आपण येशूला प्रार्थना करावी का?
अलीकडंच वेगवेगळ्या चर्चेसला जाणाऱ्या सुमारे ८०० युवकांचा एक सर्व्हे घेण्यात आला होता. त्यात त्यांना विचारण्यात आलं होतं, की येशू प्रार्थनांचं उत्तर देतो असं ते मानतात का? ६० टक्क्यांपेक्षा जास्त युवकांचं उत्तर ‘हो’ असं होतं. पण, एका युवतीचं उत्तर अगदीच वेगळं होतं. तिनं येशूचं नाव खोडलं आणि त्याऐवजी “देव” प्रार्थनांचं उत्तर देतो असं लिहिलं.
तुम्हाला काय वाटतं, आपण कुणाला प्रार्थना करावी? येशूला की देवाला? * या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी, प्रार्थनेच्या बाबतीत येशूनं त्याच्या शिष्यांना काय शिकवलं ते पाहूया.
येशूच्या मते आपण कुणाला प्रार्थना करावी?
प्रार्थना कुणाला करावी हे येशूनं फक्त शिकवलंच नाही, तर स्वतःच्या उदाहरणातून दाखवूनही दिलं.
त्यानं काय शिकवलं: प्रार्थना कशी करावी असं एका शिष्यानं येशूला विचारलं तेव्हा त्यानं म्हटलं: “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा: हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (लूक ११:१, २) नंतर डोंगरावर दिलेल्या सुप्रसिद्ध प्रवचनात त्यानं लोकांना प्रार्थना करायला आर्जवलं. त्यानं म्हटलं: “आपल्या अदृश्य अशा स्वर्गीय पित्याची प्रार्थना करा.” येशूनं त्यांना अशीही खातरी दिली, की “तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही मागण्याअगोदरच तुमच्या पित्याला माहीत असतं!” (मत्तय ६:६, ८; मराठी कॉमन लँग्वेज) तसंच, येशूच्या मृत्यूच्या शेवटल्या रात्री त्यानं शिष्यांना म्हटलं: “तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल.” (योहान १६:२३) तर मग स्पष्टच आहे, की आपण येशूचा आणि आपल्या सर्वांचा पिता असलेला यहोवा देव यालाच प्रार्थना करावी असं येशूनं शिकवलं.—योहान २०:१७.
त्यानं कसं दाखवून दिलं: येशूनं इतरांना ज्या प्रकारे प्रार्थना करायला शिकवलं त्या प्रकारे त्यानं स्वतःदेखील प्रार्थना केली. प्रार्थनेत त्यानं म्हटलं: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो.” (लूक १०:२१) आणखी एका प्रसंगी, “येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो.” (योहान ११:४१) तसंच, अखेरचा श्वास घेताना येशूनं अशी प्रार्थना केली: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६) आपल्या स्वर्गातल्या पित्याला अर्थात स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभूला प्रार्थना करण्याद्वारे येशूनं स्पष्टपणे दाखवून दिलं की आपण फक्त यहोवा देवालाच प्रार्थना केली पाहिजे. (मत्तय ११:२५; २६:४१, ४२; १ योहान २:६) प्रार्थनेच्या बाबतीत येशूनं जे शिकवलं त्याचं शिष्यांनी पालन केलं का?
सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी कुणाला प्रार्थना केली?
येशू स्वर्गात गेला त्याच्या काही आठवड्यांनंतरच विरोधक शिष्यांना छळू आणि धमकावू लागले. (प्रेषितांची कृत्ये ४:१८) त्या वेळी शिष्यांनी मदतीसाठी प्रार्थना केली. पण कुणाला? त्यांनी “एकचित्ताने देवाला उच्च स्वराने” प्रार्थना केली. तसंच देवानं “[त्याचा] पवित्र सेवक येशू याच्या नावाने” त्यांना मदत करत राहावी अशीही त्यांनी विनंती केली. (प्रेषितांची कृत्ये ४:२४, ३०) यावरून दिसून येतं, की प्रार्थनेच्या बाबतीत येशूनं जे काही शिकवलं होतं त्याचं शिष्यांनी पालन केलं. त्यांनी येशूला नव्हे, तर देवाला प्रार्थना केली.
याच्या अनेक वर्षांनंतर प्रेषित पौलानं आणि त्याच्या सोबत्यांनी कशा प्रकारे प्रार्थना केली ते विचारात घ्या. आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींना लिहिताना पौलानं म्हटलं: “आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकारस्तुती करतो.” (कलस्सैकर १:३) पौलानं पुढं त्यांना असं सांगितलं, की “आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा.” (इफिसकर ५:२०) यावरून हे दिसून येतं की पौलानं सर्व गोष्टींबद्दल येशूच्या नावानं ‘देवपित्याला’ प्रार्थना करण्याचं प्रोत्साहन दिलं.—कलस्सैकर ३:१७.
सुरुवातीच्या ख्रिश्चनांप्रमाणे आपणसुद्धा प्रार्थनेच्या बाबतीत येशूनं दिलेल्या सल्ल्याचं पालन करून त्याच्यावरचं आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. (योहान १४:१५) आपण फक्त आणि फक्त आपल्या स्वर्गीय पित्यालाच प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्या प्रार्थना ऐकतो यावरचा आपला भरवसा वाढतो. मग, आपल्याही भावना स्तोत्रकर्त्याप्रमाणेच असतील. स्तोत्र ११६:१, २ (पं.र.भा.) यात तो म्हणतो: “मी यहोवावर प्रीती करतो, कारण तो माझी वाणी व माझ्या विनंत्या ऐकतो. . . . मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्याला हाक मारीन.” * ▪ (w15-E 01/01)
^ परि. 3 बायबलनुसार, देव आणि येशू या दोन वेगळ्या व्यक्ती असून त्यांचं स्थानही वेगळं आहे. अधिक माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ४ पाहा.
^ परि. 11 देवानं आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असं वाटत असल्यास प्रार्थनेच्या बाबतीत त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण मनापासून प्रयत्न केला पाहिजे. अधिक माहितीसाठी बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातला अध्याय १७ पाहा.