“विश्वासात स्थिर राहा”
“विश्वासात स्थिर राहा . . . खंबीर व्हा.”—१ करिंथ. १६:१३.
१. (क) गालील समुद्रात उठलेल्या वादळादरम्यान पेत्राच्या बाबतीत काय घडतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) पेत्र का बुडू लागतो?
एकदा रात्रीच्या वेळी प्रेषित पेत्र आणि इतर काही शिष्य बोटीतून गालील समुद्रात प्रवास करत होते. तेव्हा अचानक समुद्रात एक मोठं वादळ उठलं. त्या खवळलेल्या समुद्रात आपली बोट किनाऱ्याला आणण्यासाठी हे शिष्य धडपडू लागले. पण, त्यादरम्यानच येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे येत असल्याचं ते पाहतात. पेत्र येशूला हाक मारून, मलाही तुमच्याकडे येऊ द्या, अशी विनंती करतो. येशूनं होकार दिल्यावर, तोही लगेच बोटीबाहेर पाय टाकत येशूच्या दिशेनं चालू लागतो. पण काही क्षणातच, पेत्र पाण्यात बुडू लागतो. का बरं? कारण ते भयंकर वादळ आणि उसळलेल्या त्या लाटा पाहून तो घाबरतो. पेत्र ओरडून येशूकडे मदत मागतो आणि त्याच वेळी येशू पटकन त्याचा हात धरून त्याला सावरून म्हणतो: “अरे अल्पविश्वासी तू संशय का धरलास?”—मत्त. १४:२४-३२.
२. आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?
२ पेत्राच्या या अनुभवावरून विश्वासाबद्दल शिकता येईल अशा तीन गोष्टींवर आता आपण चर्चा करू या: (१) यहोवा आपल्याला मदत करेल याची पेत्राला आधी खात्री का होती, (२) पेत्र विश्वासात का कमी पडला, आणि (३) विश्वासात पुन्हा खंबीर होण्यास पेत्राला कशामुळे मदत झाली. या गोष्टींचं परीक्षण केल्यामुळे, आपल्यालाही “विश्वासात स्थिर” होण्यास मदत होईल.—१ करिंथ. १६:१३.
यहोवा मदत करेल अशी खात्री देणारा विश्वास
३. कोणत्या गोष्टीमुळे पेत्राला पाण्यावर चालणं शक्य झालं, आणि कोणत्या बाबतीत आपणही त्याचं अनुकरण करतो?
३ येशूनं पेत्राला बोलवलं तेव्हा त्यानं लगेच बोटीबाहेर पाऊल टाकत पाण्यावर चालण्यास सुरवात केली. यावरून कळतं की तो विश्वासात खंबीर होता. त्याला याची पक्की खात्री होती, की देवाच्या सामर्थ्यानं जशी येशूला मदत केली तशी तो आपल्यालाही मदत करेल. येशूनं पेत्राला बोलवलं त्याचप्रमाणे तो आज आपल्यालाही त्याचं अनुकरण करण्यासाठी बोलवत आहे. त्यामुळे, आपणही यहोवाला समर्पण करतो आणि बाप्तिस्मा घेतो. कारण, आपलाही यहोवा आणि येशूवर विश्वास आहे आणि ते आपल्याला नक्की मदत करतील याची पूर्ण खात्री आपल्याला आहे.—योहा. १४:१; १ पेत्र २:२१ वाचा.
४, ५. विश्वास एक मौल्यवान गोष्ट आहे, असं आपण का म्हणू शकतो?
