समारोप
“विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.”—इब्री लोकांस ६:१२.
१, २. आज विश्वास उत्पन्न करणं व तो टिकवून ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे? उदाहरण द्या.
विश्वास. खरंच, किती सुरेख आणि मौल्यवान गुण! पण या गुणाचा विचार करताना, विलंब न करता पाऊल उचलणं किती गरजेचं आहे ही गोष्टदेखील आपल्या लक्षात येते. कारण जर आपल्यामध्ये विश्वास नसेल, तर तो उत्पन्न करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि जर आपण तो आधीपासूनच उत्पन्न केला असेल, तर त्याचं रक्षण करण्यासाठी आणि तो वाढवत राहण्यासाठीही तातडीनं पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. पण, हे इतकं महत्त्वाचं का आहे?
२ अशी कल्पना करा, की तुम्ही एका मोठ्या वाळवंटातून प्रवास करत आहात. तुम्हाला पाण्याची अत्यंत गरज आहे. शेवटी, कसंतरी करून तुम्हाला ते मिळतं. पण, आता वाळवंटातल्या रखरखीत उन्हात त्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून तुम्हाला त्याचं रक्षण करावं लागेल. शिवाय, प्रवासात शेवटपर्यंत तुमच्याजवळ पाणी असावं म्हणून ते संपल्यावर पुन्हा भरणंही गरजेचं असेल. आध्यात्मिक दृष्टीनं, आजच्या या जगाची तुलना एका वाळवंटाशी करता येईल. वाळवंटात ज्याप्रमाणे पाण्याचा अभाव असतो, त्याचप्रमाणे या जगातसुद्धा खरा विश्वास फार कमी पाहायला मिळतो. शिवाय, आहे त्या विश्वासाचं रक्षण केलं नाही आणि तो सतत वाढवला नाही तर आपण तो गमावून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं विश्वास उत्पन्न करणं आणि तो टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जसं पाण्याशिवाय जिवंत राहणं शक्य नाही, तसंच विश्वासाशिवाय यहोवा देवासोबतचं आपलं नातं टिकवून ठेवणंही शक्य नाही.—रोम. १:१७.
३. आपल्याला विश्वास वाढवता यावा म्हणून यहोवानं काय केलं आहे, आणि कोणत्या दोन गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत?
३ आपल्याला विश्वासाची किती गरज आहे हे यहोवाला माहीत आहे; तसंच, विश्वास उत्पन्न करणं आणि तो टिकवून ठेवणं आज किती कठीण आहे हेसुद्धा त्याला माहीत आहे. म्हणूनच, बायबलमध्ये त्यानं विश्वासाची अनेक उदाहरणं दिली आहेत ज्यांचं आपण अनुकरण करू शकतो. यहोवानं प्रेषित पौलाला असं लिहिण्यास प्रेरित केलं: “विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” (इब्री ६:१२) आणि यासाठीच यहोवाची संघटनासुद्धा आपल्याला बायबलमधील विश्वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांचं अनुकरण करण्याचा मनापासून प्रयत्न करावा, असं वारंवार उत्तेजन देते. यांपैकी काही विश्वासू जनांची उदाहरणं आपण या पुस्तकात पाहिली आहेत. मग, आता आपण काय केलं पाहिजे? दोन गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत: (१) आपला विश्वास वाढवत राहणं; आणि (२) आपली आशा नेहमी डोळ्यांसमोर ठेवणं.
४. सैतान हा विश्वासाचा शत्रू आहे असं का म्हणता येईल, आणि आपण कोणता विचार करू नये?
४ विश्वास वाढवत राहा. सैतान हा विश्वासाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जगाच्या या शासकानं, एकाअर्थी या जगाचं अशा वाळवंटात रूपांतर केलं आहे, जिथं विश्वास टिकवून ठेवणं सोपं नाही. शिवाय, सैतान आपल्यापेक्षा कितीतरी शक्तिशाली आहे. मग, विश्वास उत्पन्न करणं आणि तो वाढवत राहणं शक्यच नाही असा आपण विचार करावा का? मुळीच नाही. कारण, जे खरा विश्वास उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांच्या पाठीशी यहोवा एका जिवलग मित्रासारखा उभा असतो. त्याच्या याको. ४:७) आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आणि तो वाढवत राहण्यासाठी दररोज वेळ काढण्याद्वारे आपण सैतानाचा विरोध करतो. तो कसा?
मदतीनं आपण सैतानाचा केवळ विरोधच करू शकणार नाही, तर त्याला पळवून लावण्यातही यशस्वी होऊ असं आश्वासन यहोवा देतो. (५. बायबलमधील विश्वासू जनांनी कशा प्रकारे विश्वास उत्पन्न केला? स्पष्ट करा.
