सेक्सबद्दलच्या दहा प्रश्नांची उत्तरे
सेक्सबद्दलच्या दहा प्रश्नांची उत्तरे
१ पहिला पुरुष आदाम व पहिली स्त्री हव्वा यांनी एदेन बागेत जे पाप केले ते सेक्स होते का?
▪ उत्तर: पुष्कळ लोक असे मानतात, की एदेन बागेतील ते मना केलेले फळ हे, लैंगिक संबंधांना सूचित होते. परंतु बायबलमध्ये तर अशी शिकवण दिलेली नाही.
विचार करा: हव्वेला बनवण्याआधीच देवाने आदामाला अशी आज्ञा दिली: “बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको.” (उत्पत्त २:१५-१८) आदाम त्या वेळी एकटाच असल्यामुळे, देवाने दिलेली आज्ञा अर्थातच लैंगिक संबंधांना लागू होऊ शकत नाही. शिवाय, देवाने आदाम व हव्वेला “बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका,” अशी स्पष्ट आज्ञाही दिली होती. (उत्पत्ती १:२८) पृथ्वी व्यापून टाका या आज्ञेचे पालन करण्यासाठी लैंगिक संबंध साहजिकच आवश्यक होते. तर मग एक प्रेमळ देव या पहिल्या जोडप्याला आधी, “पृथ्वी व्यापून टाका” अशी आज्ञा देऊन नंतर मग त्यांनी या आज्ञेचे पालन केल्यावर त्यांना मृत्यूची शिक्षा कशी काय देऊ शकतो?—१ योहान ४:८.
शिवाय, हव्वेने मना केलेल्या झाडाचे फळ खाल्ले तेव्हा ती एकटी होती; बायबलच्या मूळ भाषेतल्या या उताऱ्यात असे म्हटले आहे, की हव्वेने मना केलेल्या झाडाचे फळ काढून खाल्ले आणि नंतर मग ते आपल्या पतीलाही दिले व त्याने ते खाल्ले.—उत्पत्ती ३:६.
तसेच, आदाम व हव्वेने संबंध ठेवले व त्यांना मुले झाली तेव्हा देवाने त्याबद्दल नापसंती दर्शवली नाही. (उत्पत्ती ४:१, २) यावरून स्पष्ट होते, की आदाम व हव्वेने खाल्लेले फळ, त्यांनी ठेवलेल्या लैंगिक संबंधांना सूचित होत नाही तर झाडाला लागलेले खरोखरचे फळ होते.
२ लैंगिक सुखाचा बायबल निषेध करते का?
▪ उत्तर: बायबलच्या पहिल्या पुस्तकात स्पष्टपणे सांगितलेले आहे, की देवानेच मानवांना “नर व नारी” असे बनवले. त्यानंतर आपली सृष्टी “फार चांगली आहे” असे त्याने म्हटले. (उत्पत्ती १:२७, ३१) नंतर देवाने बायबलचे लेखन करण्याची प्रेरणा दिलेल्या एका लेखकाला, “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. . . . तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत,” असा सल्ला पतींना देण्यास प्रेरित केले. (नीतिसूत्रे ५:१८, १९) या विधानांवरून कोठूनही असे वाटते का, की लैंगिक सुखाचा बायबल निषेध करते?
देवाने लैंगिक अवयवांची निर्मिती अशा प्रकारे केली जेणेकरून, मुलांना
जन्म देण्यासोबतच विवाहित जोडप्याला एकमेकांबद्दल असलेले प्रेम व आपुलकी दोघांना सुखकारक वाटेल अशा मार्गाने व्यक्त करता यावी. अशा नातेसंबंधांमुळे, प्रेमळ व घनिष्ठ वैवाहिक नाते असलेल्या एका स्त्री व पुरुषाला त्यांच्या शारीरिक व भावनिक गरजा भागवणे शक्य होते.३ एका स्त्री व पुरुषाचा कायद्याने विवाह झालेला नसेल तर त्यांनी सोबत राहणे बायबलनुसार योग्य आहे का?
▪ उत्तर: “व्यभिचाऱ्यांचा न्याय देव करील,” असे बायबलमध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे. (इब्री लोकांस १३:४) व्यभिचार यासाठी पोर्निया हा ग्रीक शब्द आहे. या शब्दाच्या अर्थामध्ये, एकमेकांशी विवाहित नसलेल्या व्यक्तींच्या लैंगिक अवयवांचा गैरवापर हा अर्थदेखील येतो. * त्यामुळे, जर एक जोडपे, नंतर त्यांचा लग्न करण्याचा विचार असला तरी, लग्न न करताच एकत्र राहत असतील तर देवाच्या नजरेत ते अयोग्य आहे.
