व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धैर्याने देवाचे वचन बोलत राहा

धैर्याने देवाचे वचन बोलत राहा

अध्याय २२

धैर्याने देवाचे वचन बोलत राहा

१. (अ) इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्ट पासून येशूच्या शिष्यांनी कोणत्या सुवार्तेची घोषणा करण्यास सुरवात केली, पण यहुद्यांच्या अधिकाऱ्‍यांची व वडील मंडळीची प्रतिक्रिया काय होती? (ब) या बाबतीत आपण स्वत:ला कोणते प्रश्‍न विचारु शकतो?

 मानवी इतिहासाच्या ४,००० वर्षांहूनही जास्त काळातल्या सर्वात महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. देवाच्या स्वत:च्या पुत्राचा, येशू ख्रिस्ताचा, सर्व पृथ्वीचा भावी राजा म्हणून अभिषेक झाला होता. धार्मिक शत्रूंच्या चिथावणीने येशूला ठार करण्यात आले असले तरी, यहोवाने त्याच्या पुत्राला मृतातून उठविले होते. सार्वकालिक जीवनाला अनुलक्षून, त्याच्या मार्फत तारण शक्य होते. परंतु येशूच्या विश्‍वासू अनुयायांनी या सुवार्तेची जाहीर घोषणा केल्यावर प्रखर विरोध सुरु झाला. प्रथम, प्रेषितांमधल्या दोघांना तुरुंगात टाकण्यात आले, आणि मग सर्वांना. त्यांना फटके मारुन, येशूच्या नावाने बोलणे बंद करण्याचा आदेश दिला गेला. (प्रे. कृत्ये ४:१-३, १७; ५:१७, १८, ४०) त्यांनी काय करावे? तुम्ही काय केले असते? तुम्ही धैर्याने साक्ष देत राहिला असता का?

२. (अ) आपल्या काळात त्याहूनही अधिक आश्‍चर्यजनक अशा कोणत्या बातमीची घोषणा करण्याची गरज आहे? (ब) ते करण्याची जबाबदारी कोणावर आहे?

इ.स. १९१४ साली, संपूर्ण विश्‍वात महत्त्वाची अशी त्याहूनही अधिक आश्‍चर्यजनक घटना घडली. येशू ख्रिस्ताच्या हाती देवाचे राज्य स्वर्गात खरोखरच स्थापन झाले. त्यानंतर, सैतान व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवर टाकण्यात आले. (प्रकटी. १२:१-५, ७-१२) सध्याच्या या दुष्ट व्यवस्थेच्या शेवटल्या काळाची सुरवात झाली. देव, १९१४ मधल्या घटना पाहिलेली पिढी मरण पावण्यापूर्वी या संपूर्ण सैतानी व्यवस्थेचा चुराडा करील. (मत्त. २४:३४) त्यातून वाचलेल्यांच्या पुढे सार्वकालिक जीवनाची आशा असेल. देवाच्या मूळ उद्देशाच्या पूर्ततेत सर्व पृथ्वीचे नंदनवनात रूपांतर होईल. ही सुवार्ता तुम्ही या आधीच स्वीकारलेली असल्यास, ती इतरांना सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. (मत्त. २४:१४) तुम्ही कशा प्रतिसादाची तयारी ठेवावी?

३. (अ) राज्याच्या संदेशाला लोक कसा प्रतिसाद देतात? (ब) तेव्हा आपण कोणत्या प्रश्‍नाला तोंड दिले पाहिजे?

देवराज्याचा प्रचारक म्हणून काही लोक तुमचे हार्दिक स्वागत करतील. पण बहुसंख्य अगदी उदासीन असतील. (मत्त. २४:३७-३९) इतर तुमची हेटाळणी करतील किंवा तुम्हाला कडवा विरोध करतील. तुमच्या स्वत:च्या नातेवाईकांकडून विरोध होऊ शकेल असा इशारा येशूने दिला. (लूक २१:१६-१९) तुमच्या कामाच्या जागी वा शाळेतही त्याला तोंड द्यावे लागेल. जगाच्या अनेक भागात यहोवाच्या साक्षीदारांवर शासनाची अन्याय्य बंदीही आहे. अशी एखादी अथवा अशा सर्व प्रकारची परिस्थिती समोर उभी ठाकल्यास, तुम्ही धैर्याने देवाचे वचन बोलत राहाल का?

