व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणीतरी आहे तो कोण?

आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणीतरी आहे तो कोण?

आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणीतरी आहे तो कोण?

आपल्या प्रार्थना ऐकणारा जर कोणी असेल तर तो आपला सृष्टिकर्ताच असला पाहिजे. त्यानेच आपल्या मेंदूची रचना केली आहे. तेव्हा, आपल्या मनातील विचार जाणू शकणारा, आपल्या प्रार्थनांचे उत्तर देऊ शकणारा व आपल्याला मदत करू शकणारा त्याच्याशिवाय आणखी कोण असू शकतो? पण, तुम्हाला कदाचित प्रश्‍न पडेल, की ‘सृष्टिकर्त्यावर विश्‍वास ठेवणे तर्काला पटणारे आहे का?’

अनेकांना असे वाटते की सृष्टिकर्ता आहे असा जर विश्‍वास करायचा असेल तर आपण विज्ञानशास्त्राला बाजूला ठेवले पाहिजे. पण, विज्ञान आणि देव या दोन परस्परविरोधी गोष्टी असून त्यांचा कधीच मेळ बसू शकत नाही असा विचार करणे चुकीचे आहे. हे पुढील उदाहरणांवरून सिद्ध होते.

◼ अलीकडेच अमेरिकेतील २१ नामांकित विद्यापीठातील १,६४६ प्राध्यापकांच्या एका सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले, की प्रत्येक तीनपैकी फक्‍त एका प्राध्यापकाने, “मी देवाला मानत नाही” असे म्हटले.

वास्तविकता ही आहे, की अनेक वैज्ञानिक देव आहे असा विश्‍वास बाळगतात.

सृष्टिकर्ता असल्याचा पुरावा

आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणीतरी आहे ही गोष्ट आपण डोळे झाकून स्वीकारावी का? मुळीच नाही. विश्‍वास म्हणजे पुरावा नसतानाही एखादी गोष्ट मानणे ही धारणा चुकीची आहे. बायबलमध्ये विश्‍वासाची व्याख्या कशी करण्यात आली आहे ते विचारात घ्या. ते म्हणते की विश्‍वास हा “न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलचा खातरीलायक पुरावा आहे.” (इब्री लोकांस ११:१, NW) उदाहरणार्थ, आपण रेडिओच्या लहरी पाहू शकत नाही, पण आवाजांचे प्रक्षेपण करणाऱ्‍या या अदृश्‍य लहरींचा स्पष्ट पुरावा आपल्या मोबाईलवरून आपल्याला मिळतो; त्यामुळे अशा लहरी असतात असे आपण मानतो. त्याचप्रमाणे, आपल्या प्रार्थना ऐकणाऱ्‍याला आपण पाहू शकत नसलो, तरी आपल्याजवळ असलेल्या पुराव्यांचे परीक्षण केल्याने तो अस्तित्वात असल्याची खातरी आपल्याला मिळू शकते.

देव अस्तित्वात असल्याचा पुरावा आपल्याला कोठे मिळू शकतो? त्याचा पुरावा आपल्या अवतीभोवतीच आपल्याला मिळतो. बायबल असा तर्कवाद करते: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) हा तर्क तुमच्या मनाला पटतो का? जेव्हा तुम्ही विश्‍वातील सुव्यवस्थेचा, जीवनाचा उगम कसा झाला याचा किंवा सगळ्यात गुंतागुंतीच्या रचनेचा अर्थात मानवी मेंदूचा विचार करता तेव्हा मानवांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी असलाच पाहिजे असा तर्क तुम्ही करता. *

पण, देवाच्या अस्तित्वाबद्दल निसर्गातूनच आपल्याला सर्वकाही शिकायला मिळते असे नाही. किंबहुना, निसर्गातून मिळणारा देवाच्या अस्तित्वाचा पुरावा, बंद दारामागून येणाऱ्‍या व्यक्‍तीच्या पावलांचा कानोसा घेण्यासारखे आहे. कोणीतरी येत आहे हे आपल्याला माहीत असते, पण नेमके कोण ते माहीत नसते. ते जाणून घेण्यासाठी आपल्याला दार उघडण्याची गरज आहे. सृष्टीची निर्मिती ज्याने केली त्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला नेमके हेच करण्याची गरज आहे.

बायबल हे एका दारासारखे आहे जे उघडल्यानंतर आपल्याला देवाबद्दलचे ज्ञान मिळू शकते. त्यातील तपशीलवार भविष्यवाण्यांचा व त्यांच्या पूर्णतेचा आपण अभ्यास करतो तेव्हा देव अस्तित्वात असल्याचा पुरावा आपल्याला सापडतो. पण, त्याहून अधिक म्हणजे देवाने प्राचीन काळी लोकांशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्या अहवालांवरून आपल्या प्रार्थना ऐकणाऱ्‍याचे व्यक्‍तिमत्त्व आपल्याला समजते.

आपल्या प्रार्थना ऐकणारा कसा आहे?

बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे की आपल्या प्रार्थना जो ऐकतो ती एक व्यक्‍ती आहे आणि आपण तिला जाणू शकतो. एक व्यक्‍तीच खरेतर ऐकू व समजू शकते. बायबलमधील पुढील शब्द खरोखर दिलासा देणारे आहेत: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.” (स्तोत्र ६५:२) जे लोक विश्‍वासाने प्रार्थना करतात अशांच्या प्रार्थना तो ऐकतो. शिवाय, त्याला एक नावदेखील आहे. * बायबल म्हणते की यहोवा “दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो धार्मिकांची प्रार्थना ऐकतो.”—नीतिसूत्रे १५:२९.

यहोवाला भावनादेखील आहेत. तो प्रेमळ व आनंदी देव आहे. (२ करिंथकर १३:११; १ तीमथ्य १:११) एके काळी पृथ्वीवरील दुष्टाई शिगेला पोहचली तेव्हा त्याला कसे वाटले त्याविषयी बायबल म्हणते: “त्याच्या चित्ताला खेद झाला.” (उत्पत्ति ६:५, ६) देव लोकांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना दुःख देतो असे जे लोकांचे म्हणणे आहे ते चुकीचे आहे. बायबल म्हणते: “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करावयाला नको.” (ईयोब ३४:१०) पण तुमच्या मनात कदाचित असा प्रश्‍न येईल, की ‘देव जर सर्वशक्‍तिमान सृष्टिकर्ता आहे तर तो आपले दुःख नाहीसे का करत नाही?’

यहोवाने मानवांना इच्छा-स्वातंत्र्य दिले आहे. दुसऱ्‍या शब्दांत, त्याने आपल्याला बऱ्‍यावाइटातला फरक जाणून त्यानुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यावरून देव कशा प्रकारची व्यक्‍ती आहे हे आपण समजू शकतो. देव कोणतीही गोष्ट आपल्यावर लादत नाही, तर आपल्याला निवड करण्याची मोकळीक देतो ही किती चांगली गोष्ट आहे! पण खेदाची गोष्ट म्हणजे आज बरेच लोक आपल्या या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात आणि त्यामुळे स्वतःला व इतरांनाही दुःख देतात. यामुळे आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न उभा राहतो. तो म्हणजे: देव मानवांचे स्वातंत्र्य हिरावून न घेता त्यांचे दुःख नाहीसे कसे करेल? या प्रश्‍नाचे उत्तर आपण पुढच्या लेखात पाहू या. (w१२-E ०७/०१)

[तळटीपा]

^ परि. 8 देव अस्तित्वात असल्याचा काय पुरावा आहे याबद्दलच्या अधिक माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले जीवन की शुरुआत पाँच सवाल–जवाब पाना जरूरी, हे माहितीपत्रक पाहा.

^ परि. 12 बायबलनुसार देवाचे वैयक्‍तिक नाव यहोवा आहे.

[५ पानांवरील चौकट]

तुमच्या शंकेचे कारण धर्म आहे का?

आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणी प्रेमळ देव आहे की नाही अशी शंका अनेकांच्या मनात धर्मामुळे निर्माण झाली, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. आज धर्माने युद्धे, दहशतवाद यांत सक्रिय सहभाग घेतला आहे व मुलांच्या लैंगिक शोषणाकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे प्रार्थना करणारे लोकसुद्धा, “देवावर माझा विश्‍वास नाही” असे म्हणतात.

धर्माने सहसा लोकांचे नुकसान का केले आहे? थोडक्यात सांगायचे तर दुष्ट लोकांनी धर्माच्या नावाखाली गैरकृत्ये केली आहेत म्हणून. बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे, की जगातील काही घटक ख्रिस्ती धर्मजगताला आपल्या मुठीत घेतील व त्यास देवाच्या इच्छेविरुद्ध कार्य करण्यास भाग पाडतील. प्रेषित पौलाने ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांना सांगितले: “तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.”—प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०.

देवाला खोट्या धर्माचा वीट आला आहे. देवाचे वचन, बायबल पृथ्वीवर वधलेल्या सर्वांच्या रक्‍तासाठी खोट्या धर्माला जबाबदार धरते. (प्रकटीकरण १८:२४) खोट्या धर्माने प्रेमाचा सागर असलेल्या खऱ्‍या देवाबद्दल लोकांना शिकवले नाही, त्यामुळे देवाच्या नजरेत तो रक्‍तदोषी आहे.—१ योहान ४:८.

जे लोक धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या अत्याचाराचे बळी ठरले आहेत अशांसाठी प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवाचे मन खूप हळहळते. त्यामुळे मानवजातीवर अपार प्रेम करणारा देव लवकरच येशू ख्रिस्तामार्फत धार्मिकतेचा आव आणणाऱ्‍या लोकांचा न्याय करील. येशूने म्हटले: “त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, ‘आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला’, . . . तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.”—मत्तय ७:२२, २३.