व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नेहमीच्या तक्रारींवर उपाय

नेहमीच्या तक्रारींवर उपाय

नेहमीच्या तक्रारींवर उपाय

विवाह नेहमी सुरळीत चालेल, असा दावा बायबल करत नाही. पती-पत्नीला त्यांच्या वैवाहिक “जीवनामध्ये अनेक समस्या” येतील, असे लिहिण्यास देवाने प्रेषित पौलाला प्रेरणा दिली. (१ करिंथकर ७:२८, सुबोध भाषांतर) पण पती-पत्नी या समस्या कमी करण्याकरता व एकमेकांना आनंदित करण्याकरता बरेच काही करू शकतात. पुढे, पती व पत्नी यांच्या नेहमीच्या तक्रारी मांडल्या आहेत व या तक्रारींवर बायबलमधील तत्त्वांचा उपाय सुचवण्यात आला आहे, ज्यांचा अवलंब केल्याने पती-पत्नीला मदत होऊ शकते.

तक्रार:

“आम्ही दोघं एकमेकांपासून दुरावत चाललो आहोत.”

बायबल तत्त्व:

“जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे.”फिलिप्पैकर १:१०.

या वचनानुसार, तुमचा विवाह जीवनातील श्रेष्ठ अर्थात अधिक महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. त्याला तुम्ही प्राधान्य दिलेच पाहिजे. तेव्हा तुमच्या वेळापत्रकामुळे, तुमचा सोबती तुमच्याविरुद्ध अशी तक्रार करत आहे का, ते पाहा. संसाराच्या दैनंदिन जबाबदाऱ्‍या पेलताना, तुम्ही एक-एकटे जीवन जगू नका. नोकरीमुळे किंवा इतर टाळता न येणाऱ्‍या परिस्थितींमुळे कधीकधी तुम्हाला तात्पुरत्या काळासाठी एकमेकांची साथ लाभणार नाही. पण ज्यावर तुम्ही नियंत्रण करू शकता—जसे की, एखादा छंद जोपासण्याकरता किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर तुम्ही घालवत असलेला वेळ—अशा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही मर्यादा घातलीच पाहिजे.

पण काही पती-पत्नी, आपल्या सोबत्याबरोबर वेळ घालवू इच्छित नसल्यामुळे स्वतःहूनच ओव्हरटाईम करण्याचे निवडतात किंवा कुठल्यातरी छंदात स्वतःला गुंतवून घेतात. असे पती-पत्नी आपल्या सोबत्यापासून नव्हे तर त्यांच्या विवाहातील समस्यांपासून दूर पळत असतात. तुम्ही किंवा तुमचा सोबती या वर्गात मोडत असाल तर, तुम्ही मूळ समस्या ओळखून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवल्यानेच तुम्ही दोघेही पूर्णार्थाने “एकदेह” होऊ शकाल.—उत्पत्ति २:२४.

काहींनी या सल्ल्याचा अवलंब कसा केला: ॲन्ड्रू * व तान्जे हे ऑस्ट्रेलियात राहतात. त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत. ॲन्ड्रू म्हणतात: “खूप वेळ पर्यंत कामात व्यस्त राहणं किंवा मित्रांसोबत मनोरंजनात खूप वेळ घालवणं विवाहासाठी घातक ठरू शकतं, हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आम्ही दोघं पती-पत्नी एकमेकांबरोबर बोलण्यासाठी, आपल्या भावना बोलून दाखवण्यासाठी वेळ काढतो.”

डेव्ह आणि जेन अमेरिकेत राहतात व त्यांच्या लग्नाला २२ वर्ष झाली आहेत. दररोज संध्याकाळी अर्धा तास ते दोघेही दिवसभरात जे जे झालं ते, किंवा आपले विचार एकमेकांना सांगण्यासाठी वेळ काढतात. जेन म्हणतात: “हा ‘अर्धा तास’ खास आम्हा दोघांचा असतो. या वेळेत आम्ही दुसरं काहीही करत नाही, फक्‍त एकमेकांबरोबर बोलत बसतो.”

