व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समजबुद्धी दाखवल्याने राग शांत होतो

समजबुद्धी दाखवल्याने राग शांत होतो

कॉलेजच्या एका बास्केटबॉल कोचला त्याच्या तापट स्वभावामुळे कामावरून काढण्यात येते.

हट्ट पुरवला नाही म्हणून मूल रागाने हात-पाय आपटू लागते.

मुलाच्या रूममध्ये पसारा पाहून आईचा पारा चढतो आणि दोघांमध्ये आरडाओरड सुरू होते.

आपण अनेकांना रागात असल्याचे पाहिले असेल. आपल्याला स्वतःलाही कधी ना कधी राग आलाच असेल. राग येणे ही चुकीची गोष्ट आहे हे आपल्याला माहीत असते; तरीसुद्धा, बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात ज्यांमुळे राग येतो. खासकरून, एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीचे वागते तेव्हा आपल्याला लगेच राग येतो. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका लेखात तर असेही म्हटले आहे की, “राग येणे ही एक स्वाभाविक आणि चांगली गोष्ट आहे.”

हे खरे आहे असे आपल्याला वाटू शकते; खासकरून, ख्रिस्ती प्रेषित पौल याने देवाच्या सांगण्यावरून जे लिहिले त्याचा आपण विचार करतो तेव्हा. पौलाने म्हटले: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका.” (इफिसकर ४:२६) त्याला हेच म्हणायचे होते, की काही वेळा लोकांना राग येऊ शकतो. तर मग प्रश्न आहे, की आपण राग व्यक्त केला पाहिजे, की तो शांत केला पाहिजे?

राग व्यक्त करावा का?

पौलाने वरील सल्ला दिला तेव्हा त्याच्या मनात कदाचित स्तोत्रकर्त्याचे शब्द असावेत: “जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा. पण पाप करू नका.” (स्तोत्र ४:४, ईझी-टू-रीड व्हर्शन) पण, पौलाने तो सल्ला का दिला? त्याचे स्पष्टीकरण तो पुढे देतो: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) पौल मुळात ख्रिश्चनांना असा सल्ला देत होता, की त्यांनी राग व्यक्त करू नये. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या लेखात पुढे जे म्हटले आहे ते लक्षात घेण्याजोगे आहे: “राग व्यक्त केल्यामुळे खरंतर व्यक्ती आणखी रागिष्ट व हिंसक बनते आणि त्यामुळे काहीच साध्य होत नाही.”

तर मग प्रश्न आहे, की आपण राग आणि रागामुळे होणारे वाईट परिणाम “दूर” कसे करू शकतो? प्राचीन इस्राएलच्या बुद्धिमान शलमोन राजाने लिहिले: “विवेकाने [“समजबुद्धीने,” NW] मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” (नीतिसूत्रे १९:११) समजबुद्धी दाखवल्याने राग शांत कसा होऊ शकतो?

समजबुद्धी दाखवल्याने राग शांत कसा होतो?

समजबुद्धी म्हणजे परिस्थिती समजून घेणे किंवा एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणे. कोणी आपले मन दुखावते किंवा आपल्याला चीड आणते तेव्हा समजबुद्धी कशी मदत करू शकते?

अन्याय होत असल्याचे आपण पाहतो तेव्हा आपल्याला लगेच राग येऊ शकतो. पण, रागाच्या भरात आपण हिंसकपणे वागलो तर आपले स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान होऊ शकते. ज्याप्रमाणे, आगीमुळे एखादे घर भस्म होऊ शकते, त्याचप्रमाणे रागाच्या भडक्यामुळे आपले नाव खराब होऊ शकते आणि इतरांसोबत व देवासोबत असलेला आपला नातेसंबंध बिघडू शकतो. म्हणूनच, आपल्याला राग येत असल्याचे जाणवते तेव्हा परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार केल्यास भावनांवर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होईल.

