व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय पाच

“सद्गुणी स्त्री”

“सद्गुणी स्त्री”

१, २. (क) रूथ कोणतं काम करत होती? (ख) देवाच्या नियमशास्त्राविषयी आणि त्याच्या लोकांविषयी रूथला कोणत्या चांगल्या गोष्टी कळल्या?

पाखरांची घरट्यांत परतण्याची वेळ. बेथलेहेमच्या आसपासच्या शेतांत हळहळू अंधार पडू लागला आहे. दिवसभर काम करून दमलेले बरेच मजूर जवळच्या डोंगरावर असलेल्या नगराकडे परतू लागले आहेत. रूथ मात्र अजूनही शेतात आहे. सकाळपासून सतत काम करत असल्यामुळं आतापर्यंत ती खूप थकली असेल; कदाचित तिचं अंग दुखू लागलं असेल. पण तरीही दिवसभर गोळा केलेल्या जवाच्या पेंढ्यांजवळ बसून ती काम करतच आहे. एका लहानशा सोट्यानं जवाच्या ताटांवर मारून ती कणसांतलं धान्य वेगळं करत आहे. एकंदरीत, रूथचा दिवस फार चांगला गेला आहे—तिनं कल्पनाही केली नव्हती, इतका चांगला.

या तरुण विधवेच्या जीवनात शेवटी चांगले दिवस आले होते का? याआधीच्या अध्यायात, रूथनं कशा प्रकारे आपली सासू नामी हिच्यासोबत बेथेलेहेमला येण्याचा निर्णय घेतला; तसंच, नामीचा देव यहोवा याचाही तिनं स्वीकार केला, हे आपण पाहिलं होतं. प्रियजनांच्या मृत्यूमुळं शोकाकूल झालेल्या या दोघी स्त्रिया मवाबाहून बेथलेहेमला आल्या होत्या. इथं आल्यावर, काही काळातच मवाबी रूथला कळलं की गोरगरिबांना आत्मसन्मानानं जगता यावं, म्हणून यहोवानं नियमशास्त्रात प्रेमळ तरतुदी केल्या आहेत. या तरतुदी फक्त इस्राएली लोकांसाठीच नव्हे, तर विदेश्यांसाठीही होत्या. नियमशास्त्राचं पालन आणि त्यातील तत्त्वांनुसार विचार करत असल्यामुळं, यहोवाच्या लोकांपैकी काही जण त्याच्या चांगल्या गुणांचं अनुकरण करायला आणि इतरांशी दयाळूपणे वागायला शिकले होते. याचाही रूथला आता अनुभव आला आणि दुःखानं व्याकूळ झालेल्या तिच्या मनाला यामुळं खूप दिलासा मिळाला.

३, ४. (क) बवाजानं कशा प्रकारे रूथला धीर दिला? (ख) सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत रूथचं उदाहरण आपल्याला कसं साहाय्यक ठरू शकतं?

बवाज हा असाच एक दयाळू माणूस होता. याच श्रीमंत, वयस्क माणसाच्या शेतात रूथ कापणीनंतर उरलेलं पीक गोळा करत होती. आज बवाजानं वडीलकीच्या नात्यानं रूथबद्दल आस्था व्यक्त केली होती. नामीची काळजी घेतल्याबद्दल आणि खऱ्या देवाच्या आश्रयास आल्याबद्दल त्यानं प्रेमळपणे तिची प्रशंसाही केली होती. त्याचे शब्द आठवून कदाचित नकळत तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं असेल.रूथ २:११-१४ वाचा.

