अध्याय पंधरा
देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
१-३. (क) आपल्या पतीला भेटायला जाताना एस्तेरच्या मनात भीती का होती? (ख) आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत?
एस्तेरनं आपलं मन शांत ठेवण्याचा किती प्रयत्न केला, पण व्यर्थ! शूशन नगरातल्या राजवाड्याच्या अंगणात पाऊल ठेवताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. तो भव्यदिव्य राजवाडाच असा होता, की कोणीही तो पाहून भारावून गेला असता. बर्फानं झाकलेल्या झाग्रोस पर्वतांच्या कुशीत, कोआस्पीझ नदीच्या किनारी हा आलिशान राजवाडा बांधलेला होता. चकाकणाऱ्या, रंगीबेरंगी विटांच्या प्रचंड मोठ्या भिंतींवर, पंख असलेले बैल, धनुष्यबाण चालवणारे शूरवीर आणि सिंहाची भव्य चित्रं होती. कोरीवकाम केलेले दगडी स्तंभ आणि अवाढव्य पुतळे राजवाड्याच्या शोभेत आणखीनच भर घालायचे. हे सर्व वैभव आणि ऐश्वर्य पाहणाऱ्या प्रत्येकाला त्या साम्राज्याचा सम्राट किती शक्तिशाली आहे, याची आठवण झाल्याशिवाय राहत नसे. त्याचीच तर भेट घेण्यासाठी एस्तेर इथं आली होती! स्वतःला “महासम्राट” म्हणवणारा तो राजा तिचा पती होता!
२ पती? हो, अहशवेरोश राजा हा एस्तेरचा पती होता. पण साहजिकच, यहोवाची उपासना करणाऱ्या कोणत्याही यहुदी मुलीनं पतीची जी कल्पना केली असेल, त्यापेक्षा तो अगदीच वेगळा होता! * पती म्हटलं की यहुदी लोकांच्या मनात लगेच अब्राहामासारख्या विश्वासू माणसाचं उदाहरण येत असेल. अब्राहामानं आपल्या पत्नीचं, साराचं म्हणणं ऐकण्याविषयी देवानं दिलेला सल्ला नम्रपणे स्वीकारला होता. (उत्प. २१:१२) पण, देवाचा उपासक नसलेल्या अहशवेरोशला अशा उदाहरणांची माहिती नव्हती. एस्तेरचा देव, यहोवा किंवा त्याचं नियमशास्त्र याच्याशी त्याला काहीच घेणंदेणं नव्हतं. अहशवेरोशला फक्त पर्शियन कायदा माहीत होता. आणि या क्षणी एस्तेर जे करायला निघाली होती, ते नेमकं एका पर्शियन कायद्याच्या विरोधात होतं. काय करायला निघाली होती ती? कायद्यानुसार, पर्शियन सम्राटानं आपल्यासमोर हजर होण्याचा हुकूम केलेला नसताना जर कोणी त्याच्यासमोर गेला, तर त्याला मृत्युदंड दिला जायचा. एस्तेरला राजानं बोलावलं नव्हतं, पण तरीही ती त्याची भेट घ्यायला आली होती. तिनं राजवाड्याच्या आतल्या अंगणात प्रवेश करताच राजा तिला आपल्या सिंहासनावरून सहज पाहू शकत होता. जसजशी एस्तेर एकेक पाऊल पुढं टाकत होती, तसतसं आपण मृत्यूच्या जबड्यात जात आहोत असं तिला वाटलं असेल.—एस्तेर ४:११; ५:१ वाचा.
३ पण, का केलं होतं एस्तेरनं एवढं मोठं धाडस? आणि या उल्लेखनीय स्त्रीनं दाखवलेल्या विश्वासावरून आज आपण काय शिकू शकतो? ते जाणून घेण्याआधी, मुळात एस्तेर पर्शियन साम्राज्याची राणी कशी काय बनली ते आपण पाहू या.
एस्तेरचं पूर्वीचं जीवन
४. एस्तेरचं पूर्वीचं जीवन कसं होतं, आणि ती मर्दखयच्या घरी राहायला कशी आली?
४ खरंतर, एस्तेर अनाथ होती. तिचं मूळचं नाव हदस्सा. एका सुरेख, पांढऱ्याशुभ्र फुलांच्या झुडपावरून तिच्या आईवडिलांनी तिचं हे हिब्रू भाषेतलं नाव ठेवलं होतं. पण, एस्तेरच्या आईवडिलांबद्दल आपल्याला बायबलमध्ये फारशी माहिती मिळत नाही. तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यावर, मर्दखय नावाच्या तिच्या एका प्रेमळ नातेवाइकाला तिची दया आली. खरंतर तो तिचा चुलत भाऊ होता, पण वयानं तिच्यापेक्षा बराच मोठा होता. त्यानं एस्तेरला आपल्या घरी आणलं आणि स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं.—एस्ते. २:५-७, १५.
