व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विधवा आणि विधूर त्यांना काय हवे असते? तुम्ही त्यांना मदत कशी करू शकता?

विधवा आणि विधूर त्यांना काय हवे असते? तुम्ही त्यांना मदत कशी करू शकता?

विधवा आणि विधूर त्यांना काय हवे असते? तुम्ही त्यांना मदत कशी करू शकता?

जया आपल्या लहानशा घराच्या स्वयंपाकघरातील मंद प्रकाशात नेहमीप्रमाणे ताटे वाढते. जगण्यासाठी तिने काहीतरी खाल्लेच पाहिजे. अचानक तिचे लक्ष, तिने वाढलेल्या दोन ताटांकडे जाते . . . आणि तिचा बांध फुटतो. सवयीप्रमाणे तिने दोन ताटे वाढली होती! तिच्या नवऱ्‍याला जाऊन दोन वर्षे उलटली होती.

जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर मागे राहिलेल्या जोडीदारावर जो दुःखाचा डोंगर कोसळतो ते, ज्यांना याचा अनुभव आलेला नाही त्यांना समजणे कठीण आहे. खरे तर मानवाचे मन हळूहळू ही भयंकर वास्तविकता पचवू लागते. बहात्तर वर्षांच्या प्रमिलाचे मन कितीतरी दिवस, तिच्या पतीचा झालेला अचानक मृत्यू स्वीकारायला तयार नव्हते. ती म्हणते: “मला हे खरं वाटतच नव्हतं. ते पुन्हा या घरात येणार नाहीत, ही कल्पनाच मला करवत नव्हती.”

ज्यांचा हात किंवा पाय कापावा लागला आहे, अशा रुग्णांना कधीकधी त्यांचा गमावलेला हात किंवा पाय अजूनही आहे असा “भास” होतो. तसेच, दुःखाने व्याकूळ झालेल्या जोडीदारांना कधीकधी, आपल्या प्रिय सोबत्याला गर्दीत पाहिल्याचा “भास” होतो; किंवा कधीकधी ते त्यांच्याबरोबर बोलत असतात, पण नंतर त्यांना आपला जोडीदार नसल्याची जाणीव होते.

ज्यांनी त्यांचा जोडीदार गमावला आहे त्यांच्याशी कसे बोलायचे, काय बोलायचे हे सहसा त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना समजत नाही. तुम्ही कोणाला ओळखता का ज्यांचा जोडीदार मरण पावला आहे? तुम्ही त्यांना आधार कसा देऊ शकता? त्यांच्यावर ओढवलेल्या या दुःखाच्या काळात त्यांना मदत करण्याकरता तुम्हाला काय माहीत असणे आवश्‍यक आहे? शोकग्रस्त व्यक्‍तीला पुन्हा एकदा हळूहळू जीवनाचा आनंद लुटण्यास तुम्ही कशी मदत करू शकता?

आपण करू नयेत अशा गोष्टी

आपल्या प्रिय व्यक्‍तीवर कोसळलेले दुःख पाहून मित्रजनांना व नातेवाईकांनाही यातना होतात व चांगल्या हेतूने ते कदाचित शोकग्रस्त व्यक्‍तीला तिचा शोक आवरण्यास सांगतील. पण, ७०० विधवांचा व विधूरांचा सर्व्हे घेतलेल्या एका संशोधकाने असे लिहिले: “शोक करण्याचा एक ‘उचित’ अवधी वगैरे काही नसतो.” तेव्हा, शोकग्रस्त व्यक्‍तीच्या दुःखावर आवर घालण्याऐवजी, तिला किंवा त्याला तिचे दुःख व्यक्‍त करण्यास वेळ द्या.—उत्पत्ति ३७:३४, ३५; ईयोब १०:१.

