त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा
तो मेला असूनही बोलत आहे
डोंगर उतारावर शांतपणे चरणाऱ्या आपल्या मेंढरांच्या कळपाकडे हाबेलाने पाहिले. आणि मग, मेंढरांच्या पलीकडे दूरवर त्याची नजर एका ठिकाणावर गेली. तेथील दृश्य त्याला अंधूकसे दिसत होते. एदेन बागेच्या तोंडाजवळ एक ज्वालामय तलवार सतत गरगर फिरत असल्यामुळे बागेच्या आत जाण्यास मज्जाव होता. त्याचे आईवडील एके काळी या बागेत राहत होते. पण आता त्यांना किंवा त्यांच्या मुलांनाही या बागेत प्रवेश नव्हता. कल्पना करा. मावळत्या सूर्याची वेळ आहे. थंड हवा सुटली आहे. हाबेल वर स्वर्गाकडे पाहतो आणि आपल्या निर्माणकर्त्याबद्दल विचार करू लागतो. मानव आणि देव यांमध्ये आलेला हा दुरावा कधी नाहीसा होईल का? आपल्या निर्माणकर्त्याशी नातेसंबंध जोडण्यापलीकडे हाबेलाला आणखी काहीही नको होते.
आजही हाबेल तुमच्याशी बोलत आहे. तो बोलत असल्याचे तुम्हाला ऐकू येते का? हे कसे शक्य आहे, असे तुम्ही म्हणाल. कारण आदामाच्या या दुसऱ्या मुलाला जाऊन कित्येक शतके उलटली आहेत. जवळजवळ ६ हजार वर्षांआधी मरण पावलेल्या हाबेलाच्या हाडांचीसुद्धा आता माती झाली आहे. आणि मृतांबद्दल बायबलमध्ये म्हटले आहे: “मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५, १०) शिवाय, हाबेलाने आपल्या तोंडून काही बोलल्याचा उल्लेख बायबलमध्ये कोठेही नाही. तर मग तो आपल्याशी कसा काय बोलू शकतो?
“तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे,” असे प्रेषित पौलाला हाबेलाविषयी लिहिण्याची प्रेरणा मिळाली होती. (इब्री लोकांस ११:४) म्हणजे, हाबेल विश्वासाच्याद्वारे बोलला. विश्वास हा उत्कृष्ट गुण दाखवणाऱ्यांपैकी हाबेल हा सर्वात पहिला मनुष्य होता. विश्वास प्रदर्शित करण्याच्या बाबतीत त्याने मांडलेले उदाहरण आजही जिवंत आहे. या विश्वासाचे आपण अनुकरण करू शकतो. हाबेलाच्या विश्वासातून आपण धडा शिकलो व त्याचे आपण अनुकरण करायचा प्रयत्न केला तर आपण दाखवून देऊ, की जणू काय हाबेल खरोखरच आपल्याशी बोलत आहे आणि त्याच्या बोलण्याचा आपल्यावर प्रभाव पडत आहे.
पण बायबलमध्ये तर हाबेलाबद्दल जास्त सांगितलेले नाही, मग आपण त्याच्याबद्दल आणि त्याच्या विश्वासाबद्दल कसे शिकू शकतो? पाहू यात.
ईन मीन तीन माणसांत तो वाढतो
मानवजातीची सुरुवात करणाऱ्या आदाम व हव्वा यांचा हाबेल हा दुसरा मुलगा. येशू हाबेलाविषयी बोलताना म्हणाला, की तो “जगाच्या स्थापनेपासून” होता. (लूक ११:५०, ५१) येशू खरेतर पापापासून मुक्त होण्याची आशा असलेल्या लोकांच्या जगाविषयी बोलत होता. हाबेल हा पृथ्वीवरील चवथा मनुष्य होता. पण असे दिसते, की देवाच्या नजरेत तो, पापातून मुक्त होण्याची आशा असलेल्यांपैकी सर्वात पहिला मनुष्य होता. * यावरून कळते, की हाबेलाचे संगोपन चांगल्या वातावरणात झाले नाही.
