व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा देव म्हणून यहोवाचे गौरव करा

खरा देव म्हणून यहोवाचे गौरव करा

अध्याय २

खरा देव म्हणून यहोवाचे गौरव करा

१. (अ) खरा देव कोण आहे? (ब) त्याच्याबद्दल शिकत असताना आपल्या जीवनावर कसा परिणाम व्हावा?

 प्रेषित पौलाने त्याच्या बरोबरच्या ख्रिश्‍चनांना लिहिले की, देव म्हटले जाणारे अनेक असले तरी “आपला एकच देव म्हणजे पिता आहे . . . आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे.” (१ करिंथ. ८:५, ६) “एकच देव” असा पौलाने ज्याचा उल्लेख केला तो, सर्व गोष्टींचा सृष्टीकर्ता, यहोवा आहे. (अनु. ६:४; प्रकटी. ४:११) त्याचे गुण आणि मानवजातीसाठी त्याने केलेल्या गोष्टींबद्दल माहिती झालेले गुणग्राहक लोक त्याच्याकडे अतिशय आकर्षित होतात. परिणाम काय होतो? ज्याचे त्यांना इतके कौतुक वाटते त्याला त्यांनी शब्दांनी व कृतीने गौरवावे हे अगदी स्वाभाविकच आहे. त्यांचे देवावरचे प्रेम जसजसे वाढते तसतसे इतरांना त्याच्याबद्दल सांगण्यास ते प्रवृत्त होतात. आणि मानव म्हणून त्यांना शक्य असेल तितके त्याचे अनुकरण करण्याची त्यांची इच्छा असते. “देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा; आणि . . . तुम्हीही प्रीतीने चाला,” असे म्हणून तेच करण्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला उत्तेजन देते. (इफिस. ५:१, २) हा सल्ला लागू करण्यासाठी, यहोवा खरोखर जसा आहे तसा त्याला जाणून घेण्याची आपल्याला गरज आहे.

यहोवा कशा प्रकारची व्यक्‍ती आहे

२. त्याची प्रशंसा करण्यास आपल्याला प्रेरणा देणारे देवाचे काही ठळक गुण कोणते?

देवाच्या ठळक गुणांचा परिचय करून देणारी अनेक स्पष्ट विधाने पवित्र शास्त्रात सर्वत्र आढळतात. ती तुम्ही वाचाल तेव्हा, ते गुण खरोखर काय आहेत आणि तुम्हाला त्यांचे किती महत्त्व वाटते, यावर मन लावून विचार करा. उदाहरणार्थ: “देव प्रीती आहे.” (१ योहा. ४:८) “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” (अनु. ३२:४) “त्याच्या ठायी ज्ञान” आहे. (इयो. १२:१३) तो “प्रबळ” आहे. (यश. ४०:२६) या गुणांवर तुम्ही चिंतन करता तेव्हा देवाविषयी वाटणाऱ्‍या कौतुकामुळे त्याची स्तुती करण्यास तुम्ही प्रवृत्त होता ना?

३. यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे इतर कोणते पैलू अत्यंत आकर्षक आहेत?

त्याच्या आकर्षक व्यक्‍तिमत्त्वाची अधिक ओळख करुन देताना पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, यहोवा “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. (निर्ग. ३४:६) “हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.” (स्तोत्र. ८६:५) “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करितो.” (२ इति. १६:९) “देव पक्षपाती नाही . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) यहोवा “उदारपणे देणग्या देतो” आणि “आनंदी” देव आहे. (याको. १:५; १ तीम. १:११ न्यू.व.) या अतुलनीय देवाची सेवा करणे आणि त्याच्या प्रेमळ प्रतिपाळाचा अनुभव घेणे किती उत्साहवर्धक आहे!

४. (अ) यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो व त्याचे महत्त्व किती आहे? (ब) स्तोत्रसंहिता ३४:३ कशात सहभागी होण्याचे निमंत्रण आपल्याला देते?