अंत्यविधीशी संबंधित असलेल्या गोष्टी करण्यास तुम्ही मदत करू शकता पण, सर्व गोष्टी तुम्ही ठरवल्या पाहिजेत, असा ग्रह करून घेऊ नका. ४९ वर्षांचे पुष्कर यांची पत्नी वारली तेव्हा ते म्हणाले: “अंत्यविधीच्या संबंधाने असलेल्या व्यवस्था करायला मला ज्यांनी मदत केली त्यांचा मी आभारी आहे. पण काही निर्णय त्यांनी मला घेऊ दिले म्हणून आनंद वाटतो. कारण, माझ्या पत्नीचा अंत्यविधी माझ्या इच्छेनुसार सुरळीत व्हावा, तिला आदर दाखवण्याची हीच माझी शेवटची संधी होती, असं मला वाटत होतं.”

होय, अंत्यविधीच्या संबंधाने दिल्या जाणाऱ्‍या मदतीबद्दल बहुतेक लोक आभार व्यक्‍त करतात. जसे की, ६८ वर्षीय नलिनी म्हणतात: “अंत्यविधीची व्यवस्था करणं, लागणाऱ्‍या कागदपत्रांचा व्यवहार सांभाळणं वगैरे सारखी कामं कठीण होती, कारण माझं तेव्हा डोकंच चालत नव्हतं. बरं झालं, माझा मुलगा आणि सून माझ्या जवळ होते, त्यांनी मला बरीच मदत केली.”

तसेच, मृत व्यक्‍तीविषयी बोलण्याचे टाळू नका. आधी उल्लेख करण्यात आलेल्या प्रमिलाने म्हटले: “माझ्या मित्रांनी मला खरंच खूप आधार दिला. पण, पुष्कळ जण माझा नवरा सुहास यांच्याविषयी बोलायला कचरत असल्याचं मला जाणवलं. जणू काय, सुहास हयातच नव्हते. त्याचं मला जरा वाईट वाटलं.” जोडीदार गमावलेल्या व्यक्‍ती हळूहळू त्यांच्या मृत जोडीदाराविषयी बोलायला लागतील. मृत व्यक्‍तीची एखादी प्रेमळ कृती किंवा तिच्याबद्दलची एखादी चांगली गोष्ट तुम्हाला आठवते का? मग ती सांगा; मृत व्यक्‍तीच्या जोडीदाराला वाईट वाटेल, असे समजून ते सांगायचे टाळू नका. तुमच्या आठवणी सांगायला काही हरकत नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर मृत व्यक्‍तीबद्दल तुम्हाला काय आवडायचे, ती कशी बोलायची किंवा वागायची, ते सांगा. यामुळे, मागे राहिलेल्या जोडीदाराला जाणवेल, की इतरांनाही त्याच्याप्रमाणेच दुःख झाले आहे.—रोमकर १२:१५.

शोकग्रस्त व्यक्‍तीला मदत देताना तिला भाषण देऊ नका. पटापट निर्णय घ्यायचा दबाव तिच्यावर आणू नका. * अशा वेळी समंजसपणा दाखवा आणि स्वतःला विचारा: ‘माझा मित्र किंवा नातेवाईक जीवनाच्या या सर्वात खडतर काळातून जात असताना मी तिला कशा प्रकारे मदत करू शकतो?’

तुम्ही काय करू शकता

जिचे दुःख अजूनही ओलेच आहे अशा व्यक्‍तीला आपण दिलेली व्यावहारिक मदत कदाचित आवडेल. तुम्ही स्वयंपाक करू शकाल का, किंवा आलेल्या नातेवाईकांची राहण्याची सोय करू शकाल का किंवा शोकग्रस्त व्यक्‍तीजवळ राहू शकाल का?

दुःख आणि एकाकीपणा यांना तोंड देण्याची पुरुषांची व स्त्रियांची पद्धत वेगळी असते, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. जसे की, जगाच्या काही भागांमध्ये, निम्म्यापेक्षा अधिक पुरुष, आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यावर एकदीड वर्षांतच दुसरे लग्न करतात; पण, फार कमी स्त्रिया दुसरे लग्न करतात. हा फरक का?