तक्रार:

“या नात्यातून मला जे मिळालं पाहिजे, ते आता मिळत नाहीए.”

बायबल तत्त्व:

“कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे.”१ करिंथकर १०:२४.

एका व्यक्‍तीला जर, विवाहातून आपल्याला काय मिळत आहे याचीच जास्त चिंता लागून राहिली, तर ती कधीच खऱ्‍या अर्थाने आनंदी होणार नाही. या व्यक्‍तीने कितीही लग्न केलीत तरी ती कधीही सुखी होणार नाही. विवाह सोबती जेव्हा घेण्यापेक्षा देण्यावर आपले लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्यांचा विवाह सफल होतो. कारण, “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे,” असे येशूने म्हटले होते.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

काहींनी या सल्ल्याचा अवलंब कसा केला: मारिया आणि मार्टिन यांच्या लग्नाला ३९ वर्ष झाली आहेत. ते मेक्सिकोत राहतात. पण, त्यांच्या लग्नात कधी वादच झाले नाहीत असे नाही. एक प्रसंग दोघांच्याही मनात अजूनही ताजा आहे. मारिया म्हणते: “आमच्या दोघांत कडाक्याचं भांडण चाललं होतं. आणि मार्टिनचा अपमान होईल असं काहीतरी मी बोलून गेले. तो माझ्यावर खूप भनकला. नंतर मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, की मी असं रागाच्या भरात बोलून गेले होते. पण तो माझे ऐकेना.” मार्टिन म्हणतात: “आमच्यात हा वाद चालला असताना मी विचार करू लागलो, की एकत्र राहण्यात काही फायदा नाही. कुठं सोडवत बसता वाद.”

मार्टिनला आदर हवा होता. आणि, आपल्याला कोणीतरी समजून घ्यावे, असे मारियाला वाटत होते. पण दोघांनाही जे हवे होते ते मिळत नव्हते.

मग त्यांनी त्यांच्यातला वाद कसा सोडवला? मार्टिन म्हणतात: “मी शांत डोक्यानं विचार केला. आणि आम्ही दोघांनी, एकमेकांना आदर दाखवला पाहिजे, दया दाखवली पाहिजे, याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करायचं ठरवलं. लग्न होऊन आता बरीच वर्षं झाली आहेत व या दरम्यान आम्ही एक गोष्ट शिकलो आहोत. ती म्हणजे, वाद निर्माण होतात तेव्हा, देवाला प्रार्थना केली आणि बायबलमधील सल्ल्याचे पालन केले की वाद सोडवण्यासाठी आपल्याला बुद्धी मिळते.”—यशया ४८:१७, १८; इफिसकर ४:३१, ३२.

तक्रार:

“माझा पती त्याची (अथवा माझी पत्नी तिची) जबाबदारी हवी तशी पार पाडत नाही.”

बायबल तत्त्व:

“प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.”रोमकर १४:१२.

एकच सोबती जर संसार सावरायचा प्रयत्न करत असेल तर तो विवाह रडत-कढत चालेल, हे वेगळे सांगायला नको. आणि त्यातल्या त्यात, पती-पत्नी दोघंही जर निष्काळजी असतील, एकमेकांवर नुसता दोष लावत असतील तर त्यांचा विवाह तर पार बिघडून जाईल.

तुमच्या सोबत्यानं काय करावे व काय करू नये याचाच फक्‍त तुम्ही विचार करत राहिलात तर, तुम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाही. आणि खासकरून तुमच्या जबाबदाऱ्‍या टाळण्याकरता तुम्ही जर तुमच्या सोबत्याचे कारण देत असाल तर, तुमच्या विवाहात तुम्ही मुळीच आनंदी राहणार नाही. दुसरीकडे पाहता, तुम्ही जर एक चांगला पती होण्याचा किंवा चांगली पत्नी होण्याचा प्रयत्न केला तर तुमचा विवाह सुधारू शकतो. (१ पेत्र ३:१-३) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असे करण्याद्वारे तुम्ही देवाला दाखवून देता, की त्याने स्थापित केलेल्या विवाह व्यवस्थेचा तुम्ही आदर करता. हे पाहून त्याला निश्‍चित्तच खूप आनंद होईल.—१ पेत्र २:१९.