तो “ईर्ष्यावान देव आहे” ही बाब त्याच्या गुणांशी सुसंगत आहे. (निर्ग. २०:५) स्वीकारार्ह रीतीने त्याची सेवा करण्यासाठी त्याला आपली संपूर्ण निष्ठा दिली पाहिजे. त्यासोबत, सैतान ज्याचा देव आहे अशा जगावर प्रेम करणे आपल्याला शक्य नाही. (१ योहा. २:१५-१७; २ करिंथ. ४:३, ४) नीतिमत्त्वाचा पोकळ देखावा यहोवाच्या लक्षात येतो. आपण काय करतो इतकेच नव्हे तर आपल्याला त्याविषयी काय वाटते आणि आपण कशा प्रकारची व्यक्‍ती बनण्याचा प्रयत्न करत आहोत, याची त्याला संपूर्ण माहिती आहे. आपल्याला नीतिमत्त्वाबद्दल खरे प्रेम असल्यास तो आपली मदत करतो. (यिर्म. १७:१०; नीती. १५:९) यहोवाच्या अशा व्यक्‍तिमत्त्वामुळे जगभरातल्या लाखो लोकांनी पवित्र शास्त्राच्या स्तोत्रकर्त्याचे आमंत्रण आनंदाने स्वीकारले आहे. त्याने लिहिले: “तुम्ही माझ्याबरोबर परमेश्‍वराची [यहोवा, न्यू.व.] थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.” (स्तोत्र. ३४:३) तुम्ही त्यातले एक आहात का?

५. यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या अभ्यासापासून संपूर्ण फायदा मिळण्यासाठी आपल्याला कशाचे सहाय्य होईल?

त्याच्या उदात्त गुणांचे तुम्ही बारकाईने परिक्षण केल्यास देवाबद्दल बोलण्याची तुमची इच्छा अधिक वाढेल आणि त्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला मोठे सहाय्य होईल. (१) प्रत्येक गुण नेमका काय आहे, किंवा इतर गुणांपेक्षा कदाचित तो कसा वेगळा आहे, (२) यहोवाने तो कसा व कोणत्या बाबतीत प्रदर्शित केला आहे आणि (३) तो तुम्ही कसा प्रकट करू शकता वा तुमच्या दृष्टिकोनावर त्याचा कसा प्रभाव पडावा, याचा शोध घ्या.

६. प्रीतीचे उदाहरण घेऊन यहोवाच्या गुणांचे परिक्षण तुम्ही कसे कराल ते दाखवा. त्यासाठी उत्तरामध्ये शास्त्रवचनांचा समावेश करून, परिच्छेदाच्या शेवटी असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या.

एका उदाहरणाचा विचार करा. “देव प्रीती आहे” असे पवित्र शास्त्र म्हणते तेव्हा त्याचा अर्थ काय? (१ योहा. ४:८) अर्थात प्रीती अनेक प्रकारची असते. या शास्त्रवचनात वापरलेला ग्रीक शब्द आहे गाʹपे. यहोवा देवाने स्वत: उदाहरणाने सिद्ध केल्याप्रमाणे प्रीतीच्या सर्वोत्तम स्वरूपाला उद्देशून हा वापरला जातो. अशी प्रीती संपूर्ण नि:स्वार्थीपणाची अभिव्यक्‍ती असते. हे ध्यानात ठेवून व दिलेली शास्त्रवचने वापरून, खालील प्रश्‍नांची उत्तरे द्या.

 सृष्टी घडवण्याच्या यहोवाच्या कामांमध्ये तो कसा दिसून येतो? (प्रे. कृत्ये १४:१६, १७)

 मानवजातीविषयी यहोवाच्या प्रेमाचे सर्वात ठळक उदाहरण कोणते? (योहा. ३:१६) मानवाच्या चांगुलपणामुळे देवाने असे केले का? (रोम ५:८)

 यहोवाने त्याच्या पुत्रामार्फत केलेल्या गोष्टींचा, आपण आपले जीवन ज्या प्रकारे जगतो त्यावर, कसा परिणाम व्हावा? (२ करिंथ. ५:१४, १५, १८, १९)

 ख्रिस्ती म्हणून, आपल्या सोबतच्या ख्रिश्‍चनांविषयी त्याच प्रकारचे प्रेम असल्याचे आपण कोणत्या मार्गांनी दाखवू शकू? (१ करिंथ. १३:४-७; १ योहा. ४:१०, ११; ३:१६-१८)

 आणखी कोणाबद्दल आपण प्रीती व्यक्‍त करावी व कशी? (मत्त. ५:४३-४८; २८:१९, २०; गलती. ६:१०)

७. तुमच्या वैयक्‍तिक अभ्यासात, यहोवाच्या इतर गुणांबद्दल तत्सम माहिती तुम्हाला कशी शोधता येईल?

