“तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून”
“तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून”
“तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.”—मत्तय २६:४१.
देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने पूर्वी कधी इतका तणाव अनुभवला नव्हता. त्याचे पृथ्वीवरील जीवन समाप्त होणार होते. आपल्याला लवकरच अटक करण्यात येईल, मृत्यूची शिक्षा सुनावली जाईल आणि वधस्तंभावर खिळण्यात येईल, हे त्याने जाणले होते. त्याला माहीत होते, की त्याच्या प्रत्येक निर्णयाचा व कार्याचा परिणाम, त्याच्या पित्याच्या नावावर प्रतिबिंबित होईल. येशूला हेही माहीत होते, की मानवजातीच्या भावी जीवनाची आशा ठरवली जाणार होती. या सर्व दबावांचा सामना करताना त्याने काय केले?
२ आपल्या शिष्यांसमवेत तो गेथशेमाने बागेत गेला. हे येशूचे आवडते ठिकाण होते. तेथे तो आपल्या शिष्यांपासून थोड्या अंतरावर गेला. तेथे त्याने शक्तीसाठी आपल्या स्वर्गीय पित्याला कळकळून प्रार्थना केली, आपले हृदय मोकळे केले, केवळ एकदाच नव्हे तर तीनदा अशी प्रार्थना केली. परिपूर्ण असूनही येशूला, या दबावाचा सामना आपल्या एकट्याने होणार नाही असे वाटले.—मत्तय २६:३६-४४.
३ आज, आपणही दबावाखाली आहोत. आपण या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसांत जगत आहोत याचा पुरावा या माहितीपत्रकाच्या सुरवातीला आपण पाहिला होता. सैतानाच्या जगाचे मोह व दबाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. खऱ्या देवाची सेवा करण्याचा दावा करणारे आपण, जो प्रत्येक निर्णय घेतो व जे काही कार्य करतो त्याने देवाच्या नावाचे एक तर गौरव होते किंवा बदनामी होते आणि देवाच्या नव्या जगात जीवनाची आशा मिळण्यावरही त्याचा बराच प्रभाव पडतो. आपण यहोवावर प्रेम करतो. “शेवटपर्यंत टिकून” राहायची आपली इच्छा आहे; मग तो आपल्या जीवनाचा शेवट असो किंवा या व्यवस्थीकरणाचा शेवट असो; जो शेवट पहिला येईल तोपर्यंत टिकून राहायची आपली इच्छा आहे. (मत्तय २४:१३) पण आपण कशाप्रकारे निकडीची जाणीव टिकवून जागृत राहू शकतो?
४ आपल्या शिष्यांना—पहिल्या शतकातील आणि आजच्या काळातील दोन्ही—दबावाचा सामना करावा लागेल हे लक्षात ठेवून येशूने असे आर्जवले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्तय २६:४१) या शब्दांचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो? आपल्याला कोणत्या मोहांचा सामना करावा लागतो? आणि आपण कसे ‘जागृत राहू’ शकतो?
काय करण्याचा मोह?
५ आपल्या सर्वांना दररोज, ‘सैतानाच्या पाशात’ अडकण्याच्या मोहाचा सामना करावा लागतो. (२ तीमथ्य २:२६) सैतानाने खासकरून यहोवाच्या उपासकांना त्याचे लक्ष्य बनवले आहे, असे बायबल आपल्याला बजावते. (१ पेत्र ५:८; प्रकटीकरण १२:१२, १७) कशासाठी? आपल्याला ठार मारण्यासाठी नव्हे. आपण जर मृत्यू येईपर्यंत देवाशी विश्वासू राहिलो तर त्यात सैतानाचा विजय होत नाही. सैतानाला माहीत आहे, की यहोवा आपल्या नियुक्त समयी पुनरुत्थानाद्वारे मृत्यू कायमचा नाहीसा करेल.—लूक २०:३७, ३८.
६ सैतान आपल्या सध्य जीवनापेक्षा अधिक मूल्यवान असलेली, देवाशी आपली एकनिष्ठता भंग करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. सैतान काहीही करून हे शाबीत करू पाहतोय की तो आपल्याला यहोवाची सेवा करण्यापासून परावृत करू शकतो. यास्तव, आपण जर त्याच्या प्रभावात येऊन अविश्वासू झालो—सुवार्तेचा प्रचार करण्याचे किंवा ख्रिस्ती दर्जांनुसार जीवन जगण्याचे थांबवले—तर तो त्याच्यासाठी एक विजय ठरेल! (इफिसकर ६:११-१३) अशाप्रकारे हा “परीक्षक” आपल्याला मोहात पाडतो.—मत्तय ४:३.
