तुमचे जीवन कोणत्या दिशेने जात आहे?
तुमचे जीवन कोणत्या दिशेने जात आहे?
• पुष्कळ लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात इतके गर्क झाले आहेत की त्यांचे जीवन कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार करायला त्यांच्याकडे मुळीच सवड नाही.
• बायबल आपल्याला सांगते, की भविष्यात अद्भुत गोष्टी घडणार आहेत. ते, मानवी संस्थांची विश्वव्यापी उलथापालथ होणार आहे, अशीही ताकीद देते. आपला फायदा व्हावा म्हणून व येणारे संकट टाळण्यासाठी निर्णायक कार्य करणे निकडीचे आहे.
• काही लोक असे आहेत ज्यांना बायबल काय म्हणते ते माहीत आहे आणि ते त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात परंतु तरीही जीवनातील चिंतांना ते आपले लक्ष विचलित होऊ देतात.
• तुमचे जीवन ज्या दिशेने चालले आहे, त्याबद्दल तुम्ही संतुष्ट आहात का? तुम्ही कार्यांची योजना करता तेव्हा, या योजनांचा तुमच्या जीवनांतील दीर्घकालीन ध्येयांवर कसा परिणाम होईल याचा तुम्ही कधी विचार करता का?
[९ पानांवरील चौकट/चित्रे]
तुम्ही कोणत्या गोष्टींना सर्वात अधिक महत्त्व देता?
पुढील कोणत्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देता? पहिले, दुसरे, तिसरे असा क्रमांक द्या.
पुष्कळ लोकांच्या जीवनात पुढील गोष्टींना उचित स्थान आहे, पण निवड करायची असते तेव्हा कोणती गोष्ट पहिली, दुसरी, तिसरी येते?
․․․ मनोरंजन/करमणूक
․․․ माझी नोकरी किंवा माझे करियर
․․․ माझे आरोग्य
․․․ व्यक्तिगत सुख
․․․ माझा विवाहसोबती
․․․ माझे आईवडील
․․․ माझी मुले
․․․ एक छानपैकी घर, चांगले कपडे
․․․ मी जे काही करीन त्यात नेहमी सर्वोत्कृष्ट असेन
․․․ देवाची उपासना
[१०, ११ पानांवरील चौकट]
तुमच्या निवडी तुम्हाला, तुमची इच्छा असलेल्या दिशेने नेत आहेत का?
पुढील प्रश्नांचा विचार करा
मनोरंजन/करमणूक: मी ज्या प्रकारची करमणूक निवडतो त्याने मला तजेला मिळतो का? आरोग्यासाठी धोकेदायक असलेल्या किंवा जन्मभर अधू बनवणाऱ्या साहसी करमणुकीचा प्रकार मला आवडतो का? ती केवळ क्षणभराची “मौज”, परंतु आयुष्यभराचे दुःख आणणारी आहे का? आणि मी निवडलेले मनोरंजन हितकारक असले तरी, मी त्यात इतका वेळ घालवतो का, की अधिक महत्त्वाच्या गोष्टी करायला माझ्याकडे वेळ उरत नाही?
माझी नोकरी किंवा माझे करियर: माझ्या दररोजच्या गरजा भागवण्यासाठी मी नोकरी करतो, की मी तिचा गुलाम झालो आहे? नोकरीत किंवा करियरमध्ये माझा इतका वेळ जात आहे, अथवा त्यासाठी मी इतके परिश्रम घेत आहे, की ज्याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे? मला ओव्हरटाईम करायला आवडेल की माझ्या वैवाहिक सोबत्याबरोबर किंवा मुलांबरोबर वेळ घालवायला आवडेल? माझे मालक मला, माझ्या विवेकाला न पटणारे किंवा ज्यामुळे आध्यात्मिक गोष्टींकडे सतत दुर्लक्ष होते असे काम करायला सांगतात तेव्हा, माझी नोकरी जाऊ नये म्हणून मी ती करत राहीन का?
माझे आरोग्य: मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, की काळजी घेतो? मी सतत माझ्या आरोग्याविषयीच बोलत राहतो का? मी माझ्या आरोग्याची ज्याप्रकारे काळजी घेतो त्यावरून मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे हे दिसून येते का?
व्यक्तिगत सुख: याला माझ्या जीवनात प्रथम स्थान आहे का? माझ्या सोबत्याच्या किंवा कुटुंबाच्या सुखापेक्षा मी स्वतःच्या सुखाचा विचार करतो का? सुख मिळवण्याचा माझा मार्ग, खऱ्या देवाच्या उपासनेशी सुसंगत आहे का?
माझा वैवाहिक सोबती: मी माझ्या वैवाहिक सोबत्याला माझ्या सोयीनुसार माझा साथीदार समजतो का? व्यक्ती या नात्याने आदरास पात्र असलेल्या माझ्या सोबत्याला मी आदराने वागवतो का? माझ्या सोबत्याला मी ज्याप्रकारे लेखतो त्यावरून देवावर माझा विश्वास आहे हे दिसते का?