शलमोनाचा पिता, दावीद राजा याने परिस्थिती समजून घेतली नसती, तर नाबाल नावाच्या एका मनुष्याच्या बाबतीत त्याने रक्तदोष ओढवून घेतला असता. दाविदाने आणि त्याच्या माणसांनी यहुदीयाच्या अरण्यात नाबालाच्या मेंढरांचे रक्षण केले होते. लोकर कातरण्याची वेळ आली तेव्हा दाविदाने नाबालाला काही अन्नसामग्री मागितली. त्यावर नाबाल म्हणाला: “माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांस मी देऊ काय?” किती मोठा अपमान होता हा! दाविदाने हे ऐकले तेव्हा तो आणि त्याची ४०० माणसे नाबालाचा व त्याच्या घराण्याचा नाश करण्यास निघाली.—१ शमुवेल २५:४-१३.

नाबालाची पत्नी अबीगईलला ही गोष्ट कळली तेव्हा ती दाविदाला भेटायला गेली. दावीद व त्याची माणसे भेटल्यावर तिने त्याला वाकून नमस्कार केला आणि म्हटले: “या आपल्या दासीला बोलू द्या. आपल्या दासीचं म्हणणं ऐका!” मग, तिने दाविदाला हे समजावून सांगितले की नाबाल हा किती मूर्ख माणूस आहे; तसेच, दाविदाने जर बदला घेतला व रक्तपात केला तर पुढे त्याला पस्तावा होईल हेही तिने त्याला सांगितले.—१ शमुवेल २५:२४-३१, मराठी कॉमन लँग्वेज.

अबीगईलच्या बोलण्यातून दाविदाने असे काय समजून घेतले ज्यामुळे तणावपूर्ण प्रसंग टळला. पहिली गोष्ट म्हणजे, त्याने हे लक्षात घेतले की नाबाल मूर्ख आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण जर बदला घेतला तर रक्तपात केल्याचा दोष आपल्यावर येईल हे दाविदाने ओळखले. दाविदाप्रमाणे तुम्हालासुद्धा एखाद्या गोष्टीमुळे भयंकर राग येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही काय करावे? “एक दीर्घ श्वास घ्या आणि १ ते १० आकडे मोजा,” असे मेयो क्लिनिकच्या एका लेखात सुचवण्यात आले आहे. होय, समस्येचे मूळ कारण काय आहे आणि तुम्ही जे पाऊल उचलणार आहात त्याचे काय परिणाम होतील याचा थोडा थांबून विचार करा. समजबुद्धी दाखवल्यामुळे राग शांत होऊ शकतो किंवा नाहीसाही होऊ शकतो.—१ शमुवेल २५:३२-३५.

समजबुद्धी दाखवल्यामुळे अनेकांना रागावर नियंत्रण करणे शक्य झाले आहे. सेबास्टान नावाचा एक मनुष्य २३ वर्षांचा असताना पोलंडमधील एका तुरुंगात होता; त्या वेळी बायबलच्या अभ्यासामुळे त्याला रागावर आणि त्याच्या मनात ठासून भरलेल्या चुकीच्या भावनांवर मात करायला कशी मदत मिळाली हे तो सांगतो. तो म्हणतो: “आधी मी समस्या काय आहे याचा विचार करतो; मग बायबलचा सल्ला लागू करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लक्षात आलं, की बायबल हे सगळ्यात उत्तम मार्गदर्शक आहे.”

बायबलचा सल्ला लागू केल्याने तीव्र स्वरूपाच्या भावनांवर मात करणे तुम्हाला शक्य होईल

असेच काहीसे सेट्सूओ नावाच्या मनुष्याने केले. तो म्हणतो: “पूर्वी कामाच्या ठिकाणी मला कोणी चीड आणली तर मी त्यांच्यावर खेकसायचो. पण, बायबलचा अभ्यास केल्यामुळं कोणावरही खेकसण्याआधी मी स्वतःला असं विचारतो: ‘मुळात चूक कुणाची आहे? समस्येचं कारण मीच तर नाही ना?’” सेट्सूओने स्वतःला असे प्रश्न विचारल्यामुळे, त्याला त्याच्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण करणे शक्य झाले.

रागाची भावना खूप प्रबळ असू शकते, पण देवाच्या वचनातील सल्ला त्याहून प्रबळ आहे. बायबलचा सुज्ञ सल्ला लागू केल्याने आणि मदतीसाठी देवाला प्रार्थना केल्याने तुम्हीसुद्धा समजबुद्धी दाखवून आपला राग शांत करू शकता अथवा त्यावर नियंत्रण करू शकता. ▪ (w14-E 12/01)