काहींनी या सल्ल्याचा अवलंब कसा केला: कोरियात राहणारे किम आणि तिचे पती यांच्या लग्नाला ३८ वर्ष झाली आहेत. किम म्हणतात: “कधीकधी ह्‍यांना माझ्या कुठल्यातरी वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो आणि ते माझ्याबरोबर बोलायचं सोडून देतात. त्यांनी हा अबोला का धरला आहे, हे मला माहीत नसतं. माझ्यावरचं त्यांचं प्रेम आटत चाललंय असं मला वाटतं. आणि कधीकधी मग मी असा विचार करते, की ‘मला जर ते समजून घेत नाहीत तर मी त्यांना समजून घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा ते तरी कशी करू शकतात बरं?’”

अशा वेळी किम, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर किंवा त्यांचे पती त्यांना कसे वागवत आहे यावर जास्त विचार करत बसत नाही. त्या म्हणतात: “फुगून बसण्याऐवजी मीच पुढाकार घेऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न करते. यामुळे आम्ही दोघंही शांतपणे बसून जे काही झालं त्यावर बोलू शकतो.”—याकोब ३:१८.

तक्रार:

“माझी बायको माझ्या अधीन नाही.”

बायबल तत्त्व:

“प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे.”१ करिंथकर ११:३.

माझी बायको माझ्या अधीन नाही, असे ज्या नवऱ्‍याला वाटते त्याने आधी, तो त्याचा मस्तक असलेल्या येशू ख्रिस्ताच्या अधीन आहे का हे पाहिले पाहिजे. येशूच्या उदाहरणाचे पालन करून नवरा त्याची अधीनता व्यक्‍त करू शकतो.

“पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (इफिसकर ५:२५) येशूने कधीही त्याच्या शिष्यांवर “अधिकार” गाजवला नाही. (मार्क १०:४२-४४) त्याने त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आणि आवश्‍यकता वाटली तेव्हा त्यांची सुधारणूक केली. पण तो त्यांच्याशी कधीही कठोरतेने वागला नाही. तो त्यांच्याबरोबर नेहमी दयाळूपणे वागला आणि त्यांच्या कमतरतांची जाणीव बाळगून त्याने त्यांच्याकडून कधीही, ते जितके करू शकतात त्यापेक्षा अधिक अपेक्षा बाळगल्या नाहीत. (मत्तय ११:२९, ३०; मार्क ६:३०, ३१; १४:३७, ३८) त्याने नेहमी स्वतःच्या इच्छांपेक्षा आपल्या प्रेषितांच्या इच्छांना प्राधान्य दिले.—मत्तय २०:२५-२८.

पतीने स्वतःला असे विचारले पाहिजे, ‘मस्तकपद व स्त्रिया यांच्याबाबतीत माझा दृष्टिकोन, स्थानिक रीतीरिवाजानुसार आहे की बायबलमधील सल्ल्यानुसार व उदाहरणांनुसार आहे?’ उदाहरणार्थ, एका पत्नीला नवऱ्‍याचे मत पटत नाही तेव्हा ती ठामपणे परंतु आदराने स्वतःचे मत व्यक्‍त करते, तेव्हा अशा पत्नीविषयी तुम्ही काय विचार कराल? बायबलमध्ये अब्राहामाची पत्नी सारा हिच्याकडे, नवऱ्‍याला अधीनता दाखवणारी स्त्री म्हणून पाहिले जाते. (१ पेत्र ३:१, २, ६) परंतु, जेव्हा उचित होते तेव्हा म्हणजे, कुटुंबावरील धोका अब्राहाम पाहू शकत नव्हता तेव्हा तिने तिचे मत व्यक्‍त केले.—उत्पत्ति १६:५; २१:९-१२.

