नेहमी यहोवावर भरवसा ठेवा!
“लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा.”—स्तो. ६२:८.
१-३. आपण यहोवावर भरवसा ठेवू शकतो अशी खात्री पौलाला का होती? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
पहिल्या शतकात रोममधील परिस्थिती ख्रिश्चनांसाठी अतिशय धोकादायक होती. तिथं राहणाऱ्या ख्रिश्चनांचा रोमी लोकांकडून खूप क्रूरतेनं छळ केला जात होता. एकदा रोममध्ये लागलेल्या मोठ्या आगीसाठी ख्रिश्चनांना जबाबदार धरण्यात आलं. तसंच, ते लोकांचा द्वेष करतात असा आरोप रोमी लोकांनी त्यांच्यावर लावला. त्या काळच्या आपल्या अनेक ख्रिस्ती बांधवांना आणि बहिणींना बंदी बनवण्यात आलं. काहींना रिंगणात हिंस्र प्राण्यांनी फाडून खाल्लं. इतरांना वधस्तंभांवर खिळण्यात आलं आणि काहींना तर रात्रीचा प्रकाश मिळावा म्हणून जिवंत जाळण्यात आलं! तुम्ही त्या काळात राहात असता, तर या संकटांची टांगती तलवार तुमच्यावरही नेहमी असती.
२ त्या अतिशय कठीण काळात पौलाला दुसऱ्यांदा तुरुंगात टाकण्यात आलं. आपले ख्रिस्ती बांधव आपल्याला मदत करतील का, असा प्रश्न कदाचित त्या वेळी पौलाच्या मनात आला असावा. कारण, पूर्वी जेव्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं, तेव्हा त्याला कुणीही मदत केली नव्हती. पण, पौलानं कबूल केलं की त्या परिस्थितीतही तो एकटा नव्हता. यहोवानं येशूद्वारे त्याला मदत पुरवली होती. त्यानं लिहिलं: “प्रभू माझ्याजवळ उभा राहिला . . . त्याने मला शक्ती दिली.” येशूने पौलाला संकटाचा सामना करण्यासाठी लागणारी शक्ती पुरवली होती. म्हणूनच पौलानं म्हटलं, की त्याला २ तीम. ४:१६, १७. *
“सिंहाच्या जबड्यांतून मुक्त” करण्यात आलं.—३ यहोवानं पूर्वी आपल्याला कशी मदत केली होती हे पौलाच्या लक्षात होतं. त्यामुळे, समस्यांचा सामना करण्यासाठी लागणारी शक्ती यहोवा आपल्याला आता आणि पुढेही देत राहील याची खात्री पौलाला होती. त्याला इतकी पक्की खात्री होती की त्यानं लिहिलं: “प्रभू सर्व वाइटापासून माझे नेहमीच रक्षण करेल.” (२ तीम. ४:१८, सुबोधभाषांतर) काही परिस्थितींत कदाचित बांधव आपल्याला मदत करू शकणार नाहीत याची कल्पना पौलाला होती. पण, अशा परिस्थितीतही यहोवा व येशूच्या मदतीवर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो हे तो अनुभवातून शिकला होता. याविषयी त्याच्या मनात जराही शंका नव्हती.
यहोवावर भरवसा दाखवण्याची संधी
४, ५. (क) आपण कोणाच्या मदतीवर नेहमी भरवसा ठेवू शकतो? (ख) यहोवासोबतचं तुमचं नातं तुम्ही आणखी मजबूत कसं करू शकता?
४ तुमच्यावर कधी एखादी मोठी समस्या आली आहे का, आणि तुम्हाला अगदी एकटं पडल्यासारखं वाटलं आहे का? कदाचित तुमची नोकरी गेली असेल किंवा शाळेत तुमच्यावर काही दबाव आले असतील. कदाचित तुम्ही खूप आजारी पडला असाल किंवा दुसरा एखादा कठीण प्रसंग तुमच्यावर आला असेल. अशा वेळी तुम्ही इतरांकडून मदतही मागितली असेल. पण, तुम्हाला हवी असलेली मदत त्यांच्याकडून न मिळाल्यामुळे कदाचित तुम्ही निराश झाला असाल. अर्थात, काही समस्या काढून टाकणं मानवांच्या हातातच नसतं. मग, अशा वेळी तुम्ही काय करू शकता? बायबल आपल्याला अगदी मनापासून “परमेश्वरावर भाव” ठेवण्यास सांगते. (नीति. ३:५, ६) पण, यहोवा खरंच आपल्याला मदत करेल का? हो, नक्कीच करेल! यहोवा आपल्या लोकांना खरोखर मदत करतो अशी खात्री बाळगण्यासाठी बायबलमधील अनेक उदाहरणं आपल्याला मदत करतात.