४ विश्वास एक अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. याच विश्वासामुळे पेत्राला कोणत्याही मानवाला शक्य नव्हती अशी गोष्ट करण्यास, म्हणजे पाण्यावर चालणं शक्य झालं. आणि हाच विश्वास आपल्यालाही मानवी दृष्टिकोनातून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यास मदत करू शकतो. (मत्त. २१:२१, २२) उदाहरणार्थ, आपल्यापैकी काहींनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात इतके सारे बदल केले आहेत, की पूर्वी ओळखणारे लोकही आज त्यांना ओळखू शकत नाहीत. यहोवावर असलेल्या आपल्या प्रेमामुळे आणि तो आपल्याला जी मदत करत आहे, त्यामुळेच हे बदल करणं आपल्याला शक्य झालं. (कलस्सैकर ३:५-१० वाचा.) या विश्वासामुळेच आपण यहोवाला समर्पण केलं; आणि त्याच्या मदतीशिवाय कधीही शक्य नव्हती अशी गोष्ट करण्यास, म्हणजे त्याच्याशी मैत्री करण्यास आपल्याला मदत झाली.—इफिस. २:८.
५ विश्वास आपल्याला मजबूत करतो. उदाहरणार्थ, आपला सर्वात शक्तिशाली शत्रू सैतान करत असलेल्या हल्ल्यांविरुद्ध लढा देणं आपल्याला विश्वासामुळे शक्य होतं. (इफिस. ६:१६) तसंच यहोवावर आपला पूर्ण भरवसा असल्यामुळे, समस्येत असतानाही आपण विनाकारण चिंता करत बसत नाही. जर आपण यहोवावर विश्वास ठेवून त्याच्या राज्याला जीवनात पहिल्या स्थानी ठेवलं, तर आपल्या सर्व गरजा तो पुरवेल असं अभिवचन त्यानं दिलं आहे. (मत्त. ६:३०-३४) आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे, आपल्या विश्वासामुळेच यहोवा आपल्याला सार्वकालिक जीवनाचं सुंदर बक्षीस देईल.—योहा. ३:१६.
लक्ष विचलित झाल्यानं विश्वास खचतो
६, ७. (क) पेत्राला तोंड द्याव्या लागलेल्या वादळाची आणि लाटांची तुलना कशासोबत करता येईल? (ख) आपला विश्वास कमकुवत होऊ शकतो, हे समजून घेणं महत्त्वाचं का आहे?
६ पेत्र पाण्यावर चालत असताना जोराचा वारा आणि उसळणाऱ्या लाटा पाहून तो घाबरला. आज यांची तुलना आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या मोहांशी आणि परीक्षा-प्रसंगांशी करता येईल. त्यांना तोंड देणं कठीण असलं तरी यहोवाच्या मदतीनं आपण त्यांचा सामना करू शकतो. पण पेत्राच्या बाबतीत काय झालं ते लक्षात घ्या. जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे आणि उसळत्या लाटांच्या जोरामुळे तो बुडाला नाही, तर “वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला” असं बायबल म्हणतं. (मत्त. १४:३०) येशूकडे पाहण्याऐवजी त्याचं लक्ष त्या बेफाम वादळाकडे गेलं, आणि त्याचा विश्वास खचू लागला. त्याचप्रमाणे आपलंही लक्ष जर आपल्या समस्यांवर गेलं तर यहोवा खरंच आपली मदत करेल का, अशी शंका कदाचित आपल्या मनात डोकावेल.
७ अशा परिस्थितीत आपण आपला विश्वास गमावू शकतो हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण विश्वास कमजोर होण्याच्या क्रियेलाच बायबल “सहज गुंतवणारे पाप” म्हणते. (इब्री १२:१) पेत्राप्रमाणे आपलंही लक्ष विचलित झालं तर आपणही विश्वासात कमकुवत होऊ शकतो. पण आपला विश्वास कमकुवत आहे किंवा कोलमडण्याच्या बेतात आहे, हे आपल्याला कसं कळेल? या बाबतीत स्वतःचं परीक्षण करण्यास पुढील प्रश्न आपल्याला मदत करतील.
८. देवाच्या अभिवचनांवरील आपला विश्वास कोणत्या कारणांमुळे कमजोर होऊ शकतो?