५ बायबलमधल्या ज्या विश्वासू स्त्री-पुरुषांबद्दल आपण पाहिलं, त्यांचा जन्मापासूनच यहोवावर विश्वास होता असं नाही. तर, विश्वास हा यहोवाच्या पवित्र आत्म्याद्वारे उत्पन्न होतो हे त्यांच्या जीवनावरून आपल्याला शिकायला मिळतं. (गलती. ५:२२, २३) त्यांनी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि त्यामुळं यहोवा त्यांचा विश्वास वाढवत राहिला. आपणही तेच करू या. जे यहोवाकडे पवित्र आत्म्याची मदत मागतात आणि आपल्या प्रार्थनेनुसार कार्य करतात अशांना तो उदारपणे आपला आत्मा देतो, याबद्दल आपण मनात कोणतीही शंका बाळगू नये. (लूक ११:१३) पण, आपण आणखी काही करू शकतो का?
६. बायबलमधील वृत्तान्तांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपण काय करू शकतो?
६ या पुस्तकात आपण, उल्लेखनीय विश्वास दाखवलेल्या केवळ काही जणांचीच उदाहरणं पाहिली. पण, अशी कितीतरी उदाहरणं बायबलमध्ये नमूद आहेत. (इब्री लोकांस ११:३२ वाचा.) या प्रत्येक उदाहरणातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मग, आपल्या वैयक्तिक अभ्यासात आपण प्रार्थनापूर्वक व मनापासून त्यांचा अभ्यास करू नये का? बायबलमधील हे वृत्तान्त आपण फक्त वरवर वाचले तर आपला विश्वास वाढवण्यासाठी आपल्याला तितकी मदत मिळणार नाही. यासाठी आपण जे काही वाचतो त्यापासून पूर्ण फायदा व्हावा म्हणून आपण त्या वृत्तान्तांची मागची-पुढची माहिती मिळवण्यासाठी सखोल अभ्यास केला पाहिजे. ते विश्वासू स्त्री-पुरूष ‘आपल्यासारख्या स्वभावाचे’ होते हे जर आपण लक्षात ठेवलं तर बायबलमधली ही उदाहरणं आपल्याला जास्त खरीखुरी वाटतील. (याको. ५:१७) आपल्यासारख्याच समस्यांना व आव्हानांना तोंड देताना त्यांना नेमकं कसं वाटलं असेल, हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करू शकतो.
७-९. (क) आज आपण करतो त्या प्रकारे यहोवाची उपासना करण्याविषयी प्राचीन काळातील काही सेवकांना कसं वाटलं असतं? (ख) आपण कार्यांद्वारे आपला विश्वास आणखी मजबूत का केला पाहिजे?
७ आपण आपल्या कार्यांद्वारेसुद्धा आपला विश्वास मजबूत करू शकतो. कारण, विश्वास “क्रियांवाचून निर्जीव” आहे असं बायबल म्हणतं. (याको. २:२६) आज यहोवानं आपल्यावर जे काम सोपवलं आहे ते प्राचीन काळातील विश्वासू स्त्री-पुरुषांना यहोवानं करायला सांगितलं असतं तर त्यांना किती आनंद झाला असता याची कल्पना करा!
८ उदाहरणार्थ, अब्राहामाचा विचार करा. तो अरण्यात दगडांपासून बनवलेल्या वेद्यांवर यहोवाची उपासना करायचा. पण, समजा त्याला यहोवाच्या संघटित लोकांसोबत आरामदायक राज्य सभागृहांमध्ये व मोठ्या अधिवेशनांमध्ये उपासना करायला मिळाली असती, तर त्याला कसं वाटलं असतं? आणि ज्या अभिवचनांची पूर्णता त्यानं केवळ “दुरून” पाहिली होती, त्या अभिवचनांवर अशा सभांमध्ये सुस्पष्ट व सविस्तर रीत्या चर्चा करण्याविषयी आणि माहिती घेण्याविषयी त्याला कसं वाटलं असतं? (इब्री लोकांस ११:१३ वाचा.) तसंच, एलीयाचाही विचार करा. तो एका दुष्ट व धर्मत्यागी राजाच्या शासनाखाली यहोवाची सेवा करत होता; एक संदेष्टा या नात्यानं त्याला बआलाच्या दुष्ट संदेष्ट्यांचा वध करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. पण, त्याऐवजी लोकांकडे जाऊन सांत्वनाचा व आशेचा संदेश सांगण्याचं एक शांतिपूर्ण कार्य करण्याविषयी त्याच्या काय भावना असत्या? खरंच, आज आपण ज्या प्रकारे यहोवाची उपासना करत आहोत त्या प्रकारे उपासना करायला बायबलमधल्या या विश्वासू स्त्री-पुरुषांना नक्कीच खूप आनंद झाला असता.