लोकांचा असा समज आहे, की पुरुष त्यांच्या शारीरिक व लैंगिक इच्छा तृप्त करण्यासाठी दुसरे लग्न करतात; पण ही गोष्ट नेहमीच बरोबर नाही. खरे तर, पतींची सहसा केवळ आपल्या पत्नीलाच आपल्या मनातील गोष्टी सांगायची प्रवृत्ती असते. त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्यावर त्यांना खूपच एकाकी वाटू लागते. पण, स्त्रियांच्याबाबतीत पाहता, त्यांच्या पतीचे मित्र त्यांना विसरून गेले असले तरी, त्या कोठूनही मानसिक आधार मिळवू शकतात. म्हणून, पत्नी गमावलेल्या पतींना, आपला एकाकीपणा घालवण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे दुसरे लग्न करणे का वाटतो ते कळते. पत्नीला जाऊन जास्त काळही झालेला नसतो तोच ते एक नवीन नातेसंबंध जोडतात ज्यात धोके असू शकतात. पण स्त्रियांकडे त्यांचा एकाकीपणा घालवण्याचे अनेक मार्ग असतात.

ज्याच्यावर दुःख कोसळले आहे तो तुमचा मित्र किंवा नातेवाईक एक पुरुष असो अथवा स्त्री, त्यांचा एकाकीपणा घालवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? ४९ वर्षांच्या हेमा म्हणतात: “पुष्कळांना मदत करावीशी वाटते, पण ते पुढं येत नाहीत. ते फक्‍त म्हणतात: ‘तुम्हाला काय हवं-नसेल तर सांगा हं.’ पण एका बहिणीनं मला जेव्हा, ‘मी दुकानात चाललेय, यायचं का?’ असं म्हटलं, तेव्हा मला बरं वाटलं.” पुष्कर यांची पत्नी कॅन्सरने मरण पावली. त्यांना जेव्हा लोकांनी त्यांच्या घरी बोलवलं तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं. ते म्हणतात: “कधीकधी तुम्हाला तुमच्या परिस्थितीविषयी कुणाशीच बोलावसं वाटत नाही. पण, संध्याकाळच्या वेळी इतरांबरोबर वेळ घालवल्यामुळे तुम्हाला बरं वाटायला लागतं, तुम्हाला इतकं एकटं-एकटं वाटत नाही. तुम्हाला माहीत आहे, की लोक तुमची मनापासून काळजी करतात.” *

तुमच्या सहानुभूतीची कदर केली जाते

हेमा यांना जेव्हा खरोखरच भावनिक आधार हवा होता तेव्हा त्यांचे बहुतेक नातेवाईक आपापल्या घरी परतले होते. त्या म्हणतात: “जोडीदाराचा मृत्यू होतो तेव्हा सर्व मित्र, नातेवाईक धावून येतात. पण त्यांनाही कामं असतात, त्यामुळे पुन्हा ते आपापल्या कामात व्यस्त होतात. पण तुमच्या बाबतीत तसं होत नाही.” खऱ्‍या मित्रांनी या गोष्टीची दखल घेतली तर ते अशा शोकग्रस्त लोकांना आधार व हवी ती मदत देऊ शकतात.

शोकग्रस्त व्यक्‍तीला तिच्या काही खास दिवशी, जसे तिच्या लग्नाच्या वाढदिवशी किंवा तिच्या जोडीदाराचा मृत्यू ज्या तारखेला झाला त्या दिवशी सहवासाची गरज भासेल. आधी उल्लेख करण्यात आलेल्या नलिनी म्हणतात, की त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांना, नवऱ्‍याची खूप आठवण येते, एकाकी वाटते. पण त्यांचा मोठा मुलगा कवीश त्यांना अशा वेळी खूप मानसिक आधार देतो. “दर वर्षी तो मला बाहेर फिरायला नेतो. आम्ही एकत्र मिळून जेवण करतो, हे फक्‍त आम्हा माय-लेकरात असतं.” तुमच्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या या सर्वात दुःखद काळाची तुम्ही दखल घेऊ शकता, नाही का? असे केल्यास, त्या कठीण दिवशी तुम्ही स्वतः किंवा कोणालातरी शोकग्रस्त व्यक्‍तीबरोबर राहायची व्यवस्था करू शकाल.—नीतिसूत्रे १७:१७.