एक स्त्री व पुरुष एकमेकांवर जिवापाड प्रेम करत असले तरीसुद्धा लैंगिक संबंध ठेवण्याआधी त्यांनी लग्न केले पाहिजे, अशी देव अपेक्षा करतो. देवानेच आपल्याला प्रेम करण्याची कुवत देऊन निर्माण केले आहे. प्रेम हा देवाचा प्रमुख गुण आहे. त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांमध्येच सेक्ससंबंध असले पाहिजेत अशी अट घालण्यासाठी त्याच्याजवळ योग्य कारण आहे.
४ बहुपत्नीकत्व योग्य आहे का?
▪ उत्तर: देवाने काही काळासाठी एकापेक्षा अधिक पत्नी करण्याची अनुमती दिली होती. (उत्पत्ती ४:१९; १६:१-४; २९:१८–३०:२४) पण बहुपत्नीकत्वाच्या प्रथेची सुरुवात यहोवाने करून दिली नाही. त्याने आदामाला केवळ एकच बायको दिली.
एकपत्नीकत्वाचा आपला मूळ स्तर पुन्हा स्थापित करण्यासाठी देवाने येशू ख्रिस्ताला अधिकार दिला. (योहान ८:२८) लग्नासंबंधी येशूला प्रश्न करण्यात आला तेव्हा त्याने म्हटले: “उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, याकरता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.”—मत्तय १९:४, ५.
येशूच्या एका शिष्याला नंतर देवाने असे लिहिण्यास प्रेरित केले: “प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा.” (१ करिंथकर ७:२) बायबलमध्ये असेही म्हटलेले आहे, की ख्रिस्ती मंडळीत ज्या विवाहित पुरुषाला खास जबाबदाऱ्या दिल्या जातात तो केवळ “एका स्त्रीचा पती,” असावा.—१ तीमथ्य ३:२, १२.
५ विवाहित जोडप्यांनी गर्भनिरोधकांचा वापर करणे चूक आहे का?
▪ उत्तर: येशूने आपल्या अनुयायांना मुले जन्माला घालण्याची आज्ञा दिली नाही. किंवा त्याच्या कोणत्याही शिष्यानेदेखील अशी आज्ञा दिली नाही. बायबलमध्ये कोठेही गर्भनिरोधाचा उघडपणे निषेध केलेला नाही.
पण आपले कुटुंब वाढवायचे किंवा नाही, हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य विवाहित जोडप्यांना आहे. मुले किती व केव्हा होऊ द्यायची हेही ते ठरवू शकतात. गर्भधारणा टाळण्याकरता नवरा-बायको जर गर्भपात न होणाऱ्या गर्भनिरोधकाचा वापर करत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय व जबाबदारी आहे. * कोणीही त्यांचा न्याय करू नये.—रोमकर १४:४, १०-१३.
६ गर्भपात करणे चूक आहे का?
▪ उत्तर: देवाच्या नजरेत जीवन मौल्यवान आहे; त्याच्या नजरेत, गर्भातील भ्रूणसुद्धा एक विशिष्ट जिवंत व्यक्ती आहे. (स्तोत्र १३९:१६) जन्म न झालेल्या गर्भाला इजा करणाऱ्या व्यक्तीचा झाडा घेतला जाईल, असे देवाने म्हटले होते. म्हणजेच, जन्म न झालेल्या बाळाला ठार मारणे हे त्याच्या नजरेत त्या बाळाची हत्या करण्यासारखेच आहे.—निर्गम २०:१३; २१:२२, २३.
पण समजा, प्रसूतीच्या वेळी तातडीचा प्रसंग येतो आणि त्या वेळेला जोडप्याला, आईला वाचवायचे की बाळाला, हे ठरवावे लागते तेव्हा काय? अशा वेळी, कोणाचा जीव वाचवायचा हे सर्वस्वी त्या जोडप्याला ठरवावे लागेल. *
७ बायबलमध्ये घटस्फोटाला अनुमती आहे का?
▪ उत्तर: बायबलमध्ये घटस्फोटाला अनुमती दिलेली आहे. परंतु, विवाह संपुष्टात आणण्यासाठी येशूने केवळ एकच स्वीकारयोग्य कारण दिले. त्याने म्हटले: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या [विवाहबाह्य संबंधांच्या] कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो.”—मत्तय १९:९.