माझे आईवडील: मी अद्याप अज्ञान असल्यास, माझ्या आईवडिलांच्या आज्ञेत राहतो का—त्यांना आदराने उत्तर देतो का? घरातील कामे करतो का? त्यांनी सांगितलेल्या वेळेतच घरी येतो का? ते मना करत असलेल्या मुलांबरोबर मैत्री व कामे टाळतो का? मी जर प्रौढ आहे तर, मी माझ्या आईवडिलांचे आदराने ऐकतो का, आवश्यकता असते तेव्हा त्यांना लागणारी मदत देतो का? मी त्यांच्याशी ज्याप्रकारे वागतो ते माझ्या सोयीनुसार आहे की देवाच्या वचनातील सल्ल्यानुसार आहे?
माझी मुले: माझ्या मुलांना योग्य नैतिक मूल्ये शिकवणे ही, माझी जबाबदारी आहे असे मी समजतो, की शाळेत त्यांना या सर्व गोष्टी शिकवल्या पाहिजेत असे मला वाटते? मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवतो की खेळणी, टीव्ही, कंप्युटर यांमध्ये त्यांनी व्यस्त राहावे असे मला वाटते? माझी मुले जेव्हा जेव्हा देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात तेव्हा तेव्हा मी त्यांना शिक्षा देतो की मला त्यांचा राग येतो तेव्हा मी त्यांना शिक्षा देतो?
एक छानपैकी घर, चांगले कपडे: माझ्या पेहरावावरून व माझ्याजवळ असलेल्या संपत्तीवरून काय दिसून येते?—मी माझ्या शेजाऱ्यांवर छाप पाडू इच्छितो? मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणाविषयी विचार करतो? की, मी देवाचा एक उपासक आहे?
मी जे काही करीन त्यात नेहमी सर्वोत्कृष्ट असेन: मी जे काही करतो ते सर्वोत्तम असले पाहिजे, असे मला वाटते का? मी सर्वोत्कृष्ट असण्याचा प्रयत्न करतो का? दुसऱ्याने माझ्यापेक्षा चांगले केले तर मी अस्वस्थ होतो का?
देवाची उपासना: देवाची स्वीकृती मिळवणे हे, माझ्या सोबत्याची, माझ्या मुलांची, माझ्या आईवडिलांची किंवा माझ्या मालकांची स्वीकृती मिळवण्यापेक्षा महत्त्वाचे आहे का? आरामदायक जीवनशैलीसाठी मी देवाच्या सेवेला दुय्यम स्थान देतो का?
बायबलच्या सल्ल्याचा काळजीपूर्वक विचार करा
तुमच्या जीवनात देवाला कोणते स्थान आहे?
उपदेशक १२:१३: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”
स्वतःला विचारा: या वचनानुसार माझा दृष्टिकोन आहे हे माझ्या जीवनशैलीवरून दिसून येते का? माझ्या घरातल्या, नोकरीच्या, शाळेच्या जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या हे देवाच्या आज्ञांचे पालन करण्याच्या आधारावर ठरवले जाते का? की, इतर गोष्टींच्या व जीवनातल्या दबावांच्या आधारावर मी देवासाठी वेळ देतो की नाही हे ठरवले जाते?
देवाबरोबर तुमचा नातेसंबंध कसा आहे?
नीतिसूत्रे ३:५, ६: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”
मत्तय ४:१०: “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”
स्वतःला विचारा: मलाही देवाविषयी असेच वाटते का? माझ्या दररोजच्या कामांवरून आणि माझ्यासमोर अडचणी येतात तेव्हा मी जशी प्रतिक्रिया दाखवतो त्यावरून मला अशाप्रकारचा भरवसा व श्रद्धा आहे हे दिसून येते का?
बायबलचे वाचन व त्याचा अभ्यास तुम्हाला किती महत्त्वपूर्ण वाटतो?
योहान १७:३: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”
स्वतःला विचारा: देवाचे वचन वाचण्याला व त्यावर मनन करण्याला मी जे महत्त्व देतो त्यावरून, मी वरील वचनावर खरोखरच विश्वास ठेवतो हे दिसून येते का?
ख्रिस्ती मंडळीतील सभांना उपस्थित राहणे तुम्हाला किती महत्त्वाचे वाटते?
इब्री लोकांस १०:२४, २५: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण . . . आपले एकत्र मिळणे न सोडता . . . तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.”
स्तोत्र १२२:१: “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.”
स्वतःला विचारा: देवाच्या वचनातील या सल्ल्याची मी कदर बाळगतो हे माझ्या जीवनशैलीवरून दिसून येते का? गेल्या महिन्यात, दुसऱ्या एखाद्या कामाला अधिक महत्त्व देऊन मी ख्रिस्ती सभा चुकवल्या होत्या का?
तुम्ही आवेशाने देव आणि त्याच्या उद्देशांविषयी इतरांना सांगता का?
मत्तय २४:१४: “साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”
मत्तय २८:१९, २०: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”
स्तोत्र ९६:२: “परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा.”
स्वतःला विचारा: या कार्याला जे स्थान दिले पाहिजे ते मी माझ्या जीवनात त्याला दिले आहे का? या कार्यात मी भाग घेतो त्यावरून, आपण जगत असलेल्या काळाविषयीचे गांभीर्य बाळगले पाहिजे अशी माझी खात्री आहे, हे दिसून येते का?