यहोवाच्या इतर काही गुणांचाही अभ्यास करण्यास तुम्हाला आवडेल का? सुरवात म्हणून वैयक्‍तिक अभ्यासात “न्याय” आणि “बुद्धी” व नंतर कदाचित “प्रेमळ ममता” व “दया” यांचा अभ्यास करुन पाहा. वॉचटावर प्रकाशनांची सूची व पवित्र शास्त्राचा शब्दकोष यांच्या सहाय्याने ज्ञानवर्धक माहितीचा ठेवा तुम्हाला प्राप्त होईल.

देवाबद्दल सत्य शिकण्यास इतरांना मदत करा

८. (अ) जगातले लोक कोणत्या देवांची उपासना करतात? (ब) या गोंधळामागे कोण आहे व तुम्ही असे का म्हणता?

खऱ्‍या देवाच्या उपासनेविरुद्ध लोक अक्षरश: इतर लाखो देवांची उपासना करत आहेत. चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्मजगताने, त्यापूर्वीच बाबेल व मिसरातल्या तसेच हिंदू व बौद्ध लोकांनी शिकवलेल्या, “त्रैकत्वा”वरील विश्‍वासाचा स्वीकार केला. देवाबद्दलच्या या कल्पनेशिवाय बलाढ्य शासक, प्रसिद्ध खेळाडू व गायक, देवाप्रमाणे भजले जातात. पैसा, अहंकार आणि लैंगिकता हीही मन:पूर्वक भजली जाणारी दैवते बनली आहेत. या सर्वांमागे कोण आहे? ‘ह्‍या युगाचा देव’ दियाबल सैतान. (२ करिंथ. ४:४; १ करिंथ. १०:२०) कल्पनेने शक्य त्या सर्व धूर्त मार्गांनी तो लोकांना यहोवापासून इतरत्र वळवण्याचा वा निदान त्यांच्या उपासनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो.

९. देवाबद्दल सत्य शिकण्यात एखाद्याला मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

ख्रिस्ती म्हणवणारे असोत वा इतर असोत, अशा लोकांना, देवाबद्दल सत्य समजण्यास आपण कशी मदत करू शकतो? एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे, खरा देव कोण व त्याचे व्यक्‍तिमत्त्व कशा प्रकारचे आहे, याबद्दल स्वत: पवित्र शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी सहाय्यकारक पद्धतीने त्यांना दाखवणे. त्यानंतर, स्वत:च्या जीवनात दैवी गुणांचे प्रतिबिंब दिसेल अशा आचरणाने आपण त्याला पुष्टी दिली पाहिजे.—१ पेत्र २:१२.

१०. त्रैकत्ववाद्याशी बोलताना, त्याचा विश्‍वास काय असावा हे आपल्याला अचूक माहीत असल्याचे गृहित धरणे शहाणपणाचे का नाही?

१० परंतु ‘त्रैक्या’वरचा त्यांचा विश्‍वास सशास्त्र असल्याचा दावा करून ख्रिस्ती धर्मजगातल्या कोणी तुमच्याशी वाद घातला तर? सर्वप्रथम लक्षात घ्या की, ‘त्रैक्या’च्या तत्त्वाबद्दल अधिकृत विधाने असली तरी, अनेक लोकांच्या मनात त्यांच्या स्वत:च्या कल्पनाही असतात. त्यांना त्या व्यक्‍त करण्याचे पाचारण करा. व मग त्यांच्या कल्पनांची त्यांच्याच पवित्र शास्त्रातील विधानांशी तुलना करण्यास मदत करा. यथाकाळ, चर्चच्या अधिकृत शिकवणींची देवाच्या वचनाशी तुलना करण्यासही त्यांना उत्तेजन द्या.

११. पाच प्रमुख घटकातला एकावेळी एक घेऊन, ‘त्रैक्या’च्या तत्त्वाची अशास्त्रीयता समजावून देण्यासाठी या परिच्छेदासोबत दिलेल्या प्रश्‍न व शास्त्रवचनांचा उपयोग करा.

११ प्रामाणिक मनाच्या लोकांना मदत करण्याची इच्छा मनात बाळगून, खालील मुद्यांवर उहापोह करण्यासाठी, त्यांसोबत दिलेली शास्त्रवचने तुम्ही कशी वापरू शकाल यावर विचार करा:

 (१) काही त्रैक्यवादी, तीन दैवी व्यक्‍ती (पिता, पुत्र व पवित्र आत्मा) आहेत पण देव फक्‍त एकच आहे या कल्पनेवर भर देतात.

 परंतु, “पवित्र आत्मा” ही व्यक्‍ती असल्याचे प्रे. कृत्ये २:४, १७ दर्शवते का?