फसवणूक व विश्वासघाताने घेतलेल्या घटस्फोटाची यहोवाला घृणा वाटते. जे आपल्या विवाह सोबत्याला, क्षुल्लक कारणासाठी, खासकरून दुसरा साथीदार मिळवण्याच्या हेतूने घटस्फोट देतात अशांना तर तो वैयक्तिक रीत्या जाब विचारणार आहे.—मलाखी २:१३-१६; मार्क १०:९.
८ समलैंगिकतेला देवाची मान्यता आहे का?
▪ उत्तर: बायबलमध्ये व्यभिचाराचा अगदी कडक शब्दांत निषेध करण्यात आला आहे; यात समलैंगिक संबंधांचादेखील समावेश होतो. (रोमकर १:२६, २७; गलतीकर ५:१९-२१) अशा संबंधांना देव कधीही मान्यता देणार नाही, याविषयी बायबलमध्ये अगदी ठामपणे सांगण्यात आलेले आहे; पण आपल्याला हेही माहीत आहे, की “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
खरे ख्रिस्ती समलैंगिक संबंधांचे समर्थन करत नसले तरीसुद्धा, ते सर्व लोकांना दया दाखवतात. (मत्तय ७:१२) आपण “सर्वांस मान” दिला पाहिजे, अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो. त्यामुळे खरे ख्रिश्चन समलैंगिकांचा द्वेष करत नाहीत.—१ पेत्र २:१७.
९ फोन सेक्स, “सेक्सटिंग” किंवा सायबर सेक्स हे चूक आहे का?
▪ उत्तर: फोन सेक्समध्ये, सेक्सबद्दलच्या अयोग्य गोष्टी बोलणे किंवा फोनवरचे उघड, उन्मत्त एसएमएस वाचणे समाविष्ट आहे. इतरांना कामुक चित्रे व अश्लील संदेश पाठवण्यासाठी मोबाईल फोनचा उपयोग करण्याला “सेक्सटिंग” म्हणतात. आणि सायबर सेक्समध्ये, इंटरनेटवर कामुक गोष्टींवर चर्चा करणे समाविष्ट आहे.
आधुनिक दिवसांत चालणाऱ्या या गोष्टींबद्दल बायबलमध्ये विशिष्टपणे काही सांगण्यात आलेले नाही. पण त्यात, “जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये, तसेच अमंगळपण बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो,” असे सांगितले आहे. (इफिसकर ५:३, ४) फोन सेक्स, “सेक्सटिंग” व सायबर सेक्स या गोष्टींवरून सेक्सबद्दलचा विकृत दृष्टिकोन दिसून येतो व लोकांना लग्नाच्या चाकोरीबाहेर लैंगिक सुखाचा आनंद लुटण्याचे प्रोत्साहन देतात. आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण करण्यास मदत करण्याऐवजी या गोष्टी आपल्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यावर भर देतात.
१० हस्तमैथुनाबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे?
▪ उत्तर: लैंगिक इच्छा जागृत करण्यासाठी व त्या पूर्ण करण्यासाठी मुद्दामहून लैंगिक अवयवांना चोळणे म्हणजे हस्तमैथुन. बायबलमध्ये हस्तमैथुनाचा विशिष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नसला तरी, ख्रिश्चनांना अशी आज्ञा देण्यात आली आहे: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, . . . कुवासना . . . जिवे मारा.”—कलस्सैकर ३:५.
हस्तमैथुनामुळे सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन विकृत व स्वार्थी होतो. या सवयीपासून मुक्त होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्यांना देव “पराकोटीचे सामर्थ्य” देण्याचे वचन देतो, असे बायबलमध्ये म्हटले आहे.—२ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:१३. (w११-E ११/०१)
[तळटीपा]
^ परि. 11 पोर्निया हा शब्द, अशा कार्यांनाही लागू होतो जी, मानवी लैंगिक अवयवांची निर्मिती करण्यामागे असलेल्या देवाच्या मूळ उद्देशाच्या विपरीत आहेत; उदाहरणार्थ, जारकर्म, समलैंगिकता व पशूगमन.
^ परि. 19 नसबंदीविषयी बायबलचा काय दृष्टिकोन आहे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कृपया टेहळणी बुरूज १५ जून, १९९९ पृष्ठे २७-२८ वरील “वाचकांचे प्रश्न” पाहा.
^ परि. 22 बलात्कार झालेल्या स्त्रीने गर्भपात करायचा किंवा नाही याबद्दलची अधिक माहिती यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले gbr१३-२ १३/२ पृ. ११ हे सावध राहा! माहितीपत्रक पाहावे.