तेव्हा अब्राहामने तिला दरडावून शांत बसवले नाही. तो जुलूमी नव्हता. तसेच, जो पती बायबलमधील सल्ल्याचे पालन करतो तो आपल्या पत्नीला धाक-दपटशा दाखवणार नाही; तो सांगेल तसेच तिने वागले पाहिजे असा तिच्यावर जोर करणार नाही. तर, आपल्या मस्तकपदाचा दयाळूपणे उपयोग करून तो तिचा आदर मिळवेल.

काहींनी या सल्ल्याचा अवलंब कसा केला: जेम्स इंग्लंडमध्ये राहतो. त्याच्या लग्नाला आठ वर्ष झाली आहेत. तो म्हणतो: “बायकोशी सल्लामसलत केल्याविना कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा नाही, हे मी अजूनही शिकत आहे. मी स्वतःचाच विचार करत नाही. तर, तिच्या गरजांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो.”

अमेरिकेत राहणारे जॉर्ज यांच्या लग्नाला ५९ वर्ष झाली आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे: “मी माझ्या पत्नीला, माझ्यापेक्षा कनिष्ठ समजत नाही तर, एक हुशार व कर्तबगार सोबती समजतो.”—नीतिसूत्रे ३१:१०.

तक्रार:

“माझा नवरा पुढाकार घेत नाही.”

बायबल तत्त्व:

“सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.”नीतिसूत्रे १४:१.

तुमचा पती निर्णय घेण्यात कुचराई करत असेल किंवा मग घर सांभाळण्यात पुढाकार घेत नसेल तर तुमच्यापुढे तीन पर्याय आहेत. (१) तुम्ही सतत त्याची उणी-दुणी त्याला दाखवत राहू शकता किंवा (२) कुटुंबाचा मस्तक म्हणून असलेली त्याची भूमिका तुम्ही तुमच्या हातात घेऊ शकता किंवा, (३) त्याच्या परीने तो जे काही करतो त्याची तुम्ही मनापासून प्रशंसा करू शकता. पहिल्या दोन पर्यायांपैकी तुम्ही कोणताही एक पर्याय निवडलात तर, तुम्ही स्वतःच्याच हातांनी तुमचे घर पाडून टाकाल. पण तिसरा पर्याय निवडल्याने, तुम्ही तुमचा विवाह आणखी मजबूत करू शकाल.

पुष्कळ पुरुषांना आपल्या पत्नीकडून प्रेमापेक्षा आदराची जास्त अपेक्षा असते. त्यामुळे, तुम्ही जर तुमच्या कार्यांतून दाखवून दिले, की तुम्ही तुमच्या पतीचा आदर करता, कुटुंबात पुढाकार घेण्याच्या बाबतीत तो करत असलेले प्रयत्न उपयोगी ठरत आहेत व तुम्हाला त्याची प्रशंसा वाटते हे तुम्ही त्याला बोलून दाखवले तर तो कदाचित त्याच्या भूमिकेत सुधारणा करू शकेल. अर्थात, काही वेळा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवर तुम्ही त्याच्याशी सहमत होणार नाही. मग अशा वेळी, तुम्ही दोघांनी त्या विषयांवर निवांत बसून चर्चा केली पाहिजे. (नीतिसूत्रे १८:१३) पण तुम्ही ज्या प्रकारचे शब्द वापराल, ज्या आवाजात तुम्ही तुमचे मत व्यक्‍त कराल त्याने एकतर तुमचा विवाह मोडू शकतो किंवा मजबूत होऊ शकतो. (नीतिसूत्रे २१:९; २७:१५) तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते आदराने सांगा. अशाने तुम्हाला जे हवे आहे ते, अर्थात तुमच्या पतीने पुढाकार घेण्यात कुचराई करू नये, असे जे तुम्हाला वाटत असते, तसेच होईल.