तरी, पुढच्या जीवनाबद्दल रूथला नक्कीच काळजी वाटत असावी. ती एका परक्या देशात राहणारी गरीब स्त्री होती. नवऱ्याचा किंवा मुलांचा आधार तिला नव्हता. मग अशा परिस्थितीत, येणाऱ्या वर्षांमध्ये स्वतःच्या आणि नामीच्या पोटापाण्याची व्यवस्था कशी करावी? फक्त लोकांच्या शेतातून उरलेलं पीक गोळा करून आपलं कसं भागेल? शिवाय, उतारवयात मला कोण सांभाळेल? अशी काळजी रूथला वाटणं स्वाभाविक होतं. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत अनेकांना असेच प्रश्न भेडसावत आहेत. पण, रूथच्या विश्वासानं तिला या आव्हानांना तोंड द्यायला कशी मदत केली, याविषयी जाणून घेतल्यामुळं आपल्याला तिच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल.

कुटुंब कशानं बनतं?

५, ६. (क) बवाजाच्या शेतात रूथचा पहिला दिवस चांगला गेला असं का म्हणता येईल? (ख) रूथला पाहून नामीची काय प्रतिक्रिया होती?

रूथनं धान्य झोडून गोळा केलं, तेव्हा एफाभर म्हणजे जवळजवळ १४ किलो धान्य भरलं! ते एका कापडात बांधून तिनं ते गाठोडं डोक्यावर घेतलं आणि वाढत्या काळोखात बेथलेहेमचा रस्ता धरला.—रूथ २:१७.

आपल्या लाडक्या सुनेला पाहून नामीला आनंद झाला. तिच्या डोक्यावरचं मोठं गाठोडं पाहून ती थक्क झाली. रूथनं आपल्यासोबत दुपारचं काही उरलेलं जेवणसुद्धा आणलं होतं. नामीनं तिला विचारलं: “आज तू सरवा कुठं वेचलास? कुठं काम केलंस? तुझ्याकडे ज्यानं लक्ष दिलं त्याचं कल्याण होवो!” (रूथ २:१९, मराठी कॉमन लँग्वेज) नामी समंजस होती; रूथनं आणलेलं मोठं गाठोडं आणि खाण्याच्या वस्तू पाहून तिनं लगेच ताडलं की कोणा भल्या माणसानं रूथकडे लक्ष देऊन तिच्याशी प्रेमळपणे व्यवहार केला असेल. मग रूथनं आणलेलं साधं जेवण त्या दोघींनी मिळून खाल्लं.

७, ८. (क) बवाजानं दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल नामीनं काय म्हटलं आणि का? (ख) रूथनं पुढंही आपल्या सासूबद्दल एकनिष्ठ प्रेम कशा प्रकारे दाखवलं?

यानंतर, दोघीजणी एकमेकींशी गप्पा मारू लागल्या. बवाज आपल्याशी किती दयाळूपणे वागला हे रूथनं नामीला सांगितलं. ते ऐकून तिला इतका आनंद झाला, की ती म्हणाली: “ज्या परमेश्वराने जिवंतांवर व मृतांवरही आपली दया करावयाचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो.” (रूथ २:२०) बवाजानं दाखवलेला दयाळूपणा, हा खरंतर यहोवानंच त्यांना दाखवलेला दयाळूपणा आहे, हे नामीनं ओळखलं. तोच आपल्या सेवकांना उदारता दाखवण्यास प्रवृत्त करतो आणि त्यांनी दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल प्रतिफळही देतो, याची नामीला जाणीव होती. *नीतिसूत्रे १९:१७ वाचा.

बवाजानं सांगितल्याप्रमाणे रूथनं पुढंही त्याच्याच शेतांत धान्य गोळा करायला जावं, असा नामी तिला सल्ला देते. तसंच, मजुरांनी त्रास देऊ नये म्हणून तिनं इतर तरुण स्त्रियांसोबतच राहावं असंही ती सांगते. रूथ आपल्या सासूच्या सल्ल्याप्रमाणेच वागते. तसंच अहवालात म्हटलं आहे, की ती पुढंही “आपल्या सासूबरोबर राहिली.” (रूथ २:२२, २३) या शब्दांतून पुन्हा एकदा रूथच्या व्यक्तिमत्त्वातला एक खास गुण दिसून येतो; तो म्हणजे तिचं एकनिष्ठ प्रेम. रूथचं हे उदाहरण आपल्यालाही विचार करायला लावतं. आपणसुद्धा कौटुंबिक नाती जपतो का? कठीण प्रसंग येतात तेव्हा आपण एकनिष्ठपणे आपल्या जवळच्या माणसांना लागणारा आधार आणि साहाय्य त्यांना देतो का? अशा प्रकारे दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम यहोवाच्या नजरेतून कधीही सुटत नाही.

