सर्वधर्मसमभाव या कल्पनेविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा काय दृष्टिकोन आहे?
वाचक विचारतात . . .
सर्वधर्मसमभाव या कल्पनेविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा काय दृष्टिकोन आहे?
▪ वर्ल्ड ख्रिश्चन एन्सायक्लोपिडियानुसार जगभरात सुमारे “१०,००० विभिन्न धर्म आहेत.” पण धर्मा-धर्मांमध्ये होत असलेल्या झगड्यांमुळे आजवर पुष्कळ हानी झाली आहे. म्हणून, अनेक उपासकांना सर्वधर्मसमभाव ही कल्पना रुचते. सर्वधर्मसमभाव बाळगल्यास, या विभाजित जगात शांती व ऐक्य निर्माण होऊ शकेल, असा त्यांचा समज आहे.
आपण ऐक्याने राहावे, असे उत्तेजन बायबलमध्ये दिले आहे. प्रेषित पौलाने ख्रिस्ती मंडळीची तुलना मानवी शरीराशी केली ज्यातील प्रत्येक अंग ‘जोडलेले व एकत्र बांधलेले आहे.’ (इफिसकर ४:१६, ईझी टू रीड भाषांतर) तसेच, प्रेषित पेत्राने आपल्या सहउपासकांना “तुम्ही सर्व एकचित्त . . . व्हा,” असा आग्रह केला.—१ पेत्र ३:८.
आरंभीचे ख्रिस्ती राहत असलेल्या जगात अनेक संस्कृतींचे व धर्मांचे लोक होते. खऱ्या ख्रिस्ती धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर ऊठबस करण्याविषयी पौलाने असे विचारले: “विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?” यानंतर त्याने “त्यांच्यामधून निघा” अशी ताकीद त्यांना दिली. (२ करिंथकर ६:१५, १७) येथे पौल, सर्वधर्मसमभाव या कल्पनेचा विरोध करत होता हे स्पष्ट आहे. तो का विरोध करत होता?
पौलाला असे सांगायचे होते, की खरा ख्रिस्ती आणि खोटा ख्रिस्ती यांनी एकत्र मिळून देवाची उपासना करायचा प्रयत्न केला तर हा उपासना प्रकार विजोड ठरू शकतो, व देव ती उपासना स्वीकारणार नाही. (२ करिंथकर ६:१४) यामुळे ख्रिस्ती विश्वासाला तडा जाण्याची शक्यता होती. पौलाला सहउपासकांबद्दल काळजी वाटत होती. त्याची तुलना आपण एका वडिलांशी करू शकतो ज्यांना, त्यांच्या परिसरातील वाईट वळणाच्या मुलांविषयी माहीत असते. या वडिलांना आपल्या मुलांची काळजी असल्यामुळे ते सुज्ञपणे, आपल्या मुलाने कोणाबरोबर खेळावे व कोणाबरोबर खेळू नये याबाबतीत बंधने लादतील. वडिलांनी लादलेली बंधने कदाचित मुलांना आवडणार नाहीत. पण, आपल्या मुलांना त्या वाईट मुलांपासून वेगळे ठेवल्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत नाहीत. तसेच, इतर धर्मांपासून खरे ख्रिश्चन जर वेगळे राहिले तर त्यांच्यावर हानीकारक प्रथांचा परिणाम होणार नाही, हे पौलाला माहीत होते.
ख्रिश्चनांनी इतर धर्मांपासून वेगळे राहिले पाहिजे, असे सांगून पौल येशूचे अनुकरण करत होता. येशूने लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले असले, तरीसुद्धा सर्व धर्म सारखेच आहेत, असा त्याचा विश्वास नव्हता. येशू पृथ्वीवर सेवा करत असताना, शास्त्री व परूशी यांसारखे अनेक धार्मिक गट सक्रिय होते. पण येशूने आपल्या अनुयायांना “परूशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.” (मत्तय १६:१२) खरे तर, येशूचा विरोध करण्यासाठी, इतकेच नव्हे तर त्याला ठार मारण्याचा कट रचण्यासाठी या धार्मिक गटांची युती तयार झाली होती.
आज आपल्या दिवसाविषयी काय? सर्वधर्मसमभाव या कल्पनेविषयी बायबलमध्ये दिलेला इशारा आजही लागू होतो का? होय. एखाद्या भांड्यात तेल आणि पाणी टाकल्यावर ते जसे एकजीव होऊच शकत नाहीत तसेच सर्वधर्मसमभाव ही कल्पना बाळगून वेगवेगळ्या धार्मिक विश्वासांचा मिलाफ होणे शक्यच नाही. उदाहरणार्थ, विविध धर्माचे लोक शांतीसाठी प्रार्थना करायला एकत्र जमतात तेव्हा ते कोणत्या देवाला विनंती करत असतात? चर्चचे लोक मानत असलेल्या त्रैक्याच्या देवाला, हिंदूंच्या ब्रम्हाला, बुद्धाला की आणखी कोणा दुसऱ्या देवाला?
संदेष्टा मीखा याने असे भाकीत केले, की “शेवटल्या दिवसात” सर्व राष्ट्रांतील लोक म्हणतील: “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” (मीखा ४:१-४) तेव्हा, संपूर्ण जगात शांती व ऐक्य, सर्व धर्म सारखेच आहेत या कल्पनेमुळे नव्हे तर सर्व लोकांनी एकच खरा विश्वास स्वीकारल्यामुळे निर्माण होईल. (w१०-E ०६/०१)
[१३ पानांवरील चित्र]
२००८ साली, सर्वधर्मसमभाव परिषदेसाठी जमलेले जगातील प्रमुख धर्मांचे सदस्य
[चित्राचे श्रेय]
REUTERS/Andreas Manolis