मानवजातीची नुकतीच सुरुवात झाली होती तरीपण सर्वत्र दुःख पसरले होते. हाबेलाचे आईवडील आदाम व हव्वा बहुधा दिसायला अतिशय सुंदर व जोशपूर्ण असावेत. पण ते जीवनात खूप मोठी चूक करून बसले होते व याची त्यांनादेखील जाणीव होती. ते परिपूर्ण होते आणि त्यांच्यापुढे सदासर्वकाळ जिवंत राहण्याची आशा होती. पण यहोवा देवाविरुद्ध बंड केल्यामुळे नंदनवनासारख्या असलेल्या एदेन बागेतून त्यांना हाकलून लावण्यात आले होते. आपल्या स्वार्थी इच्छेपोटी त्यांनी परिपूर्णता व सदासर्वकाळचे जीवन गमावले होते. उत्पत्ति २:१५–३:२४.
देवाविरुद्ध बंड करताना त्यांनी, त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या संततीचादेखील विचार केला नव्हता.—एदेन बागेच्या बाहेर आल्यानंतर आदामाला व हव्वेला जाणवले, की येथे जीवन इतके सोपे नाही. तरीपण, त्यांचा पहिला मुलगा जन्मला तेव्हा त्यांनी त्याचे नाव काइन ठेवले. काइनाचा अर्थ, “काहीतरी उत्पन्न होणे” असा होतो. आणि हव्वेने म्हटले: “देवाच्या साहाय्याने मी एका पुरुषाला जन्म दिला आहे.” एदेन बागेत असताना यहोवाने दिलेले अभिवचन तिच्या मनात असावे, असे तिच्या बोलण्यावरून दिसते. त्या अभिवचनात देवाने असे म्हटले होते, की एक स्त्री एक “संतती” जन्माला घालेल जी, आदाम व हव्वा यांची दिशाभूल करणाऱ्या त्या दुष्टाचा नाश करेल. (उत्पत्ति ३:१५; ४:१, सुबोध भाषांतर) या अभिवचनातील स्त्री आपणच आहोत व काइनच ती “संतती” आहे, असे हव्वेला वाटले असावे का?
तसे जर तिला वाटले असेल तर ही तिची चुकीची समजूत होती. एवढेच नव्हे तर तिने व आदामाने जर काइनाच्या मनात असे विचार बालपणापासून घातले असतील तर कोवळ्या वयापासूनच त्यांनी त्याच्या मनात गर्वाचे बी रोवले असावेत ज्याचा त्याला मुळीच फायदा होणार नव्हता. हव्वेला नंतर दुसरा मुलगा झाला. पण त्याच्याबद्दलचे कसलेही भपकेबाज वर्णन आपण बायबलमध्ये वाचत नाही. आदामाने व हव्वेने त्याचे नाव हाबेल ठेवले ज्याचा अर्थ, “श्वासोच्छवास” किंवा “व्यर्थता” असा होतो. (उत्पत्ति ४:२) त्यांनी निवडलेल्या नावावरून असे सूचित होते का, की आदामाला आणि हव्वेला, त्यांचा मोठा मुलगा काइन याच्याकडून जशा अपेक्षा होत्या तशा हाबेलाकडून नव्हत्या? कदाचित तसे असावे, पण आपण निश्चितपणे तसे सांगू शकत नाही.
काहीही असो, आजचे पालक मात्र त्या पहिल्या पालकांकडून बरेच काही शिकू शकतात. पालकांनो, तुम्ही तुमच्या बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे तुमच्या मुलांच्या मनात गर्व, स्वाभिमान व स्वार्थी प्रवृत्तींना खतपाणी घालाल की, त्यांना यहोवा देवावर प्रेम करण्यास व त्याच्याबरोबर मैत्री करण्यास शिकवाल? पहिले पालक या जबाबदारीत अपयशी ठरले. पण त्यांच्या मुलांसाठी मात्र एक आशा होती.
हाबेलाने विश्वास विकसित केला—कसा?
