व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!

हिऱ्‍यांची तस्करी करणाऱ्‍या व आपल्या मालकाला लुबाडणाऱ्‍या स्त्रीला अचानक प्रामाणिक जीवन जगण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली? दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्‍या एका स्त्रीला एकाएकी जीवन इतके हवेहवेसे का वाटू लागले? दारूबाजी व मादक पदार्थांचा गैरवापर करणाऱ्‍या व्यक्‍तीला या जीवघेण्या व्यसनापासून मुक्‍त होण्याचे बळ कोठून मिळाले? याविषयी त्यांच्याच तोंडून ऐका.

संक्षिप्त चरित्र

नाव: मार्गरेट डबेन

वय: ४५

देश: बोट्‌सवाना

माझा गतकाळ: तस्कर व चोर

माझी पूर्व जीवनशैली: माझे वडील मूळचे जर्मनीचे. पण नंतर ते नैऋत्य आफ्रिकेचे (सध्याचे नामिबिया) नागरिक बनले. माझी आई बोट्‌सवानातील मंगोलोगा वंशातली होती. नामिबियातील गेबॉबिस येथे माझा जन्म झाला.

सन १९७० च्या दशकात नामिबियावर दक्षिण आफ्रिकन सरकारचं जास्त वर्चस्व होतं आणि या सरकारनं नामिबियातील सर्व शहरांत व गावांत वर्णभेदाचे नियम कडकपणे लागू केले. माझ्या आईवडिलांचा आंतरजातीय विवाह झाल्यामुळे त्यांना विभक्‍त होण्यास भाग पाडलं गेलं. त्यामुळे माझी आई मला व माझ्या भावंडांना घेऊन बोट्‌सवानातील घानसी येथे राहायला आली.

मग १९७९ मध्ये मी बोट्‌सवानातील लोबाट्‌से येथे राहायला गेले. तेथे माझं शालेय शिक्षण संपेपर्यंत मी माझ्या मानलेल्या आईवडिलांजवळ राहिले. नंतर एका गॅरेजमध्ये मला क्लार्कची नोकरी लागली. देव आपल्याला घर बसल्या खायला देणार नाही तर आपल्या व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपण वाटेल ते केले पाहिजे असाच मी लहानपणापासून विचार करायचे.

मी एका जबाबदार पदावर काम करत असल्यामुळे गॅरेजमधील स्पेर पार्ट्‌स चोरायचे. रात्रीच्या वेळी कोणतीही ट्रेन आमच्या शहरातून जाणार असेल, तर माझे मित्र व मी ट्रेनमध्ये चढायचो आणि हाती लागले ते लुटायचो. हिरे, सोनं व तांबं यांची मी तस्करी करू लागले. मी ड्रग्ज घेऊ लागले, अतिशय हिंसक बनले व मला अनेक पुरूष मित्र होते.

शेवटी १९९३ मध्ये माझी चोरी पकडली गेली व मला माझी नोकरी गमवावी लागली. आपणही पकडले जाऊ या भीतीनं माझे “मित्र” मला सोडून पळून गेले. त्यांच्या या वागण्यामुळे मला फार वाईट वाटलं आणि मी त्यानंतर कोणावरही विश्‍वास ठेवायचा नाही असं ठरवलं.

बायबलनं माझं जीवन बदललं: सन १९९४ मध्ये टिम आणि वर्जिनिया यांच्याशी माझी गाठ पडली. ते दोघंही यहोवाचे साक्षीदार असून मिशनरी कार्य करत होते. माझ्या नवीन नोकरीच्या ठिकाणी ते माझ्याशी बोलले आणि जेवणाच्या सुटीत ते मला बायबलविषयी शिकवू लागले. आपण यांच्यावर भरवसा ठेवू शकतो असं काही दिवसांनंतर मला वाटलं तेव्हा मी त्यांना, माझ्या घरी येऊन बायबल अभ्यास घेण्यास सांगितलं.

देवाला खूष करायचं असेल तर मला माझ्या जीवनशैलीत काही बदल करणं जरूरीचे आहे हे लवकरच माझ्या लक्षात आले. उदाहरणार्थ, १ करिंथकर ६:९, १० या वचनावरून मी शिकले, की “जारकर्मी . . . चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” एकेक करून मी माझ्या सर्व वाईट सवयी सोडून दिल्या. चोरी करण्याचं सोडून दिलं. ज्यांच्याबरोबर लहानाची मोठी झाले होते त्या गुंडांच्या टोळीतून मी बाहेर पडले. यहोवाच्या मदतीनं मी माझ्या पुरूष मित्रांनाही माझ्या जीवनातून पिटाळून लावलं.