रूथ व नामीचं उदाहरण आपल्याला आठवण करून देतं, की आपण आपल्या कुटुंबाची कदर केली पाहिजे

९. कुटुंबाविषयी आपल्याला रूथ आणि नामी यांच्याकडून काय समजतं?

रूथ आणि नामी यांच्या कुटुंबात फक्त त्या दोघीच असल्यामुळं ते खऱ्या अर्थानं एक कुटुंब नव्हतं, असं म्हणता येईल का? काहींना असं वाटतं की नवरा, बायको, मुलगा, मुलगी, आजी-आजोबा हे सर्व जण असतात तेव्हाच त्याला एक “खरं” कुटुंब म्हणता येतं. पण रूथ आणि नामीचं उदाहरण आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतं, की यहोवाच्या सेवकांचं कुटुंब कितीही लहान असलं, तरी त्यात जिव्हाळा, दयाळूपणा आणि प्रेम असल्यास ते एक आनंदी कुटुंब बनू शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबाची कदर करता का? ज्यांना स्वतःचं असं कुणीही नाही, त्यांना ख्रिस्ती मंडळीतील बांधव कुटुंबातल्या सदस्यांसारखंच प्रेम देऊ शकतात, असं येशूनं आपल्या अनुयायांना सांगितलं.—मार्क १०:२९, ३०.

रूथ आणि नामी या दोघींनी एकमेकींना साहाय्य केलं आणि सांत्वन दिलं

“आपले वतन सोडवण्याचा त्यास हक्क आहे”

१०. रूथला कोणत्या प्रकारे मदत करण्याची नामीची इच्छा होती?

१० एप्रिल महिन्यातल्या जवाच्या कापणीपासून ते जून महिन्यात गव्हाच्या कापणीपर्यंत रूथ बवाजाच्या शेतातच काम करत राहिली. या दरम्यान नामी आपल्या लाडक्या सुनेसाठी आणखी काय करता येईल, याबद्दल दिवसेंदिवस अधिकच विचार करू लागली. मवाबात असताना नामीला कधीच वाटलं नव्हतं, की रूथला पुन्हा संसार थाटायला ती काही मदत करू शकेल. (रूथ १:११-१३) पण आता मात्र तिचा विचार बदलला होता. म्हणून एके दिवशी ती रूथला म्हणाली: “तुझे कल्याण व्हावे म्हणून तुजसाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय?” (रूथ ३:१) त्या काळात, आईवडीलच सहसा आपल्या मुलांसाठी स्थळ पाहायचे. आणि रूथ ही नामीला तिच्या मुलीसारखीच होती. त्यामुळं रूथचं पुन्हा लग्न व्हावं आणि तिनं आपल्या पतीच्या घरात सुखासमाधानानं राहावं, असं नामीला मनापासून वाटत होतं. मग, यासाठी नामीनं काय केलं?

११, १२. (क) बवाजाला आपलं वतन सोडवण्याचा हक्क आहे असं नामीनं म्हटलं, त्याचा काय अर्थ होता? (ख) सासूनं दिलेल्या सल्ल्याप्रती रूथची कशी मनोवृत्ती होती?