५, ६. (क) मर्दखयनं कशा प्रकारे एस्तेरचं संगोपन केलं? (ख) शूशनमध्ये एस्तेर आणि मर्दखय यांचं जीवन कसं होतं?
५ जेरूसलेमच्या नाशानंतर आपला मायदेश सोडून आलेले अनेक यहुदी, पर्शियाची राजधानी शूशन इथं राहत होते. मर्दखय आणि एस्तेर हेदेखील त्याच यहुद्यांपैकी होते. या परक्या देशातही हे लोक आपल्या धर्माचं आणि देवाच्या नियमशास्त्राचं जमेल तितकं पालन करण्याचा प्रयत्न करायचे. यामुळं अनेक पर्शियन लोक त्यांना तुच्छ लेखायचे. पण तरीसुद्धा, मर्दखयनं एस्तेरला लहानपणापासूनच यहोवाबद्दल शिकवलं होतं. तो किती दयाळू देव आहे, त्यानं कसं आपल्या लोकांना अनेक वेळा संकटातून सोडवलं आणि पुढंही सोडवेल, हे मर्दखयनं तिला सांगितलं होतं. (लेवी. २६:४४, ४५) नक्कीच, एस्तेर आणि मर्दखय यांच्यात बापलेकीसारखं प्रेमळ आणि भरवशाचं नातं निर्माण झालं असेल!
६ मर्दखय हा शूशनच्या राजवाड्यात कामाला होता, असं दिसतं. तो सहसा राजवाड्याच्या प्रवेशद्वारात राजाच्या इतर सेवकांसोबत बसायचा. (एस्ते. २:१९, २१; ३:३) एस्तेर लहानाची मोठी होत असताना तिचं जीवन कसं असेल, याबद्दल फारशी माहिती आपल्याजवळ नाही. पण आपण कल्पना करू शकतो, की ती आपल्या भावाची काळजी घेत असेल, तसंच घरातली लहानमोठी कामंही करत असेल. त्यांचं घर राजवाड्याच्या समोरून वाहणाऱ्या नदीच्या पलीकडे एका गरीब वस्तीत होतं. कदाचित एस्तेर अधूनमधून शूशनच्या बाजारात फिरायला जात असेल. तिथल्या सोन्याचांदीच्या आणि इतर दुकानांत ठेवलेल्या निरनिराळ्या वस्तू ती आवडीनं पाहत असेल. पण, पुढं अशा मौल्यवान वस्तू आपल्याला कवडीमोल वाटतील अशी कल्पनाही कदाचित तिनं त्या वेळी केली नसेल; भविष्यात तिच्यासाठी जे राखून ठेवलं होतं, त्याचा तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता!
“सुंदर व रूपवती”
७. वश्तीला राणीच्या पदावरून का काढून टाकण्यात आलं, आणि त्यानंतर काय घडलं?
७ एकदा, शूशन नगरात एक खळबळजनक बातमी पसरली. राजघराण्यात घडलेल्या एका घटनेबद्दलची ती बातमी होती. घडलं असं, की अहशवेरोश राजानं एक मोठी मेजवानी दिली होती. मेजवानीचा आनंद लुटत, आपल्या सरदारांसोबत खातपीत असताना राजानं आपली सुंदर राणी, वश्ती हिला सर्वांसमोर बोलवायचं ठरवलं. त्या वेळी, वश्ती राणी राजवाड्यात दुसऱ्या ठिकाणी स्त्रियांसोबत मेजवानीचा आनंद घेत होती. राजाचं बोलावणं आलं तेव्हा तिनं जाण्यास नकार दिला. सर्वांसमोर अपमान झाल्यामुळं राजाला खूप राग आला. वश्ती राणीला काय शिक्षा द्यावी असं त्यानं आपल्या सल्लागारांना विचारलं. याचा परिणाम काय झाला? वश्तीला राणीच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. मग, तिच्या जागी दुसरी राणी निवडण्यासाठी राजाचे सेवक सबंध देशात सुंदर, तरुण कुमारींचा शोध करू लागले.—एस्ते. १:१–२:४.
८. (क) एस्तेर मोठी झाल्यावर मर्दखयला थोडी काळजी का वाटली असावी? (ख) सौंदर्याबद्दल बायबलमध्ये दिलेला योग्य दृष्टिकोन आपण बाळगत असल्याचं कसं दाखवू शकतो? (नीतिसूत्रे ३१:३० देखील पाहा.)
