व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय सहा

तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं

तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं

१, २. (क) प्रवासाची तयारी करताना हन्‍ना दुःखी का होती? (ख) हन्‍नाच्या गोष्टीतून आपण काय शिकणार आहोत?

 हन्‍ना प्रवासाची तयारी करण्यात मन गुंतवण्याचा प्रयत्न करू लागली. निदान काही वेळासाठी तरी तिला आपलं दुःख विसरायचं होतं. खरंतर, हा एक आनंदाचा प्रसंग असायला हवा होता. कारण, त्यांचं संपूर्ण कुटुंब निवासमंडपात यहोवाची उपासना करण्यासाठी शिलो इथं जायला निघालं होतं. हन्‍नाचा पती, एलकाना दरवर्षी आपल्या कुटुंबाला घेऊन तिथं जायचा. यहोवाची अशी इच्छा होती, की हे प्रसंग इस्राएली लोकांसाठी खूप आनंदाचे असावेत. (अनुवाद १६:१५ वाचा.) हन्‍नानंसुद्धा लहानपणापासून या सणांचा आनंद घेतला होता. पण, आता मागील काही वर्षांत तिचं जीवन पार बदलून गेलं होतं.

हन्‍नाला तिच्यावर मनापासून प्रेम करणारा पती मिळाला होता, हा एक आशीर्वादच होता. पण, एलकानाला दुसरी बायकोही होती. तिचं नाव पनिन्‍ना. तिनं हन्‍नाला छळून छळून तिचं जगणं मुष्कील केलं होतं. आणि दरवर्षी या सणांसाठी जाताना तर, हन्‍नाला दुखवण्याचं एक आयतं कारण पनिन्‍नाला मिळायचं. ते कोणतं? आणि याहून महत्त्वाचं म्हणजे, यहोवावर असलेल्या विश्‍वासामुळं हन्‍नाला या कठीण परिस्थितीला तोंड देणं कशा प्रकारे शक्य झालं? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला हन्‍नाच्या अहवालातून मिळतील. तुम्हीसुद्धा जीवनातल्या समस्यांमुळं दुःखी असाल, तर हन्‍नाच्या या गोष्टीतून नक्कीच तुम्हाला खूप सांत्वन मिळेल.

“तुझे हृदय खिन्‍न का?”

३, ४. हन्‍नाच्या जीवनात कोणत्या दोन समस्या होत्या, आणि या दोन्ही समस्यांना तोंड देणं तिच्यासाठी कठीण का होतं?

बायबल आपल्याला हन्‍नाच्या जीवनातल्या दोन मोठ्या समस्यांबद्दल सांगतं. यांपैकी पहिल्या समस्येला तोंड देणं निदान काही प्रमाणात तिच्या हातात होतं; पण, दुसऱ्‍या समस्येबद्दल मात्र ती काहीही करू शकत नव्हती. हन्‍नाची पहिली समस्या म्हणजे तिच्या पतीला दुसरी बायको होती आणि तिची ही सवत तिचा खूप द्वेष करायची. दुसरी समस्या म्हणजे तिला मूल होत नव्हतं. आई होण्यासाठी आसूसलेल्या कोणत्याही स्त्रीसाठी ही परिस्थिती तशी कठीणच असते; पण, हन्‍नाच्या काळातील संस्कृतीत तर मूल नसणं ही एका स्त्रीसाठी अत्यंत क्लेशदायक अशी गोष्ट होती. त्या काळी, वंशाचं नाव पुढं चालवण्यासाठी मूल होणं अत्यावश्‍यक आहे असं मानलं जायचं. तर, मूल नसणं ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट समजली जायची.

हन्‍नानं कदाचित मन घट्ट करून आपलं दुःख कसंबसं सहन केलंही असतं; पण, पनिन्‍नामुळं तिला ते शक्य होत नव्हतं. एकापेक्षा जास्त पत्नी असलेल्या कुटुंबांत सहसा समस्या या असायच्याच. अशा कुटुंबांत हेवेदावे, भांडणतंटे आणि मनस्ताप या गोष्टी अगदी सर्रासपणे दिसायच्या. मुळात, एकापेक्षा जास्त पत्नी असणं ही गोष्ट देवाच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हती. त्यानं एदेन बागेत आदामासाठी हव्वेची निर्मिती करून, एका मनुष्याला एकच पत्नी असावी असा स्तर घालून दिला होता. (उत्प. २:२४) त्यामुळं, एकापेक्षा जास्त पत्नी असण्याच्या प्रथेचं बायबलमध्ये सहसा नकारात्मक चित्रण केलेलं आढळतं. आणि याचंच एक अत्यंत बोलकं उदाहरण म्हणजे एलकानाच्या कुटुंबात असलेली दुःखदायक परिस्थिती.