 खालील प्रत्येक शास्त्रवचनामध्ये किती व्यक्‍तींचा उल्लेख झालेला आहे याची नोंद घेणे सहाय्यकारक का आहे? (योहा. १७:२०-२२; प्रे. कृत्ये ७:५६; प्रकटी. ७:१०)

 (२) ‘त्रैक्या’तल्या सर्वजणांचे गौरव समान आहे, कोणीही एक दुसऱ्‍यापेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही; ते सहसमान तसेच सहसनातन आहेत असा काहींचा विश्‍वास आहे.

 शास्त्रवचने याच्याशी सहमत आहेत का? (उत्तरासाठी योहान १४:२८; मत्तय २४:३६; प्रकटीकरण ३:१४ पाहा.)

 (३) ‘त्रैक्या’चा पुरावा म्हणून काही लोक योहान १:१चा निर्देश करतात. ग्रीक मसुद्यामध्ये या ठिकाणी अनिश्‍चिति-दर्शक उपपद (“a”) नसल्याने “एक देव”च्या ऐवजी “शब्द देव होता” असे ते शास्त्रवचन असले पाहिजे, असे ते म्हणतात.

 परंतु योहान १:१मध्ये किती व्यक्‍तींचा उल्लेख केलेला आहे? तीन? की दोन? योहान १:१८ देखील त्रैक्याच्या तत्त्वाविरुद्ध कसे आहे?

 ग्रीक भाषेमध्ये अनिश्‍चिति-दर्शक उपपद नाही हे खरे. पण ते अनेक भाषांमध्ये आहे. आणि अचूक रीतीने विचार मांडण्यासाठी त्या त्या भाषांमध्ये ते वापरले जाते. योहान १:१ चे भाषांतर करताना उपपद वापरणे चूक आहे असे कोणाला वाटत असल्यास ते, किंग जेम्स व्हर्शन व इतर अनुवादांनुसार, प्रे. कृत्ये २८:६ मधून देखील वगळलेले त्यांना चालेल का? (ॲन अमेरिकन ट्रान्स्लेशनमध्ये योहान १:१ चे भाषांतर करण्याची दुसरी पद्धत “शब्द दैवी होता” अशी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देवापाशी असलेले दैवी गुण होते.)

 (४) त्रैक्यवादी असेही म्हणतात की, उत्पत्ती १:१, २६ मध्ये “देव” असे भाषांतर केलेला इब्री शब्द ए․लो․हिमʹ आहे आणि त्या भाषेत हा अनेकवचनी असून त्याचा वास्तविक अर्थ “(अनेक) देव” असा आहे.

 ‘एका देवा’मध्ये तीन दैवी व्यक्‍ती असल्याच्या शिकवणीला त्यामुळे पुष्टी का मिळत नाही?

 उत्पत्ती १:१ मध्ये “त्रैक्य” सूचित होत असल्यास शास्ते १६:२३ मध्ये “देव”साठी वापरलेल्या, अनेकवचनी नव्हे तर एकवचनी क्रियापदासह येणाऱ्‍या ए․लो․हिमʹने काय सूचित होते?

 इब्री भाषेतील या शास्त्रवचनांमध्ये देव शब्दाचे अनेकवचन का वापरले आहे? इब्री भाषेत आदरार्थी शब्द वापरण्याची ही एक रीत आहे. एकापेक्षा अधिक व्यक्‍तींविषयी उल्लेख असता तर सोबतचे क्रियापदही अनेकवचनी असते. पण वरील ठिकाणी ते तसे नाही.

 (५) चर्च येशूवर भर देत असल्याने (व जोडीला पवित्र शास्त्राच्या अनेक भाषांतरांमधून यहोवाचे नाव काढून टाकण्यात आले असल्याने) देवाचा उल्लेख केला की काही लोक फक्‍त येशूचाच विचार करतात.

 परंतु आपण अनुकरण करावे म्हणून येशूने उपासनेचे कोणते उदाहरण घालून दिले? (लूक ४:८)

१२. येशूने त्याच्या पित्याला “एकच खरा देव” संबोधणे का योग्य होते?

१२ पवित्र शास्त्रात येशूला “देव” आणि “समर्थ देव” असेही म्हटलेले असले तरी ‘माझा देव व तुमचा देव’ असे संबोधून त्याने आपल्या पित्याचे गौरव केले. (योहा. १:१; २०:१७; यश. ९:६) “परमेश्‍वरच (यहोवा, न्यू.व.) देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही” या मोशेने पूर्वी केलेल्या विधानाशी तो सहमत होता. (अनु. ४:३५) मूर्ती, देव मानलेली माणसे व दियाबल सैतान अशी भक्‍तिपात्रे आणि यहोवा यांच्यामध्ये पराकोटीची तफावत आहे. त्या सर्वांच्या अगदी विरुद्ध, येशूने त्याला संबोधल्याप्रमाणे यहोवा हा “एकच खरा देव” आहे.—योहा. १७:३.