८ एस्तेर मोठी होऊ लागली, तशी ती अतिशय देखणी दिसू लागली. आपली लहानशी बहीण आता मोठी झाली आहे आणि सुंदर दिसू लागली आहे, हे पाहून मर्दखयला कदाचित तिचा अभिमान, आणि त्याच वेळी थोडी काळजीही वाटली असेल. बायबलच्या अहवालात एस्तेरविषयी म्हटलं आहे, “ती मुलगी सुंदर व रूपवती होती.” (एस्ते. २:७) शारीरिक सौंदर्याविषयी बायबलमध्ये एक योग्य असा दृष्टिकोन मांडला आहे. सौंदर्य हे सर्वांनाच हवंहवंसं वाटतं आणि त्यात काही गैर नाही; पण सौंदर्याला सुज्ञता आणि नम्रपणा यांसारख्या गुणांची जोड असणं गरजेचं आहे. नाहीतर स्वार्थ, गर्विष्ठपणा आणि इतर वाईट गुण उत्पन्न होऊन एक सुंदर व्यक्तीसुद्धा कुरूप वाटू लागते. (नीतिसूत्रे ११:२२ वाचा.) कदाचित तुम्हीही असं घडताना पाहिलं असेल. पण, एस्तेरच्या बाबतीत काय घडलं? तिचं सौंदर्य तिच्यासाठी एक आशीर्वाद ठरला का? की, तिच्या सौंदर्यानं तिला गर्विष्ठ बनवलं? येणारा काळच हे सांगणार होता.
९. (क) राजाच्या सेवकांची एस्तेरवर नजर पडल्यावर काय घडलं, आणि मर्दखयला आणि तिलासुद्धा वाईट का वाटलं असेल? (ख) मर्दखयनं एस्तेरला यहोवाची उपासना न करणाऱ्या व्यक्तीशी लग्न का करू दिलं? (चौकटही पाहा.)
९ राजासाठी सुंदर तरुणींचा शोध घेणाऱ्या सेवकांची एस्तेरवर नजर पडली. त्यांनी तिला मर्दखयच्या घरून, नदीपलीकडे असलेल्या आलिशान राजवाड्यात नेलं. (एस्ते. २:८) एस्तेरला नेलं जात असताना तिला आणि मर्दखयलाही खूप वाईट वाटलं असेल, यात शंका नाही. कारण, त्या दोघांच्यात बापलेकीसारखं नातं होतं. मुलीसारखं वाढवलेल्या एस्तेरचं, यहोवाचा उपासक नसलेल्या व्यक्तीशी, मग तो राजा का असेना, लग्न व्हावं अशी मर्दखयची मुळीच इच्छा नसेल. पण, जे काही घडत होतं ते रोखणं त्याच्या हातात नव्हतं. * एस्तेरला राजवाड्यात नेण्यात आलं, त्याआधी नक्कीच मर्दखयनं तिला वडिलकीच्या नात्यानं उपदेशाच्या चार गोष्टी सांगितल्या असतील. आणि तिनंही त्याचा शब्द न् शब्द आपल्या हृदयात साठवला असेल! एस्तेरला शूशनच्या राजवाड्याच्या आत नेलं जात असताना, तिच्या मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली असेल. मग, कसं होतं एस्तेरचं राजवाड्यातलं जीवन?
“सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली”
१०, ११. (क) नव्या वातावरणाचा एस्तेरवर सहजपणे कसा परिणाम होऊ शकला असता? (ख) मर्दखयला एस्तेरबद्दल काळजी असल्याचं कशावरून दिसून येतं?
१० एस्तेरनं तिच्यासाठी पूर्णपणे नवीन असलेल्या, जणू एका वेगळ्याच जगात पाऊल ठेवलं होतं. राजवाड्यात तिच्यासोबत सबंध पर्शियन साम्राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आणण्यात आलेल्या अनेक तरुण मुली होत्या. त्या सगळ्यांचे रीतिरिवाज, भाषा आणि वागण्याबोलण्याची पद्धत फार वेगळी असेल. त्या सर्व तरुण मुलींना राजमंदिरात हेगे नावाच्या एका रक्षकाच्या हवाली सोपवण्यात आलं होतं. वर्षभर या मुलींवर वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी तेलांनी अनेक सौंदर्योपचार केले जाणार होते. (एस्ते. २:८, १२) अशा या वातावरणात, कदाचित त्या मुली रात्रंदिवस फक्त आपल्या रंगरूपाबद्दलच विचार करत असतील. तसंच, त्यांच्यात मीपणाची आणि चढाओढीची भावनाही कदाचित निर्माण झाली असेल. पण, एस्तेरच्या बाबतीत असं घडलं का?
