देवाने दुष्टाईला दिलेल्या अनुमतीतून आपल्याला मिळणारी शिकवण
अध्याय ७
देवाने दुष्टाईला दिलेल्या अनुमतीतून आपल्याला मिळणारी शिकवण
१. (अ) जर यहोवाने एदेन बागेमध्ये बंडखोरांना तात्काळ मृत्युदंड दिला असता तर त्याचा आपल्यावर कसा परिणाम झाला असता? (ब) त्याऐवजी यहोवाने आपल्यासाठी कोणत्या प्रेमळ तरतुदी केल्या आहेत?
जीवनात आपल्या वाट्याला कितीही कठीण प्रसंग आले तरी आपला जन्म होण्यात देव अन्यायी आहे असे म्हणता येणार नाही. त्याने पहिल्या मानवांना पूर्णत्व दिले होते. आणि घर म्हणून नंदनवन दिले. त्यांनी बंड केल्यावर तात्काळ त्याने त्यांना मृत्यूदंड दिला असता तर आज आपल्याला माहीत असलेला, रोग, दारिद्य्र आणि गुन्हे यांनी युक्त असा मानववंश अस्तित्वातच नसता. परंतु, वारशाने त्यांना अपूर्णता मिळणार असली तरी यहोवाने दयाळूपणे, आदाम व हव्वा यांना मरण्यापूर्वी मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली. ख्रिस्तामार्फत देवाने, विश्वास ठेवणाऱ्या आदामाच्या वंशजांना त्याने गमावलेली ही गोष्ट—म्हणजे जीवनाचा आनंद सर्वतोपरी उपभोगता येईल अशा वातावरणातील अनंत जीवन—प्राप्त होण्याची तरतूद केली.—अनु. ३२:४, ५; योहा. १०:१०.
२. या सर्व गोष्टी काय फक्त आपल्या उद्धारासाठी केल्या गेल्या?
२ व्यक्तिश: आपल्याला याचे अगणित फायदे आहेत. परंतु आपल्या व्यक्तिगत उद्धारापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाची गोष्ट त्यात गोवली असल्याचे पवित्र शास्त्रातील अहवालावरून आपल्याला समजते.
त्याच्या महान नावासाठी
३. पृथ्वी व मानवजातीविषयी यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेसंबंधी काय धोक्यात होते?
३ पृथ्वी आणि मानवजातीबद्दल यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेमध्ये, त्याचे नाव, विश्वाचा सार्वभौम सत्ताधीश व सत्याचा देव म्हणून त्याचा लौकिक हे गोवलेले होते. यहोवाच्या पदामुळे, सर्व विश्वाच्या शांती व हितासाठी त्याच्या नावाला त्याच्या पात्रतेनुसार संपूर्ण आदर दिला गेला पाहिजे आणि सर्वांनी त्याच्या आज्ञेत राहिले पाहिजे.
४. त्या उद्देशात वस्तुत: कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता?
४ आदाम व हव्वेला घडवल्यावर त्याने त्यांना काम नेमून दिले. नंदनवनाच्या सीमेचा विस्तार करुन सबंध पृथ्वीला सत्तेखाली आणणे एवढाच नव्हे तर आदाम व हव्वा या प्रथम पुरुष व स्त्रीच्या वंशजांनी ती वसवावी असा त्याचा उद्देश असल्याचे त्याने स्पष्ट केले. (उत्प. १:२८) त्यांच्या पापामुळे तो उद्देश असफल होणार होता का व परिणामी, देवाच्या नावावर ठपका येणार होता का?
५. (अ) उत्पत्ती २:१७ नुसार, बऱ्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाणारा कधी मरेल? (ब) पृथ्वी वसवण्याविषयी त्याचा उद्देश न विसरता यहोवाने ते कसे पूर्ण केले?
५ अवज्ञा करुन बऱ्यावाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ आदामाने खाल्यास तो “त्या दिवशी” खचित मरेल असा इशारा यहोवाने त्याला दिला होता. (उत्प. २:१७) देवाच्या वचनानुसार आदामाने पाप केल्याच्या दिवशीच यहोवाने अपराध्यांना खुलासा मागितला आणि मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. त्या शिक्षेतून सुटका नव्हती. कायद्यानुसार, यहोवाच्या दृष्टीकोनातून आदाम व हव्वा त्याच दिवशी मेले. (पडताळा लूक २०:३७, ३८.) परंतु पृथ्वीवर मानवांच्या वसाहतीबद्दल त्याने स्वत: अगोदरच सांगितलेला उद्देश अमलात आणण्यासाठी, ते अक्षरश: मरण्यापूर्वी मुले जन्माला घालण्यास यहोवाने त्यांना परवानगी दिली. तरीही, १,००० वर्षांनी एक दिवस मानण्याच्या देवाच्या दृष्टीकोनातून, ९३०व्या वर्षी आदामाचे जीवन संपले तेव्हा ते एका “दिवसात” घडले. (उत्प. ५:३-५; पडताळा स्तोत्रसंहिता ९०:४; २ पेत्र ३:८.) अशा रीतीने शिक्षा अमलात येण्याच्या वेळेबद्दल यहोवाची सत्यता उचलून धरली गेली व आदामाच्या वंशजांनी पृथ्वी वसवण्याच्या त्याच्या उद्देशात बाधा आली नाही. पण त्याचा अर्थ असा झाला की, काही काळ पापी लोकांना जगण्याची परवानगी मिळाली.