५. पनिन्‍ना हन्‍नाला का छळायची, आणि हन्‍नाचं मन दुःखवण्यासाठी ती काय करायची?

यहुद्यांमध्ये सर्वसामान्यपणे असं मानलं जातं, की हन्‍ना ही एलकानाची पहिली बायको होती आणि काही वर्षांनंतर त्यानं पनिन्‍नाशी लग्न केलं. पण, एलकानाचं हन्‍नावर जास्त प्रेम होतं. त्यामुळं, पनिन्‍ना तिचा खूप हेवा करायची आणि काही ना काही निमित्त शोधून तिला छळायची. पनिन्‍नाचं हन्‍नावर वर्चस्व असण्याचं एक कारण म्हणजे तिला बरीच मुलं होती. प्रत्येक वेळी तिला मूल व्हायचं, तेव्हा ती स्वतःला हन्‍नापेक्षा आणखीनच वरचढ समजायची. हन्‍नाच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती वाटणं आणि तिच्याशी सांत्वनाचे दोन शब्द बोलणं तर दूरच, पण, पनिन्‍ना उलट तिच्या जखमेवर सतत मीठ चोळायची. बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की पनिन्‍ना “तिला मनस्वी चिडवी, तेणेकरून ती कुढत राही.” (१ शमु. १:६) पनिन्‍ना हे सारं जाणूनबुजून करत होती. तिला कसंही करून हन्‍नाचं मन दुखवायचं होतं, आणि व्हायचंही तसंच.

मूल नसल्यामुळं हन्‍ना अतिशय दुःखी होती आणि तिच्या दुःखात भर घालण्यात पनिन्‍नानं कोणतीही कसर ठेवली नाही

६, ७. (क) एलकानानं हन्‍नाला सांत्वन दिलं तरीसुद्धा त्याला खरी परिस्थिती सांगण्याचं तिनं का टाळलं असावं? (ख) हन्‍नाला मूल होत नव्हतं यावरून यहोवा तिच्यावर नाराज होता असा अर्थ आपण काढावा का? स्पष्ट करा. (तळटीप पाहा.)

वार्षिक सणासाठी शिलोला गेल्यावर हन्‍नाला छळण्याची पनिन्‍नाला आयती संधी मिळायची. ती जणू या संधीची वाटच पाहायची. यहोवाला यज्ञ केल्यावर एलकाना पनिन्‍नाच्या सर्व मुलांना, म्हणजे, “तिच्या सर्व पुत्रांस व कन्यांस” त्यातले वाटे द्यायचा. पण, हन्‍नाला मूल नसल्यामुळं तिला फक्‍त तिचा स्वतःचा वाटा मिळायचा. तेव्हा, मूल नसण्यावरून पनिन्‍ना हन्‍नाला इतकं सतवायची की ती रडत असे; तिला काही खायचीसुद्धा इच्छा होत नसे. आपली प्रिय पत्नी, हन्‍ना दुःखी आहे आणि तिनं काही खाल्लंसुद्धा नाही हे एकदा एलकानाच्या लक्षात आलं. तेव्हा तो तिची समजूत घालून तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणाला, “हन्‍ना, तू का रडतेस? तू अन्‍नपाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्‍न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”—१ शमु. १:४-८.

