धडा ३५
आपण चांगले निर्णय कसे घेऊ शकतो?
आपल्या सगळ्यांनाच जीवनात निर्णय घ्यावे लागतात. त्यांपैकी बऱ्याच निर्णयांमुळे आपलं जीवन पूर्णपणे बदलू शकतं आणि यहोवासोबतच्या आपल्या मैत्रीवरही परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ कुठे राहायचं, पोटापाण्यासाठी काय काम करायचं, किंवा लग्न करायचं की नाही याबद्दल कदाचित आपल्याला निर्णय घ्यावे लागू शकतात. आपण चांगले निर्णय घेतो तेव्हा आपण जीवनात समाधानी राहू शकतो आणि यामुळे यहोवालाही आनंद होतो.
१. चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्ही बायबलचा उपयोग कसा करू शकता?
तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. आणि यहोवा त्याबद्दल काय विचार करतो हे जाणून घेण्यासाठी बायबलचा खोलवर अभ्यास करा. (नीतिवचनं २:३-६ वाचा.) काही गोष्टींच्या बाबतीत यहोवाने बायबलमध्ये स्पष्ट आज्ञा दिली आहे. जर तसं असेल, तर त्या आज्ञेप्रमाणे वागणं हाच सगळ्यात चांगला निर्णय ठरेल.
पण जर त्याबद्दल बायबलमध्ये कोणतीही स्पष्ट आज्ञा नसेल तर मग तुम्ही काय कराल? अशा वेळीही ‘ज्या मार्गाने तुम्ही चाललं पाहिजे तो मार्ग’ यहोवा तुम्हाला नक्की दाखवेल. (यशया ४८:१७) तो हे कसं करेल? बायबलमधल्या तत्त्वांद्वारे. ही तत्त्वं म्हणजे अशी सत्यं, ज्यांवरून आपल्याला देवाचे विचार आणि त्याच्या भावना कळतात. सहसा बायबलमधून आपण जेव्हा एखादा अहवाल वाचतो, तेव्हा देवाला एखाद्या गोष्टीबद्दल कसं वाटतं हे आपल्याला कळतं. यहोवा देवाला नेमकं कसं वाटतं हे जेव्हा आपण चांगल्या प्रकारे समजून घेतो, तेव्हा आपण असे निर्णय घेऊ शकतो ज्यांमुळे त्याला आनंद होईल.
२. निर्णय घेण्याआधी तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?
बायबल म्हणतं, “शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.” (नीतिवचनं १४:१५) याचा अर्थ, कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्यासमोर असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. प्रत्येक पर्यायाचा विचार करताना स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘बायबलची कोणती तत्त्वं या परिस्थितीला लागू होतात? हा पर्याय निवडल्यामुळे माझं मन मला खाणार तर नाही ना? माझ्या निर्णयाचा दुसऱ्यांवर काय परिणाम होईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यामुळे यहोवाला आनंद होईल का?’—अनुवाद ३२:२९.
आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगण्याचा अधिकार यहोवाला आहे. जेव्हा आपण यहोवाचे नियम आणि तत्त्वं चांगल्या प्रकारे समजून घेतो, आणि त्यांप्रमाणे वागायचा निश्चय करतो, तेव्हा आपण आपल्या विवेकाला एक प्रकारे शिकवत असतो. विवेक म्हणजे, चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखण्याची क्षमता. (रोमकर २:१४, १५) यहोवाच्या तत्त्वांप्रमाणे प्रशिक्षित केलेला विवेक आपल्याला चांगले निर्णय घ्यायला मदत करेल.
आणखी जाणून घेऊ या
निर्णय घेताना बायबलमधली तत्त्वं आणि आपला विवेक आपल्याला कशी मदत करू शकतात, याकडे आता आपण लक्ष देऊ या.
३. बायबलचं मार्गदर्शन स्वीकारा
निर्णय घेताना बायबलची तत्त्वं आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन देऊ शकतात? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
-
यहोवाने आपल्याला कोणती मौल्यवान देणगी दिली आहे?
-
यहोवाने आपल्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य का दिलंय?
-
चांगले निर्णय घेण्यासाठी यहोवाने आपल्याला कोणती मदत पुरवली आहे?
बायबलमधलं एक तत्त्व पाहण्यासाठी इफिसकर ५:१५, १६ वाचा. वचनात आपण वाचलं, की आपण आपल्या “वेळेचा चांगला उपयोग” केला पाहिजे. असं केल्यामुळे, खाली दिलेल्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कशी मदत होईल:
-
बायबल नियमितपणे वाचण्यासाठी?
-
कुटुंबात पती-पत्नी, आईवडील किंवा मुलं या नात्याने आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी?
-
मंडळीच्या सभांना हजर राहण्यासाठी?
