योहान्नाकडून आपण काय शिकतो?
येशूच्या १२ प्रेषितांबद्दल बऱ्याच लोकांना माहीत आहे. पण येशूच्या इतर शिष्यांमध्ये स्त्रियादेखील होत्या आणि त्या येशूसोबत मिळून सेवा करायच्या, हे कदाचित त्यांना माहीत नसेल. योहान्ना, ही त्या स्त्रियांपैकी एक होती.—मत्त. २७:५५; लूक ८:३.
तर चला आपण पाहू या, की येशूच्या सेवाकार्यात योहान्नाची काय भूमिका होती आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो?
योहान्ना कोण होती?
योहान्ना ही “हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको” होती. खुजा कदाचित हेरोद अंतिपाच्या घराची व्यवस्था पाहणारा कारभारी असावा. येशूनं अनेक स्त्रियांना बरं केलं होतं आणि योहान्नाही त्यांच्यापैकीच एक होती. इतर स्त्रियांप्रमाणे, योहान्नादेखील येशू आणि त्याच्या शिष्यांसोबत सेवाकार्य करण्यासाठी प्रवास करायची.—लूक ८:१-३.
स्त्रियांनी त्यांच्या नात्यात नसलेल्या पुरुषांसोबत उठबस करणं किंवा त्यांच्यासोबत प्रवास करणं योग्य नाही, असं त्या काळातील यहुदी धर्मगुरू शिकवायचे. इतकंच काय तर यहुदी पुरुषांनी स्त्रियांशी जास्त बोलू नये, असंही ते शिकवायचे. पण येशूनं मात्र अशा व्यर्थ शिकवणींकडे लक्ष दिलं नाही. याउलट, त्यानं योहान्ना आणि इतर विश्वासू स्त्रियांना त्याच्यासोबत येऊ दिलं.
येशू आणि त्याच्या प्रेषितांसोबत आपण सेवाकार्य केलं, तर लोक आपली टिका करतील हे योहान्नाला माहीत होतं. पण तरी ती त्यांच्यासोबत गेली. येशूसोबत जाणाऱ्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात बरेच फेरबदल करावे लागायचे आणि ज्यांनी हे फेरबदल केले, त्यांच्याबद्दल येशूनं म्हटलं, “जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.” (लूक ८:१९-२१; १८:२८-३०) आज आपल्या काळातही येशूचं अनुकरण करण्यासाठी जे स्वतःच्या जीवनात बदल करतात, त्यांची येशू खूप कदर करतो. हे जाणून तुम्हालाही उत्तेजन मिळत नाही का?
सेवेसाठी तिनं आपल्या संपत्तीचा वापर केला
योहान्ना आणि इतर अनेक स्त्रियांनी स्वतःच्या “पैशाअडक्याने” येशू आणि त्याच्या १२ प्रेषितांची सेवाचाकरी केली, असं लूकनं म्हटलं. (लूक ८:३) पण लूकच्या या बोलण्याचा संदर्भ घेऊन एका लेखकानं म्हटलं, “या स्त्रियांनी कदाचित जेवण बनवलं असेल, जेवणाची भांडी धूतली असतील आणि कपडेही शिवले असतील. पण लूक इथं या गोष्टींबद्द्ल सांगत नव्हता.” यावरून हे स्पष्ट होतं, की या स्त्रियांनी आपल्यासोबत असणाऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी स्वतः जवळ असलेल्या पैशांचा, वसतूंचा किंवा आपल्या मालमत्तेचाही वापर केला होता.
प्रचार करण्यासाठी येशू आणि त्याचे प्रेषित वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचे तेव्हा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी नोकरीधंदा केला नाही. त्यामुळे वीसएक जणांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे कदाचित नसतीलही. येशू आणि त्याच्या शिष्यांचा पाहुणचार केला जायचा हे खरं आहे. पण स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ते नेहमी लोकांच्या पाहुणचारावर अवलंबून राहिले नाहीत. हे कशावरून म्हणता येईल? बायबल सांगतं की त्यांच्याकडे पैशाची एक “डबी” होती. (योहा. १२:६; १३:२८, २९) शिवाय, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योहान्ना आणि इतर स्त्रियांनीदेखील दान दिलं असावं.