काइन व हाबेल जसजसे मोठे होऊ लागले, तसतसे आदामाने त्यांना कुटुंबाच्या भरणपोषणाकरता काम करण्यास शिकवले असावे. काइनाने शेती करण्याचे काम निवडले, तर हाबेल एक मेंढपाळ झाला.
पण हाबेल फक्तच मेंढरांची राखण करीत नसे. त्याने स्वतःत विश्वास निर्माण केला. या सुरेख गुणाविषयी पौलाने नंतर लिहिले. हाबेलापुढे कोणाचेही चांगले उदाहरण नव्हते. मग यहोवा देवावर त्याने विश्वास कसा वाढवला? तीन गोष्टींद्वारे. त्या कोणत्या होत्या ते पुढे पाहू यात.
यहोवाची निर्मिती.
हे खरे आहे, की यहोवाने जमिनीला शाप दिला असल्यामुळे जमिनीत काटेकुसळे उगवत होते आणि त्यामुळे शेती करणे सोपे नव्हते. तरीपण, हाबेलाचे कुटुंब जिवंत राहू शकेल इतके भरपूर पीक पृथ्वीवर उगवत होते. शिवाय, प्राणी, पक्षी, मासे, डोंगर, सरोवरे, नद्या, समुद्र, आकाश, ढग, सूर्य, चंद्र किंवा तारे यांवर शाप नव्हता. हाबेलाची नजर जाईल तेथे त्याला, सर्व काही निर्माण करणाऱ्या यहोवा देवाच्या गाढ प्रेमाचा, बुद्धीचा व चांगुलपणाचा पुरावा दिसत होता. (रोमकर १:२०) या निर्मितीवर व यातून दिसणाऱ्या देवाच्या गुणांवर मनन केल्याने त्याचा विश्वास आणखी मजबूत झाला.
देवाबरोबरचा नातेसंबंध आणखी घट्ट कसा करता येईल, यावर हाबेलाने नक्कीच बराच विचार केला असावा. तो त्याच्या कळपाची राखण करत आहे, अशी कल्पना करा. कळपाला चारा मिळावा
म्हणून मेंढपाळाला खूप चालावे लागत असे. हिरवेगार गवत कुठे दिसते का, मेंढरांना पोटभर पाणी पिता यावे म्हणून कुठे चांगले पाणवठे दिसतात का, पोट भरल्यानंतर आराम करण्याकरता एखादे सावलीचे ठिकाण मिळते का, याच शोधात तो आपल्या गरीब प्राण्यांना डोंगर-दऱ्यांतून, नदी-नाल्यांच्या शेजारून नेत असेल. देवाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांमध्ये मेंढरे ही सर्वात असाहाय्य वाटतात. त्यांना वाट दाखवण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना मानवावरच अवलंबून राहावे लागते. आपल्यालासुद्धा आपल्यापेक्षा सुज्ञ व अधिक शक्तिशाली असलेल्या ‘कोणाच्या तरी’ मार्गदर्शनाची, संरक्षणाची व देखभालीची गरज आहे, असे हाबेलाला वाटले असावे का? त्याच्या मनातील हे विचार त्याने नक्कीच प्रार्थनेत बोलून दाखवले असतील आणि त्यामुळेच त्याचा विश्वास वाढत गेला असावा.हाबेलाला निर्मितीत दिसणाऱ्या गोष्टींतून आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्यावर विश्वास ठेवण्याचा सबळ पुरावा मिळाला
यहोवाने दिलेली अभिवचने.
आदाम व हव्वेने आपल्या मुलांना, त्यांना एदेन बागेतून बाहेर का काढण्यात आले ते सांगितले असावे. त्यामुळे हाबेलाजवळ मनन करण्यासाठी बरेच विषय होते.