८ पूर्वीइतकी आजही देवाची अभिवचनं मला वास्तविक वाटतात का? उदाहरणार्थ, देवानं आपल्याला असं अभिवचन दिलं आहे, की तो सैतानाच्या या जगाचा लवकरच नाश करेल. पण जगात आज करमणुकीची जी वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत, त्यांमुळे जर आपण विचलित झालो तर आपल्या मनात याबद्दल शंका उत्पन्न होईल. (हब. २:३) आणखी एका उदाहरणाचा विचार करा. यहोवानं खंडणी बलिदानाची तरतूद करून, आपल्या पापांची क्षमा करण्याचं अभिवचन त्यानं दिलं आहे. पण जर पूर्वी केलेल्या चुकांबद्दलच आपण विचार करत राहिलो, तर यहोवानं खरंच आपल्याला माफ केलं आहे का, अशी शंका आपल्या मनात उत्पन्न होईल. (प्रे. कृत्ये ३:१९) याचा परिणाम म्हणजे यहोवाच्या सेवेतील आपला आनंद आपण गमावून बसू आणि इतरांना सुवार्ता सांगण्याचं कामही आपण थांबवू.
९. स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना जास्त महत्त्व दिल्यामुळे काय होऊ शकतं?
९ आजही मी यहोवाच्या सेवेत जितकं चांगलं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो का? यहोवाच्या सेवेत भरपूर परिश्रम घेण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा भविष्यातील आपल्या आशेवर लक्ष केंद्रित करण्यास आपल्याला मदत होते. पण त्याऐवजी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांनाच आपण जास्त महत्त्व दिलं तर काय? उदाहरणार्थ, आपण कदाचित अशी नोकरी करत असू ज्यामुळे आपल्याला भरपूर पैसा तर मिळत असेल, पण यहोवाची सेवा करणं मात्र आपल्याला कठीण जात असेल. अशा प्रकारे स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना जास्त महत्त्व दिल्यामुळे आपला विश्वास कमकुवत होऊ शकतो आणि यहोवाच्या सेवेत आपण “आळशी” बनू शकतो.—इब्री ६:१०-१२.
१०. इतरांना क्षमा केल्यामुळे आपण कशा प्रकारे यहोवावर विश्वास असल्याचं दाखवतो?
१० इतरांना माफ करणं मला कठीण जातं का? जेव्हा इतर जण आपला अपमान करतात किंवा आपलं मन दुखावतात तेव्हा आपण त्यांच्याशी रागानं बोलतो का, किंवा त्याच्याशी बोलायचंच सोडून देतो का? आपण असं करत असू, तर कदाचित स्वतःच्या भावनांनाच आपण जास्त महत्त्व देत असू. याउलट जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो, तेव्हा यहोवावर आपला विश्वास असल्याचं आपण दाखवत असतो. कसं बरं? आपण जेव्हा यहोवाविरुद्ध पाप करतो, तेव्हा एका अर्थानं आपण त्याचे ऋणी बनतो. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याविरुद्ध पाप करते तेव्हा तीही आपली ऋणी बनते. (लूक ११:४) तेव्हा या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा भरवसा असणं गरजेचं आहे, की त्या व्यक्तीच्या ऋणापेक्षा यहोवाच्या कृपेचं मोल आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतरांना माफ करताना आपल्याला यहोवावरील विश्वासाची गरज पडते. इतरांना क्षमा करण्यासाठी विश्वासाची गरज असते, हे येशूच्या शिष्यांनी ओळखलं होतं. म्हणून इतरांनी कितीही वेळा तुमचा अपराध केला तरी त्यांना क्षमा करा असं जेव्हा येशूनं सांगितलं, तेव्हा “आमचा विश्वास वाढवा” अशी विनंती शिष्यांनी केली.—लूक १७:१-५.
११. दिलेला सल्ला लागू करणं कशामुळे कठीण होऊ शकतं?