काही शोकग्रस्त व्यक्‍तींना असे दिसून आले आहे, की ते स्वतःही इतरांना सांत्वन देऊ शकतात. आठ वर्षांपासून विधवा असलेल्या अनुषाने, तिच्यासारख्या विधवा असलेल्या एका स्त्रीबरोबर मैत्री केली. अनुषा तिच्याविषयी म्हणते, “तिचा दृढनिश्‍चय पाहून मी खूप प्रभावीत झाले व मलाही पुढे जाण्याचे प्रोत्साहन मिळाले.”

होय, मनावर झालेल्या जखमेने खपली धरायला सुरुवात केल्यावर, विधवा आणि विधूर झालेल्या व्यक्‍ती इतरांना प्रेरणा व आशा देऊ शकतात. बायबलमध्ये, तरुण स्त्री रूथ व तिची सासू नामी या दोन विधवांचा अहवाल आहे. त्या दोघींना एकमेकांच्या आधाराचा खूप फायदा झाला. त्यांचा हृदयस्पर्शी अहवाल वाचल्यावर कळते, की त्यांच्यावर गुदरलेले दुःख पचवून, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास या दोघींनी एकमेकींची काळजी घेतली.—रूथ १:१५-१७; ३:१; ४:१४, १५.

बरे होण्याचा समय

पुन्हा नव्याने पूर्णार्थाने जीवन जगण्यासाठी विधवा व विधूर झालेल्या व्यक्‍तींनी, आपल्या प्रिय जोडीदाराच्या आठवणींचे जतन करण्यात व स्वतःच्या गरजांची काळजी घेण्यात योग्य संतुलन राखले पाहिजे. “रडण्याचा समय” असतो हे, प्राचीन काळातील शलमोन नावाच्या एका राजाने कबूल केले. पण, त्याने असेही म्हटले, की ‘बरे होण्याचा देखील समय’ असतो.—उपदेशक ३:३, ४.

आधी उल्लेख करण्यात आलेले पुष्कर, भूतकाळाविषयी अधिक विचार करत बसण्याचे टाळणे किती कठीण असू शकते याविषयी ते म्हणतात: “आम्ही दोघं, एकमेकांत गुंफत वाढणाऱ्‍या झाडांप्रमाणे होतो. पण त्यातलं एक झाड मरतं, मग त्याला काढून टाकण्यात आल्यावर उरलेलं झाड कसं वेडंवाकडं दिसू लागतं तशी माझी अवस्था झाली आहे. मी एकटा पडलोय.” काहींना वाटतं, की मरण पावलेल्या जोडीदाराचा जास्त विचार न करणे, हसणे म्हणजे त्याच्याशी विश्‍वासघात करणे. म्हणून ते लोकांबरोबर उठ-बस करू इच्छित नाहीत. पण विधवा व विधूर झालेल्यांना आपण हळूहळू बरे होण्यास, थांबलेले त्यांचे आयुष्य पुन्हा सुरू करण्यास कशा प्रकारे मदत करू शकतो?

सर्वात आधी, अशा व्यक्‍तींना आपण त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवण्याचे उत्तेजन देऊ शकतो. हर्षल यांच्या पत्नीला जाऊन सहा वर्षे झाली आहेत. ते म्हणतात: “मला भेटायला येणारे लोक जेव्हा, माझ्या मनात रेंगाळत असलेल्या आठवणी मी त्यांना सांगत असतो तेव्हा शांतपणे बसून ऐकतात ते मला खूप आवडतं. तसं पाहायलं गेलं तर लोकांना मी आवडायचो नाही, पण आता ते मला दाखवत असलेल्या सहानुभूतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” पुष्कर यांना, त्यांच्या एका प्रौढ मित्राचे कौतुक वाटते. तो मित्र, न विसरता त्यांची विचारपूस करायचा. पुष्कर म्हणतात: “माझ्या दोस्ताचा प्रामाणिकपणा व प्रेमळपणा पाहून मी भारावून जायचो आणि मला त्या प्रसंगी कसं वाटत आहे, हे मी मनमोकळेपणाने सांगायचो.”—नीतिसूत्रे १८:२४.