एस्ते. २:११) राजवाड्यात काम करणाऱ्या त्याच्या ओळखीच्या काही सेवकांकडून त्याला अधूनमधून एस्तेरविषयी थोडीबहुत माहिती मिळत असेल. पण, जे काही त्याच्या कानावर आलं ते ऐकून त्याला नक्कीच एस्तेरचा खूप अभिमान वाटला असेल. अशी काय खबर मिळाली होती मर्दखयला एस्तेरविषयी?
११ राजवाड्यात एस्तेरचं कसं काय चाललं आहे, हे जाणून घेण्याची सर्वात जास्त काळजी जर कोणाला असेल, तर ती होती मर्दखयला. अहवालात सांगितलं आहे, की तो दररोज राजवाड्यात स्त्रियांच्या महालाजवळ फेऱ्या मारायचा. (१२, १३. (क) लोकांचं एस्तेरविषयी काय मत होतं? (ख) एस्तेरनं आपण यहुदी असल्याचं कोणाला सांगितलेलं नाही, हे समजल्यावर मर्दखयला आनंद का झाला असेल?
१२ मुलींची देखभाल करणारा हेगे हा एस्तेरमुळं फार प्रभावित झाला होता. तो तिच्याशी अतिशय प्रेमानं वागायचा. इतकंच काय, तर त्यानं सात एस्ते. २:९, १५) पण, फक्त सौंदर्याच्या बळावर एस्तेरनं सर्वांना असं प्रभावित केलं होतं का? नाही, सौंदर्यासोबतच एस्तेरचं व्यक्तिमत्त्व अनेक चांगल्या गुणांनी सजलेलं होतं.
मुलींना तिच्या सख्या म्हणून नेमलं होतं आणि त्यांना राहण्यासाठी स्त्रियांच्या महालात सर्वात चांगलं ठिकाण दिलं होतं. अहवालात असंही म्हटलं आहे: “ज्याने ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली.” (१३ उदाहरणार्थ, एस्तेर अतिशय सुज्ञ आणि आज्ञाधारक होती. अहवालात असं म्हटलं आहे: “एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही; तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते.” (एस्ते. २:१०) पर्शियन राजघराण्यातले बहुतेक लोक यहुद्यांना पाण्यात पाहतात, हे मर्दखयला माहीत होतं; आणि म्हणूनच आपण यहुदी वंशाचे आहोत हे कोणालाही न सांगण्याची त्यानं एस्तेरला ताकीद दिली होती. आता जेव्हा त्याला कळलं, की तो समोर नसतानाही एस्तेरनं सुज्ञतेनं वागून त्याच्या आज्ञेचं पालन केलं होतं, तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल!
१४. आज लहान मुलं व तरुण कशा प्रकारे एस्तेरच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात?
१४ आजसुद्धा लहान मुलं आणि तरुण, आईवडिलांचं आणि आपली काळजी घेणाऱ्यांचं मन आनंदित करू शकतात. आईवडील समोर नसतानाही लहान मुलं आपल्या आजूबाजूच्या अनैतिक आणि दुष्ट प्रभावांचा प्रतिकार करून चांगल्या मार्गावर टिकून राहू शकतात. असं केल्यास, एस्तेरसारखंच तेसुद्धा आपल्या स्वर्गातील पित्याचं मन आनंदित करू शकतील.—नीतिसूत्रे २७:११ वाचा.
१५, १६. (क) एस्तेरनं कशा प्रकारे राजाचं मन जिंकलं? (ख) बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं एस्तेरला सोपं का गेलं नसेल?
१५ एस्तेरला राजाच्या पुढे नेण्याची वेळ आली, तेव्हा आवश्यक वाटणाऱ्या कोणत्याही वस्तू मागण्याची तिला संधी देण्यात आली. उदाहरणार्थ, आपल्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी ती हवं ते मागू शकत होती. पण, हेगेनं ज्या गोष्टी तिला देण्याचं ठरवलं होतं त्यांव्यतिरिक्त तिनं त्याच्याकडे काहीही मागितलं नाही. (एस्ते. २:१५) फक्त सौंदर्याच्या बळावर आपण राजाचं मन जिंकू शकत नाही, याची एस्तेरला जाणीव होती. उलट, त्या राजवाड्यातल्या बहुतेक लोकांमध्ये नसलेले, विनम्रता आणि विनयशीलता यांसारखे गुण त्याला जास्त प्रभावित करतील हे तिनं ओळखलं. मग, तिचा हा अंदाज खरा ठरला का?
१६ अहवालात म्हटलं आहे: “राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि . . . सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले.” (एस्ते. २:१७) या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं एस्तेरला नक्कीच सोपं गेलं नसेल! ती नम्र यहुदी मुलगी, त्या काळच्या सर्वात शक्तिशाली सम्राटाची राणी बनली होती! पण, राणी बनल्यामुळं एस्तेरला गर्व आला का? मुळीच नाही!