४. वैयक्‍तिक निर्धारामुळे आपण देवाची सेवा करत राहू अशी खात्री बाळगता येते का?

देवाचे धैर्यवान सेवक व्हावयाची तुमची इच्छा आहे यात काही शंका नाही. असे असले तरी, आपल्याला कोणीही मागे फिरवू शकणार नाही असे वाटणारे काही, राज्य प्रचारकांमधून गळाले आहेत. या उलट, इतर स्वभावाने काही बुजरे लोकही—चिकाटीने देवाचे आवेशी सेवक बनून राहिले आहेत. तुम्ही, “विश्‍वासात स्थिर” राहणाऱ्‍यातले असल्याचे कसे सिध्द करु शकाल?—१ करिंथ. १६:१३.

आपल्या स्वत:च्या बळावर न विसंबणे

५. (अ) आपण देवाचे विश्‍वासू सेवक ठरण्यासाठी एक मूलभूत अट कोणती? (ब) सभा इतक्या महत्त्वाच्या का आहेत?

देवाचा विश्‍वासू सेवक बनण्यात अनेक मुद्दे अंतर्भूत आहेत. पण यहोवा आणि त्याच्या तरतुदींवर विसंबून राहणे, हा त्या सर्वांचा पाया आहे. असा भरवसा आपण कसा दाखवतो? मंडळीच्या सभांना उपस्थित राहणे, हा एक मार्ग होय. त्यांची उपेक्षा न करण्याचा आग्रह शास्त्रवचने आपल्याला करतात. (इब्री. १०:२३-२५) लोकांच्या औदासिन्याला वा छळाला तोंड देऊनही, उपासक बांधवांबरोबर सभांना नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले आहेत, ते यहोवाचे विश्‍वासू साक्षीदार राहिले आहेत. त्या सभांमध्ये नुसते नवीन गोष्टींचे कुतूहल आपल्याला आकर्षित करत नाही तर शास्त्रवचनाबाबत आपले ज्ञान वाढविले जाते. (पडताळा प्रे. कृत्ये १७:२१.) सर्वसामान्य सत्यांविषयी आपली कदर वाढते, आणि त्यांचा उपयोग करण्याच्या मार्गांबद्दल आपली जाणीव प्रखर होते. येशूने घालून दिलेले उदाहरण आपल्या मनावर व हृदयावर खोलवर ठसते. (इफिस. ४:२०-२४) उपासनेच्या ऐक्यामध्ये आपण आपल्या ख्रिस्ती बंधूंच्या जवळ ओढलो जातो, व देवाची इच्छा करत राहण्यासाठी व्यक्‍तिश: बळकट होतो. यहोवाचा आत्मा मंडळीमार्फत मार्गदर्शन करतो, आणि येशूच्या नावाने आपण एकत्र जमलेले असताना, त्या आत्म्याच्या योगे तो (येशू) आपल्यामध्ये असतो.—प्रकटी. ३:६; मत्त. १८:२०.

६. यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी असलेल्या ठिकाणी, सभांच्या बाबतीत काय केले जाते?

सर्व सभांना तुम्ही नियमितपणे उपस्थित असता का, आणि ज्या गोष्टींची चर्चा तुम्ही ऐकता त्या स्वत:ला लागू करता का? काही वेळा, बंदी असताना, खाजगी घरांमध्ये लहान गटाने सभा भरवण्याची गरज पडली आहे. जागा व वेळ बदलू शकतात. काही सभा रात्री उशीरा घेतल्याने, त्या सोइस्कर असतीलच असे नाही. परंतु वैयक्‍तिक गैरसोय व धोका असला तरी, प्रत्येक सभेला उपस्थित राहण्यासाठी विश्‍वासू बंधू व भगिनी निकराचा प्रयत्न करतात.