एलकानाची ही एक गोष्ट मानावी लागेल; मूल नसल्यामुळंच हन्‍ना निराश आहे हे त्यानं अचूक हेरलं. जेव्हा त्यानं तिची समजूत काढली आणि तिला आपल्या प्रेमाचं आश्‍वासन दिलं तेव्हा तिला नक्कीच खूप बरं वाटलं असेल. a पण, पनिन्‍नाच्या द्वेषपूर्ण वागणुकीचा एलकानानं उल्लेख केला नाही; हन्‍नानंही त्याविषयी त्याला काही सांगितल्याचं बायबल अहवालात म्हटलेलं नाही. एलकानाला याविषयी सांगितल्यामुळं परिस्थिती आणखीनच चिघळेल, असा कदाचित हन्‍नानं विचार केला असावा. बरं, तिनं त्याला सांगितलंही असतं, तरी परिस्थिती खरंच बदलली असती का? उलट, पनिन्‍ना हन्‍नाचा आणखीनच द्वेष करू लागली असती. शिवाय, तिचं पाहून तिची मुलं आणि तिचे नोकरचाकरसुद्धा हन्‍नाचा तिरस्कार करू लागले नसते हे कशावरून? असं घडल्यास हन्‍नाला आपल्याच घरात परक्यासारखं वाटू लागलं असतं.

वाईट वागणुकीला तोंड देताना हन्‍ना सांत्वनासाठी यहोवावर विसंबून राहिली

८. यहोवा न्यायी देव आहे हे आठवणीत ठेवल्यामुळे आपल्याला सांत्वन कसं मिळू शकतं?

पनिन्‍ना हन्‍नाशी किती दुष्टपणे वागत होती याची पूर्ण कल्पना एलकानाला होती की नाही, हे आपल्याला माहीत नाही. पण, यहोवापासून मात्र काहीही लपलेलं नव्हतं. म्हणूनच, त्याच्या वचनात हन्‍नाच्या परिस्थितीचं पूर्ण चित्र मांडलेलं आहे. खरंतर, द्वेषापोटी इतरांशी वाईट वागणाऱ्‍यांसाठी हा एक इशाराच आहे. यहोवा अशा वागणुकीकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. दुसरीकडे पाहता, हन्‍नाप्रमाणे जे शांतिप्रिय असतात आणि ज्यांना विनाकारण वाईट वागणूक दिली जाते, त्यांना हे जाणून सांत्वन मिळेल की देव न्यायी आहे; तो योग्य वेळी आणि त्याला योग्य वाटेल त्या मार्गानं सर्व समस्या सोडवतो. (अनुवाद ३२:४ वाचा.) कदाचित हन्‍नालाही याची जाणीव असावी. म्हणूनच, तिनं आपली समस्या यहोवापुढं मांडायचं ठरवलं.

“तिचा चेहरा उदास राहिला नाही”

९. पनिन्‍ना आपल्याशी वाईट वागेल हे माहीत असूनही हन्‍ना शिलोला गेली, यावरून आपण काय शिकतो?

पहाटेची वेळ आहे. घरात सर्वांची धावपळ चाललेली आहे. सर्व जण, अगदी मुलंसुद्धा प्रवासाची तयारी करत आहेत. शिलोला जाण्यासाठी एलकानाला आपल्या मोठ्या कुटुंबाला घेऊन एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातून ३०-३२ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता. b ते पायीच प्रवास करणार असल्यामुळं शिलोला पोचायला त्यांना एक किंवा दोन दिवस लागणार होते. तिथं गेल्यावर आपली सवत आपल्याशी कशी वागेल हे हन्‍नाला चांगलं ठाऊक होतं; पण म्हणून काही ती घरी बसली नाही. अशा रीतीनं, हन्‍नानं आपल्यासाठी खरोखर एक फार चांगलं उदाहरण मांडलं. इतरांच्या वाईट वागणुकीमुळं आपण यहोवाची उपासना करण्याचं कधीच सोडू नये. असं करणं नक्कीच शहाणपणाचं ठरणार नाही. कारण, आपण यहोवाच्या उपासनेत सहभागी होतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात; आणि हेच आशीर्वाद खरंतर आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड देण्याचं बळ देत असतात. पण, जर आपण यहोवाच्या उपासनेत सहभागी होण्याचंच सोडून दिलं, तर आपल्याला हे बळ कसं मिळेल?

१०, ११. (क) हन्‍नाला संधी मिळताच ती निवासमंडपाकडे का गेली? (ख) हन्‍नानं कशा प्रकारे आपल्या स्वर्गातील पित्याजवळ मन मोकळं केलं?