७ सैतान नाना तऱ्हेच्या ‘कुयुक्त्यांचा’ उपयोग करतो. (इफिसकर ६:११, सुबोध भाषांतर) तो आपल्यासमोर, भौतिकवाद, भय, शंका किंवा सुखविलास यांचा मोह आणू शकतो. परंतु त्याची एक सर्वात प्रभावशाली पद्धत आहे, निराशा. एखाद्या धूर्त संधीसाधूप्रमाणे, त्याला हे चांगल्याप्रकारे माहीत आहे, की निराशेमुळे आपण आध्यात्मिकरीत्या अशक्त होऊन सहज मोहात पडू शकतो. (नीतिसूत्रे २४:१०) यास्तव, आपण खासकरून भावनिकरीत्या जेव्हा ‘ठेचले’ जातो तेव्हा तो आपल्यासमोर हार मानण्याचा मोह आणतो.—स्तोत्र ३८:८.
८ आपण जसजसे शेवटल्या दिवसांच्या अंताच्या समीप येतो तसतसे, निराश होण्याची कारणे वाढत राहतात असे दिसते; आणि आपल्यावरही त्यांचा परिणाम होतो. (“निराश करणारी काही कारणे” हा चौकोन पाहा.) कारण काहीही असो, निराशेमुळे आपण आध्यात्मिकरीत्या अशक्त बनू शकतो. तुम्ही शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या आणि भावनिकरीत्या थकलेला असाल तर आध्यात्मिक जबाबदाऱ्या तसेच बायबलचा अभ्यास, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे, सेवेमध्ये भाग घेणे यांसारखी आध्यात्मिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी “वेळेचा सदुपयोग” करणे कठीण होऊ शकते. (इफिसकर ५:१५, १६) तुम्ही सर्वकाही सोडून द्यावे अशी परीक्षकाची अर्थात सैतानाची इच्छा आहे हे लक्षात ठेवा. धीमे पडण्याची किंवा आपण जगत असलेल्या काळांच्या निकडीची जाणीव बाळगण्याचे सोडून देण्याची ही वेळ नाही! (लूक २१:३४-३६) तुम्ही मोहांचा प्रतिकार करून जागृत कसे राहू शकता? तुम्हाला सहायक ठरू शकतील अशा चार सूचनांचा विचार करा.
‘सतत प्रार्थना करा’
९ प्रार्थनेद्वारे यहोवावर अवलंबून राहा. गेथशेमाने बागेतील येशूच्या उदाहरणाची आठवण करा. तीव्र भावनिक तणावात असताना त्याने काय केले? त्याने मदतीसाठी यहोवाकडे याचना केली; त्याने यहोवाला इतक्या कळकळीने प्रार्थना केली की “रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” (लूक २२:४४) विचार करा. येशू सैतानाला चांगल्याप्रकारे ओळखत होता. देवाच्या सेवकांना पाशांत पकडण्यासाठी सैतान कोणकोणत्या मोहांचा उपयोग करतो, हे सर्व येशूने स्वर्गातून पाहिले होते. तरीपण, परीक्षकाने अर्थात सैतानाने आपल्यापुढे कोणताही मोह आणला तरी आपण सहज त्यावर मात करू असे येशूला वाटले नाही. मग जर देवाच्या परिपूर्ण पुत्राला, मदतीसाठी व शक्तीसाठी प्रार्थना करण्याची गरज भासली तर आपल्याला किती अधिक वाटली पाहिजे!—१ पेत्र २:२१.
१० हेही लक्षात ठेवा, की आपल्या शिष्यांना ‘सतत प्रार्थना करीत राहा’ असे आर्जवल्यानंतर येशूने पुढे म्हटले: “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” (मत्तय २६:४१) येशू कोणाच्या देहाची गोष्ट करीत होता? नक्कीच स्वतःच्या नव्हे; कारण त्याच्या परिपूर्ण मानवी देहात कोणताही अशक्तपणा नव्हता. (१ पेत्र २:२२) परंतु त्याच्या शिष्यांचे असे नव्हते. वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे आणि पापी प्रवृत्तींमुळे, त्यांना मोहाचा प्रतिकार करण्यासाठी मदतीची विशेष गरज लागणार होती. (रोमकर ७:२१-२४) त्यामुळे त्याने त्यांना आणि त्यांच्यानंतरच्या सर्व खऱ्या ख्रिश्चनांना, मोहाचा सामना करतेवेळी मदतीसाठी प्रार्थना करण्यास आर्जवले. (मत्तय ६:१३) यहोवा अशा प्रार्थनांचे उत्तर देतो. (स्तोत्र ६५:२) ते कसे? निदान दोन मार्गांद्वारे.