६, ७. (अ) दुष्ट लोकांना यहोवा काही काळ का राहू देतो याबद्दल निर्गम ९:१५, १६ काय दर्शविते? (ब) फारोच्या बाबतीत यहोवाचे सामर्थ्य कसे दाखवण्यात आले व त्याचे नाव कसे प्रसिध्द करण्यात आले? (क) तेव्हा, सध्याच्या दुष्ट व्यवस्थेच्या अंताच्या वेळी काय निष्पन्न होईल?
६ मोशेच्या काळातल्या इजिप्तच्या (मिसर) राजाला संबोधून यहोवाने केलेल्या भाषणातून, दुष्ट लोकांना काही काळ जगण्याची परवानगी देवाने का दिली आहे ते अधिक स्पष्टपणे दिसून येते. फारोने इस्राएलाच्या संतानांना इजिप्त (मिसर) सोडून जाण्यापासून मनाई केली तेव्हा, यहोवाने त्याला तात्काळ मारुन टाकले नाही. आश्चर्यकारक व अनेकविध मार्गांनी यहोवाच्या बळाचे प्रदर्शन करणाऱ्या दहा पीडा त्या देशावर आल्या. सातव्या पीडेबद्दल इशारा देताना यहोवाने फारोला सांगितले की, फारो व त्याच्या लोकांना पृथ्वीवरुन तो नामशेष करु शकला असता. यहोवाने म्हटलेः “तथापि मी तुला आपले सामर्थ दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रकट व्हावे यासाठीच मी तुला राखिले आहे.”—निर्ग. ९:१५, १६.
७ यहोवाने इस्राएलांची सुटका केली तेव्हा खरोखरच त्याचे नाव दूरवर प्रसिध्द झाले. आज सुमारे ३,५०० वर्षांनंतरही त्याने केलेल्या गोष्टीचा विसर पडलेला नाही. यहोवा हे व्यक्तिगत नाव विख्यात झाले असे नव्हे तर ते नाव धारण करणाऱ्या व्यक्तीबद्दलचे सत्यही विख्यात झाले. त्यामुळे केलेले करार पाळणारा व आपल्या सेवकांच्या वतीने कृती करणारा देव म्हणून यहोवाचा लौकिक स्थापन झाला. त्याच्या सर्वसमर्थ बळामुळे त्याच्या उद्देशात कशाचीही आडकाठी येऊ शकत नाही, हे त्यामुळे सिध्द झाले. या संपूर्ण दृश्य व अदृश्य दुष्ट व्यवस्थेचा येऊ घातलेला नाश त्याहूनही अधिक प्रभावी असेल. सर्वसमर्थ बळाचे ते प्रदर्शन व त्यामुळे यहोवाच्या नावाला मिळणारे गौरव यांचा विश्वाच्या इतिहासात कधीही विसर पडणार नाही. त्याचे फायदे अनंत असतील!—यहे. ३८:२३; प्रकटी. १९:१, २.
‘अहाहा, देवाचे ज्ञान किती अगाध आहे!’
८. आणखी कोणत्या मुद्यांचा विचार करण्यास पौल आपल्याला आग्रह करतो?
८ “देवाच्या ठायी अन्याय आहे काय?” असा प्रश्न प्रेषित पौल, त्याने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित करतो व त्यानंतर देवाच्या दयेवर भर देऊन आणि यहोवाने फारोला सांगितलेल्या गोष्टीचा उल्लेख करुन तो उत्तरही देतो. तसेच, आपण कुंभाराच्या हातातल्या मातीसारखे असल्याची देखील आठवण करुन देतो. तिचा वापर जसा झाला असेल त्याबद्दल माती तक्रार करते का? पौल पुढे म्हणतो: “आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिध्द झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले. त्या आपल्याविषयी, म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिध्द केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असेल, तर काय?”—रोम. ९:१४-२४.
९. (अ) ‘नाशासाठी सिध्द केलेली क्रोधाची पात्रे’ कोण आहेत? (ब) त्यांच्या विरोधापुढे यहोवाने मोठी सहनशीलता का दाखवली आहे, आणि त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी अंतिम परिणाम चांगला कसा असेल?