१७. (क) एस्तेर कशा प्रकारे आपल्या मानलेल्या पित्याच्या आज्ञेत राहिली? (ख) एस्तेरचं उदाहरण आज आपल्यासाठी उपयोगी का आहे?
१७ एस्तेर पुढंही, आपला मानलेला पिता मर्दखय याच्या आज्ञेत राहिली. आपण यहुदी आहोत हे राणी बनल्यानंतरही तिनं इतरांपासून लपवून ठेवलं. तसंच काही काळानं, जेव्हा अहशवेरोशला ठार मारण्याचा कट रचला जात असल्याचं मर्दखयला समजलं, तेव्हा त्यानं एस्तेरला याविषयी राजाला सावध करण्यास सांगितलं. एस्तेरनं त्याच्या सांगण्यानुसार केलं आणि यामुळं तो कट फसला. (एस्ते. २:२०-२३) अशा रीतीनं, नम्र आणि आज्ञाधारक राहण्याद्वारे एस्तेरनं देवावर विश्वास असल्याचं दाखवलं. एस्तेरचं उदाहरण आज आपल्यासाठी खरोखर किती उपयोगी आहे! आज जगातल्या बहुतेक लोकांमध्ये आज्ञा न मानण्याची, स्वैराचारी व बंडखोर वृत्ती दिसून येते. पण, खरा विश्वास दाखवणारे लोक मात्र एस्तेरप्रमाणेच आज्ञाधारक राहण्याचं महत्त्व ओळखतात.
एस्तेरच्या विश्वासाची कसोटी
१८. (क) मर्दखयनं हामानाला मुजरा करायला नकार का दिला असावा? (तळटीपही पाहा.) (ख) आज विश्वासू स्त्रीपुरुष कशा प्रकारे मर्दखयच्या उदाहरणाचं अनुकरण करतात?
१८ पुढं काही काळानं, हामान नावाच्या एका माणसाला अहशवेरोशच्या दरबारात एक उच्च पद देण्यात आलं. राजानं त्याला प्रधानमंत्री केलं आणि अशा रीतीनं तो राजाचा प्रमुख सल्लागार बनला. पर्शियन साम्राज्यात राजाच्या खालोखाल त्याचंच स्थान होतं. राजानं तर असा हुकूमही काढला की हामान समोर येताच प्रत्येकानं त्याला वाकून मुजरा करावा. (एस्ते. ३:१-४) पण, या कायद्यामुळं मर्दखयसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली. त्याला राजाची आज्ञा तर मानायची होती, पण त्यासाठी आपल्या देवाचा अनादर करणं त्याला मान्य नव्हतं. हामानाला मुजरा केल्यामुळं देवाचा अनादर कसा होणार होता? हामान हा अगागी, म्हणजेच अगाग राजाचा वंशज होता. या अमालेकी राजाचा, शमुवेल संदेष्ट्यानं वध केला होता. (१ शमु. १५:३३) मुळात, अमालेकी लोक अतिशय दुष्ट होते. ते यहोवाचे आणि इस्राएल राष्ट्राचे कट्टर शत्रू होते. देवानं सर्व अमालेकी लोकांना नाशास पात्र ठरवलं होतं. * (अनु. २५:१९) मग, एका विश्वासू यहुद्यानं अमालेकी व्यक्तीला मुजरा करणं योग्य ठरलं असतं का? मर्दखय तर असं करण्याचा विचारही करू शकत नव्हता. त्यानं हामानाला मुजरा करण्यास स्पष्ट नकार दिला. “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे,” या तत्त्वाचं पालन करण्यासाठी आजसुद्धा कितीतरी विश्वासू स्त्रीपुरुष आपला जीव धोक्यात घालतात!—प्रे. कृत्ये ५:२९.
१९. हामानाला काय करायचं होतं आणि त्यानं ही गोष्ट राजाला कशी पटवून दिली?