१० दिवसभर डोंगरांमधल्या वळणा-वळणाच्या रस्त्यांवरून पायी चालत, शेवटी, ते मोठं कुटुंब शिलोजवळ येऊन पोचलं. एका लहानशा डोंगरावर वसलेलं हे शहर सर्व बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेलं होतं. ते शहराजवळ येऊ लागले तशी हन्‍ना, आपण प्रार्थनेत यहोवाला काय म्हणणार याचा विचार करू लागली असेल. शहरात पोचल्यावर कुटुंबानं एकत्र मिळून जेवण केलं. मग हन्‍नाला संधी मिळताच ती तिथून उठली आणि यहोवाच्या निवासमंडपाकडे गेली. तिथं दाराजवळ मुख्य याजक एली बसला होता. पण, हन्‍ना यहोवाला प्रार्थना करण्यास इतकी अधीर झाली होती, की तिचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही. इथं यहोवाच्या निवासमंडपात आपली प्रार्थना नक्की ऐकली जाईल याची हन्‍नाला खात्री होती. कुणाला आपली व्यथा समजो न समजो, पण आपला स्वर्गातील पिता यहोवा आपलं दुःख पूर्णपणे जाणतो हे तिला माहीत होतं. शेवटी, अनेक दिवसांपासून मनात साठवून ठेवलेलं दुःख तिला अनावर झालं आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटून ती ढळढळा रडू लागली.

११ हुंदके देत रडणारी हन्‍ना मनातल्या मनात यहोवाशी बोलत होती. आपलं दुःख शब्दांत व्यक्‍त करण्याचा प्रयत्न करताना तिचे ओठ थरथरत होते. तिनं बराच वेळ प्रार्थनेत आपल्या प्रेमळ पित्याजवळ मन मोकळं केलं. पण, देवाकडून आशीर्वाद मिळवण्याचाच फक्‍त ती विचार करत नव्हती; तर त्यासोबत, आपण देवाला काय देऊ शकतो याचाही ती विचार करत होती. म्हणून, आई होण्याची आपली उत्कट इच्छा पूर्ण करावी इतकीच देवाजवळ विनंती करून ती थांबली नाही; तर, तिनं देवाला एक नवसही केला. मला मुलगा झाला तर मी त्याला आयुष्यभर तुझी सेवा करण्यासाठी समर्पित करेन, अशी शपथ तिनं यहोवाला वाहिली.—१ शमु. १:९-११.

१२. हन्‍नाच्या उदाहरणावरून प्रार्थनेच्या बाबतीत आपल्याला कोणती गोष्ट समजते?

१२ खरोखर, प्रार्थनेच्या बाबतीत हन्‍नानं देवाच्या सर्व सेवकांसाठी खूप चांगलं उदाहरण मांडलं. यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्याशी कोणताही आडपडदा न ठेवता, अगदी मोकळेपणानं बोलावं. ज्याप्रमाणे एखादं लहानसं मूल पूर्ण भरवशानं आपल्या आईवडिलांशी बोलतं, त्याचप्रमाणे आपणही यहोवाजवळ आपल्या सगळ्या चिंता व्यक्‍त कराव्यात, अशी त्याची इच्छा आहे. (स्तोत्र ६२:८; १ थेस्सलनीकाकर ५:१७ वाचा.) प्रार्थनेच्या संदर्भात प्रेषित पेत्रानं देवाच्या प्रेरणेनं पुढील शब्द लिहिले: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.

१३, १४. (क) हन्‍नाविषयी एलीनं लगेच कोणता चुकीचा निष्कर्ष काढला? (ख) हन्‍नानं एलीला उत्तर देताना कशा प्रकारे विश्‍वासाचं उत्तम उदाहरण मांडलं?

१३ पण दुःखाची गोष्ट म्हणजे, मानव नेहमीच यहोवा देवासारखे समजूतदारपणे आणि सहानुभूतीनं वागत नाहीत. हन्‍ना रडत-रडत प्रार्थना करत होती, तेव्हा अचानक कुणाचातरी आवाज ऐकू आल्यानं ती दचकली. तो मुख्य याजक एली होता. एली बऱ्‍याच वेळापासून हन्‍नाचं निरीक्षण करत होता. तो तिला म्हणाला: “तू अशी कोठवर नशेत राहणार? तू या आपल्या द्राक्षारसाच्या नशेतून मुक्‍त हो.” हन्‍नाचे ओठ थरथरत होते, ती हुंदके देऊन रडत होती आणि एकंदरीत ती अतिशय भावुक झाली होती हे एलीनं पाहिलं होतं. पण, तिची विचारपूस करण्याऐवजी, त्यानं लगेच निष्कर्ष काढला की ती नशेत असावी.—१ शमु. १:१२-१४.

