व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर चर्चा

देवाचे राज्य केव्हापासून शासन करू लागले? (भाग १)

देवाचे राज्य केव्हापासून शासन करू लागले? (भाग १)

यहोवाचे साक्षीदार सहसा पुढीलप्रमाणे लोकांशी चर्चा करतात. कल्पना करा की केतन नावाचा यहोवाचा साक्षीदार जयेश नावाच्या व्यक्तीच्या घरी आला आहे.

समजून घेण्यासाठी “शोध” करत राहा

केतन: जयेश, आपण दर आठवडी बायबलविषयी जी चर्चा करतो ती मला खूप आवडते. * तू मागच्या वेळी देवाच्या राज्याबद्दल एक प्रश्न विचारला होता: देवाचं राज्य १९१४ मध्ये सुरू झालं हे यहोवाचे साक्षीदार कोणत्या आधारावर म्हणू शकतात?

जयेश: हो, तुमच्याच एका पुस्तकात मी वाचलं की देवाचं राज्य १९१४ पासून शासन करू लागलं. तू नेहमी म्हणतोस ना की तुम्ही जे काही मानता ते बायबलवर आधारित असतं; त्यामुळं माझ्या मनात हा प्रश्न आला.

केतन: हो, आम्ही जे काही मानतो ते बायबलवर आधारित असतं.

जयेश: अरे पण, मी संपूर्ण बायबल वाचून काढलं, पण मला असं एकही वचन सापडलं नाही ज्यात १९१४ चा उल्लेख आहे. त्यामुळं मी ऑनलाईन बायबलमध्ये “१९१४” हे वर्षं टाकून सर्च केलं, पण तिथंही काही सापडलं नाही.

केतन: जयेश मला दोन गोष्टींसाठी तुझी प्रशंसा करावीशी वाटते. एक म्हणजे, तू संपूर्ण बायबल वाचून काढलंस; याचाच अर्थ, तुझं देवाच्या वचनावर प्रेम आहे.

जयेश: हो नक्कीच. त्यासारखं दुसरं पुस्तकच नाही.

केतन: बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या प्रश्‍नाचं उत्तर तू बायबलमध्ये शोधण्याचा प्रयत्न केलास. बायबलसुद्धा आपल्याला तेच करायला सांगतं: समजून घेण्यासाठी “शोध” करत राहा. * आणि जयेश तू तेच करण्याचा प्रयत्न करत आहेस.

जयेश: थँक्स रे, मला अजून खूप शिकायचंय. खरंतर मी याबद्दल आणखी शोध केला आणि आपण ज्या पुस्तकाचा अभ्यास करतोय त्यातच मला १९१४ बद्दल काही माहिती मिळाली. त्यात सांगितलंय की एका राजाला स्वप्न पडतं; स्वप्नात राजाला भलं मोठं झाड दिसतं जे तोडलं जातं आणि नंतर ते पुन्हा वाढतं; असंच काहीतरी ना?

केतन: हो. ती दानीएलाच्या चौथ्या अध्यायातली भविष्यवाणी आहे आणि ते स्वप्न बॅबिलोनचा राजा नबुखदनेस्सर याला पडलं होतं.

जयेश: हो तीच भविष्यवाणी. मी ती कितीतरी वेळा वाचली. पण खरं सांगू, त्या भविष्यवाणीचा देवाच्या राज्याशी किंवा १९१४ शी काय संबंध आहे हे मला कळलं नाही.

केतन: जयेश तुला हे जाणून आश्चर्य वाटेल, की स्वतः दानीएल ज्याने ही भविष्यवाणी लिहिली त्यालासुद्धा याचा अर्थ समजला नव्हता!

जयेश: हो का?

केतन: हो. दानीएल १२:८ मध्ये तो काय म्हणतो बघ: “मी हे ऐकले पण समजलो नाही.”

जयेश: अच्छा, म्हणजे मी एकटाच नाहीए ज्याला ती समजली नाही.

केतन: खरंतर दानीएलाला ही भविष्यवाणी यासाठी समजली नाही, कारण त्याच्या पुस्तकातल्या भविष्यवाण्यांचा अर्थ मानवांना कधी समजायला हवा याची एक विशिष्ट वेळ देवानं ठरवली होती; आणि ती वेळ आली नव्हती. पण, आज आपण त्या भविष्यवाण्या समजू शकतो.

जयेश: हे तू कशावरून म्हणू शकतोस?

केतन: त्यासाठी पुढच्याच वचनात काय म्हटलंय ते पाहा. दानीएल १२:९ म्हणते: “अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.” म्हणजेच, या भविष्यवाण्यांचा अर्थ खूप नंतर अर्थात ‘अंतसमयी’ समजणार होता. आणि सर्व पुरावे दाखवून देतात की आज आपण अंतसमयातच जगत आहोत; याविषयी आपण पुढं शिकणारच आहोत. *

जयेश: बरं मग, दानीएलाच्या भविष्यवाणीचा काय अर्थ होतो तू सांगशील का?