१९ मर्दखयनं मुजरा करायला नकार दिल्यामुळं हामान रागानं वेडापिसा झाला. त्याला कसंही करून मर्दखयला ठार मारायचं होतं. पण, एकट्या मर्दखयला मारून त्याचं समाधान होणार नव्हतं. त्यानं मर्दखयच्या लोकांचाच समूळ नाश करायचं ठरवलं! म्हणून, हामानानं यहुदी लोकांबद्दल राजाच्या मनात विष पेरलं. त्या लोकांचा स्पष्ट उल्लेख न करता, त्यानं राजाला असं सुचवलं की सर्व राष्ट्रांत “पांगलेले व विखरलेले” हे लोक राजाच्या काहीच कामाचे नाहीत. इतकंच काय, तर हे लोक राजाच्या कायद्यांचं पालन करत नाहीत आणि त्यांच्यापासून राष्ट्राला धोका आहे, असंही हामानानं राजाला सांगितलं. त्यामुळं, पर्शियन साम्राज्यात राहणाऱ्या सर्व यहुद्यांना ठार मारलं जावं असं त्यानं सुचवलं. यासाठी लागणाऱ्या खर्चाला हातभार लावण्यासाठी त्यानं एक मोठी रक्कम * अहशवेरोशनं हामानाला त्याच्या सांगण्यानुसार करण्याची परवानगी दिली आणि त्याला जो काही हुकूम काढायचा असेल त्यावर मोहर लावण्यासाठी स्वतःची अंगठीसुद्धा त्याच्या हवाली केली.—एस्ते. ३:५-१०.
राजाला देऊ केली.२०, २१. (क) हामानानं काढलेल्या फर्मानामुळं सबंध पर्शियन साम्राज्यातल्या यहुद्यांवर, तसंच मर्दखयवर कसा परिणाम झाला? (ख) मर्दखयनं एस्तेरला कोणती विनंती केली?
२० यानंतर लागलीच, एक खास फर्मान घेऊन घोडेस्वारांना दूरवर पसरलेल्या पर्शियन साम्राज्याच्या कानाकोपऱ्यांत पाठवण्यात आलं. सर्व यहुदी लोकांच्या समूळ नाशाचं ते फर्मान होतं. शूशनपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जेरूसलेममध्ये जेव्हा ही बातमी पोचली असेल, तेव्हा तिथं राहणाऱ्या यहुद्यांना कसं वाटलं असावं याची कल्पना करा. बॅबिलोनच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांपैकी काही जण जेरूसलेमला परतले होते आणि ते उद्ध्वस्त झालेलं शहर आणि त्याच्या तटबंदी पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत होते. शहराचं संरक्षण करणाऱ्या तटबंदी अजूनही पडीक अवस्थेत होत्या. ही भयंकर एस्तेर ३:१२–४:१ वाचा.
बातमी ऐकल्यावर नक्कीच मर्दखयला जेरूसलेममध्ये असलेल्या त्या यहुद्यांची आणि सोबतच शूशनमध्ये राहणाऱ्या आपल्या सर्व ओळखीच्या लोकांची आणि नातेवाइकांची खूप काळजी वाटली असेल. तो इतका दुःखी झाला की त्यानं आपली वसत्रं फाडली, गोणताट घातलं आणि डोक्यावर राख टाकून तो शहराच्या मध्यभागी जाऊन मोठमोठ्यानं रडू लागला. तिकडे, शूशनमध्ये राहणाऱ्या असंख्य यहुद्यांना दुःखसागरात लोटणारा हामान मात्र काहीही न घडल्याप्रमाणे राजासोबत बसून मद्याचा आनंद लुटत होता.—२१ आता आपणच काहीतरी केलं पाहिजे याची मर्दखयला जाणीव झाली. पण तो काय करू शकत होता? तो किती दुःखी मनःस्थितीत होता हे ऐकून एस्तेरनं त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याला वसत्रं पाठवली. पण, मर्दखयचं दुःख काही कमी झालं नाही. कदाचित मर्दखयनं यापूर्वी अनेकदा विचार केला असावा, की आपल्या लाडक्या एस्तेरपासून यहोवा देवानं आपल्याला वेगळं का होऊ दिलं असावं? आणि त्याची उपासना न करणाऱ्या एका विदेशी राजाशी तिचं लग्न का होऊ दिलं असावं? पण, आता मात्र त्या सर्व गोष्टींचा अर्थ त्याला उलगडू लागला. मर्दखयनं लगेच एस्तेर राणीला एक निरोप पाठवला. त्यानं तिला राजाजवळ जाऊन आपल्या लोकांच्या वतीनं बोलण्याची आणि त्यांच्यासाठी दयेची भीक मागण्याची विनंती केली.—एस्ते. ४:४-८.
२२. एस्तेरला राजासमोर जायला भीती का वाटली असावी? (तळटीपही पाहा.)
२२ मर्दखयचा निरोप ऐकल्यावर नक्कीच एस्तेरच्या हृदयाचं पाणी पाणी झालं असेल. तिच्या विश्वासाची ही सर्वात मोठी कसोटी होती. सुरुवातीला ती घाबरली आणि तिनं मर्दखयला पाठवलेल्या उत्तरात तसं कबूलही केलं. तसंच, तिनं त्याला राजाच्या कायद्याची आठवण करून दिली. राजानं स्वतः बोलावलेलं नसताना त्याच्यापुढं जाणाऱ्याला मृत्युदंड होऊ शकत होता. फक्त, राजानं त्याला पाहून आपला सुवर्णदंड पुढं केल्यास त्याचा जीव वाचू शकत होता. वश्ती राणीनं राजाच्या आज्ञेचं पालन केलं नाही तेव्हा तिच्यासोबत काय घडलं हे एस्तेरला चांगलं माहीत होतं. त्यामुळं, राजा सुवर्णदंड पुढं करून आपल्याला जीवदान देईल अशी खातरी ती खरंच बाळगू शकत होती का? शिवाय, *—एस्ते. ४:९-११.
