धडा ०५
बायबल—देवाकडून असलेलं पुस्तक
बायबल ही यहोवाने आपल्याला दिलेली एक सुंदर भेट आहे. ते ६६ लहान-लहान पुस्तकांनी मिळून बनलंय. पण कदाचित तुम्ही म्हणाल, की ‘मुळात बायबलचा लेखक कोण आहे? आणि ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?’ या धड्यात आपण या प्रश्नांची उत्तरं पाहू.
१. बायबल माणसांनी लिहिलंय, तर मग देव त्याचा लेखक आहे असं का म्हणता येईल?
बायबल एकूण ४० माणसांनी लिहिलं आणि ते लिहायला जवळजवळ १,६०० वर्षं लागली. a बायबलचे काही लेखक मेंढपाळ, काही कोळी तर काही राजे होते. तरीसुद्धा, त्यांनी लिहिलेल्या गोष्टी एकमेकांच्या विरोधात आहेत असं कुठेही दिसून येत नाही. याचं कारण म्हणजे मुळात बायबलचा लेखक देव आहे. (१ थेस्सलनीकाकर २:१३ वाचा.) बायबल लिहिणाऱ्यांनी स्वतःचे विचार लिहिले नाहीत. तर ती “माणसं देवाच्या पवित्र शक्तीच्या b मार्गदर्शनाने बोलली.” (२ पेत्र १:२१) देवाने पवित्र शक्तीद्वारे आपले विचार लिहायला त्यांना प्रेरित केलं.—२ तीमथ्य ३:१६.
२. आज कोणकोण बायबल वाचू शकतं?
देवाची इच्छा आहे, की “प्रत्येक . . . राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या” लोकांनी बायबल वाचावं आणि त्यातल्या संदेशाचा त्यांना फायदा व्हावा. (प्रकटीकरण १४:६ वाचा.) म्हणूनच, आज बायबल कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि यामुळे जगातले जवळजवळ सगळेच लोक बायबल वाचू शकतात; मग ते कुठेही राहत असोत किंवा कोणतीही भाषा बोलत असोत.
३. यहोवाने बायबलला कसं सुरक्षित ठेवलं?
बायबल अशा साहित्यांवर लिहिण्यात आलं होतं, जी जास्त काळ टिकत नाहीत. जसं की, चामडं किंवा पपायरस वनस्पतीपासून बनलेला कागद. पण बायबलचं महत्त्व ओळखणाऱ्या लोकांनी त्यातला मजकूर काळजीपूर्वक उतरवून, त्याच्या भरपूर प्रती तयार केल्या. काही राजांनी आणि धर्मपुढाऱ्यांनी बायबल नष्ट करायचा प्रयत्न केला. पण बऱ्याच लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बायबलचं रक्षण केलं. यहोवाची इच्छा आहे की सर्व मानवांना बायबलद्वारे त्याचे विचार कळावेत. त्यामुळे त्याने कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला याच्या आड येऊ दिलं नाही. म्हणूनच बायबल म्हणतं: “देवाचं वचन सर्वकाळ टिकून राहतं.”—यशया ४०:८.
आणखी जाणून घेऊ या
बायबल लिहिणाऱ्यांना देवाने कसं प्रेरित केलं, त्याने बायबल कसं सुरक्षित ठेवलं आणि सर्व लोकांना ते मिळावं म्हणून त्याने काय केलं, याबद्दल आणखी जाणून घेऊ या.
४. बायबलचा लेखक कोण आहे हे बायबल स्वतःच सांगतं
व्हिडिओ पाहा. त्यानंतर २ तीमथ्य ३:१६ वाचा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
-
बायबल माणसांनी लिहिलंय, तर मग त्याला देवाचं वचन का म्हटलंय?
-
देव माणसांना आपले विचार कळवू शकतो, हे तुम्हाला पटण्यासारखं वाटतं का?
५. बायबल नष्ट करायचे प्रयत्न होऊनही ते टिकून राहिलं
बायबल देवाकडून असल्यामुळेच, आजपर्यंत त्याने ते सुरक्षित ठेवलं. सत्तेवर असलेल्या बऱ्याच लोकांनी बायबल नष्ट करायचा प्रयत्न केला. धर्मपुढाऱ्यांनीही ते लोकांच्या हाती लागू नये म्हणून प्रयत्न केले. पण कित्येकांनी बायबलला सुरक्षित ठेवण्यासाठी जीव धोक्यात घातला. त्यांना विरोध झाला, ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या, पण तरी ते घाबरले नाहीत. अशाच एका माणसाबद्दल जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
-
बायबल सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांनी कायकाय सहन केलंय हे पाहिल्यावर ते वाचायची तुमची उत्सुकता वाढली का? आणि तुम्ही असं का म्हणता?
स्तोत्र ११९:९७ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
बायबलचं भाषांतर करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बऱ्याच जणांनी आपला जीव धोक्यात का घातला?
६. सगळ्या लोकांसाठी असलेलं पुस्तक
बायबल हे आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रमाणात भाषांतर आणि वितरण झालेलं पुस्तक आहे. प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
बायबलचं इतक्या मोठ्या प्रमाणात भाषांतर आणि वितरण व्हावं असं देवाला का वाटतं?
-
बायबलबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली?
जगातल्या लोकांपैकी जवळजवळ
१००%
लोक त्यांना समजणाऱ्या भाषेत बायबल वाचू शकतात
बायबल किंवा त्याचा काही भाग
३,०००
पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे
५,००,००,००,०००
आजपर्यंत तयार करण्यात आलेल्या बायबलच्या प्रतींची संख्या;
दुसऱ्या कोणत्याही पुस्तकाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे
काही जण म्हणतात: “बायबल हे खूप जुन्या काळातलं पुस्तक आहे, आणि ते माणसांनीच लिहिलंय.”
-
तुम्हाला काय वाटतं?
-
बायबल देवाचं वचन आहे हे कशावरून दिसून येतं?
थोडक्यात
बायबल देवाचं वचन आहे आणि म्हणूनच त्याने ते जगातल्या सगळ्या लोकांना उपलब्ध करून दिलंय.
उजळणी
-
देवाने मानवांना बायबल लिहायला कसं प्रेरित केलं?
-
या धड्यात आपण बायबलबद्दल जे पाहिलं, त्यातली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली?
-
देवाने त्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कायकाय केलंय, हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटलं?
हेसुद्धा पाहा
मूळ हस्तलिखितांपासून आजच्या काळातल्या भाषांतरांपर्यंत बायबलचा संपूर्ण इतिहास वाचा.
बायबल नष्ट करण्यासाठी झालेल्या तीन प्रयत्नांबद्दल आणि त्यांतून ते कसं सुरक्षित राहिलं याबद्दल जाणून घ्या.
बायबलचं भाषांतर करण्यासाठी काहींनी कोणत्या समस्यांचा सामना केला ते पाहा.
बायबलच्या हजारो प्रती तयार करून त्याचं कित्येक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं. पण त्याचा मूळ मजकूर आपल्यापर्यंत अचूकपणे पोहोचला, असं आपण खातरीने का म्हणू शकतो?
“बायबलच्या मूळ मजकुरात फेरफार झाले आहेत का?” (वेबसाईटवरचा लेख)
a इसवी सन पूर्व १५१३ पासून जवळजवळ इसवी सन ९८ पर्यंत.
b पवित्र शक्ती म्हणजे देवाची क्रियाशील शक्ती. याबद्दल आपण ७ व्या धड्यात पाहणार आहोत.