९ उत्पत्ती ३:१५ मध्ये नमूद केलेले भविष्यसूचक विधान यहोवाने केल्यापासून सैतान व त्याची संतती ही ‘नाशासाठी सिध्द झालेली क्रोधाची पात्रे’ आहेत. या सर्व काळात यहोवाने सहनशीलता दाखवली आहे. दुष्ट लोकांनी त्याच्या मार्गांचा उपहास केला आहे, त्यांनी त्याच्या सेवकांचा छळ केला आणि, त्याच्या पुत्रालाही जिवे मारले आहे. परंतु यहोवाने मोठा संयम दाखवला आहे व त्यामुळे त्याच्या सेवकांना अक्षय फायदे होणार आहेत. देवाविरुध्द बंड पुकारण्याचे अनर्थकारक परिणाम पाहण्याची संधी सर्व सृष्टीला मिळाली आहे. त्या सोबतच येशूच्या मृत्युने, आज्ञाधारक मानवजातीच्या सुटकेचा व ‘सैतानाची कृत्ये नष्ट करण्याचा’ मार्ग पुरवला.—१ योहा. ३:८; इब्री. २:१४, १५.
१०. गेली १,९०० वर्षे यहोवाने दुष्ट लोकांना का वागवून घेतले आहे?
१० येशूच्या पुनरुत्थानापासून आतापर्यंत गेला १,९०० वर्षांपेक्षा अधिक काळ, ‘क्रोधाच्या पात्रां’चा विनाश थोपवून धरुन यहोवाने त्यांना आणखीन वागवून घेतले आहे. का बरे? कारण येशू ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्यात त्याचे सहकारी होणाऱ्या स्त्रीच्या संततीच्या दुय्यम भागाला तो तयार करत आहे. (गलती. ३:२९) १,४४,००० संख्येचे हे लोक, प्रेषित पौलाने उल्लेखलेली ‘दयेची पात्रे’ होत. हा वर्ग बनवण्यासाठी प्रथम यहूद्यांतील व्यर्क्तिना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सुंता झालेल्या शोमरोन्यांचा समावेश करण्यात आला व शेवटी परराष्ट्रातील लोकांचा. त्याची सेवा करण्याची बळजबरी कोणावरही न करता, पण त्याच्या प्रेमळ तरतुदींची कदर करुन प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांना मोठे आशीर्वाद देऊन यहोवाने मोठ्या सहनशीलतेने आपला हेतु साध्य करण्याची योजना केली आहे. त्या स्वर्गीय वर्गाची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे.
११. यहोवाच्या सहनशीलतेमुळे आणखी कोणत्या वर्गाला आता फायदे मिळत आहेत?
११ परंतु पृथ्वीवर राहणाऱ्यांचे काय? देवाच्या इच्छेनुसार योग्य काळी त्या राज्याचे प्रजाजन म्हणून करोडोंचे पुनरुत्थान होईल. तसेच, विशेषतः इ.स. १९३५ पासून, उद्धार करण्याच्या दृष्टीने, सर्व राष्ट्रांतून एक “मोठा लोकसमुदाय” एकत्रित करणे, यहोवाच्या सहनशीलतेमुळे शक्य झाले आहे.—प्रकटी. ७:९, १०; योहा. १०:१६.
१२. (अ) परिणामी, खुद्द यहोवाबद्दल आपल्याला काय समजले आहे? (ब) या गोष्टी यहोवाने ज्या रीतीने हाताळल्या आहेत त्यावर तुमची प्रतिक्रिया कशी आहे?
१२ या सर्व गोष्टीत कोठे अन्याय झाला आहे का? नक्कीच नाही. आपल्या हेतूला अनुसरुन इतरांवर त्याला दया दाखवता यावी म्हणून देवाने ‘क्रोधाच्या पात्रां’चा, दुष्टांचा, नाश रोखून धरल्यास कोणालाही सार्थपणे तक्रार कशी करता येईल? उलट आपण त्याचा हेतू उलगडत असलेला पाहतो तेव्हा आपल्याला खुद्द यहोवाबद्दल बरेच काही समजते. त्याचा न्याय, त्याची दया, त्याची सहनशीलता, त्याच्या बुध्दीची विविधता, अशा त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकट झालेल्या पैलूंनी आपण आश्चर्यचकित, होतो. राज्य करण्याची त्याची पध्दत सर्वोत्तम आहे याला, या वादाची यहोवाने केलेली सूज्ञ हाताळणी हा कायमचा पुरावा असेल. प्रेषित पौलासह आपणही म्हणतो: “अहाहा, देवाच्या बुध्दीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!”—रोम. ११:३३.