१४ दुःखानं व्याकूळ झालेल्या हन्‍नावर असा खोटा, बिनबुडाचा आरोप आणि तोही इतक्या आदरणीय पदावर असलेल्या व्यक्‍तीकडून लावण्यात आला, तेव्हा तिला कसं वाटलं असेल याची कल्पना करा! पण, पुन्हा एकदा हन्‍नानं विश्‍वासाचं उत्तम उदाहरण आपल्यापुढं मांडलं. एका मनुष्याच्या चुकीच्या वागणुकीला तिनं यहोवाच्या उपासनेच्या आड येऊ दिलं नाही. तिनं एलीशी अगदी आदरपूर्वक बोलून त्याला खरी परिस्थिती समजावून सांगितली. तेव्हा, कदाचित आपली चूक लक्षात आल्यामुळे, एली काहीशा सौम्य स्वरात तिला म्हणाला: “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.”—१ शमु. १:१५-१७.

१५, १६. (क) यहोवाजवळ मन मोकळं केल्यामुळे आणि निवासमंडपात येऊन त्याची उपासना केल्यामुळे हन्‍नावर कोणता चांगला परिणाम झाला? (ख) नकारात्मक भावनांना तोंड देताना हन्‍नाप्रमाणे आपणही काय केलं पाहिजे?

१५ हन्‍नानं यहोवाजवळ आपलं मन मोकळं केल्यामुळे आणि निवासमंडपात येऊन त्याची उपासना केल्यामुळे तिच्यावर कोणता चांगला परिणाम झाला? अहवालात असं सांगितलं आहे: “मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्‍न सेवन केले, व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमु. १:१८) हन्‍नाचं मन हलकं झालं होतं. जणू आपल्या मनावरचं दुःखाचं मोठं ओझं तिनं स्वर्गातील आपल्या प्रेमळ पित्यावर टाकून दिलं होतं; आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं सामर्थवान असलेला यहोवा देवच आपली मदत करू शकतो, हा भरवसा तिला होता. (स्तोत्र ५५:२२ वाचा.) खरोखर, यहोवासाठी कोणतीही समस्या फार मोठी आहे का? नाही, तेव्हाही नव्हती, आताही नाही, आणि पुढं कधीही नसेल!

१६ कधीकधी, आपल्याही मनावर दुःखाचं ओझं असतं आणि जीवनातल्या समस्यांमुळे आपण अगदी खचून जातो. अशा वेळी, हन्‍नाप्रमाणे आपणही यहोवाजवळ मन मोकळं केलं पाहिजे. बायबलमध्ये त्याला ‘प्रार्थना ऐकणारा’ असं म्हणण्यात आलं आहे. (स्तो. ६५:२) जर आपण पूर्ण विश्‍वासानं आपला भार यहोवावर टाकला, तर आपल्या मनातील निराशेच्या भावना नाहीशा होऊन, “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती” आपल्याला लाभेल.—फिलिप्पै. ४:६, ७.

“आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही”

१७, १८. (क) हन्‍नानं वाहिलेल्या शपथेला आपली संमती असल्याचं एलकानानं कसं दाखवलं? (ख) लवकरच कोणती गोष्ट पनिन्‍नाच्या लक्षात आली?

१७ दुसऱ्‍या दिवशी सकाळीच हन्‍ना एलकानासोबत पुन्हा निवासमंडपात गेली. साहजिकच, तिनं देवाला जी विनंती केली होती आणि जो नवस केला होता, त्याविषयी तिनं एलकानाला सांगितलं असावं. कारण मोशेच्या नियमशास्त्रानुसार, पत्नीनं आपल्या पतीच्या संमतीशिवाय एखादी शपथ वाहिल्यास तिच्या पतीला ती रद्द करण्याचा अधिकार होता. (गण. ३०:१०-१५) अर्थात, यहोवाचा विश्‍वासू उपासक असलेल्या एलकानानं तिची शपथ रद्द केली नाही. उलट, घरी परतण्यापूर्वी एलकाना व हन्‍ना या दोघांनी सोबत निवासमंडपात येऊन यहोवाची उपासना केली.