राजानं ३० दिवसांपासून आपल्याला त्याच्यासमोर हजर होण्याचं आमंत्रण दिलेलं नाही, असंही एस्तेरनं मर्दखयला सांगितलं. इतक्या दिवसांपासून राजानं बोलावलं नसल्यामुळं आपण त्याच्या मर्जीतून उतरलो आहोत की काय, अशी भीतीही साहजिकच एस्तेरला वाटली असावी.२३. (क) एस्तेरचा विश्वास खंबीर करण्यासाठी मर्दखयनं काय म्हटलं? (ख) मर्दखयकडून आपण काय शिकू शकतो?
२३ एस्तेरचा विश्वास खंबीर करण्यासाठी मर्दखयनं तिला अगदी सडेतोड शब्दांत उत्तर दिलं. जर तिनं या प्रसंगी धैर्य दाखवलं नाही, तर दुसऱ्या कोणत्याही मार्गानं यहुद्यांची सुटका केली जाईल, असं त्यानं म्हटलं. पण, छळाचा जोर वाढल्यावर ती आपला जीव वाचवू शकेल का, याचा विचार करण्यास त्यानं तिला सांगितलं. मर्दखयनं दिलेल्या उत्तरातून त्याचा यहोवावर किती मजबूत विश्वास होता हे दिसून येतं. यहोवा आपल्या लोकांचा कधीही समूळ नाश होऊ देणार नाही आणि त्यानं दिलेली वचनं तो कधीही निष्फळ ठरू देणार नाही, याची मर्दखयला पूर्ण खातरी होती. (यहो. २३:१४) शेवटी, मर्दखयनं एस्तेरला विचारलं, “तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?” (एस्ते. ४:१२-१४) खरोखर, मर्दखयच्या दृढ विश्वासावरून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आपला देव, यहोवा याच्यावर त्यानं पूर्ण भरवसा ठेवला. आपणही ठेवतो का?—नीति. ३:५, ६.
मृत्यूच्या भीतीपेक्षा विश्वास प्रबळ
२४. एस्तेरनं धैर्य आणि विश्वास कसा दाखवला?
२४ एस्तेरसाठी आता निर्णयाची घडी आली होती. मग, काय निर्णय घेतला तिनं? एस्तेरनं मर्दखयला निरोप पाठवला, की त्यानं सर्व यहुद्यांना तिच्यासोबत मिळून तीन दिवस उपवास करायला सांगावं. तिच्या या निरोपाच्या शेवटी तिनं जे म्हटलं, त्या साध्याशा वाक्यावरून तिचा विश्वास आणि धैर्य दिसून येतं. आजही तिचे ते शब्द आपल्या हृदयाला स्पर्श करतात. ती म्हणाली, “मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.” (एस्ते. ४:१५-१७) त्या तीन दिवसांदरम्यान एस्तेरनं, पूर्वी कधीही केली नव्हती इतक्या कळकळीनं यहोवाला प्रार्थना केली असेल. मग, शेवटी तो महत्त्वाचा क्षण आला. एस्तेरनं आपली सर्वात उत्तम राजवसत्रं घातली. आपल्याला पाहताच राजानं खुश व्हावं यासाठी तिनं जमेल ते केलं. आणि मग ती राजाची भेट घेण्यासाठी गेली.
२५. एस्तेर आपल्या पतीसमोर गेली तेव्हा काय घडलं याचं वर्णन करा.
२५ एस्तेर राजाच्या दरबाराकडे जात असतानाचं वर्णन आपण अध्यायाच्या सुरुवातीला वाचलं होतं. एकेक पाऊल पुढं टाकताना, चिंता आणि भीती यामुळं तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल; आणि ती किती कळकळीनं यहोवाला प्रार्थना करत असेल, याची आपण केवळ कल्पना करू शकतो. शेवटी, एस्तेरनं राजदरबाराच्या अंगणात प्रवेश केला. तिथून ती सिंहासनावर बसलेल्या अहशवेरोशला पाहू शकत होती. तिच्या मनात एकच विचार होता, आपल्याला पाहून राजाची काय प्रतिक्रिया असेल? कदाचित, तिनं त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला असेल. तो क्षण तिला युगापेक्षाही लांब वाटला असेल. पण, तिला फार प्रतीक्षा करावी लागली नाही. तिच्या पतीनं तिला पाहिलं. आधी त्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. त्यानं आपल्या हातातला सुवर्णदंड पुढं केला!—एस्ते. ५:१, २.