११ रूथनं पहिल्यांदा बवाजाचा उल्लेख केला होता, तेव्हा नामीनं असं म्हटलं होतं: “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्यास हक्क आहे.” (रूथ २:२०) याचा काय अर्थ होता? कर्त्या पुरुषांच्या मृत्यूमुळं कठीण परिस्थिती आलेल्या कुटुंबांसाठी यहोवा देवानं नियमशास्त्रात प्रेमळपणे काही तरतुदी केल्या होत्या. मूलबाळ नसताना एखादी स्त्री विधवा झाल्यास, आपल्या पतीचं नाव आणि वंश आता पुढं कोण चालवेल, या विचारानं तिच्या दुःखात आणखीनच भर पडायची. पण, देवाच्या नियमशास्त्रानुसार, मेलेल्या मनुष्याचा भाऊ त्याच्या विधवेशी लग्न करू शकत होता. असं केल्यामुळं, तिला होणारा मुलगा तिच्या पतीचं नाव पुढं चालवू शकत होता व कुटुंबाच्या मालमत्तेची देखभाल करू शकत होता. *अनु. २५:५-७.

१२ नामी आता रूथला एक योजना सांगते. आपल्या सासूचं बोलणं ऐकताना डोळे विस्फारून तिच्याकडे पाहणाऱ्या रूथची आपण कल्पना करू शकतो. इस्राएल देशातील कायदेकानून अजूनही रूथला इतक्या चांगल्या प्रकारे माहीत नव्हते; तसंच, इथल्या अनेक प्रथासुद्धा अजून तिच्यासाठी नवीनच होत्या. तरीसुद्धा, नामीबद्दल तिच्या मनात खूप आदर असल्यामुळं, ती तिचा शब्द न्‌ शब्द लक्षपूर्वक ऐकत होती. नामीनं तिला जे सांगितलं ते ऐकून तिला थोडं अवघडल्यासारखं झालं असेल; कदाचित संकोच वाटला असेल. नामीनं सांगितल्याप्रमाणे केल्यास आपली लाजिरवाणी स्थिती तर होणार नाही ना, अशी भीतीही तिला वाटली असेल. पण, तरीसुद्धा रूथ नामीच्या सांगण्याप्रमाणे करायला तयार झाली. ती नम्रपणे इतकंच म्हणाली: “तुम्ही सांगता ते सगळे मी करीन.”—रूथ ३:५.

१३. वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींचा सल्ला स्वीकारण्याबाबत रूथनं कोणतं चांगलं उदाहरण मांडलं? (ईयोब १२:१२ देखील पाहा.)

१३ कधीकधी तरुणांना आपल्यापेक्षा वयानं मोठ्या आणि अनुभवी असलेल्या व्यक्तींचा सल्ला स्वीकारणं जड जातं. आपल्यासमोर असलेली आव्हानं, आपल्या समस्या मोठ्यांना काय कळणार, असं या तरुणांना वाटू शकतं. पण, रूथचं नम्र उदाहरण या गोष्टीची आठवण करून देतं, की आपल्यावर प्रेम असलेल्या आणि आपल्या हिताची काळजी असलेल्या मोठ्या व्यक्तींचा सल्ला स्वीकारल्यामुळं अनेक आशीर्वाद मिळू शकतात. (स्तोत्र ७१:१७, १८ वाचा.) मग, नामीनं रूथला नेमकं काय सांगितलं आणि तिच्या सल्ल्याप्रमाणे वागल्यामुळं रूथला खरोखरच आशीर्वाद मिळाला का?

रूथ खळ्याकडे जाते

१४. खळं म्हणजे काय आणि तिथं काय केलं जायचं?

१४ त्या दिवशी संध्याकाळी रूथ खळ्याकडे जाते. खळं म्हणजे चोपून, सारवून टणक केलेली जमीन. अशा खळ्यात बरेच शेतकरी आपलं धान्य आणून मळणी आणि पाखडणी करायचे. सहसा डोंगराच्या उतारावर किंवा डोंगरमाथ्यावर संध्याकाळ होण्याच्या सुमारास जोराचा वारा असल्यामुळं, अशा ठिकाणी हे खळं तयार केलं जायचं. धान्यापासून पाचोळा आणि कस्पटं वेगळी करण्यासाठी सहसा मजूर मोठ्या फावड्यानं ते वाऱ्याच्या दिशेनं उडवायचे. हलका पाचोळा आणि कस्पटं आपोआपच वाऱ्यासोबत उडून जायची आणि दाणे जमिनीवर पडायचे.