११ एक मार्ग म्हणजे, देव आपल्याला मोह ओळखण्यास मदत करतो. अंधाऱ्या मार्गावर पसरवून ठेवलेल्या पाशाप्रमाणे सैतानाचे मोह असतात. हे पाश आपल्याला दिसले नाहीत तर आपण त्यांत सहज अडकू शकतो. बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांद्वारे यहोवा, सैतानाने पसरवून ठेवलेल्या पाशांवर प्रकाश टाकतो ज्यामुळे आपल्याला मोहात पडण्याचे टाळता येते. अनेक वर्षांपासून, छापील साहित्ये, अधिवेशने, संमेलन कार्यक्रम यांद्वारे आपल्याला वारंवार, मनुष्याची भीती, लैंगिक अनैतिकता, भौतिकवाद यांसारख्या धोक्यांपासून आणि इतर सैतानी मोहांपासून सावध करण्यात आले आहे. (नीतिसूत्रे २९:२५; १ करिंथकर १०:८-११; १ तीमथ्य ६:९, १०) सैतानाच्या कुयुक्त्यांविषयी सावध केल्याबद्दल तुम्ही यहोवाचे आभारी नाहीत का? (१ करिंथकर २:११) हे सर्व इशारे, मोहांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला मदत मिळावी म्हणून तुम्ही केलेल्या प्रार्थनांचे उत्तर आहे.
१२ दुसरा मार्ग म्हणजे, मोहांचा प्रतिकार करण्याची शक्ती देऊन यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो. त्याचे वचन म्हणते: “तो [देव] तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील.” (१ करिंथकर १०:१३) आपण देवावर नेहमी विसंबून राहिलो तर तो कोणत्याही मोहाला आपल्यासमोर इतका काळ राहू देणार नाही की त्या मोहाचा प्रतिकार करण्याची आध्यात्मिक शक्ती आपल्याकडे नसेल. मोहातून “निभावण्याचा” मार्ग तो कसा पुरवतो? ‘जे मागतात त्यांस तो पवित्र आत्मा’ देतो. (लूक ११:१३) हा पवित्र आत्मा आपल्याला, जे बरोबर आहे ते करण्याचा आपला दृढनिश्चय आणखी पक्का करण्यास व सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करू शकणारी बायबल तत्त्वे आठवण्यास मदत करील. (योहान १४:२६; याकोब १:५, ६) चुकीच्या प्रवृत्तींवर मात करण्यासाठी लागणारे गुण विकसित करण्यास पवित्र आत्मा आपल्याला मदत करू शकेल. (गलतीकर ५:२२, २३) देवाचा आत्मा सहविश्वासू बंधूभगिनींना, ‘आपल्याला सांत्वन’ देण्यासही प्रवृत्त करू शकतो. (कलस्सैकर ४:११) मदतीसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांचे यहोवा अशा प्रेमळ मार्गांद्वारे उत्तर देतो म्हणून तुम्ही त्याचे आभारी नाहीत का?
वाजवी अपेक्षा बाळगा
१३ जागृत राहण्याकरता आपण वाजवी अपेक्षा बाळगल्या पाहिजेत. जीवनाच्या दबावांमुळे आपण कधीकधी थकून जातो. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की या जुन्या व्यवस्थीकरणात आपले जीवन समस्यांपासून मुक्त असेल, असे अभिवचन देवाने दिलेले नाही. बायबल काळांतही, देवाच्या सेवकांना संकटांचा तसेच छळाचा, दारिद्र्याचा, नैराश्याचा, आजारपणाचा सामना करावा लागला.—प्रेषितांची कृत्ये ८:१; २ करिंथकर ८:१, २; १ थेस्सलनीकाकर ५:१४; १ तीमथ्य ५:२३.