काहींनी या सल्ल्याचा अवलंब कसा केला: मिशेल, अमेरिकेत राहते. तिच्या लग्नाला ३० वर्ष झाली आहेत. ती असे म्हणते: “आमच्या आईनं एकटीच्या जिवावर मला आणि माझ्या बहिणींना सांभाळल्यामुळं, ती अतिशय ठाम मताची व स्वावलंबी बाई बनली. मीही कधीकधी तिच्यासारखेच गुण दाखवते. त्यामुळं, पतीला योग्य अधीनता दाखवण्याच्या बाबतीत मला सारखा प्रयत्न करावा लागतो. जसं की, कुठल्याही बाबतीत स्वतःच निर्णय घेण्याऐवजी, मी नवऱ्‍याशी त्यावर बोलण्यास शिकले आहे.”

रेचल आणि मार्क यांचे लग्न २१ वर्षांपूर्वी झाले होते. ते ऑस्ट्रेलियात राहतात. रेचल ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली होती त्याचा तिच्यावरही परिणाम झाला होता. ती आठवून सांगते: “माझी आई माझ्या वडिलांच्या कधीच अधीन नव्हती. वादावादी आणि अपमानास्पद बोलणं हे तर रोजचंच झालं होतं. माझं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला मीही आईसारखीच वागत होते. पण, जसजशी वर्ष सरत गेली तसतसे मी, पतीला आदर दाखवण्याच्या बाबतीत असलेला बायबलमधील सल्ला माझ्या जीवनात लागू केल्याने किती फायदा होतो, हे पाहू लागले. आता आम्ही दोघंही अतिशय आनंदी आहोत.”

तक्रार:

“माझ्या जोडीदाराच्या सवयींमुळं माझं डोकं फिरतं.”

बायबल तत्त्व:

“एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा.”कलस्सैकर ३:१३.

लग्न व्हायच्या आधी तुम्हाला तुमच्या भावी जोडीदाराचे फक्‍त चांगलेच गुण दिसत होते; त्याच्यातील दुर्गुण कदाचित तुम्हाला दिसलेही नसतील. आता लग्न झाल्यावरही तुम्ही असेच करू शकता का? हे खरे आहे, की कधीकधी तुमचा जोडीदार असे काहीतरी करत असेल ज्यामुळे तुम्हाला तिचा किंवा त्याचा खरोखरच राग येत असेल. तरीपण तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘माझ्या जोडीदाराच्या कोणत्या गुणावर—चांगल्या की वाईट गुणावर—मी जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे?’

इतरांतील दुर्गुणांकडे दुर्लक्ष करणे किती महत्त्वाचे आहे हे समजण्याकरता येशूने एक चपखल उदाहरण दिले. त्यावेळी त्याने असे विचारले: “तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहातोस?” (मत्तय ७:३) कुसळ म्हणजे गवताचे किंवा धान्याचे बारीक टोक. आणि मुसळ म्हणजे घराचे छत ज्यावर टेकवले जाते असा एक जाडजूड लाकडी खांब. येशूला नेमके काय म्हणायचे होते? तो म्हणतो: “पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.”—मत्तय ७:५.

हे उदाहरण देण्याआधी येशूने एक इशारा दिला जो खरोखरच विचार करण्याजोगा आहे. तो म्हणाला: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील.” (मत्तय ७:१, २) देवाने तुमच्या दोषांकडे—तुमच्या डोळ्यातील मुसळाकडे—दुर्लक्ष करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करण्यातच तुमचे हित आहे.—मत्तय ६:१४, १५.