यहोवाने सांगितले, की जमीन शापित केली जाईल. जमिनीतील काटेकुसळे पाहून, यहोवाचे शब्द किती खरे आहेत याची खातरी हाबेलाला पटली असेल. गर्भावस्थेत व बाळंतपणात जन्म देताना हव्वेला यातना होतील, असेही यहोवाने भाकीत केले होते. हाबेलाने त्याच्या बहीण-भावांचा जन्म होताना, यहोवाचे हेही शब्द खरे ठरल्याचे पाहिले असावे. हव्वेला तिच्या नवऱ्याचे प्रेम व त्याचे लक्ष वेधण्याची आस लागेल व आदाम तिच्यावर स्वामित्व गाजवेल, हेही यहोवाने आधीच सांगितले होते. आपल्या आईवडिलांचे हे वर्तन हाबेल पाहत असावा. हाबेलाने प्रत्येक बाबतीत यहोवाचे शब्द पूर्णपणे विश्वसनीय असल्याचे पाहिले. त्यामुळेच, एदेन बागेत बिघडलेल्या गोष्टी एके दिवशी सरळ करणाऱ्या एका संततीविषयी देवाने दिलेल्या अभिवचनावर विश्वास ठेवण्याकरता हाबेलाकडे सबळ कारणे होती.—उत्पत्ति ३:१५-१९.
यहोवाचे सेवक.
मानव परिवारात कोणीच असे चांगले नव्हते ज्याचे अनुकरण हाबेल करू शकत होता. पण, त्या काळी पृथ्वीवर फक्त मानवच नव्हते तर देवदूतही होते. आदाम व हव्वा यांना यहोवाने एदेनातून बाहेर काढल्यानंतर, त्यांनी किंवा त्यांच्या संततीने पृथ्वीवरील या नंदनवनात पुन्हा प्रवेश करू नये म्हणून यहोवाने या बागेच्या प्रवेशद्वारासमोर दोन करुबांना नेमले. देवदूतांमध्ये करुबांना उच्च स्थान आहे. या प्रवेशद्वारासमोर दोन करुबांसह एक ज्वालारूपी तलवार सतत गरगरत असे.—उत्पत्ति ३:२४.
या करुबांना पाहत पाहतच हाबेल लहानाचा मोठा झाला होता. ते मानवरूपात असल्यामुळे किती शक्तिशाली आहेत हे तो पाहू शकत होता. आणि सतत गरगर फिरणारी ज्वालारूपी “तरवार” पाहून हाबेलाच्या मनात भय निर्माण झाले असावे. हाबेल लहानाचा मोठा होत होता, पण त्याने कधीच या करुबांना, त्यांना नेमलेल्या कामाचा कंटाळा करत असल्याचे किंवा आपली जागा सोडून दुसरीकडे गेल्याचे पाहिले नव्हते. रात्रंदिवस, वर्षांमागून वर्षे, दशकांमागून दशके हे बुद्धिमान, शक्तिशाली प्राणी त्याच ठिकाणी उभे होते. त्यांना पाहून हाबेलाला समजले असावे, की यहोवाचे सेवक धार्मिक व अविचल आहेत. हे करुब त्याच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे नव्हते. तर ते यहोवाशी एकनिष्ठ व त्याच्या आज्ञेत असल्याचे हाबेलाने पाहिले. या देवदूतांच्या उदाहरणामुळे हाबेलाचा विश्वास नक्कीच आणखी मजबूत झाला.
यहोवाची सृष्टी, त्याने दिलेली अभिवचने व त्याच्या सेवकांची उदाहरणे यांतून त्याने स्वतःबद्दल जे काही प्रकट केले होते त्यामुळे हाबेलाचा विश्वास पक्का झाला होता. तर अशा प्रकारे हाबेल आपल्याशी बोलतो, नाही का? कुटुंबातील सदस्यांनी उत्तम उदाहरण मांडले नसले तरी, खासकरून तरुण जन यहोवा देवावर खरा विश्वास वाढवू शकतात. आज, विश्वास दाखवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी कारणे आहेत. जसे की, आपल्या सभोवती आपण सृष्टीची किमया पाहतो, आपल्याजवळ संपूर्ण बायबल आहे तसेच विश्वास प्रदर्शित करणाऱ्या अनेकांची उदाहरणेही आहेत.
हाबेलाचे बलिदान—सर्वोत्कृष्ट का होते?