१४ आज, आपल्यासमोरही समस्या येतात. आपल्याला छळ सोसावा लागत असेल, आर्थिक बाबींची चिंता असेल, आपण नैराश्याशी झगडत असू, आजारी पडत असू किंवा इतर मार्गांनी आपल्याला त्रास सहन करावा लागत असेल. या सर्वांतून यहोवाने जर आपल्याला चमत्कारिकरीत्या वाचवले तर, यहोवाला टोमणा मारायला सैतानाला वाव मिळणार नाही का? (नीतिसूत्रे २७:११) यहोवा आपल्या सेवकांसमोर मोह येऊ देतो व त्यांची परीक्षा घेऊ देतो; कधीकधी तर विरोधकांकडून त्यांना अकालीच मरणही येऊ देतो.—योहान १६:२.
१५ मग यहोवाने कशाचे अभिवचन दिले आहे? आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्याने, आपल्यासमोर येऊ शकणाऱ्या कोणत्याही मोहाचा प्रतिकार करण्याची शक्ती देण्याचे वचन दिले आहे; अट इतकीच आहे, की आपण त्याच्यावर संपूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. (नीतिसूत्रे ३:५, ६) त्याचे वचन, त्याचा पवित्र आत्मा, त्याची संघटना यांद्वारे तो आध्यात्मिकरीत्या आपले संरक्षण करतो, त्याच्याबरोबरचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्यास तो आपली मदत करतो. या नातेसंबंधाला कसलाही धक्का पोहंचला नाही, आणि मग आपण मेलो तरी, आपणच विजयी ठरतो. काहीही—होय, मृत्यूसुद्धा देवाला आपल्या विश्वासू सेवकांना प्रतिफळ देण्यास रोखू शकत नाही. (इब्री लोकांस ११:६) आणि जवळ येऊन ठेपलेल्या नव्या जगात यहोवा, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी असलेल्या अद्भुत अभिवचनांची पूर्ती न चुकता करेल.—स्तोत्र १४५:१६.
वादविषय आठवणीत राहू द्या
१६ शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी, देवाने दुष्टाईला कोणत्या महत्त्वपूर्ण वादविषयांमुळे परवानगी दिली आहे ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. कधीकधी आपण आपल्या समस्यांच्या ओझ्याखाली दबून जातो आणि आपल्याला हार मानण्याचा मोह होतो तेव्हा आपण स्वतःला ही आठवण करून देऊ शकतो, की सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या अधिकाराला ललकारले आहे. दिशाभूल करणाऱ्या सैतानाने, देवाच्या उपासकांच्या भक्तीविषयी, त्यांच्या एकनिष्ठेविषयी देखील शंका व्यक्त केली आहे. (ईयोब १:८-११; २:३, ४) हे वादविषय आणि या वादविषयांचे निरसन करण्याचा यहोवाने निवडलेला मार्ग, आपल्या जीवनापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. ते कसे?
१७ हालअपेष्टेला देवाने दिलेल्या तात्पुरत्या अनुमतीमुळे, इतरांना सत्याचा स्वीकार करण्यास वेळ मिळाला आहे. याचा विचार करा: आपल्याला जीवन मिळावे म्हणून येशूने हालअपेष्टा सहन केल्या. (योहान ३:१६) यासाठी आपण त्याचे कृतज्ञ नाही का? पण इतरांनाही जीवन मिळावे म्हणून आपण आणखी जरा जास्त वेळ हालअपेष्टा सहन करू इच्छितो का? शेवटपर्यंत टिकून राहण्याकरता आपण हे ओळखले पाहिजे, की देवाची बुद्धी आपल्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. (यशया ५५:९) वादविषयांचे कायमचे निरसन करण्याच्या आणि आपले चिरकालिक कल्याण करण्याच्या उचित समयी तो दुष्टाईचा अंत करेल. यापेक्षा आणखी कोणता उत्तम मार्ग असू शकतो का? देवाच्या ठायी अन्याय नाही!—रोमकर ९:१४-२४.
“देवाजवळ या”
१८ निकडीची जाणीव टिकवून ठेवण्याकरता आपण यहोवाच्या जवळ असले पाहिजे. यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडवण्याचा सैतान हात धुऊन प्रयत्न करत आहे, हे विसरू नका. सैतान आपल्याला असा विचार करायला लावू इच्छितो, की अंत कधी येणार नाही व सुवार्तेचा प्रचार करण्यात व बायबलच्या दर्जांनुसार जीवन जगण्यात काही अर्थ नाही. पण तो “लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) आपण त्याला ‘अडवण्याचा’ निश्चय केला पाहिजे. यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध ही अशी एक गोष्ट आहे जिला आपण केव्हाही हलके समजू नये. बायबल प्रेमळपणे आपल्याला आर्जवते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” (याकोब ४:७, ८) तुम्ही यहोवाच्या जवळ कसे येऊ शकाल?