७. (अ) यहोवावरचा भरवसा आपण आणखी कोणत्या रीतीने दाखवतो? (ब) त्यामुळे धैर्याने बोलत राहण्यास आपल्याला कशी मदत होते?

प्रार्थनामध्ये नेमाने त्याच्याकडे वळूनही—नुसता औपचारिक परिपाठ म्हणून नव्हे, तर आपल्याला देवाच्या मदतीची गरज असते हे मन:पूर्वक पटल्यामुळे—यहोवावरचा भरवसा दाखवला जातो. तुम्ही असे करता का? पृथ्वीवरच्या त्याच्या सेवाकार्यात येशूने वारंवार प्रार्थना केली. (लूक ३:२१; ६:१२, १३; ९:१८, २८; ११:१; २२:३९-४४) आणि वधस्तंभावर खिळला जाण्याच्या आदल्या रात्री त्याने आपल्या शिष्यांना आग्रहाने सांगितले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मार्क १४:३८) राज्याच्या संदेशाला उदासीन प्रतिसाद मिळाल्यास, आपल्या सेवाकार्यात शिथिल होण्याचा मोह पडणे शक्य आहे. लोकांनी आपला उपहास केल्यास किंवा अधिक जास्त छळ झाल्यास, तो टाळण्यासाठी गप्प बसण्याचा मोह आपल्याला होण्याची शक्यता आहे. पण धैर्याने बोलत राहण्यास आपल्याला मदत व्हावी म्हणून देवाच्या आत्म्यासाठी आपण कळकळीची प्रार्थना केल्यास, त्या मोहात पडण्यापासून आपले रक्षण होईल.—लूक ११:१३; इफिस. ६:१८-२०.

धैर्यवान साक्षीची नोंद

८. (अ) प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातल्या नोंदीमध्ये आपल्याला विशेष आस्था का आहे? (ब) या माहितीचा फायदा आपल्याला कसा होतो यावर भर देत, या परिच्छेदाच्या शेवटी दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या.

प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील नोंदीमध्ये आपणा सर्वांना विशेष आस्था आहे. आपल्यासारख्या भावना असलेल्या प्रेषितांनी व इतर शिष्यांनी अडचणींवर कशी मात केली व ते यहोवाचे धैर्यवान आणि विश्‍वासू साक्षीदार कसे ठरले, या गोष्टी ते सांगते. खालील प्रश्‍न व सोबत दिलेल्या शास्त्रवचनांच्या मदतीने आपण त्या नोंदीच्या एका भागाचे परिक्षण करु या. ते करत असताना, तुम्ही वाचत असलेल्या गोष्टीपासून वैयक्‍तिकरित्या स्वत:ला फायदा कसा होईल याचा विचार करा.

 ते प्रेषित उच्च-शिक्षित होते का? काहीही झाले तरी ते जात्या निडर होते का? (प्रे. कृत्ये ४:१३; योहा. १८:१७, २५-२७; २०:१९)

 काही आठवड्यांपूर्वी प्रत्यक्ष देवाच्या पुत्राला ज्यांनी दोषी ठरवले होते, त्या यहुदी न्यायसभेपुढे पेत्र कशामुळे धैर्याने बोलू शकला? (प्रे. कृत्ये ४:८; मत्त. १०:१९, २०)

 त्यांना न्यायसभेपुढे आणले जाण्यापूर्वीच्या काही आठवड्यामध्ये, प्रेषित काय करत होते? (प्रे. कृत्ये १:१४; २:१, ४२.)