१५, १६. (क) संध्याकाळी काम संपल्यावर खळ्यातलं दृश्य कसं होतं? (ख) रूथ आपल्या पायांजवळ झोपली आहे हे बवाजाच्या कसं लक्षात आलं?

१५ रूथ सावधगिरीनं मजुरांची संध्याकाळची कामं संपण्याची वाट पाहू लागली. बवाज आपल्या धान्याच्या पाखडणीच्या कामाची देखरेख करत होता. काम संपेपर्यंत धान्याची मोठी रास झाली होती. खाणंपिणं झाल्यावर बवाज धान्याच्या राशीजवळ एका बाजूला जाऊन झोपायची तयारी करू लागला. त्या काळी, चोर-लुटारूंपासून धान्याचं रक्षण करण्यासाठी शेतकरी सहसा रात्री खळ्यातच झोपायचे. रूथनं बवाजाला झोपायला जाताना पाहिलं. शेवटी, नामीच्या योजनेप्रमाणे काम करण्याची वेळ आली होती.

१६ रूथ दबक्या पावलांनी पुढं गेली. तिच्या काळजाची धडधड वाढत चालली होती. बवाजाला गाढ झोप लागल्याची रूथनं खात्री केली. त्यानंतर, नामीनं सांगितल्याप्रमाणे तिनं जवळ जाऊन त्याच्या पायांवरचं पांघरूण काढलं आणि तिथंच त्याच्या पायांजवळ झोपली. मग ती वाट पाहत राहिली. त्या वेळी रूथला एकेक क्षण युगांसारखा वाटला असेल. शेवटी, मध्यरात्रीच्या सुमारास बवाजाला थोडीशी जाग आली. थंडीमुळं तो काकडू लागला होता. त्यामुळं, कदाचित पायांवर पांघरूण घेण्यासाठी तो उठला. पण तेवढ्यात, तिथं कुणीतरी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. बायबल सांगतं की, बवाज “वर डोके करून पाहतो तो आपल्या पायांपाशी कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.”—रूथ ३:८.

१७. रूथच्या वागण्यामागे काहीतरी अनैतिक हेतू होता असं म्हणणारे कोणत्या दोन साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात?

१७ त्यानं तिला विचारलं, “तू कोण आहेस?” रूथनं, कदाचित कापऱ्या आवाजात, त्याला उत्तर दिलं: “मी आपली दासी रूथ आहे; या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या; कारण आमचे वतन सोडविण्याचा हक्क आपल्याला आहे.” (रूथ ३:९) काही बायबल विद्वान असं सुचवतात की त्या प्रसंगी रूथच्या वागण्या-बोलण्यामागे काहीतरी अनैतिक हेतू होता. पण हे विद्वान दोन साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पहिली गोष्ट म्हणजे, रूथनं जे काही केलं ते त्या काळाच्या प्रथांना अनुसरून होतं. त्या प्रथा आज आपण पूर्णपणे समजू शकत नाही. आजच्या जगातले नैतिक स्तर अगदीच खालावलेले आहेत. त्यामुळं, या स्तरांच्या आधारावर रूथच्या वागणुकीची पारख करणं नक्कीच योग्य ठरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, बवाजानं तिला जे उत्तर दिलं त्यावरून स्पष्टपणे दिसून येतं, की त्याच्या दृष्टीत रूथ निष्कलंक होती. खरंतर, त्यानं तिची प्रशंसाच केली.

बवाजाला भेटण्यामागे रूथचा हेतू निःस्वार्थ आणि निर्मळ होता

१८. बवाजाचे कोणते शब्द ऐकून रूथला धीर आला, आणि तिनं एकनिष्ठ प्रेम दाखवलेल्या कोणत्या दोन प्रसंगांबद्दल बवाजानं उल्लेख केला?