मला काय फायदा झाला: खूप प्रयत्नांती मी माझ्या रागावर ताबा ठेवायला शिकले आहे व मुलांच्या हातूनही काही चूक होते तेव्हा मी त्यांच्यावर पूर्वीसारखी खेकसत नाही. (इफिसकर ४:३१) काही बिघडलं तरी मी डोकं शांत ठेवूनच बोलण्याचा प्रयत्न करते. अशाप्रकारे संवाद साधल्यामुळं चांगले परिणाम निष्पन्‍न होतात व कुटुंब या नात्याने आम्ही एकमेकांच्या अधिक समीप येतो.

माझे पूर्वीचे मित्र व माझे शेजारीही आता माझ्यावर भरवसा ठेवू शकतात. माझ्या स्वाधीन असलेल्या पैशांचा व सामानसुमानांचा व्यवहार मी अत्यंत काळजीपूर्वक हाताळत असल्यामुळं आज मी एक प्रामाणिक व भरवशालायक कामगार बनले आहे. यामुळं मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते. शिवाय, इतरांना बायबलविषयी शिकवण्यासाठी माझ्याजवळ भरपूर वेळही असतो. नीतिसूत्रे १०:२२ यात असं म्हटलं आहे: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही,” या शब्दांशी मी पूर्णपणे सहमत आहे.

संक्षिप्त चरित्र

नाव: ग्लोरिया एलिझारारास डी चोपेरेना

वय: ३७

देश: मेक्सिको

माझा गतकाळ: आत्महत्येचा प्रयत्न

माझी पूर्व जीवनशैली: मेक्सिको राज्यातील नौकॅल्पन येथील एका रईस भागात मी लहानाची मोठी झाले. लहानपणापासूनच मी फार बंडखोर होते आणि पार्ट्‌यांचं मला खूप वेड होतं. वयाच्या १२ व्या वर्षी मी धूम्रपान करू लागले, १४ व्या वर्षी दारू पिऊ लागले आणि वयाच्या १६ व्या वर्षी मादक पदार्थांचा दुरूपयोग करू लागले. काही वर्षांनी मी घर सोडलं. माझे बहुतेक मित्रमैत्रिणी अत्याचारपीडित कुटुंबातली होती, त्यांचं एक तर शारिरीक रीत्या शोषण झालं होतं किंवा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप शिवीगाळ केली होती. मला जीवनाचा इतका वीट येऊ लागला होता की मला ते नकोसं झालं होतं.

वयाच्या १९ व्या वर्षी मी एक मॉडेल झाले व पुरूषांसोबत मोठमोठ्या पार्ट्‌यांना जाऊ लागले. असे करण्यासाठी मला पैसे मिळत असत. यामुळे राजकारणी व मनोरंजन जगातील लोकांबरोबर माझी उठबस सुरू झाली. पुढं माझं लग्न झालं, मला मुलंही झाली. पण कुटुंबात माझाच हुकूम चालायचा. याबरोबरच माझं धूम्रपान व दारू पिणं चालूच होतं आणि माझ्या पार्ट्‌यांचा तर काही हिशोबच नव्हता. शिवीगाळ करण्याशिवाय जणू माझं वाक्य पूर्णच होत नसे आणि घाणेरडे विनोद सांगायला मला आवडायचं. माझा पाराही लवकर चढायचा.

ज्या लोकांबरोबर माझी उठबस होती त्यापैकी बहुतेक लोकांची जीवनशैली अशीच होती. त्यांच्या दृष्टीनं मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. परंतु, माझ्या जीवनात मला एक पोकळी जाणवत होती. मला माझं जीवन निरर्थक वाटत होतं.

बायबलनं माझं जीवन बदललं: सन १९९८ मध्ये मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला. जीवनाचा एक उद्देश आहे हे मी बायबलमधून शिकले. पृथ्वीला नंदनवन बनवण्याचा, मृतांना पुन्हा जिवंत करण्याचा यहोवाचा उद्देश आहे व अशा आनंदी भवितव्याचा मी देखील उपभोग घेऊ शकते, हे मी शिकले.

देवावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे हेही मी शिकले. (१ योहान ५:३) असं करणं माझ्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं, कारण मला कुणाचंही ऐकून घ्यायची सवय नव्हती. पण हळूहळू मला कळून चुकलं की मी स्वतःच्या ताकदीवर माझं जीवन मार्गदर्शित करू शकत नाही. (यिर्मया १०:२३) मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. त्याच्या उच्च नैतिक दर्जांनुसार जीवन व्यतीत करता यावं आणि माझ्या मुलांना माझ्या पूर्व जीवनशैलीचं अनुकरण न करता त्यांना त्याचे उच्च दर्जे शिकवता यावेत, अशी मी त्याला प्रार्थना केली.