११ स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा मला राग येतो का? तुम्हाला जो सल्ला दिला जातो त्यात काय चुकीचं आहे किंवा ज्यानं सल्ला दिला त्याच्यात काय उणीवा आहेत हे पाहण्यापेक्षा, दिलेला सल्ला कसा लागू करता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करा. (नीति. १९:२०) असं केल्यानं आपण खरंतर यहोवाच्या विचारांच्या एकमतात काम करत असतो.
१२. मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांविरुद्ध कुरकूर करणं चुकीचं का आहे?
१२ मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांविरुद्ध मी कुरकूर करतो का? इस्राएली लोकांचं उदाहरण घ्या. दहा हेरांनी आणलेल्या वाईट बातमीकडेच इस्राएलांनी लक्ष दिलं, आणि ते मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकूर करू लागले. तेव्हा यहोवानं मोशेला म्हटलं: “हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत?” (गण. १४:२-४, ११) यहोवानं नियुक्त केलेल्या मोशे व अहरोनाविरुद्ध इस्राएली लोकांनी कुरकूर केली, तेव्हा यहोवावर त्यांचा विश्वास नसल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणे, आपणही जर मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांविरुद्ध नेहमी तक्रार किंवा कुरकूर करत राहिलो, तर याचा अर्थ देवावरील आपला विश्वास कमी झाला आहे असा होईल.
१३. आपला विश्वास कमकुवत असल्याचं आपल्याला जाणवल्यास निराश होण्याची गरज का नाही?
१३ या सर्व प्रश्नांचा विचार केल्यानंतर आपण विश्वासात कुठंतरी कमी पडत आहोत असं वाटल्यास निराश होऊ नका. लक्षात घ्या, की प्रेषित पेत्रही एके प्रसंगी घाबरून गेला होता आणि त्याचाही विश्वास कमकुवत झाला होता. शिवाय काही वेळा तर येशूनंही आपल्या प्रेषितांना “अल्पविश्वासी” म्हटलं. (मत्त. १६:८) तरीसुद्धा, पेत्राच्या उदाहरणातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. त्याच्या मनात शंका निर्माण झाल्यामुळे जेव्हा तो बुडू लागला, तेव्हा त्यानं काय केलं त्याचा विचार करा.
विश्वासाला बळकट करण्यासाठी येशूवर लक्ष केंद्रित करा
१४, १५. (क) पाण्यात बुडत असताना पेत्रानं काय केलं? (ख) आपण येशूवर आपली नजर कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो?
१४ पाण्यात बुडायला लागल्यावर पेत्रानं काय केलं ते आठवा. तो एक चांगला पोहणारा होता. त्यामुळे तो पुन्हा बोटीपर्यंत पोहत जाऊ शकला असता. (योहा. २१:७) पण त्यानं तसं का केलं नाही? कारण तो स्वतःवर विसंबून राहिला नाही, तर त्यानं पुन्हा येशूकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्याची मदत घेतली. आपणही विश्वासात कमी पडत आहोत असं आपल्याला वाटत असेल, तर पेत्राच्या या उदाहरणाचं अनुकरण आपण केलं पाहिजे. पण हे कसं करता येईल?
१५ ज्याप्रमाणे मदतीकरता पेत्रानं पुन्हा एकदा येशूकडे लक्ष दिलं, त्याप्रमाणे आपणही येशूवर आपली नजर टिकवून ठेवली पाहिजे. (इब्री लोकांस १२:२, ३ वाचा.) पण पेत्रासारखं आपण तर येशूला आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग त्याच्याकडे पाहत राहणं आपल्याला कसं शक्य होईल? येशूनं जे शिकवलं आणि जे केलं त्याचं परीक्षण करण्याद्वारे आणि मग त्याचं जवळून अनुकरण करण्याद्वारे आपण हे करू शकतो. असं केल्यानं आपला विश्वास आणखी बळकट करण्यास आपल्याला मदत होईल. तेव्हा, येशूचं अनुकरण करता येईल अशा काही मार्गांचा आता आपण विचार करू या.