आपल्या मनात येणाऱ्‍या खेदाच्या, अपराधीपणाच्या किंवा रागाच्या भावना व्यक्‍त करण्याद्वारे शोकग्रस्त व्यक्‍ती, तिची नवीन परिस्थिती स्वीकारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत असते. राजा दाविदाचे मूल मरण पावले तेव्हा, त्याचा सर्वात जवळचा मित्र यहोवा देव याच्यापुढे आपले मन मोकळे केल्यामुळे त्याला, ‘उठण्यास’ व वास्तविकता स्वीकारण्यास बळ मिळाले.—२ शमुवेल १२:१९-२३.

सुरुवातीला कठीण वाटत असले तरी, विधवा किंवा विधूर झालेल्या व्यक्‍तीने आपला रोजचा दिनक्रम चालू केला पाहिजे. अशा व्यक्‍तींना तुम्ही तुमच्यासोबत कधी बाजाराला किंवा असेच पाय मोकळे करायला नेऊ शकता का? त्यांना तुम्ही एखाद्या कामात मदत करायला बोलवू शकता का? अशा दुःखी व्यक्‍तींना त्यांच्या एकाकीपणाच्या कोशातून बाहेर काढण्याचा हा एक मार्ग आहे. जसे की, विधवा झालेली व्यक्‍ती तुमच्या बाळाकडे लक्ष देऊ शकेल किंवा मग एखादा चविष्ट अन्‍नपदार्थ कसा करायचा ते ती तुम्हाला सांगू शकेल. किंवा मग, विधूर झालेली व्यक्‍ती तुमच्या घरात तुम्हाला दुरुस्तीच्या कामात मदत करू शकते. या अशा गोष्टी आहेत ज्या मनाला चालना देऊ शकतात; पण अशा व्यक्‍तींना तुमच्यासोबत काम करण्याची विनंती केल्याने त्यांना जाणवेल, की त्यांच्या जीवनालाही उद्देश आहे.

आपल्या मनातील भावना आता इतरांनाही सांगायला सुरुवात केल्याने, शोकग्रस्त व्यक्‍ती हळूहळू जीवनाचा आनंद लुटू लागेल; एवढेच नव्हे तर नवनवीन ध्येयेही ठेवू शकेल. योगिताच्या बाबतीत असेच झाले. ती ४४ वर्षांची विधवा आहे आणि तिला दोन मुली व एक मुलगा आहे. ती आठवून सांगते: “माझा दिनक्रम पुन्हा सुरु करायला मला कठीण वाटत होतं. घरातली दररोजची कामं सांभाळून, पैशा-आडक्याची सोय करणं, मुलांची काळजी घेणं इतकं सोपं नव्हतं.” पण, जसजसा वेळ सरत गेला तसतसे योगिता, नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला व आपल्या मुलांबरोबर खुला संवाद करायला शिकली. निकटचे मित्रजन देत असलेला आधार स्वीकारायलाही ती शिकली.

“जीवनाची देणगी ही नेहमी अमूल्य राहते”

अशा व्यक्‍तींना खरोखरच मदत करू इच्छिणाऱ्‍या मित्रांनी व नातेवाईकांनी समंजस असले पाहिजे. कित्येक महिन्यांपर्यंत, नव्हे वर्षांपर्यंत विधवा किंवा विधूर झालेल्या व्यक्‍तीच्या जीवनात भावनिक चढउतार येऊ शकतात. ती कधी शांत व आनंदी असेल तर कधी निराश. होय, तिच्या “जीवाला होणारा क्लेश” खूप तीव्र असू शकतो.—१ राजे ८:३८, ३९.