४. चांगले निर्णय घेण्यासाठी विवेकाला प्रशिक्षित करा
एखाद्या विषयावर बायबलमध्ये जर स्पष्ट आज्ञा दिली असेल तर निर्णय घेणं सोपं वाटू शकतं. पण स्पष्ट आज्ञा नसेल तर काय? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
-
व्हिडिओमध्ये बहिणीने तिच्या विवेकाला चांगल्यावाइटात फरक करायला शिकवण्यासाठी आणि यहोवाला आवडेल असा निर्णय घेण्यासाठी कायकाय केलं?
आपण दुसऱ्यांना आपल्यासाठी निर्णय घ्यायला का सांगू नये? इब्री लोकांना ५:१४ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
कधीकधी दुसऱ्यांना आपल्यासाठी निर्णय घ्यायला सांगणं सोपं वाटू शकतं. पण कोणता फरक करायला शिकून घेतल्यामुळे आपण स्वतः चांगले निर्णय घेऊ शकतो?
-
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आपल्या विवेकाला चांगल्या-वाइटात फरक करायला शिकवण्यासाठी आणि चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्याला कोणती मदत उपलब्ध आहे?
५. दुसऱ्यांच्या विवेकाचाही विचार करा
सगळ्यांचेच निर्णय सारखे नसतात. निर्णयांच्या बाबतीत आपण दुसऱ्यांच्या विवेकाचाही विचार करतो हे आपण कसं दाखवू शकतो? दोन परिस्थितींचा विचार करा:
पहिली परिस्थिती: एका बहिणीला मेकअप करायला आवडतं. ती अशा एका ठिकाणी राहायला जाते, जिथल्या मंडळीत बहिणींना मेकअप केलेला आवडत नाही.
रोमकर १५:१ आणि १ करिंथकर १०:२३, २४ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
या वचनांप्रमाणे, ती बहीण कदाचित काय ठरवेल? एखादी गोष्ट तुमच्या विवेकाप्रमाणे कदाचित तुम्हाला चुकीची वाटत नसेल. पण जर तुम्ही अशा व्यक्तीसोबत असाल, जिला तीच गोष्ट खटकत असेल, तर तुम्ही काय कराल?
दुसरी परिस्थिती: बायबलनुसार, प्रमाणात दारू पिणं चुकीचं नाही हे एका भावाला माहीत आहे. पण तरी तो स्वतः कधीच पीत नाही. जेव्हा तो एका लग्नाच्या रिसेप्शनला जातो, तेव्हा तिथे त्याला मंडळीतले काही भाऊ ड्रिंक्स घेताना दिसतात.
उपदेशक ७:१६ आणि रोमकर १४:१, १० वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
या वचनांप्रमाणे, तो भाऊ कदाचित काय ठरवेल? अमुक एक गोष्ट करणं तुमच्या विवेकाप्रमाणे कदाचित तुम्हाला चुकीचं वाटत असेल. पण जर तीच गोष्ट तुम्ही दुसऱ्यांना करताना पाहिली, तर तुम्ही काय कराल?
चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलू शकता?
१. यहोवाला प्रार्थना करा. योग्य निर्णय घेण्यासाठी त्याला मदत मागा.—याकोब १:५.
२. संशोधन करा. बायबल आणि बायबल आधारित साहित्यांमध्ये तुमच्या परिस्थितीला लागू होणारी तत्त्वं शोधा. तुम्ही अनुभवी भाऊ-बहिणींचाही सल्ला घेऊ शकता.
३. परिणामांचा विचार करा. तुमच्या निर्णयामुळे तुमच्या आणि इतरांच्या विवेकावर काय परिणाम होईल हे लक्षात घ्या.
काही जण म्हणतात: “मला जे पाहिजे ते मी करेन, दुसऱ्यांशी मला काय घेणं-देणं?”
-
देवाला काय वाटतं यासोबतच, इतरांना काय वाटतं याचाही आपण विचार का केला पाहिजे?
थोडक्यात
चांगले निर्णय घेण्यासाठी, यहोवाला एखाद्या गोष्टीबद्दल कसं वाटतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तसंच, आपल्या निर्णयामुळे दुसऱ्यांना फायदा होईल की त्यांचं नुकसान होईल, याचाही आपण विचार केला पाहिजे.
उजळणी
-
यहोवाला ज्यांमुळे आनंद होईल असे निर्णय तुम्ही कसे घेऊ शकता?
-
चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या विवेकाला कसं प्रशिक्षित करू शकता?
-
आपण दुसऱ्यांच्या विवेकाचाही विचार करतो हे आपण कसं दाखवू शकतो?
हेसुद्धा पाहा
यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत व्हावं म्हणून तुम्ही काय करू शकता?
“देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या” (टेहळणी बुरूज, १५ एप्रिल, २०११)
यहोवा आपल्याला सल्ला कसा देतो हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्या.
एक कठीण निर्णय घेताना एका माणसाला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली ते पाहा.
एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्ट आज्ञा नसते, तेव्हासुद्धा आपण यहोवाचं मन कसं आनंदित करू शकतो हे जाणून घ्या.
“तुम्हाला प्रत्येक वेळी बायबलमधली आज्ञा हवी का?” (टेहळणी बुरूज, १ डिसेंबर, २००३)