केतन: ठीकंय, मी प्रयत्न करतो.

नबुखदनेस्सर राजाचं स्वप्न

केतन: आधी आपण थोडक्यात हे पाहूया की नबुखदनेस्सर राजाला काय स्वप्न पडलं होतं; मग त्याचा काय अर्थ होतो ते पाहू.

जयेश: ठीकंय.

केतन: नबुखदनेस्सर राजानं स्वप्नात एक भलं मोठं झाड पाहिलं; त्याची उंची गगनाला पोहचेल इतकी होती. त्यानंतर राजानं ऐकलं की एका देवदूतानं ते झाड तोडून टाकण्याची आज्ञा दिली. पण, झाडाचा बुंधा मात्र जमिनीतच राहू द्यावा असं त्यानं सांगितलं. ‘सात काळांनंतर’ ते झाड पुन्हा वाढणार होतं. * सुरुवातीला ही भविष्यवाणी नबुखदनेस्सर राजाला लागू झाली. गगनाला पोहचणाऱ्या त्या झाडाप्रमाणेच तो एक प्रख्यात राजा असला, तरी ‘सात काळांसाठी’ त्याला जणू तोडण्यात आलं. त्यानंतर काय झालं तुला आठवतं का?

जयेश: हं . . . नाही.

केतन: काही हरकत नाही. बायबल सांगतं की नबुखदनेस्सर राजानं “सात काळ,” म्हणजे सात वर्षं आपली बुद्धी गमावली. त्या काळात, राजा या नात्यानं तो राज्य करू शकला नाही. पण सात काळांच्या शेवटी त्याला त्याची बुद्धी पुन्हा प्राप्त झाली आणि तो पुन्हा राज्य करू लागला. *

जयेश: ठीकंय, आतापर्यंत तर मला समजलं. पण या सगळ्याचा देवाच्या राज्याशी आणि १९१४ शी काय संबंध आहे?

केतन: थोडक्यात, या भविष्यवाणीच्या दोन पूर्णता आहेत. पहिली पूर्णता, नबुखदनेस्सर राजाच्या राज्यशासनात खंड पडला त्या वेळी झाली. तर दुसरी पूर्णता, देवाच्या राज्यशासनात खंड पडतो तेव्हा होते. तर जी दुसरी पूर्णता आहे, तिचा देवाच्या राज्याशी संबंध आहे.

जयेश: हे तू कशावरून म्हणू शकतोस?

केतन: एक म्हणजे, या भविष्यवाणीतच आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. दानीएल ४:१७ म्हणते: “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्यास देतो. . . . हे सर्व जीवधाऱ्यांना समजावे.” तर इथं काय म्हटलंय बरं, “मानवी राज्यावर” कुणाची सत्ता आहे?

जयेश: इथं म्हटलंय: “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे.”

केतन: बरोबर. यावरून समजतं की ही भविष्यवाणी फक्त नबुखदनेस्सरबद्दल नाही, तर मानवजातीवरील देवाच्या शासनाबद्दलही आहे. आणि भविष्यवाणीचा संदर्भ लक्षात घेतल्यावर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते.

जयेश: म्हणजे?

दानीएलाच्या पुस्तकाचा मुख्य विषय

केतन: दानीएलाच्या पुस्तकात एकाच विषयाचा बऱ्याच वेळा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात वारंवार, देवाचा पुत्र येशू याचं शासन असलेल्या देवाच्या राज्य स्थापनेविषयी सांगण्यात आलं आहे. त्याचं एक उदाहरण आपल्याला दानीएल २:४४ यात पाहायला मिळतं. तू वाचशील का?

जयेश: हो. इथं म्हटलंय: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”

केतन: थँक्यू. तुला काय वाटतं, या वचनाचा देवाच्या राज्याशी काही संबंध आहे का?

जयेश: हं . . . माहीत नाही.

केतन: इथं काय म्हटलंय बघ; ते राज्य “सर्वकाळ टिकेल.” असं देवाच्या राज्याबद्दल म्हणता येईल. पण मानवी सरकाराबद्दल तसं म्हणता येईल का?

जयेश: नाही.

केतन: आता दानीएलाच्या पुस्तकातली आणखी एक भविष्यवाणी पाहूया जिचा देवाच्या राज्याशी संबंध आहे. ही भविष्यवाणी दानीएल ७:१३, १४ यात पाहायला मिळते. एका भावी राजाबद्दल ही भविष्यवाणी म्हणते: “सर्व लोक, सर्व राषट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.” या भविष्यवाणीतसुद्धा कशाचा उल्लेख करण्यात आला आहे?