१८ बवाज रूथशी ज्या शांत आणि प्रेमळ स्वरात बोलला ते ऐकून तिला किती धीर आला असेल. तो म्हणाला: “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा [“एकनिष्ठ प्रेम,” NW] दाखवलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस.” (रूथ ३:१०) “पहिल्यापेक्षा” असं म्हणताना, रूथनं नामीसोबत इस्राएलला येण्याद्वारे आणि तिची काळजी घेण्याद्वारे जे एकनिष्ठ प्रेम दाखवलं होतं, त्याविषयी बवाज बोलत होता. तर, “दुसऱ्या खेपेस” असं म्हणताना, रूथ एखाद्या तरुणासोबत लग्न करण्याचा विचार करण्याऐवजी, त्याच्यासारख्या वयस्क माणसाशी लग्न करायला तयार झाली, याविषयी तो बोलत होता. तिच्यासारख्या तरुण स्त्रीला बवाजापेक्षा पुष्कळ कमी वयाच्या एखाद्या तरुणाशी लग्न करणं शक्य होतं; मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. पण, रूथला फक्त नामीच्याच नाही, तर तिचा मृत पती अलीमलेख याच्याही हिताची काळजी होती. त्याच्या मायदेशात त्याचं नाव पुढं चालावं अशी तिची इच्छा होती. रूथच्या निःस्वार्थ वृत्तीमुळं बवाजाचं प्रभावित होणं स्वाभाविकच होतं.

१९, २०. (क) बवाज रूथशी लग्न करायला लगेच तयार का झाला नाही? (ख) बवाज रूथशी प्रेमळपणे कसा वागला आणि तिच्या अब्रूची काळजी असल्याचं त्यानं कसं दाखवलं?

१९ बवाज पुढं म्हणाला: “तर मुली, भिऊ नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस.” (रूथ ३:११) रूथशी लग्न करण्याविषयी त्याला आनंदच होता; तिनं त्याला आपलं वतन सोडवण्याची विनंती केली, याचं कदाचित त्याला आश्चर्य वाटलं नसेल. पण बवाज हा एक भला माणूस होता. फक्त स्वतःच्या इच्छांचा विचार करणाऱ्यांपैकी तो नव्हता. त्यानं रूथला सांगितलं, की वतन सोडवण्याचा हक्क असलेला, नामीच्या मृत पतीचा आणखी एक जवळचा नातेवाईक आहे. म्हणून, तो आधी त्या माणसाची भेट घेऊन, त्याला रूथशी लग्न करण्याचा हक्क बजावण्याची संधी देईल.

इतरांशी प्रेमळपणे व आदरानं वागल्यामुळं रूथनं चांगलं नाव कमवलं

२० बवाज रूथला तिथंच झोपायला सांगतो आणि तिनं भल्या पहाटे इतरांच्या नकळत घरी निघून जावं असं सुचवतो. त्याला स्वतःच्याच नाही तर तिच्याही अब्रूची काळजी होती. कारण कोणी जर तिला तिथं पाहिलं असतं, तर त्या दोघांमध्ये काहीतरी अनैतिक घडलं असावं, असा त्यांचा चुकीचा समज झाला असता. म्हणून, रूथ पुन्हा बवाजाच्या पायांजवळ झोपते. त्यानं तिच्या विनंतीचा प्रेमळपणे स्वीकार केल्यामुळं कदाचित आता ती अगदी निश्चिंत झाली असेल. मग, उजाडण्याआधीच ती उठते. जाताना, बवाज तिच्या पदरात भरपूर धान्य घालतो. मग ती बेथलेहमकडे जायला निघते.—रूथ ३:१३-१५ वाचा.