अशा वेळी त्या व्यक्‍तींना, वास्तविकतेपासून दूर जाण्याचे व स्वतःला लोकांपासून दूर करण्याचे टाळून योग्य दिशेने जाण्यासाठी एक अगदी हलकी ढकल द्यावी लागेल. या अशा आधारामुळे, अनेक विधवांना व विधूरांना आपल्या जीवनाला नवीन वळण देण्यास मदत झाली आहे. आफ्रिकेत सुवार्तिक म्हणून पूर्ण वेळेची सेवा करत असलेले क्लॉड नावाचे ६० वर्षीय विधूर म्हणतात: “सोबत्यापासून विलग होण्याचे संकट तुमच्यावर कोसळल्यानंतरही, जीवनाची देणगी ही नेहमी अमूल्य राहते.”

सोबत्याच्या मृत्यूनंतर जीवन पहिल्यासारखे राहत नाही. तरीपण, आपल्या प्रिय जोडीदाराच्या मृत्यूनंतर मागे राहिलेली व्यक्‍ती इतरांसाठी पुष्कळ काही करू शकते.—उपदेशक ११:७, ८. (w१०-E ०५/०१)

[तळटीपा]

^ परि. 11 “आठवण म्हणून ठेवलेल्या वस्तू की दुःखात भर घालणाऱ्‍या वस्तू?” हा पृष्ठ १२ वरील चौकोन पाहा.

^ परि. 16 शोकाकूल लोकांना व्यावहारिक मदत कशी दिली जाऊ शकते याविषयीच्या अधिक माहितीकरता तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) या माहितीपत्रकाची पृष्ठे २०-२५ पाहा.

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

खरे मित्र मदतीला धावून येतात आणि कधीही साथ सोडत नाहीत

[१२ पानांवरील चौकट/ चित्र]

आठवण म्हणून ठेवलेल्या वस्तू की दुःखात भर घालणाऱ्‍या वस्तू?

हेमा यांच्या पतीचा अलीकडेच मृत्यू झाला. त्या म्हणतात: “मी माझ्या नवऱ्‍याच्या पुष्कळ वस्तू सांभाळून ठेवल्या आहेत. या वस्तू पाहून मला त्यांच्या अनेक गोष्टी आठवतात ज्यामुळे मला आनंद होतो. मला त्यांची कोणतीही वस्तू लगेचच फेकावीशी वाटली नाही, कारण जसजसा वेळ सरतो तसतसे आपल्या भावनाही बदलतात.”

पण क्लॉड यांचे म्हणणे याच्या अगदी उलट आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. ते म्हणतात: “मला माझ्या अवती-भोवती तिच्या वस्तू नको वाटू लागल्या; कारण त्या पाहून मला तिची खूपच आठवण यायची. मी घरातून तिच्या वस्तू काढून टाकल्यामुळे वस्तुस्थिती स्वीकारायला मला सोपे गेले आणि माझ्यावर कोसळलेल्या दुःखातून मी लवकर सावरू शकलो.”

मृत व्यक्‍तीच्या वस्तुंचे काय करायचे याबाबतीत प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असू शकतात हे वरील विधानांवरून कळते. त्यामुळे, विवेकी मित्र व नातेवाईक याबाबतीत स्वतःचे मत शोकग्रस्त व्यक्‍तीवर लादणार नाहीत.—गलतीकर ६:२, ५.

[९ पानांवरील चित्रे]

कोणत्या खास दिवशी, तुम्ही केलेल्या मदतीची कदर केली जाईल?

[९ पानांवरील चित्र]

तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्यांना सोबत घेऊन जा

[१० पानांवरील चित्रे]

तुमच्या रोजच्या कामात किंवा मनोरंजनाच्या वेळी विधवा व विधूर झालेल्या व्यक्‍तींनाही सहभागी करा