 येशूच्या नावाने प्रचार करणे बंद करण्याची आज्ञा अधिकाऱ्‍यांनी दिली तेव्हा, पेत्र व योहानाने काय उत्तर दिले? (प्रे. कृत्ये ४:१९, २०)

 सुटका झाल्यावर, मदतीसाठी त्यांनी पुन्हा कोणाकडे पाहिले? छळ थांबवण्यासाठी त्यांनी त्याच्या विनवण्या केल्या की, काय केले? (प्रे. कृत्ये ४:२४-३१)

 विरोधकांनी प्रचाराचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा, यहोवाने कशाच्यायोगे मदत केली? (प्रे. कृत्ये ५:१७-२०, ३३-४०)

 आपल्याला कोणत्या कारणासाठी सोडविले गेले आहे, हे त्यांना कळले असल्याचे प्रेषितांनी कसे दाखवले? (प्रे. कृत्ये ५:२१, ४१, ४२)

 छळाच्या प्रखरतेमुळे अनेक शिष्य पांगले तरी, ते काय करत राहिले? (प्रे. कृत्ये ८:३, ४; ११:१९-२१)

९. (अ) सुरुवातीच्या शिष्यांच्या सेवाकार्यामुळे कोणते रोमहर्षक परिणाम प्राप्त झाले? (ब) त्यात आपण कसे गोवलेले आहोत?

सुवार्तेच्या संबंधातले त्यांचे कार्य व्यर्थ नव्हते. इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टला सुमारे ३,००० शिष्यांना बाप्तिस्मा दिला गेला होता. “विश्‍वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्‍यांचा समुदाय प्रभूला मिळत गेला.” (प्रे. कृत्ये २:४१; ४:४; ५:१४) कालांतराने असे कळले की, अतिशय छळ करणाऱ्‍यांपैकी, तार्सचा शौल हा देखील ख्रिस्ती झाला होता व धैर्याने सत्याची साक्ष देत होता. तोच, प्रेषित पौल या नावाने ओळखला जाऊ लागला. (गलती. १:२२-२४) पहिल्या शतकात सुरु झालेले हे काम थांबलेले नाही. या “शेवटल्या काळी” त्याने गती घेतली असून, जगाच्या सर्व भागात ते पसरले आहे. त्यात सहभागी होण्याचा विशेषाधिकार आपल्याला लाभला आहे. आणि तसे करताना, आपल्या आधी ज्यांनी सेवा केली, अशा विश्‍वासू साक्षीदारांनी घालून दिलेल्या उदाहरणापासून आपण शिकू शकतो.

१०. (अ) साक्ष देण्यासाठी पौलाने कोणत्या संधीचा फायदा घेतला? (ब) तुम्ही कोणत्या मार्गांनी इतरांना राज्याचा संदेश देता?

१० पौलाला येशू ख्रिस्ताबद्दलचे सत्य समजल्यावर, त्याने चालढकल केली नाही. “त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे.” (प्रे. कृत्ये ९:२०) देवाने त्याच्यावर केलेल्या अपात्रित कृपेची त्याने कदर केली. तसेच त्याला मिळालेल्या सुवार्तेची गरज सर्वांना असल्याचे त्याच्या ध्यानात आले. तो यहुदी असल्याने, त्याच्या काळातील रिवाजानुसार, सिनेगॉग म्हटल्या जाणाऱ्‍या यहूद्यांच्या सार्वजनिक सभास्थानामध्ये जाऊन त्याने साक्ष दिली. त्याशिवाय त्याने घरोघरी प्रचार व बाजारात लोकांशी युक्‍तिवाद केला. आणि सुवार्तेला प्रसिद्धी देण्यासाठी नव्या मुलखात जाण्याची त्याची तयारी होती.—प्रे. कृत्ये १७:१७; २०:२०; रोम. १५:२३, २४.

११. (अ) साक्ष देण्यात धैर्यवान असण्याबरोबर तो चाणाक्षही होता, हे पौलाने कसे दाखवले? (ब) नातेवाईकांना, सहकाऱ्‍यांना किंवा शाळेतील सोबत्यांना साक्ष देताना आपण हा गुण कसा प्रदर्शित करु शकू?