१६. आपला विश्वास भक्कम करण्यासाठी बायबल आपल्याला कशी मदत करते?
१६ बायबलवरील आपला विश्वास आणखी मजबूत करा. बायबल हे देवाचं वचन आहे आणि त्यात दिलेला सल्लाच सर्वोत्तम आहे, याबद्दल येशूला मुळीच शंका नव्हती. (योहा. १७:१७) आपणही येशूचं अनुकरण केलं पाहिजे. बायबलचं दररोज वाचन करून, त्याचा अभ्यास करण्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या धड्यांवर मनन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शिवाय आपल्या मनात काही प्रश्न असतील तर उत्तरासाठी आपण संशोधन केलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपण खरंच शेवटल्या दिवसांत जगत आहोत याची पक्की खात्री तुम्हाला आहे का? नसेल, तर आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत हे सिद्ध करणाऱ्या बायबल भविष्यवाण्यांचा अभ्यास करा. भविष्याबद्दल यहोवानं दिलेल्या अभिवचनावरील विश्वास आणखी मजबूत करण्याची तुमची इच्छा आहे का? तर मग अशा बायबल भविष्यवाण्यांचा अभ्यास करा ज्या पूर्ण झाल्या आहेत. बायबल आजही व्यावहारिक आहे का, अशी शंका तुमच्या मनात येत असेल तर अशा बंधुभगिनींचा अनुभव वाचा, ज्यांनी बायबलच्या मदतीनं आपल्या जीवनात बदल केले आहेत आणि आज एक चांगलं जीवन जगत आहेत. *—१ थेस्सलनी. २:१३.
१७. वाईट रीत्या छळ होत असतानाही टिकून राहण्यास येशूला कशामुळे शक्य झालं, आणि तुम्ही येशूचं अनुकरण कसं करू शकता?
१७ देव देणार असलेल्या आशीर्वादांवर लक्ष केंद्रित करा. येशूनं भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांवर लक्ष केंद्रित केलं. यामुळे अगदी वाईट रीत्या छळ होत असतानाही, टिकून राहण्यास येशूला मदत झाली. (इब्री १२:२) जगातील गोष्टींमुळे तो कधीच विचलित झाला नाही. (मत्त. ४:८-१०) मग येशूच्या उदाहरणाचं आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो? यहोवानं दिलेल्या सुंदर अभिवचनांवर मनन करा. तुम्ही जणू नवीन जगातच आहात अशी कल्पना करा. नंदनवनात तुम्ही काय करणार याचं एखादं चित्र काढायला किंवा लिहून ठेवायला तुम्हाला आवडेल का? किंवा तुम्ही अशा लोकांची यादी बनवू शकता ज्यांचं पुनरुत्थान झाल्यावर तुम्हाला त्यांच्याशी बोलायला आवडेल. शिवाय तुम्ही त्यांच्याशी कोणत्या विषयावर बोलाल हेदेखील तुम्ही लिहून ठेवू शकता. देवानं दिलेली अभिवचनं सगळ्या मानवजातीच्या बाबतीत खरी ठरतील यात काहीच शंका नाही. पण ती तुम्हाला व्यक्तिगत रीत्या कशी लागू होतील ते पाहण्याचा प्रयत्न करा.
१८. आपला विश्वास आणखी मजबूत व्हावा म्हणून प्रार्थना आपल्याला कशी मदत करू शकते?
१८ आपला विश्वास आणखी भक्कम होण्यासाठी प्रार्थना करा. येशूनं त्याच्या शिष्यांना पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवलं. (लूक ११:९, १३) तसंच तुम्हीदेखील पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत असताना, तुमचा विश्वास आणखी वाढावा म्हणून यहोवाकडे विनंती करू शकता. विश्वास हा पवित्र आत्म्याच्या फळाचाच एक खास पैलू आहे. शिवाय तुम्ही काही विशिष्ट गोष्टींचाही आपल्या प्रार्थनांमध्ये उल्लेख करू शकता. उदाहरणार्थ, इतरांना क्षमा करणं तुम्हाला कठीण जात असेल तर तुमचा विश्वास वाढवण्यासाठी आणि इतरांना क्षमा करणं सोपं जावं म्हणून यहोवाला विनंती करा.