जयेश: एका राज्याचा.

केतन: बरोबर. पण हे कोणतंही राज्य नाही, तर असं राज्य आहे जे “सर्व लोक, सर्व राषट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक” यांच्यावर अधिकार चालवेल. दुसऱ्या शब्दांत, ते राज्य सबंध जगावर शासन करेल.

जयेश: हो रे, माझ्या ते लक्षातच आलं नाही.

केतन: शिवाय या भविष्यवाणीत आणखी काय सांगितलंय तेही पहा: “त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.” या वचनात जे सांगितलंय त्याचा आणि याआधी आपण दानीएल २:४४ या वचनात जे वाचलं त्यात साम्य नाही का?

जयेश: हो, आहे.

केतन: आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्याची थोडी उजळणी करूया. दानीएलाच्या चौथ्या अध्यायातली भविष्यवाणी यासाठी देण्यात आली होती की, “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे,” हे लोकांना कळावं. यावरूनच सूचित होतं, की या भविष्यवाणीची पूर्णता केवळ नबुखदनेस्सर राजामध्येच होत नाही, तर तिची एक मोठी पूर्णतादेखील आहे. तसेच दानीएलाच्या संपूर्ण पुस्तकात अशा अनेक भविष्यवाण्या वाचायला मिळतात ज्यांचा देवाच्या राज्य स्थापनेशी संबंध आहे. तर मग, दानीएलाच्या चौथ्या अध्यायातल्या या भविष्यवाणीचा देवाच्या राज्याशी संबंध आहे असं म्हणणं योग्य नाही का?

जयेश: हो, योग्य आहे. पण त्या भविष्यवाणीचा १९१४ शी काय संबंध आहे हे अजूनही मला कळलं नाही.

“सात काळ त्याजवरून जावोत”

केतन: त्यासाठी आपण परत नबुखदनेस्सर राजाविषयी पाहू. पहिल्या पूर्णतेत, भविष्यवाणीतल्या झाडानं नबुखदनेस्सर राजाला चित्रित केलं. झाड जेव्हा तोडण्यात आलं आणि त्यावरून सात काळ जाऊ देण्यात आले तेव्हा नबुखदनेस्सर राजाच्या शासनात खंड पडला; राजानं काही काळासाठी आपली बुद्धी गमावली तेव्हा ही गोष्ट घडली. पुढे राजाला आपली बुद्धी पुन्हा प्राप्त झाली आणि तो पुन्हा राज्य करू लागला तेव्हा ते सात काळ संपले. भविष्यवाणीच्या दुसऱ्या पूर्णतेत, देवाच्या राज्यशासनातही काही काळ खंड पडणार होता; पण, देवाचं काही चुकलं म्हणून नव्हे.

जयेश: म्हणजे?

केतन: बायबलच्या काळात, जेरूसलेममध्ये राज्य करणारे इस्राएली राजे “परमेश्वराच्या सिंहासनावर” बसून राज्य करायचे असं म्हटलं जायचं. * देवाच्या लोकांवर शासन करताना त्यांनी त्याचं प्रतिनिधित्व केलं. त्यामुळं, त्या राजांचे शासन खरंतर देवाचेच शासन होते. पण कालांतरानं, त्या राजांपैकी अनेकांनी देवाच्या आज्ञांचं उल्लंघन केलं आणि त्यांच्या प्रजेतल्या अनेकांनीही त्यांच्या वाईट उदाहरणाचं अनुकरण केलं. इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञांचं उल्लंघन केल्यामुळं इ.स.पू. ६०७ मध्ये देवानं बॅबिलोनी सैन्याद्वारे त्यांच्यावर हल्ला करवून आणला. तेव्हापासून कोणत्याही राजानं जेरूसलेममध्ये यहोवाचं प्रतिनिधित्व केलं नाही. त्याअर्थी, देवाच्या राज्यशासनात खंड पडला. आतापर्यंत मी जे काही सांगितलं ते तुला समजलं का?

जयेश: हो समजलं.

केतन: तर सात काळाची सुरुवात किंवा देवाच्या राज्यशासनात खंड पडणार होता त्या काळाची सुरुवात इ.स.पू. ६०७ पासून झाली. सात काळाच्या शेवटी, देव त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका नवीन शासकाला नेमणार होता; पण या वेळी मात्र तो शासक स्वर्गातला असणार होता. ज्या वेळी देव या शासकाला नेमणार होता तेव्हाच दानीएलाच्या पुस्तकात देण्यात आलेल्या इतर भविष्यवाण्या पूर्ण होणार होत्या. तेव्हा महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की हे सात काळ कधी संपले? या प्रश्‍नाचं उत्तर जर आपल्याला देता आलं तर देवाचं राज्य केव्हा शासन करू लागलं हे आपल्याला समजेल. तुला काय वाटतं कधी संपले हे सात काळ?