आपल्या जीवनशैलीत बदल करणं मला फार कठीण गेलं पण इफिसकर ४:२२-२४ येथे दिलेला सल्ला मी आपल्या जीवनात लागू करू लागले. तिथं म्हटलं आहे: “तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा . . . आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करण्यासाठी मला वाईट सवयी जसे की धूम्रपान सोडावं लागलं व त्याचप्रमाणे अश्‍लील भाषा बोलणंही सोडून द्यावं लागलं. हे सर्व बदल करण्यासाठी मला जवळजवळ तीन वर्षे लागली. त्यानंतर यहोवाची साक्षीदार या नात्याने माझा बाप्तिस्मा झाला.

या सोबतच, पत्नी व आई या नात्यानं मी माझी जबाबदारी गांभीर्यांनं पार पाडू लागले. पहिले पेत्र ३:१, २ येथील सल्ला मी लागू करू लागले. त्यात म्हटलं आहे: “स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.”

मला काय फायदा झाला: मला जीवनाचा अर्थ दाखवल्याबद्दल मी यहोवाची अत्यंत ऋणी आहे. आज मी एक चांगली व्यक्‍ती बनले आहे आणि त्यामुळे मी माझ्या मुलांचंही पूर्वीपेक्षा चांगलं संगोपन करू शकते असं मला स्वतःविषयी वाटतं. अधूनमधून कधीतरी मला माझ्या वाईट जीवनशैलीची आठवण होऊन फार अपराध्यासारखं वाटतं खरं, पण यहोवा माझी मनोदशा जाणतो. (१ योहान ३:१९, २०) खरोखर, बायबलच्या स्तरांनुसार जीवन व्यतीत केल्यामुळे मी आज सुरक्षित आहे आणि मला मनःशांती लाभली आहे.

संक्षिप्त चरित्र

नाव: जेल्सन कोरे डी ओलिवेरा

वय: ३३

देश: ब्राझील

माझा गतकाळ: दारू व ड्रग्जच्या आहारी गेलेला

माझी पूर्व जीवनशैली: ब्राझीलच्या बाझे शहरात माझा जन्म झाला. सुमारे १,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर, ब्राझील व उरुग्वेच्या सीमेवर वसलेलं आहे. शेती व पशुपालन हे येथील प्रमुख व्यवसाय होते. एका गरीब जिल्ह्यात मी लहानाचा मोठे झालो. या ठिकाणी दांडगाई करणाऱ्‍या टोळ्या होत्या आणि येथील तरूण लोक दारू व ड्रग्जचं सर्रास सेवन करत असत.

शाळा सोडल्यानंतर मी दारू प्यालला लागलो, गांजा ओढू लागलो व सतत हेवी-मेटल संगीत ऐकू लागलो. देवावर माझा मुळीच विश्‍वास नव्हता. कारण देव असता तर या जगात इतकं दुःख, इतका गोंधळ नसता असं मला वाटायचं.

मी गिटार वाजवायचो आणि सोबतच गाणीही लिहायचो. अनेकदा गाणी लिहिण्याची प्रेरणा मला बायबलच्या प्रकटीकरण पुस्तकातून मिळत असे. माझ्या अपेक्षेप्रमाणे माझा बँड फारसा लोकप्रिय झाला नाही त्यामुळे निराश होऊन मी अधिकाधिक जहाल ड्रग्ज घेऊ लागलो. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे माझ्या जिवाचं काही बरंवाईट होण्याची मला पर्वा नव्हती. तसंही मी आजवर ज्या अनेक गायकांची पूजा करत आलो होतो त्यांच्याही जीवनाचा असाच अंत झाला होता.

त्यावेळी मी माझ्या आजीकडं राहायचो. ड्रग्जची लत पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आजीला खोटं सांगून तिच्याकडून पैसे घ्यायचो. आणि हेही कमी म्हणून की काय मी भूतविद्येकडंही वळालो. काळ्या जादूचं मला विशेष आकर्षण वाटू लागलं. यामुळे माझी संगीतरचना आणखीन सुरेख होईल असा माझा ग्रह होता.