हाबेलाचा जसजसा यहोवावर विश्वास वाढत गेला तसतसा तो, हा विश्वास कार्यात दाखवण्याचा मार्ग शोधू लागला. पण या विश्वाच्या निर्मात्याला एक मर्त्य मनुष्य काय देऊ शकत होता? आणि खरे पाहता देवाला मानवांकडून कसल्याही भेटीची किंवा मदतीची गरज नाही. हळूहळू हाबेलाला एक गहन सत्य समजले. ते हे, की योग्य हेतू बाळगून त्याने त्याच्याजवळ असलेले जे सर्वोत्तम आहे ते यहोवाला अर्पण केले तर त्याचा प्रेमळ स्वर्गीय पिता त्याच्यावर खूश होईल.
त्यामुळे हाबेलाने त्याच्या कळपातील काही मेंढरांचे बलिदान देण्याचे ठरवले. त्याने निरोगी व प्रथम जन्मलेले मेंढरू निवडले आणि त्या प्राण्यांच्या शरीराचे जे अवयव त्याला सर्वात उत्तम वाटत होते ते त्याने अर्पिले. इकडे काइनसुद्धा देवाची मर्जी व त्याचे आशीर्वाद मिळवू पाहत होता. म्हणून त्यानेही त्याच्या शेतातील पिकांचे अर्पण देण्याची तयारी केली. पण त्याचे हेतू हाबेलासारखे नव्हते. या दोन भावांनी त्यांची अर्पणे सादर केली तेव्हा त्यांचे हेतू स्पष्ट झाले.
उत्पत्ति ४:४, पं.र.भा.) यहोवाने हे अर्पण कसे मान्य केले हे अहवालात सांगितलेले नाही. पण त्याने हाबेलाचेच अर्पण मान्य का केले?
आदामाच्या दोन्ही मुलांनी वेद्या बांधून त्यावर अर्पणे ठेवून त्यांचा होम केला असावा. तेव्हा कदाचित करुब हे सर्व पाहत असावेत. त्या काळी पृथ्वीवर यहोवाचे जिवंत प्रतिनिधी म्हणून केवळ करुबच तेथे हजर होते. या अर्पणांवर यहोवाने प्रतिसाद दिला. “यहोवाने हाबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले,” असे आपण बायबलमध्ये वाचतो. (त्याने दिलेल्या अर्पणामुळे देव त्याच्यावर संतुष्ट झाला होता का? हे खरे आहे, की हाबेलाने जिवंत प्राण्यांचे अर्पण देऊन त्याचे मौल्यवान रक्त वाहिले होते. अशा प्रकारच्या बलिदानाचे किती मूल्य आहे, हे हाबेलाला माहीत होते का? हाबेलाच्या अनेक शतकांनंतर देवाने, एका निर्दोष मेंढराच्या बलिदानाचा उपयोग करून स्वतःच्या परिपूर्ण पुत्राचे बलिदान चित्रित केले. देवाच्या पुत्राला “देवाचा कोकरा” म्हटले आहे ज्याचे निर्दोष रक्त वाहिले जाणार होते. (योहान १:२९; निर्गम १२:५-७) अर्थात या सर्व गोष्टी हाबेलाला त्या वेळी समजल्या नसाव्यात.
आपल्याला हे नक्की माहीत आहे की हाबेलाने त्याच्याजवळ जे सर्वोत्तम होते ते दिले. यहोवा फक्त हाबेलाच्या अर्पणावरच नव्हे तर व्यक्ती म्हणून खुद्द त्याच्यावरसुद्धा संतुष्ट होता. कारण हाबेलाने यहोवावर प्रेम व विश्वास दाखवून हे अर्पण दिले होते.
काइनाच्या बाबतीत असे नव्हते. यहोवाने “काइनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही.” (उत्पत्ति ४:५, पं.र.भा.) काइनाने जे अर्पण केले ते चुकीचे होते असे नाही. कारण नंतर, देवाने दिलेल्या नियमशास्त्रात, जमिनीचा उपज अर्पण म्हणून देण्याची मुभा होती. (लेवीय ६:१४, १५) पण, “काइनाची कृत्ये दुष्ट होती,” असे बायबलमध्ये म्हटले आहे. (१ योहान ३:१२) आज बहुतेक लोक दाखवतात तशीच मनोवृत्ती काइनानेसुद्धा दाखवली होती. देवाची भक्ती करण्याचा फक्त दिखावा केला तर पुरेसे आहे असे काइनाला वाटत होते. त्याच्या वागण्यावरूनच त्याचा यहोवावर विश्वास किंवा प्रेम नसल्याचे दिसून आले.