१८ आपल्या वाईट वागणुकीचा आता हन्‍नावर काहीही परिणाम होत नाही, हे पनिन्‍नाच्या नेमकं केव्हा लक्षात आलं? हे अहवालात सांगितलेलं नाही. पण, “यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही,” या शब्दांवरून असं दिसतं, की निवासमंडपात यहोवाजवळ मन मोकळं केल्यानंतर हन्‍ना निश्‍चिंत व आनंदित झाली. हन्‍नाला छळण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे हे पनिन्‍नाच्या लवकरच लक्षात आलं असेल. यापुढं बायबलमध्ये पनिन्‍नाचा उल्लेख आढळत नाही.

१९. हन्‍नाला कोणता आशीर्वाद मिळाला, आणि यहोवानंच हा आशीर्वाद दिला असल्याचं ती विसरली नव्हती, हे तिनं कसं दाखवलं?

१९ पुढं, एकेक महिना सरत गेला. निवासमंडपात जाऊन आल्यापासून हन्‍नाला एक प्रकारची मनःशांती लाभली होती. मग, एके दिवशी आपल्याला दिवस गेल्याची तिला समजलं, तेव्हा तिच्या आनंदाला सीमा राहिली नाही! पण या आनंदाच्या भरात, हा आशीर्वाद आपल्याला यहोवाकडूनच मिळाला आहे याचा तिला क्षणभरही विसर पडला नाही. तिच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा तिनं त्याचं नाव शमुवेल ठेवलं, ज्याचा अर्थ “देवाचं नाव” असा होतो. कदाचित, हन्‍नानं केल्याप्रमाणे, देवाच्या नावाचा धावा करणं असंही या नावावरून सूचित होत असावं. त्या वर्षी हन्‍ना आपल्या कुटुंबासोबत शिलोला गेली नाही. बाळाचं दूध तुटेपर्यंत, तीन वर्षं ती घरीच राहिली. मग, आपल्या काळजाच्या तुकड्याला स्वतःपासून वेगळं करावं लागेल त्या दिवसासाठी ती आपलं मन घट्ट करू लागली.

२०. यहोवाला दिलेला शब्द हन्‍ना व एलकानानं कशा प्रकारे पाळला?

२० चिमुकल्या शमुवेलाला निवासमंडपात सोडायला जाताना हन्‍नाला कसं वाटलं असेल याची कल्पना करा! अर्थात, शिलो इथं त्याची चांगली काळजी घेतली जाईल हे हन्‍नाला माहीत होतं. निवासमंडपात काही स्त्रियासुद्धा सेवा करायच्या; त्या शमुवेलाला नक्कीच सांभाळतील याची तिला जाणीव असावी. पण, तो अजून फार लहान होता. आणि कोणत्या आईला आपल्या बाळाला स्वतःपासून वेगळं करावंसं वाटेल? तरीसुद्धा, यहोवाला शब्द दिल्याप्रमाणे हन्‍ना आणि एलकानानं आपल्या मुलाला निवासमंडपात आणलं. त्यांनी नाइलाजानं नाही, तर अतिशय कृतज्ञतेनं त्याला देवाच्या मंदिरात आणलं. तिथं त्यांनी देवाला अर्पणं दिली आणि एलीजवळ जाऊन तीन वर्षांपूर्वी हन्‍नानं घेतलेल्या शपथेची त्याला आठवण करून दिली. त्यानंतर, त्यांनी शमुवेलाला एलीच्या स्वाधीन केलं.

हन्‍नासारखी आई असणं हा शमुवेलासाठी एक मोठा आशीर्वाद होता

२१. हन्‍नाच्या प्रार्थनेवरून तिचा गाढ विश्‍वास कसा दिसून येतो? (“दोन उल्लेखनीय प्रार्थना,” ही चौकटदेखील पाहा.)