१९ प्रार्थनापूर्वक मनन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवनातील दबाव वाढतात तेव्हा यहोवापुढे आपले मन हलके करा. तुम्ही जितक्या खुल्या मनाने यहोवाला आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवाल तितक्याच सहजतेने तुम्हाला तो तुमच्या विनंत्यांचे उत्तर देत असल्याचा प्रत्यय येईल. तुमच्या मनात जो प्रश्न होता नेमके तेच उत्तर कदाचित तुम्हाला मिळणार नाही, पण तुमची त्याला आदर दाखवण्याची व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची इच्छा असेल तर तो तुम्हाला यशस्वीरीत्या टिकून राहण्यासाठी लागणारी मदत देईल. (१ योहान ५:१४) जीवनात तो मार्गदर्शन पुरवत असल्याचे तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ याल. बायबलमध्ये यहोवाच्या गुणांविषयी व मार्गांविषयी जे लिहिले आहे त्याचे वाचन करणे व त्यांवर मनन करणे देखील महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे मनन केल्याने तुम्हाला त्याला अधिक चांगल्याप्रकारे ओळखायला मदत होईल; यामुळे तुमचे अंतःकरण प्रेरित होईल आणि त्याच्याबद्दलचे तुमचे प्रेम वाढेल. (स्तोत्र १९:१४) आणि ही प्रीती, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुम्हाला मोहांचा प्रतिकार करण्यास व जागृत राहण्यास अधिक मदत करेल.—१ योहान ५:३.
२० यहोवाच्या जवळ राहण्यासाठी, आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींच्या जवळ असणे देखील महत्त्वाचे आहे. या माहितीपत्रकाच्या शेवटल्या भागात याची चर्चा केली जाईल.
अभ्यासासाठी प्रश्ने
• पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या समाप्तीस, येशूवर तीव्र दबाव आले तेव्हा त्याने काय केले आणि त्याने त्याच्या शिष्यांना काय करण्यास आर्जवले? (परि. १-४)
• सैतानाने यहोवाच्या उपासकांना आपले लक्ष्य का बनवले आहे व कोणकोणत्या मार्गांनी तो आपल्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो? (परि. ५-८)
• मोहांचा प्रतिकार करण्यासाठी आपण सतत प्रार्थना का केली पाहिजे (परि. ९-१२), वाजवी अपेक्षा का बाळगल्या पाहिजेत (परि. १३-१५), वादविवाद लक्षात का ठेवले पाहिजेत (परि. १६-१७) आणि ‘देवाच्या जवळ’ का आले पाहिजे (परि. १८-२०)?
[२५ पानांवरील चौकट]
“निराश करणारी काही कारणे”
आरोग्य/वय. आपल्याला एखादा असाध्य रोग आहे किंवा वाढत्या वयामुळे आपल्यावर मर्यादा लादल्या जातात तेव्हा, देवाच्या सेवेत आणखी करू शकत नाही म्हणून आपण निराश होऊ.—इब्री लोकांस ६:१०.
अपेक्षाभंग. देवाच्या वचनाचा प्रचार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना फार कमी प्रतिसाद मिळतो तेव्हा आपला अपेक्षाभंग होऊ शकतो.—नीतिसूत्रे १३:१२.
कुचकामी असल्याच्या भावना. अनेक वर्षांच्या गैरवागणुकीनंतर एखाद्या व्यक्तीची अशी खात्री होण्याची शक्यता आहे, की लोकांचे आणि यहोवाचे सुद्धा तिच्यावर प्रेम नाही.—१ योहान ३:१९, २०.
मन दुखावणे. सहविश्वासू बंधू अथवा भगिनीने एखाद्याचे मन खूप दुखावले असल्यास तो इतका निराश होऊ शकतो, की ख्रिस्ती सभा किंवा क्षेत्र सेवा सोडून देण्याचा तो विचार करू शकतो.—लूक १७:१.
छळ. जे सत्यात नाहीत ते कदाचित तुमचा विरोध करतील, तुम्हाला छळतील, तुमची थट्टामस्करी करतील.—२ तीमथ्य ३:१२; २ पेत्र ३:३, ४.
[२६ पानांवरील चित्र]
मोहांचा प्रतिकार करण्यास मदत मिळण्यासाठी येशूने आपल्याला ‘सतत प्रार्थना’ करीत राहण्यास आर्जवले