यहोवाने आपले अर्पण मान्य केले नाही हे जेव्हा काइनाने पाहिले तेव्हा त्याने हाबेलाकडून शिकण्याचा प्रयत्न केला का? नाही. उलट त्याला त्याच्या भावाचा हेवा वाटू लागला व तो त्याचा तिरस्कार करू लागला. काइनाच्या मनात येणाऱ्या सूड भावना यहोवाने पाहिल्या व त्याने त्याला नरमाईने समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने वेळीच स्वतःला आवरले नाही तर त्याच्या हातून गंभीर पाप घडेल, अशी ताकीदसुद्धा यहोवाने त्याला दिली व पुढे म्हटले, की तू जर आपला मार्ग बदलला तर तू “प्रसन्न” होशील.—उत्पत्ति ४:६, ७.
पण काइनाने देवाच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. उलट त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या हाबेलाला तो शेतात फिरायला घेऊन गेला. आणि तेथे त्याने त्याला ठार मारले. (उत्पत्ति ४:८) अशा प्रकारे, धार्मिक छळामुळे शहीद झालेल्यांमध्ये हाबेल पहिला होता. त्याचा मृत्यू झाला तरी त्याची कहाणी तिथेच संपली नाही.
लाक्षणिक अर्थाने हाबेलाचे रक्त यहोवा देवाकडे सूडाची किंवा न्यायाची मागणी करत होते. आणि यहोवाने दुष्ट काइनाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देऊन हाबेलाला न्याय मिळवून दिला. (उत्पत्ति ४:९-१२) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हाबेलाच्या विश्वासाचे उदाहरण आपल्याशी आज बोलत आहे. हाबेलाचे आयुष्यमान त्या काळाच्या मानवांच्या तुलनेत बरेच कमी होते. तो कदाचित केवळ शंभर वर्षे जगला. पण त्या शंभर वर्षांतसुद्धा तो देवाला पसंत असलेल्या मार्गानेच चालला. त्याला याची खातरी होती, की त्याचा स्वर्गीय पिता यहोवा याचे त्याच्यावर प्रेम होते व तो त्याच्यावर संतुष्ट होता. (इब्री लोकांस ११:४) त्यामुळे आपण ही खातरी बाळगू शकतो, की तो यहोवाच्या अमर्याद स्मृतीत सुरक्षित आहे व पृथ्वीवरील नंदनवनात त्याला पुन्हा जिवंत केले जाईल. (योहान ५:२८, २९) तुम्ही त्याला तेथे भेटाल का? जरूर भेटू शकाल; पण फक्त जर तुम्ही हाबेलाचे बोलणे ऐकण्याचा व त्याच्या अप्रतिम विश्वासाचे अनुकरण करण्याचा दृढनिश्चय केला तरच. ▪ (w१३-E ०१/०१)
^ “जगाच्या स्थापनेपासून” या वाक्यांशात बी रोवण्याचा अर्थात पुनरुत्पादनाचा अर्थ गोवलेला आहे त्यामुळे हा वाक्यांश सर्वात आधीच्या मानवी संततीला सूचित करतो. पण मग येशूने “जगाच्या स्थापनेपासून” या वाक्याशांशी, आदाम आणि हव्वा यांना झालेल्या सर्वात पहिल्या मानवाचा अर्थात काइनाचा नव्हे तर हाबेलाचा संबंध का लावला? कारण, काइनाच्या निर्णयांतून व कार्यांतून, तो यहोवा देवाविरुद्ध जाणीवपूर्वक बंड करत होता. आपल्या आईवडिलांप्रमाणेच त्यालाही पुनरुत्थानाची व पापातून मुक्त होण्याची कसलीच आशा नाही.