९ तेव्हा, आपल्या कार्यांद्वारे आपण आपला विश्वास मजबूत करत राहू या. हे करत असताना खरंतर आपण देवाच्या प्रेरित वचनात उल्लेख केलेल्या या विश्वासू जनांच्या उदाहरणांचं अनुकरण करत असू. आणि या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे बायबलमधील हे विश्वासू स्त्री-पुरुष आपल्याला जिवलग मित्रांसारखे वाटू लागतील. खरंतर, तो दिवस आता दूर नाही जेव्हा आपल्याला या विश्वासू जनांना प्रत्यक्ष भेटता येईल आणि त्यांच्याशी मैत्री करता येईल.
१०. नंदनवनात आपल्याला काय करण्याची सुसंधी मिळेल?
१० आपली आशा सतत डोळ्यांसमोर ठेवा. देवानं दिलेली आशा सदैव डोळ्यांसमोर ठेवल्यामुळं सबंध इतिहासात कित्येक विश्वासू स्त्री-पुरुषांना खूप बळ मिळालं आहे. तुम्हीसुद्धा ते अनुभवलं आहे का? उदाहरणार्थ, “नीतिमानांचे . . . पुनरुत्थान होईल,” तेव्हा देवाच्या या प्राचीन काळातल्या विश्वासू सेवकांना भेटून आपल्याला किती आनंद होईल याची कल्पना करा! (प्रेषितांची कृत्ये २४:१५ वाचा.) त्यांना भेटल्यावर तुम्ही कोणते प्रश्न विचाराल?
११, १२. (क) हाबेल (ख) नोहा (ग) अब्राहाम (घ) रूथ (च) अबीगईल (छ) एस्तेर यांना नवीन जगात भेटल्यावर तुम्ही कोणते प्रश्न विचारू शकता?
११ उदाहरणार्थ हाबेलाला भेटल्यावर, “तुझे आईवडील कसे होते?” किंवा “एदेन बागेजवळ असलेल्या करूबांशी तू कधी बोललास का? आणि तेही तुझ्याशी बोलले का?” असे प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतील का? तसंच नोहाबद्दल काय? “तुला नेफिलीमची कधी भीती वाटली का? वर्षभर तारवामध्ये असताना त्या सगळ्या प्राण्यांना कसं सांभाळलं?” असं कदाचित तुम्ही नोहाला विचाराल. अब्राहामाला भेटल्यावर तुम्ही त्याला विचारू शकता की, “तुला शेमच्या सहवासात राहायला मिळालं का? यहोवाबद्दल तुला कोणी माहिती दिली? ऊरसारखं समृद्ध शहर सोडून जाणं तुला कठीण गेलं का?”
१२ तसंच, पुनरुत्थान झालेल्या काही विश्वासू स्त्रियांना तुम्ही कोणते प्रश्न विचारू शकता याचाही विचार करा. उदाहरणार्थ, “रूथ, तुला यहोवाची उपासना करण्याची प्रेरणा कशामुळं मिळाली?” “अबीगईल, तू दाविदाला मदत केली ही गोष्ट नाबालाला सांगायला तुला भीती वाटली का?” “एस्तेर, बायबलमधली मर्दखय आणि तुझ्याविषयीचा अहवाल संपल्यावर पुढं काय झालं?”
१३. (क) पुनरुत्थान झालेले विश्वासू जन कदाचित तुम्हाला कोणते प्रश्न विचारतील? (ख) प्राचीन काळातील स्त्री-पुरुषांना भेटण्याविषयी तुम्हाला कसं वाटतं?
१३ अर्थात, ते विश्वासू स्त्री-पुरुषसुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न विचारायला उत्सुक असतील. या शेवटल्या दिवसांविषयी आणि यहोवानं या कठीण काळात आपल्या लोकांना कसं आशीर्वादित केलं याविषयी त्यांना सांगणं खरंच किती रोमांचक असेल! देवानं दिलेलं प्रत्येक अभिवचन कसं पूर्ण झालं हे ऐकून ते नक्कीच भारावून जातील. येणाऱ्या त्या नवीन जगात, बायबलमध्ये उल्लेख केलेल्या विश्वासू लोकांविषयी आपल्याला कल्पना करावी लागणार नाही. कारण नंदनवनात ते प्रत्यक्ष आपल्यासोबत असतील! म्हणूनच, आज होता होईल तितकं त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करत राहा. आणि येणाऱ्या भविष्यात, तुमच्या या जिवाभावाच्या मित्रमैत्रिणींसोबत सर्वकाळ यहोवाची उपासना करण्याचा आनंद तुम्हाला लाभो!