काहींनी या सल्ल्याचा अवलंब कसा केला: जेनी इंग्लंडमध्ये राहते. नऊ वर्षांपूर्वी तिचे सायमनबरोबर लग्न झाले. ती म्हणते: “मी सारखी चिडचिड का करते त्याचं कारण माझ्या लक्षात आलं. माझा नवरा पुढच्या गोष्टींचं प्लॅनिंग करत नाही, शेवटच्या मिनिटापर्यंत थांबून राहतो. लग्नाच्या आधी मला त्याचा हा गुण खूप आवडायचा. तो किती पटकन निर्णय घेतो हे पाहून मी चाट पडायचे पण लग्नानंतर मात्र मला त्याच्या याच गुणाचा राग येऊ लागला, काय मजेशीर गोष्ट ना! नंतर मला जाणवलं, की माझ्यात पण कितीतरी दुर्गुण आहेत, जसं की मी खूप अधिकार गाजवते. त्यामुळे आम्ही दोघांनी आता एकमेकांच्या बारीकसारीक चुकांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे.”

आधी उल्लेख करण्यात आलेल्या मिशेलचा नवरा कर्ट म्हणतो: “तुम्ही जर तुमच्या जोडीदाराच्या दुर्गुणांकडेच बघत राहिलात तर त्याच्या/तिच्या चुका तुम्हाला जास्तच मोठ्या दिसतील. मिशेलच्या ज्या चांगल्या गुणांकडं पाहून मी तिच्या प्रेमात पडलो होतो, ते गुण पाहायचं मी ठरवलं आहे.”

सुखी संसाराचा मंत्र

या काही उदाहरणांवरून कळते, की विवाहात येणाऱ्‍या समस्या ह्‍या टाळता येत नाहीत पण, त्यांच्यावर मात करता येत नाही, असेही नाही. मग सुखी संसाराचा मंत्र काय आहे? देवावर प्रेम करायला लागा आणि त्याचे वचन बायबल यात असलेल्या सल्ल्याचे पालन करण्याची तयारी दाखवा.

अलीक्स आणि इटोहान नायजेरियात राहतात. त्यांच्या लग्नाला २० पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. सुखी संसाराचा मंत्र काय आहे हे त्यांना माहीत झाले आहे. अलीक्स म्हणतो: “एखाद्या जोडप्यानं बायबलमधील तत्त्वांचं पालन केलं, की ते लग्नात येणाऱ्‍या कोणत्याही समस्यांवर मात करू शकतात, असं माझ्या पाहण्यात आलं आहे.” त्यांची बायको इटोहान म्हणते: “एकत्र व नियमितरीत्या प्रार्थना करणं, एकमेकांवर अगदी खऱ्‍या मनानं प्रेम करणं, एकमेकांबरोबर धीरानं वागणं याबद्दल बायबलमध्ये असलेल्या सल्ल्याचं पालन करणं खरोखरच किती महत्त्वाचं आहे हे आम्ही दोघंही पाहू शकतो. त्यामुळे, लग्नाच्या सुरुवातीला आमच्यात जितक्या समस्या होत्या त्या आता बऱ्‍यापैकी कमी झाल्या आहेत.”

देवाचे वचन बायबल यात दिलेल्या व्यावहारिक सल्ल्याचा तुमच्या कुटुंबाला फायदा कसा होऊ शकतो, याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी आहे का? तर मग, यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा आणि त्यांना, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातून या विषयावर चर्चा करायला सांगा. * (w११-E ०२/०१)

[तळटीपा]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ कौटुंबिक जीवन आनंदी कसे बनवायचे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर या पुस्तकाचा १४ वा अध्याय पाहा. यहोवाच्या साक्षीदारांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

[४ पानांवरील चित्र]

आम्ही एकमेकांसाठी वेळ काढतो का?

[५ पानांवरील चित्र]

मला जितके मिळते त्याच्यापेक्षा अधिक देण्याचा मी प्रयत्न करतो का?

[६ पानांवरील चित्र]

वाद सोडवण्यासाठी मी पुढाकार घेतो/घेते का?

[७ पानांवरील चित्र]

कोणताही निर्णय घेण्याआधी मी माझ्या बायकोला तिचे मत विचारतो का?

[९ पानांवरील चित्र]

मी माझ्या जोडीदाराच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देते का?