बायबलनं माझं जीवन बदललं: मी बायबलचा अभ्यास करू लागलो व यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना जाऊ लागलो तेव्हापासून माझ्या व्यक्‍तिमत्त्वात बदल होऊ लागला. हळूहळू माझ्यात आनंदी जीवन जगण्याची उर्मी निर्माण होऊ लागली. या नवीन विचारसरणीनं प्रेरित होऊन मी माझे लांब केस कापून टाकायचं ठरवलं. माझी नाराजी व बंडखोर प्रवृत्ती दाखवण्यासाठी मी माझे केस वाढवले होते. देवाला खूष करायचं असेल तर दारूचं व्यसन व ड्रग्ज तसेच धूम्रपान कायमचं सोडलं पाहिजे याची मला जाणीव झाली. याशिवाय, संगीताविषयीची माझी निवडही बदलणं जरूरीचं होतं.

मी पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेलो तेव्हा भिंतीवरील एका शास्त्रवचनावर माझी नजर पडली. ते नीतिसूत्रे ३:५, ६ हे वचन होतं जे म्हणतं: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” या वचनाचा विचार करताना मला खात्री झाली, की माझी खरोखरच इच्छा असेल तर माझं विस्कटलेलं जीवन सावरण्यासाठी यहोवा नक्कीच माझी मदत करील.

तरीसुद्धा माझी खोलवर मुळावलेली जीवनशैली बदलणं तसंच दारूचं व मादक द्रव्यांचं व्यसन सोडणं हे माझ्यासाठी माझा हात कापून टाकण्याइतकं महाकठीण होतं. (मत्तय १८:८, ९) माझ्याबाबतीत हळूहळू हे सर्व सोडून देणं शक्य होणार नाही हे मी जाणलं. त्यामुळे एका झटक्यात या सर्व वाईट सवयी मी सोडून दिल्या. शिवाय, माझ्या पूर्वीच्या घातक, जीवनशैलीकडं वळण्यास मला मोहीत करतील अशी सर्व ठिकाणं व लोक यांपासून मी स्वतःला चारहात दूरच ठेवू लागलो.

कधीकधी मी निराश व्हायचो. पण, त्यावर कुढत बसण्याऐवजी, दररोज जे लहानसहान बदल करण्यात मी यशस्वी व्हायचो त्याबद्दल मला आनंद वाटायचा. यहोवाच्या नजरेत शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं शुद्ध राहणं हे माझ्याकरता सगळ्यात सन्मानाचं ठरेल हे मी जाणलं. सोडून दिलेल्या वाईट सवयींचा विचार न करता जीवनात पुढं पाहत राहण्यास माझी मदत करावी म्हणून मी यहोवाला प्रार्थना केली आणि त्यानं माझी तशी मदत केलीही. कधीकधी मी माझ्या वाईट सवयींकडं परत वळायचो. आदल्या रात्री बेसुमार प्यायल्यामुळं दुसऱ्‍या दिवशी मी चांगल्या अवस्थेत नसलो तरीही बायबल अभ्यास घेणाऱ्‍या व्यक्‍तीला मी माझ्यासोबत अभ्यास करण्याचा आग्रह करायचो.

बायबलच्या अभ्यासातून देवाबद्दल मी जे काही शिकत होतो त्या गोष्टी मला पटू लागल्या जसं की, देवाला प्रत्येक व्यक्‍तीची काळजी आहे, लवकरच तो खोट्या धर्माचा नाश करील आणि सध्या जगभरात चाललेल्या प्रचार कार्याला तो पाठिंबा देतो. (मत्तय ७:२१-२३; २४:१४; १ पेत्र ५:६, ७) बायबलच्या या शिकवणी मला अर्थभरीत वाटू लागल्या होत्या. शेवटी, मी यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. देवानं आजवर माझ्यासाठी जे काही केलं होतं त्याबद्दल गुणग्राहकता व्यक्‍त करण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग होता.

मला काय फायदा झाला: आता मला माझं जीवन अधिक उद्देशपूर्ण, अर्थपूर्ण वाटतं. (उपदेशक १२:१३) पूर्वी कुटुंबाकडून फक्‍त घ्यायचं मला माहीत होतं, पण आता त्यांना देण्यासारखं माझ्याजवळ काहीतरी होतं. बायबलमधून शिकलेल्या गोष्टी मी आजीला सांगायचो. याचा परिणाम असा झाला की तिनं आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं. माझ्या कुटुंबातील अनेकांनी व माझ्या बँडमधील एका सदस्यानंही हेच पाऊल उचललं.

आज मी विवाहित आहे आणि माझी पत्नी आणि मी आमचा बराच वेळ इतरांना बायबल शिकवण्यासाठी खर्च करतो. ‘अगदी मनापासून यहोवावर भाव ठेवण्यास’ शिकल्यामुळे मला माझं जीवन समृद्ध झाल्यासारखं वाटतं. (w०९ २/१)

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

“हळूहळू माझ्यात आनंदी जीवन जगण्याची उर्मी निर्माण होऊ लागली”