१९. आपण कशा प्रकारे चांगल्या मित्रांची निवड करू शकतो?
१९ मजबूत विश्वास असलेल्यांशीच मैत्री करा. येशूनं फार काळजीपूर्वकपणे आपल्या सोबत्यांची निवड केली. त्याचे जिवलग मित्र म्हणजेच त्याचे प्रेषित विश्वासू, एकनिष्ठ आणि आज्ञाधारक होते. (योहान १५:१४, १५ वाचा.) येशूचं अनुकरण करून तुम्हीही काळजीपूर्वकपणे मित्रांची निवड करा. येशूच्या आज्ञेत राहून तेदेखील भक्कम विश्वास दाखवत आहेत की नाही याची खात्री करा. खरे मित्र त्यांनाच म्हणता येईल जे एकमेकांशी प्रामाणिक असतात, अगदी एकमेकांच्या चुका दाखवतानाही!—नीति. २७:९.
२०. इतरांना त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी मदत केल्यामुळे काय परिणाम होईल?
२० इतरांना त्यांचा विश्वास वाढवण्यास मदत करा. येशूनं आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून त्याच्या शिष्यांना आपला विश्वास वाढवण्यास मदत केली. (मार्क ११:२०-२४) याबाबतीतही आपल्याला येशूचं अनुकरण करता येईल. यामुळे आपल्या स्वतःचा आणि इतरांचाही विश्वास वाढवणं आपल्याला शक्य होईल. (नीति. ११:२५) उदाहरणार्थ, तुमच्या क्षेत्रातील लोकांना तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता? त्यांना बायबलविषयी शिकवताना देव खरंच अस्तित्वात आहे, तो आपली काळजी करतो आणि बायबल हे त्याचंच वचन आहे याबद्दलच्या पुराव्यांवर जोर द्या. तुमच्या बंधुभगिनींचा विश्वास आणखी भक्कम करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? जर पुढाकार घेणाऱ्या बांधवांविरुद्ध कोणी तक्रार करत असेल, तर लगेच त्याला टाळायचा प्रयत्न करू नका. उलट त्याचा विश्वास आणखी वाढवण्याकरता, व्यवहारचातुर्य दाखवून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा. (यहू. २२, २३) तुम्ही शाळेत असाल आणि तुमचे शिक्षक उत्क्रांतीबद्दल सांगत असतील तर काय? अशा वेळी धाडस दाखवून निर्मितीवरील आपल्या विश्वासाचं समर्थन करा. तुमच्या शिक्षकांची आणि तुमच्या वर्गसोबत्यांची चांगली प्रतिक्रिया पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.
२१. यहोवा आपल्या प्रत्येकाला काय अभिवचन देतो?
२१ यहोवा आणि येशूनं पेत्राला त्याच्या शंकेवर आणि भीतीवर मात करण्यास मदत केली. आणि पेत्रानं पुढे आपल्या जीवनात भक्कम विश्वासाचं एक उत्तम उदाहरण मांडलं. त्याच प्रकारे, यहोवा आपल्यालाही विश्वासात खंबीर होण्यासाठी मदत करतो. (१ पेत्र ५:९, १० वाचा.) हे खरं आहे, की भक्कम विश्वासासाठी परिश्रमाची गरज आहे. पण जेव्हा आपण त्यासाठी परिश्रम घेऊ तेव्हा यहोवा आपल्याला नक्कीच प्रतिफळ देईल याची खात्री बाळगा.
^ परि. 16 उदाहरणार्थ, टेहळणी बुरूजच्या सार्वजनिक आवृत्तीमधील “बायबलनं बदललं जीवन!” ही लेखमाला पाहा.