंभीर उलट परिणाम, बेशुद्धी आणि मृत्यू देखील संभवू शकतो. म्हणून, एक ड्रिंक आणि एक गोळी यांचा तुमच्या कल्पनेपेक्षाही फार जास्त परिणाम होऊ शकतो. खरोखर, त्या औषधाचा परिणाम तिप्पट, चौप्पट, पाच पटीने किंवा त्यापेक्षाही अधिक होतो!
८. खोटे. जिन, विस्की, वोडका किंवा इतर कोणत्याही पेयातील एकूण प्रमाण घेतल्याने नशा चढते.
९. खोटे. खाद्य पदार्थांप्रमाणे मद्याचे पचन हळू होते असे काही नाही. उलटपक्षी, सुमारे २० टक्के लगेचच जठरातून रक्तप्रवाहात मिसळते. बाकीचे जठरातून लहान आंतड्यात जाते आणि तेथून मग रक्तप्रवाहात शोषले जाते.
[Box/Pictures on page 266, 267]
गाडी चालवणे आणि पिणे—घातक संयोग
“पिऊन गाडी चालवणे हे १६-२४ वयोगटातील युवकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे,” असे १९८४ च्या पिणे व गाडी चालवण्याबाबत युवकांच्या राष्ट्रीय परिषदेवरील अहवालाने सांगितले. खरे म्हणजे, “इतर कोणत्याही चालकापेक्षा किशोरवयीनाला मद्याशी संबंधित असलेला अपघात होण्याची चार पटीने अधिक शक्यता असते.” (फक्त फेरी घेण्यासाठी सोबत) (इंग्रजी) अशी ही अनावश्यक जीवितहानी काही अंशी, मद्याच्या परिणामांविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे आहे. येथे काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे आहेत:
गैरसमज: तुम्ही काहीशी बीयर घेतली असल्यास गाडी चालवणे सुरक्षित आहे.
वास्तविकता: “एका तासापेक्षा कमी वेळात १२-आँउन्सचे दोन बीयर कॅन घेतल्यावर चालकाची प्रतिक्रिया, एका सेकंदाच्या दोन पंचमांशाने मंदावली जाऊ शकते—त्यामुळे ताशी ५५ मैल वेगाने जाणारी मोटार आणखी ३४ फूट पुढे जाऊ शकते—आणि संभवतः हाच थोडक्यात वाचणे आणि धडक यातील फरक असू शकतो.”—सिनियर प्रौढांकरता वाहतूक सुरक्षा आणि मद्यपान कार्यक्रमाचा विकास (इंग्रजी), जेम्स एल. मॅल्फेट्टी, इ.डी., आणि डार्लीन जे. विंटर, पीएच.डी.
गैरसमज: तुमच्या मते तुम्हाला नशा चढलेली नसल्यास गाडी चालवण्यास काहीच हरकत नाही.
वास्तविकता: तुम्हाला कसे वाटते यावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. मद्यामुळे चांगल्या अवस्थेत असण्याचा भ्रम होतो, प्यायलेल्या व्यक्तीचा तोल गेलेला असला तरीही स्वतःवर आपला काबू आहे असे वाटते.
पिऊन गाडी चालवली तर ते कोणासाठीही धोक्याचे ठरू शकते तरीही युवकांकरता ते अधिक घातक ठरू शकते. पिऊन गाडी चालवणाऱ्या प्रौढांपेक्षा युवकांना गाडी नीट चालवता येत नाही कारण हा अनुभव त्यांच्याकरता नवीन असून इतका सर्वसामान्य नसतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे, किशोरवयीन हे अननुभवी चालक आणि अननुभवी पिणारे देखील असतात आणि पिऊन गाडी चालवण्याच्या बाबतीत तर त्याहीपेक्षा अधिक अननुभवी असतात.”—सिनियर एडल्ट्स, ट्रॅफिक सेक्युरिटी ॲण्ड ॲल्कोहॉल प्रोग्रॅम लिडर्स गाईड डार्लीन जे. विन्टर, पीएच.डी.
प्रौढापेक्षा युवकाला कमी मद्य घेतले तरीही.
नशा चढते. युवकांचे वजन सहसा प्रौढांपेक्षा कमी असते, आणि एखाद्या व्यक्तीचे वजन जितके कमी तितकेच त्याने प्राशन केलेले मद्य विरल करायला त्याच्या शरीरात कमी द्रव्य असते. तुमच्या रक्तप्रवाहात मद्याची संहती जितकी अधिक असते तितकीच अधिक नशा तुम्हाला चढते.“चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” (नीतिसूत्रे २२:३) पिऊन गाडी चालवल्याने कोणते धोके आहेत हे सांगितल्यामुळे या दोन्ही गोष्टी एकसाथ न करण्याचा स्वतःशी निर्धार केल्यास तुम्ही “चतुर” आहात. म्हणून तुम्ही केवळ अपंगत्व—किंवा घातक जखमांपासूनच—स्वतःचा बचाव करू शकत नाही तर इतरांच्या जीवनाकरता देखील आदर दाखवू शकता.
तुम्ही हा निर्धार देखील केला पाहिजे की तुम्ही (१) पिणाऱ्या चालकासोबत गाडीत बसणार नाही आणि (२) जर कोणी मित्र पीत असेल तर त्याला गाडी चालवू देणार नाही. यामुळे तुमचा मित्र कदाचित चिडेल पण एकदा तो शुद्धीवर आला की तुम्ही जे केले त्याची तो प्रशंसा करील.—पडताळा स्तोत्र १४१:५.
[Pictures]
ज्या चालकाने मद्य घेतले आहे त्याच्यासोबत गाडीत कधीच बसू नका आणि ज्या मित्राने मद्य घेतले आहे त्याला गाडी चालवू देऊ नका
[Pictures on page 262]
सवंगडी, टीव्ही आणि काही पालकही युवकांना पिण्याकरता प्रभावित करतात
[२६५ पानांवरील चित्र]
मद्याचा दुरुपयोग केल्यावर ते ‘सर्पासारखा दंश’ करू शकते
[Pictures on page 269]
मद्यपान करून गाडी चालवल्याने बहुधा हे घडते