२१ मग, हन्‍नानं यहोवा देवाला प्रार्थना केली. तिची ही प्रार्थना इतकी उल्लेखनीय होती, की देवानं बायबल लेखकांना त्याच्या वचनात ती लिहून ठेवण्यास प्रेरित केलं. १ शमुवेल २:१-१० यात नमूद असलेल्या या प्रार्थनेत यहोवावरील तिचा गाढ विश्‍वास तिच्या प्रत्येक शब्दातून झळकतो. यहोवानं किती अद्‌भुत रीतीनं आपलं सामर्थ्य दाखवलं याबद्दल हन्‍ना त्याची स्तुती करते. तो गर्विष्ठांना नमवतो, दुःखीकष्टी लोकांना आशीर्वादित करतो; शिवाय, त्याच्याकडे एखाद्याचं जीवन संपवण्याचा अधिकार आणि एखाद्याला मरणापासून वाचवण्याचं सामर्थ्यही आहे, असं ती म्हणते. केवळ यहोवाच पवित्र, न्यायी आणि विश्‍वासू आहे, असं म्हणून ती त्याचं गौरव करते. यहोवाच्या या सर्व अद्‌भुत गुणांमुळेच हन्‍ना असं म्हणू शकली, की “आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही.” एखाद्या दुर्गाप्रमाणे किंवा भक्कम किल्ल्याप्रमाणे यहोवा पूर्णपणे विश्‍वसनीय आहे. तो कधीही बदलत नाही. आणि त्याच्याकडे मदतीची याचना करणाऱ्‍या सर्व त्रासलेल्या व पीडित लोकांसाठी तो एक आश्रय आहे.

२२, २३. (क) आपल्या आईवडिलांचं आपल्यावर प्रेम आहे याची शमुवेलाला खात्री का होती? (ख) हन्‍नाला यहोवाकडून आणखी कोणते आशीर्वाद मिळाले?

२२ खरोखर, हन्‍नाचा यहोवावर किती गाढ विश्‍वास होता! अशी आई असणं ही शमुवेलासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट होती. लहानाचा मोठा होत असताना नक्कीच त्याला आपल्या आईची खूप आठवण येत असेल. पण, आपली आई आपल्याला विसरून गेली आहे, असं त्याला कधीच वाटलं नाही. कारण दर वर्षी हन्‍ना शिलोला यायची, आणि निवासमंडपातील सेवेकरता शमुवेलासाठी ती एक बिनबाह्‍यांचा झगा आणायची. हन्‍नानं आपल्या हातांनी शिवून आणलेल्या या झग्याच्या प्रत्येक टाक्यात तिची ममता, वात्सल्य व प्रेम दडलेलं होतं. (१ शमुवेल २:१९ वाचा.) दर वर्षी त्याला भेटायला गेल्यावर हन्‍ना कशी त्याला तो झगा घालत असेल, त्याला तो व्यवस्थित बसतो की नाही याची खात्री करत असेल. आपल्या मुलाकडे डोळे भरून पाहताना ती कशी त्याला गोंजारत असेल आणि प्रेमळ शब्दांत धीर देत असेल याची आपण कल्पना करू शकतो. खरोखरच, शमुवेलाची आई त्याच्यासाठी एक आशीर्वाद होती आणि स्वतः शमुवेलदेखील आपल्या आईवडिलांसाठी आणि सबंध इस्राएल राष्ट्रासाठी एक आशीर्वाद ठरला.

२३ हन्‍नानं केलेला त्याग यहोवासुद्धा विसरला नाही. त्याच्या आशीर्वादानं तिला आणखी पाच मुलं झाली. (१ शमु. २:२१) पण, हन्‍नाला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे तिचा स्वर्गातील पिता यहोवा याच्यासोबत असलेला तिचा नातेसंबंध, जो दिवसेंदिवस अधिकच घनिष्ठ होत गेला. हन्‍नाच्या विश्‍वासाचं अनुकरण करण्याद्वारे, तुमचाही यहोवासोबतचा नातेसंबंध दिवसेंदिवस घनिष्ठ होत राहो.

a यहोवानं हन्‍नाची “कूस बंद केली,” असं अहवालात म्हटलेलं आहे. पण, हन्‍ना ही एक नम्र आणि विश्‍वासू स्त्री होती. शिवाय, यहोवा तिच्यावर नाराज होता असं मानण्यासाठी बायबलमध्ये कोणताच आधार सापडत नाही. (१ शमु. १:५) बायबलमध्ये काही घटना देवानं केल्या, असं म्हटलेलं आहे; पण, मुळात त्यानं फक्‍त काही काळापर्यंत त्या घटना घडू दिल्या.

b एलकानाचं गाव रामा आणि येशूच्या काळातील अरिमथाई नावाचं ठिकाण कदाचित एकच असावं, या अंदाजावरून हे अंतर ठरवण्यात आलं आहे.