जयेश: नक्की माहीत नाही. हं . . . १९१४ तर नाही?

केतन: अगदी बरोबर!

जयेश: पण हे कशावरून म्हणता येईल?

केतन: येशू पृथ्वीवर सेवाकार्य करत होता तेव्हा त्यानं हे सूचित केलं, की सात काळ अजून संपले नव्हते. * यावरून समजतं की सात काळ हा एक मोठा कालावधी असावा. येशू पृथ्वीवर येण्याच्या शेकडो वर्षांआधी सात काळांची सुरुवात झाली आणि तो स्वर्गात गेल्यानंतरसुद्धा काही समयापर्यंत सात काळ चालूच होते. शिवाय हेसुद्धा लक्षात ठेव, की दानीएलाच्या भविष्यवाण्यांचा अर्थ “अंतसमयापर्यंत” स्पष्ट होणार नव्हता. * लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, १८०० दशकाच्या शेवटी बायबलचे प्रामाणिक विद्यार्थी या आणि इतर भविष्यवाण्यांचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास प्रवृत्त झाले. त्यांना हे समजू लागले की सात काळांची समाप्ती १९१४ मध्ये होणार होती. आणि जगभरात तेव्हापासून घडणाऱ्या मोठ्या घडामोडींवरून याची खातरी झाली, की १९१४ याच वर्षापासून देवाचं राज्य स्वर्गात शासन करू लागलं. त्याच वर्षी शेवटल्या काळाची किंवा अंतसमयाची सुरुवात झाली. जयेश, मला माहीतीय, की तुला हे सगळं समजणं थोडं कठीण आहे . . .

जयेश: हो थोडं कठीणच आहे. त्यामुळं मी परत एकदा ही माहिती वाचून काढणार आहे.

केतन: अरे जयेश, ही माहिती समजून घ्यायला मलासुद्धा खूप वेळ लागला. पण या चर्चेतून तुला निदान हे तरी समजलं असेल की देवाच्या राज्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचे जे काही विश्वास आहेत ते बायबलवर आधारित आहेत.

जयेश: हो नक्कीच. तुमच्या सर्व विश्वासांसाठी तुम्ही बायबलचा आधार घेता; तुमची हीच गोष्ट मला खूप आवडते.

केतन: आणि जयेश, मला वाटतं तुलाही तेच करायची इच्छा आहे. जसं मी मघाशी बोललो, की एकाच वेळी सर्व काही समजून घेणं खूप कठीण आहे. त्यामुळं तुझ्या मनात अजूनही काही प्रश्न असतील. सात काळांचा देवाच्या राज्याशी संबंध आहे आणि ते काळ इ.स.पू. ६०७ मध्ये सुरू झाले हे आपण पाहिलं; पण, सात काळांचा कालावधी १९१४ मध्ये संपला हे आपण नक्की कसं सांगू शकतो? *

जयेश: हो, मी आता तोच विचार करत होतो?

केतन: सात काळ म्हणजे नेमके किती हे समजण्यास बायबलच आपल्याला मदत करतं. या विषयावर आपण पुढच्या वेळी चर्चा करू या का? *

जयेश: हो चालेल. ▪ (w14-E 10/01)

बायबलच्या एखाद्या विषयासंबंधी तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांबद्दल किंवा त्यांच्या चालीरीतींबद्दल जाणून घ्यायची तुमची इच्छा आहे का? असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांना विचारण्यास कचरू नका. तुमच्याबरोबर चर्चा करण्यास त्यांना नक्कीच आवडेल.

^ परि. 5 यहोवाचे साक्षीदार, विनामूल्य बायबल अभ्यासाद्वारे इतरांसोबत बायबलविषयी पद्धतशीर चर्चा करतात.

^ परि. 21 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातील अध्याय ९ पाहा.

^ परि. 61 शेवटल्या काळाच्या भविष्यवाणीबद्दल बोलताना येशूने म्हटले: “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेस [जे देवाच्या राज्यशासनाला सूचित करत होते] पायांखाली तुडवतील.” (लूक २१:२४) म्हणजेच, देवाच्या राज्यशासनात जो खंड पडला होता तो येशूच्या काळातही चालू होता आणि शेवटल्या काळापर्यंत चालू राहणार होता.

^ परि. 65 बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातील “१९१४—बायबल भविष्यवाणीतील महत्त्वाचे वर्ष” हे परिशिष्ट पाहा.

^ परि. 67 सात काळ म्हणजे नेमके किती हे बायबलमधील काही वचनांवरून कसं दिसून येतं याची चर्चा या लेखमालेच्या पुढच्या लेखात केली जाईल.