आपली भक्ती प्रदर्शित करण्याची संधी
१३. (अ) व्यक्तिगत क्लेश सोसतो तेव्हा आपल्याला कोणती संधी मिळते? (ब) त्याला सूज्ञपणे प्रतिक्रिया दाखवण्यास आपल्याला कशाची मदत होईल?
१३ देवाने अद्यापि दुष्टांचा नाश व पूर्वसूचित केलेले मानवजातीच्या पुनर्वसनाचे काम अजून केलेले नसल्याने व्यक्तिगत दु:ख देणारे प्रसंग येतात. त्यांना आपली प्रतिक्रिया कशी आहे? यहोवाच्या नावावरील दूषण नाहीसे करण्यात व सैतानाला लबाड सिध्द करण्यात सहभागी होण्याची संधी त्यात आपल्याला दिसते का? “माझ्या मुला, सूज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीती. २७:११) हा सल्ला लक्षात ठेवल्याने तसे करण्यात आपल्याला मोठा धीर येऊ शकेल. लोकांना भौतिक नुकसान वा शारीरिक पीडा सहन करावी लागल्यास ते देवाला दूषण लावतील, शाप देतील, असा आरोप यहोवाची निंदा करणाऱ्या सैतानाने केला. (ईयो. १:९-११; २:४, ५) कठीण परिस्थितीतही देवाशी एकनिष्ठ राहून, ही गोष्ट आपल्या बाबतीत खरी नसल्याचे सिद्ध करण्याने आपण यहोवाला आनंदित करु शकतो. यहोवाचे त्याच्या दासांवर अतिशय प्रेम असल्याची व ईयोबाप्रमाणे विश्वासू राहिल्यास, यथाकाळी यहोवा आपल्याला उदारहस्ते प्रतिफळ देईल याची आपल्याला पूर्ण खात्री आहे.—याको. ५:११; ईयो. ४२:१०-१६.
१४. क्लेश सोसत असताना आपण यहोवावर विसंबून राहिल्यास आपल्याला आणखी कोणते फायदे मिळू शकतात?
१४ क्लेशकारक सत्त्वपरीक्षा होत असताना यहोवावर भरवशाने विसंबून राहिल्यास आपण अमूल्य गुण उत्पन्न करु शकतो. येशूने सहन केलेल्या गोष्टींचा परिणाम, त्याला पूर्वी कधीही परिचित नव्हता अशा रितीने तो “आज्ञाधारकपणा शिकला.” आपणही, सहनशीलता, धीर यहोवाच्या नीतिमान मार्गाविषयी अधिक कदर उत्पन्न करत शिकू शकतो. आपण धीराने त्या प्रशिक्षणाचा स्वीकार करु का?—इब्री. ५:८, ९; १२:११; याको. १:२-४.
१५. आपण धीराने कष्ट सहन केल्याने इतरांना कसा फायदा होऊ शकतो?
१५ आपली कामे इतर लोक पाहतील. नीतिमत्तेवरील प्रीतीखातर आपण ज्या गोष्टी सोसतो त्यांच्यामुळे कालांतराने त्यातले काही, आजच्या काळातल्या ख्रिस्ताच्या ‘बंधू’ची कदर करतील व उपासनेमध्ये त्याच्या ‘बंधू’शी एक होऊन सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद मिळवण्यास पात्र होतील. (मत्त. २५:३४-३६, ४०, ४६) त्यांना ती संधी मिळावी अशी यहोवाची व त्याच्या पुत्राची इच्छा आहे. आपलीही तशीच इच्छा आहे का? ते शक्य व्हावे म्हणून कष्ट सहन करायला आपण तयार आहोत का?
१६. अशा वैयक्तिक कष्टाविषयी आपल्या दृष्टीकोनाचा एकतेशी कसा संबंध आहे?
१६ अशा रीतीने जीवनातल्या कठीण परिस्थितीकडे देखील, यहोवाला आपली भक्ती प्रदर्शित करण्याची तसेच त्याची इच्छा साध्य करण्यात सहभागी होण्याची संधी, या दृष्टीने आपण पाहिल्यास किती उत्तम! तसे केल्याने आपण खरोखरच देव आणि येशू यांच्याशी एकता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा पुरावा देऊ. त्या एकतेविषयी, खऱ्या ख्रिश्चनांच्या वतीने येशूने प्रार्थना केली होती.—योहा. १७:२०, २१.
पुनरावलोकन चर्चा
• दुष्टाईला अनुमती देताना, यहोवाने स्वत:च्या नावाला यथोचितपणे मोठा आदर कसा दाखवला आहे?
• देवाने ‘क्रोधाच्या पात्रांना’ वागवून घेतल्यामुळे त्याची दया आपल्यापर्यंत कशी पोहोचू शकली?
• व्यक्तिगत त्रास सोसावा लागतो अशा परिस्थितीत आपण काय पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]