यहुदी स्त्रियांकडे संपत्ती असेल का, याविषयी काही जण शंका व्यक्त करतात. पण त्या काळाची माहिती देणाऱ्या काही पुस्तकांमधून हे कळतं की यहुदी स्त्रियांकडे भौतिक मालमत्ता असण्याची बरीच कारणं असावीत. जसं की, (१) इतर कोणी वारस नसल्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर तिला मिळाणारी संपत्ती, (२) मुलीला दिला जाणारा संपत्तीचा हिस्सा, (३) आधीच ठरवल्याप्रमाणे घटस्फोटाच्या वेळी दिली जाणारी रक्कम, (४) पतीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहासाठी त्याच्या मालकीचा मिळणारा हिस्सा, किंवा (५) तिनं स्वतः कमवलेली संपत्ती.
येशूचे अनुयायी त्यांच्या परीनं होईल तितकं दान द्यायचे यात काहीच शंका नाही. त्याच्या अनुयायांमध्ये कदाचित काही श्रीमंत स्त्रियादेखील असतील. योहान्ना हेरोदाच्या कारभाऱ्याची बायको असल्यामुळे तीदेखील अशा स्त्रियांपैकी एक असावी, असा निष्कर्ष काही जण काढतात. अशांपैकीच कुणीतरी येशूला, कुठलाही जोड नसलेला महागडा अंगरखा दिला असावा. एका लेखिकेच्या मते, एका सर्वसामान्य स्त्रीनं असा महागडा अंगरखा येशूला देणं शक्य नव्हतं.—योहा. १९:२३, २४.
योहान्ना हिनं आर्थिक मदत केली असेल, असं बायबल स्पष्टपणे सांगत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की तिनं जमेल तितकं केलं. यावरून आपण काय शिकतो? राज्याच्या कामाला हातभार लावण्यासाठी कितपत द्यायचं हे ठरवणं आपल्या हातात आहे. पण आपण जे काही करतो ते जर आपण मनापासून आणि आनंदानं केलं, तर देव त्याची नक्कीच कदर करेल.—मत्त. ६:३३; मार्क १४:८; २ करिंथ. ९:७.
येशूच्या मृत्यूच्या वेळी आणि त्यानंतर
येशूच्या मृत्यूच्या वेळी बऱ्याच स्त्रिया तिथं उपस्थित होत्या. या स्त्रियांविषयी बायबल सांगतं की येशू “गालीलात असताना या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत; यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या.” या स्त्रियांमध्ये योहान्नासुद्धा कदाचित तिथं असावी. (मार्क १५:४१) यासोबतच येशूचं शरीर पुरण्याकरता वधस्तंभावरून खाली उतरवण्यात आलं, तेव्हा “गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्या मागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली.” आणि शब्बाथानंतर मरीया मग्दालीया व याकोबाची आई मरीया जेव्हा कबरेजवळ गेल्या तेव्हा योहान्नादेखील त्यांच्यासोबत होती. तिथं गेल्यावर त्यांनी देवदूतांना पाहिलं आणि त्या देवदूतांनी येशूच्या पुनरुत्थानाविषयी त्यांना सांगितलं.—लूक २३:५५–२४:१०.
इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला जेव्हा येशूचे शिष्य एकत्र जमले होते, तेव्हा येशूची आई आणि त्याच्या भावांसोबत कदाचित योहान्नादेखील तिथं उपस्थित असेल. (प्रे. कृत्ये १:१२-१४) योहान्नाला तिच्या पतीमुळे न्यायालयीन कामकाजांच्या काही आतील गोष्टींची माहिती मिळत असेल. त्यामुळे हेरोद अंतिपाबद्दलच्या ज्या काही गोष्टी लूकला समजल्या त्या कदाचित योहान्नाकडूनच समजल्या असाव्यात, असं काही जणांना वाटतं. शिवाय लूक हा असा एकमेव शुभवर्तमान लेखक होता, ज्यानं योहान्नाचा उल्लेख तिच्या नावानं केला. ही गोष्टदेखील याला दुजोरा देते.—लूक ८:३; ९:७-९; २३:८-१२; २४:१०.
योहान्नाच्या उदाहरणातून आपल्याला काही महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. येशूची सेवा करण्यासाठी तिनं आपल्याकडून होता होईल तितका प्रयत्न केला. तिनं दिलेल्या दानामुळे, येशू, त्याचे बारा शिष्य, आणि इतर अनुयायांना प्रवासासाठी आणि प्रचारकार्यासाठी फायदा झाला, हे जाणून तिला नक्कीच खूप आनंद झाला असेल. त्याकाळी स्त्रियांना इतका विरोध असूनही योहान्नानं एकनिष्ठपणे येशूची सेवा केली. आजच्या ख्रिस्ती बहिणींकरता योहान्नाचं हे किती सुंदर उदाहरण आहे!