२६. खऱ्या ख्रिस्ती उपासकांना एस्तेरसारखं धैर्य दाखवण्याची गरज का आहे, आणि तिनं जे केलं ती केवळ एक सुरुवात का होती?
२६ राजा खुश झाला होता! सुवर्णदंड पुढं करून त्यानं एस्तेरला बोलण्याची परवानगी दिली होती. एस्तेरनं आपल्या लोकांना वाचवण्यासाठी जिवाचीही पर्वा केली नव्हती. याद्वारे तिनं देवावर पूर्ण विश्वास असल्याचं दाखवलं. खरोखर, तिनं देवाच्या सर्व सेवकांसाठी विश्वासाचं किती सुंदर उदाहरण मांडलं आहे! खरे ख्रिस्ती अशा उदाहरणांना खूप मौल्यवान लेखतात. येशूनं म्हटलं होतं, की आत्मत्यागी प्रेम हे त्याच्या खऱ्या उपासकांचं ओळखचिन्ह असेल. (योहान १३:३४, ३५ वाचा.) असं प्रेम दाखवण्यासाठी बऱ्याचदा एस्तेरसारखं धैर्य दाखवण्याची गरज असते. एस्तेरनं त्या दिवशी देवाच्या लोकांच्या वतीनं बोलण्यासाठी धैर्य तर दाखवलं, पण ही फक्त सुरुवात होती. कारण, राजाचा आवडता सल्लागार हामान हा एक दुष्ट कारस्थानी माणूस आहे, हे तिला राजाला पटवून द्यावं लागणार होतं. हे तिनं कसं केलं? आणि आपल्या लोकांना तिनं कसं वाचवलं? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या अध्यायात पाहू.
^ परि. 2 अहशवेरोश हा ख्रिस्ताच्या सुमारे पाचशे वर्षांपूर्वी, पर्शियन साम्राज्यावर राज्य करणारा झर्कसीझ पहिला असावा असं मानलं जातं.
^ परि. 9 “एस्तेरविषयी उद्भवणारे प्रश्न,” असं शीर्षक असलेली १६ व्या अध्यायातील चौकट पाहा.
^ परि. 18 अमालेकी लोकांपैकी जे “उरले होते” त्यांचा हिज्कीया राजाच्या काळातच नाश करण्यात आला होता. त्यामुळं, हामान हा कदाचित अगदी शेवटल्या काही अमालेकी लोकांपैकी एक असावा.—१ इति. ४:४३.
^ परि. 19 हामानानं राजाला १०,००० किक्कार चांदी देऊ केली. आज त्याचं मूल्य अब्जावधी रुपयांइतकं असेल. अहशवेरोश हाच झर्कसीझ पहिला असल्यास त्याला हामानाचा हा प्रस्ताव नक्कीच पसंत पडला असेल. कारण, झर्कसीझची बऱ्याच काळापासून ग्रीससोबत युद्ध करण्याची योजना होती आणि त्यासाठी त्याला भरपूर पैशाची गरज होती. पण, शेवटी या युद्धात त्याचा वाईट रीतीनं पराभव झाला.
^ परि. 22 झर्कसीझ पहिला, हा अतिशय तापट स्वभावाचा होता असं म्हटलं जातं. ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यानं ग्रीससोबत झर्कसीझनं केलेल्या युद्धातली काही उदाहरणं दिली आहेत. हेलेस्पाँट खाडी ओलांडण्यासाठी झर्कसीझनं बोटींची साखळी करून एक पूल तयार करण्याचा आदेश दिला होता. पण वादळ आल्यामुळं हा पूल उद्ध्वस्त झाला तेव्हा झर्कसीझनं तो बांधणाऱ्या अभियंत्यांचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. इतक्यावरच तो थांबला नाही, तर हेलेस्पाँट खाडीलाही “शिक्षा” देण्यात आली. झर्कसीझनं आपल्या माणसांना खाडीतल्या पाण्यावर चाबकाचे फटके मारायला सांगितलं आणि फटके मारत असताना एक अतिशय अपमानजनक घोषणा वाचण्यात आली. त्याच युद्धादरम्यान जेव्हा एका श्रीमंत माणसानं आपल्या मुलाला सैन्यात भरती न करण्याची राजाला विनंती केली, तेव्हा झर्कसीझनं त्या मुलाच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि इतरांनीही यापासून धडा घ्यावा म्हणून त्याचं शरीर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित केलं.