‘यहोवाच्या नावाने चाला’

१३, १४. यहोवाला ‘ओळखणे’ व त्याच्या नावाने ‘चालणे’ यात काय गोवलेले आहे?

१३ देवाच्या परिचयाबद्दल अनेक वर्षे गोंधळात काढल्यावर, आपल्या पवित्र शास्त्रात त्याचे वैयक्‍तिक नाव यहोवा, प्रथमत: पाहिल्यावर अनेक लोक रोमांचित होतात. (निर्ग. ६:३) परंतु ‘परमेश्‍वराच्या (यहोवा, न्यू.व.) नावाने सदासर्वकाळ चालत’ राहिल्यासच त्यांना या ज्ञानाचा चिरकाल टिकणारा फायदा मिळेल. (मीखा ४:५) फक्‍त यहोवा हे नाव ठाऊक असणे वा आपण यहोवाचे साक्षीदार असल्याचा दावा करणे, यापेक्षा त्यात पुष्कळसे अधिक गोवलेले आहे.

१४ देवाच्या नावाच्या महत्त्वाबद्दल स्तोत्रसंहिता ९:१० म्हणते: “ज्यास तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, . . . हे यहोवा.” यात कशाचा अंतर्भाव आहे? केवळ यहोवा हे नाव माहीत असणे म्हणजे यहोवावर भरवसा असणे असा अर्थ आपोआप होत नसल्याने, त्यात बरेच अधिक गोवलेले आहे. येथे यहोवाच्या नावाची “ओळख” होण्याचा अर्थ यहोवा कशा प्रकारचा देव आहे याची जाणीव, त्याच्या अधिकाराबद्दल आदर व त्याच्या आज्ञांचे पालन होय. त्याच प्रमाणे, ‘यहोवाच्या नावाने चालण्या’मध्ये, त्याला वाहून घेणे आणि त्याचा उपासक या नात्याने त्याचे प्रतिनिधित्व करणे, खरोखरी आपले जीवन देवाच्या इच्छेनुरूप वापरणे, सूचित होते. (लूक १०:२७) तुम्ही तसे करत आहात का?

१५. आपण चिरकाल यहोवाची सेवा करणार असल्यास कर्तव्य-भावनेपेक्षा अधिक कशाची गरज आहे?

१५ आपल्याला यहोवाची चिरकाल सेवा करावयाची असल्यास, नुसत्या कर्तव्य भावनेने प्रेरित होऊन चालणार नाही. आधीच अनेक वर्षे यहोवाची सेवा करणाऱ्‍या तीमथ्याला प्रेषित पौलाने उत्तेजन दिले: “सुभक्‍तीविषयी कसरत (“सराव”, न्यू.व.) कर.” (१ तीम. ४:७) भक्‍ती हृदयातून येते; भजल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दलच्या आवडीमुळे ती उत्पन्‍न होते. “सुभक्‍ती” हा यहोवा या व्यक्‍तीबद्दल वाटणारा गाढ आदर होय. त्याच्याबद्दल व त्याच्या मार्गाबद्दल कदर असल्याने, ती त्याच्याविषयी प्रेमळ आपुलकी प्रकट करते. सर्वांनी त्याच्या नावाला मोठा सन्मान द्यावा असे ती आपल्याला वाटायला लावते. खऱ्‍या देवाच्या, यहोवाच्या नावाने आपण सदा सर्वकाळ चालणार असलो तर आपल्या जीवनात “सुभक्‍ती” हे ध्येय किंवा लक्ष्य म्हणून जोपासले पाहिजे.—स्तोत्र. ३७:४; २ पेत्र ३:११.

पुनरावलोकन चर्चा

• यहोवा कशा प्रकारची व्यक्‍ती आहे? त्याच्या प्रत्येक गुणाबद्दल स्पष्ट माहिती झाल्याने आपल्याला कसा फायदा होतो?

• देवाबद्दल सत्य शिकण्यास आपण इतरांना कशी मदत करू शकतो?

• यहोवाला ‘ओळखणे’ आणि ‘त्याच्या नावाने चालणे’ यात काय गोवलेले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]