११ पौल धैर्यवान होता, शिवाय चाणाक्षही होता. आपण देखील तसेच असले पाहिजे. देवाने त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या वचनांच्या आधारे त्याने यहुद्यांची विनवणी केली. ग्रीक लोक ज्या गोष्टींशी परिचित होते त्यांच्या आधारावर, तो त्यांच्याशी बोलला. काही वेळा, साक्ष देण्याचे माध्यम म्हणून त्याने, सत्य शिकण्याच्या स्वत:च्या अनुभवाचा उपयोग केला. त्याने खुलासा केल्याप्रमाणे: “मी सर्व काही सुवार्तेकरिता करितो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.”—१ करिंथ. ९:२०-२३; प्रे. कृत्ये २२:३-२१.

१२. (अ) धैर्यवान असला तरी, विरोधकांशी सतत झुंजणे टाळण्यासाठी पौलाने काय केले? (ब) आपण त्या उदाहरणाचे सुज्ञ अनुसरण कधी करु शकू व का? (क) धैर्याने बोलत राहण्यासाठी शक्‍ती कोठून मिळते?

१२ सुवार्तेला होणाऱ्‍या विरोधामुळे, सत्याच्या शत्रूंशी सतत झुंजण्यापेक्षा, इतरत्र प्रचार करणे अथवा तात्पुरते दुसऱ्‍या प्रदेशात जाणे योग्य वाटल्यावर पौलाने तसे केले. (प्रे. कृत्ये १४:५-७; १८:५-७; रोम. १२:१८) परंतु त्याला सुवार्तेची कधीही लाज वाटली नाही. (रोम. १:१६) विरोधकांकडून झालेली अपमानजनक, तशीच हिंसक वागणूक पौलाला कटु वाटली तरी, प्रचार करत राहण्यासाठी लागणारे “धैर्य आपल्या देवाकडून [त्याला] मिळाले.” कठीण परिस्थितीत सापडला असतानाही तो म्हणाला: “प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी . . . म्हणून त्याने मला शक्‍ती दिली.” (१ थेस्सलनी. २:२; २ तीम. ४:१७) ख्रिस्ती मंडळीच्या शिरोभागी असलेला येशू ख्रिस्त, आपल्या काळात होणाऱ्‍या ज्या कामाचे भाकीत त्याने केले होते, ते करण्यासाठी जरुर ती शक्‍ती सातत्याने पुरवत आहे.—मार्क १३:१०.

१३. ख्रिस्ती धैर्य कशाने दिसून येते व ते कशावर आधारित आहे?

१३ येशू ख्रिस्त आणि पहिल्या शतकातल्या देवाच्या इतर विश्‍वासू सेवकांप्रमाणे, देवाचे वचन धैर्याने सांगत राहण्यास आपल्यापाशी सबळ कारणे आहेत. आपले वागणे निष्ठुर वा उद्धट असावे असा याचा अर्थ नव्हे. अविचारी होण्याची अथवा ज्यांना संदेश नको आहे त्यांच्यावर तो लादण्याची मुळीच गरज नाही. मात्र लोकांच्या उदासीनतेमुळे आपण हताश होत नाही, वा विरोधामुळे घाबरुन गप्प होत नाही. सर्व जगावर शासन करण्याचा रास्त हक्क असलेले राज्य म्हणून देवाच्या राज्याकडे, येशूप्रमाणे आपणही इशारा करतो. विश्‍वाच्या सार्वभौम सत्ताधीशाचे, यहोवाचे प्रतिनिधी असल्यामुळे आणि आपण घोषणा करत असलेला संदेश आपला नसून त्याचा असल्याने, आपण विश्‍वासाने बोलतो.—फिलिप्पै. १:२७, २८; १ थेस्सलनी. २:१३.

पुनरावलोकन चर्चा

• शक्यतो प्रत्येकाला राज्याचा संदेश सांगणे महत्त्वाचे का आहे? परंतु कशा प्रतिक्रियांची तयारी ठेवावी?

• यहोवाची सेवा करण्यासाठी स्वत:च्याच बळावर विसंबून नसल्याचे आपण कसे दाखवू?

• प्रेषितांची कृत्ये या पुस्तकावरुन आपण कोणते बहुमोल धडे शिकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]