२१. रूथला लोकांमध्ये एक चांगलं नाव कमवणं कशामुळं शक्य झालं असेल, आणि आपण तिच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

२१ रूथ एक “सद्गुणी स्त्री” असल्याचं गावच्या सर्व लोकांना माहीत आहे, असं बवाजानं म्हटलं होतं. बवाजाचे हे शब्द आठवून रूथला किती समाधान वाटलं असेल! यहोवा देवाची ओळख करून घेण्यास व त्याची सेवा करण्यास उत्सुक असल्यामुळेच तिनं हे चांगलं नाव कमवलं होतं यात शंका नाही. तसंच, नामी आणि तिच्या लोकांशी रूथनं खूप प्रेमळपणे व समजूतदारपणे व्यवहार केला होता; अनोळखी प्रथा व पद्धतींशी जुळवून घेण्याची तिची तयारी होती. रूथच्या विश्वासाचं अनुकरण केल्यास, आपणही नेहमी इतरांचा मनापासून आदर करू. तसंच, त्यांच्या रीतिरिवाजांचाही आपण आदर करू; अर्थात, बायबलमधील तत्त्वांशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता.

रूथला मिळालेले आशीर्वाद

२२, २३. (क) बवाजानं रूथला सहा मापे धान्य दिलं याचा कदाचित काय अर्थ असावा? (तळटीपही पाहा.) (ख) नामीनं रूथला कोणता सल्ला दिला?

२२ रूथ घरी आली तेव्हा नामी म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” रूथ अजूनही पूर्वीसारखीच एक निराधार विधवा आहे, की आता तिचं लग्न होण्याची काही आशा आहे, हे जाणून घ्यायला नामी उत्सुक होती. त्यामुळं, रूथनं लगेच तिला बवाज आणि तिच्यामध्ये घडलेल्या गोष्टींचा सगळा वृत्तान्त सांगितला. तसंच, नामीला देण्यासाठी त्यानं तिला उदारपणे जे धान्य दिलं होतं, तेसुद्धा रूथनं नामीला दिलं. *रूथ ३:१६, १७.

२३ नामी रूथला त्या दिवशी शेतांत जाण्याऐवजी घरीच राहण्याचा सल्ला देते. ती रूथला म्हणते: “आज तो मनुष्य या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहावयाचा नाही.”—रूथ ३:१८.

२४, २५. (क) बवाज चांगला आणि निःस्वार्थ वृत्तीचा होता हे कशावरून दिसून आलं? (ख) रूथला कोणकोणते आशीर्वाद मिळाले?

२४ नामीचा अंदाज अगदी खरा ठरतो. बवाज त्याच दिवशी शहराच्या वेशीजवळ जातो. त्या काळात सहसा या ठिकाणी शहराची वडील माणसं जमत. मग, अलीमलेखाचा तो जवळचा नातलग तिथं आल्यावर बवाज साक्षीदारांसमोर त्याला रूथशी लग्न करून वतन सोडवण्याचा हक्क बजावण्याविषयी विचारतो. पण, तो मनुष्य तयार होत नाही. कारण यामुळं, त्याच्या स्वतःच्या वतनाचं मोल कमी होईल असं तो म्हणतो. तेव्हा, शहराच्या वेशीजवळ सर्व साक्षीदारांसमोर बवाज नामीचा मृत पती अलीमलेख याचं वतन आपण सोडवत असल्याचं घोषित करतो. तसंच, अलीमलेखाचा मुलगा महलोन याची विधवा रूथ हिच्याशी आपण लग्न करत असल्याचंही तो सांगतो. यामुळे “मयताचे नाव त्याच्या वतनात कायम” राहील, असं तो म्हणतो. (रूथ ४:१-१०) खरोखर, बवाज हा एक चांगला आणि निःस्वार्थ वृत्तीचा माणूस होता.

२५ बवाज रूथशी लग्न करतो. त्यानंतर बायबल सांगतं, की “परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.” नातू झाल्याबद्दल बेथलेहमच्या स्त्रिया नामीचं अभिनंदन करतात. तसंच, रूथ नामीला सात पुत्रांहून अधिक आहे असं म्हणून त्या रूथची प्रशंसा करतात. पुढं, रूथच्या याच मुलाच्या वंशात इस्राएलचा थोर राजा दावीद याचा जन्म होतो. (रूथ ४:११-२२) आणि दाविदाच्या वंशात पुढं येशू ख्रिस्ताचा जन्म होतो.—मत्त. १:१. *

यहोवानं रूथला मसीहाची पूर्वज बनण्याचा बहुमान देऊन आशीर्वादित केलं

२६. रूथ आणि नामी यांच्या जीवनाचा वृत्तान्त आपल्याला कोणत्या गोष्टीची आठवण करून देतो?

२६ खरोखर, रूथला आणि नामीला यहोवानं भरभरून आशीर्वाद दिले. नामीनं तर रूथच्या मुलाला आपल्याच मुलाप्रमाणे वाढवलं. या दोन स्त्रियांच्या जीवनाचा वृत्तान्त खरंच किती उल्लेखनीय आहे! तो आपल्याला याची आठवण करून देतो, की जे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ करण्यासाठी नम्रपणे कष्ट करतात आणि यहोवाच्या निवडलेल्या लोकांसोबत मिळून एकनिष्ठेनं त्याची उपासना करतात, त्यांना तो कधीही विसरत नाही. बवाज, नामी आणि रूथ यांच्यासारख्या विश्वासू सेवकांचं अनुकरण करणाऱ्यांना तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही!

^ परि. 7 नामीनं म्हटल्याप्रमाणे यहोवा फक्त जिवंतांवरच दया करत नाही, तर मृतांवरदेखील दया करतो. कोणत्या अर्थानं? नामीच्या पतीचा आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. तर, रूथनं पतीला गमावलं होतं. आपल्या कुटुंबातल्या या प्रिय माणसांवर नक्कीच त्या दोघींचंही खूप प्रेम असेल. त्यामुळे त्या दोघींवर दया दाखवणं हे एका अर्थानं त्या मृत माणसांप्रती दया दाखवण्यासारखंच होतं. कारण, जर ते जिवंत असते तर त्यांनी नक्कीच आपल्या कुटुंबातील स्त्रियांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली असती.

^ परि. 11 वतनाच्या हक्काप्रमाणेच, विधवेशी लग्न करण्याचा हक्कसुद्धा सर्वप्रथम मृताच्या भावांना आणि त्यानंतर सर्वात जवळच्या नातलगाला दिला जायचा.—गण. २७:५-११.

^ परि. 22 बवाजानं रूथला “सहा मापे” धान्य दिलं, असं अहवालात म्हटलं आहे. ती किती वजनाची मापे होती हे मात्र सांगितलेलं नाही. त्यानं सहा मापे धान्य दिलं यावरून कदाचित असं सूचित होत असावं, की ज्या प्रकारे सहा दिवस काम केल्यानंतर शब्बाथाचा म्हणजेच विश्रांतीचा दिवस यायचा; त्याच प्रकारे, रूथनं विधवेचं जीवन जगताना केलेलं कष्ट आता संपणार होतं. आणि आता तिला लग्नानंतर आपल्या हक्काच्या घरात “विश्रांती” मिळणार होती. किंवा कदाचित, ती फक्त तेवढंच वजन उचलू शकत असल्यामुळं बवाजानं तिला फक्त सहा मापे धान्य, फावड्यानं मापून दिलं असावं.

^ परि. 25 येशूच्या वंशावळीत ज्या पाच स्त्रियांचा उल्लेख आहे, त्यांपैकी रूथही एक आहे. त्या वंशावळीत उल्लेख केलेली आणखी एक स्त्री म्हणजे राहाब, जी बवाजाची आई होती. (मत्त. १:३, ५, ६, १६) रूथप्रमाणेच तीसुद्धा इस्राएली नव्हती.