५ इतरांकडून हवी असलेली मदत न मिळाल्यास, याविषयी मनात राग बाळगू नका. त्याऐवजी पौलासारखा दृष्टिकोन बाळगा. आपल्यावर आलेली समस्या ही खरंतर यहोवावर पूर्ण भरवसा बाळगण्याची संधी आहे असा विचार करा. तसंच, यहोवा कशा प्रकारे साहाय्य पुरवतो हे आपल्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवण्याची ही एक संधी आहे असं समजा. यामुळे, यहोवावर असलेला तुमचा भरवसा अनेक पटींनी वाढेल आणि त्याच्यासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत होईल.
यहोवावर भरवसा ठेवण्याची गरज
६. गंभीर समस्यांचा सामना करत असताना यहोवावर भरवसा ठेवणं नेहमीच सोपं का नसतं?
६ तुम्ही एका कठीण परिस्थितीत आहात अशी कल्पना करा. या समस्येतून बाहेर निघण्यासाठी तुम्ही तुमच्या परीनं सर्व प्रयत्न केले आहेत आणि यहोवाला मदतीसाठी प्रार्थनादेखील केली आहे. पण, यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? यहोवा तुम्हाला मदत करेल ही खात्री बाळगून तुम्ही आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (स्तोत्र ६२:८; १ पेत्र ५:७ वाचा.) जर तुम्हाला यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करायचं असेल, तर त्याच्यावर भरवसा ठेवायला शिकून घेणं फार गरजेचं आहे. अर्थातच हे नेहमी सोपं नसतं. का बरं? कारण, कधीकधी यहोवा लगेचच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही.—स्तो. १३:१, २; ७४:१०; ८९:४६; ९०:१३; हब. १:२.
७. कधीकधी यहोवा आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर का देत नाही?
७ कधीकधी यहोवा आपल्या प्रार्थनांचं लगेच उत्तर का देत नाही? बायबल सांगते की यहोवा आपला पिता आणि आपण त्याची मुलं आहोत. (स्तो. १०३:१३) एक पिता आपल्या मुलाला तो जे काही मागतो ते सर्वच देत नाही आणि काही वेळा लगेचच देत नाही. कारण, पित्याला हे माहीत असतं की कधीकधी मुलांना अचानक एखादी गोष्ट हवीहवीशी वाटते आणि नंतर तिचा विसरही पडतो. तसंच, आपल्या मुलासाठी काय योग्य आहे; आणि त्याची मागणी पूर्ण केल्यामुळे इतरांवर काय परिणाम होईल हेही पित्याला माहीत असतं. मुलाला खरोखरच कशाची गरज आहे आणि त्याला ती गोष्ट देण्याची योग्य वेळ कोणती, याचीही त्याला जाणीव असते. पण विचार करा, मुलगा जे काही मागेल ते पिता लगेचच देऊ लागला, तर तो पिता मुलाचा गुलाम झाल्यासारखं होणार नाही का? त्याचप्रमाणे, आपला स्वर्गातील पिता यहोवा याचं आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे. शिवाय तो आपला निर्माणकर्ता आहे आणि सर्वात बुद्धिमान आहे. त्यामुळे, आपल्याला कशाची गरज आहे आणि आपली ही गरज पुरवण्याची सर्वात योग्य वेळ कोणती हे ठरवण्याचा अधिकार फक्त यहोवालाच आहे. तेव्हा, आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेपर्यंत धीरानं वाट पाहणं योग्य ठरणार नाही का?—यशया २९:१६; ४५:९ पडताळून पाहा.
८. यहोवाने कोणतं अभिवचन दिलं आहे?
८ प्रत्येक व्यक्ती कितपत सहन करू शकते आणि कोणती गोष्ट तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे हे यहोवाला माहीत आहे. (नीति. ३:५, ६) त्यामुळे, प्रत्येकाच्या गरजेनुसार तो सामर्थ्य पुरवतो. कधीकधी आपल्याला वाटेल, ‘आता पुरे झालं, यापुढे मी सहन करू शकत नाही.’ पण, परिस्थिती आपल्या सहन करण्यापलीकडे गेली तर यहोवा त्यातून “निभावण्याचा उपायही करेल,” असं अभिवचन त्याने दिलं आहे. (१ करिंथकर १०:१३ वाचा.) खरोखर, आपल्या प्रत्येकाच्या सहनशक्तीची मर्यादा यहोवाला जाणतो, ही गोष्ट किती दिलासा देणारी आहे!
९. यहोवाने आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर दिलं नाही तर आपण काय केलं पाहिजे?
९ आपण प्रार्थना केल्यावर यहोवानं लगेच आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही, तरी आपण धीर धरला पाहिजे. आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा आतुर असला, तरी आपली गरज पुरवण्यासाठी सर्वात उत्तम वेळ येईपर्यंत तो धीराने वाट पाहतो. बायबलमध्ये असं सांगितलं आहे: “प्रभू तुमच्यावर अनुग्रह करण्यासाठी वाट पाहत आहे. तुमच्यावर करुणा करायला तो उत्सुक आहे; कारण प्रभू न्यायी देव आहे त्याची प्रतीक्षा बाळगणारे धन्य.”—यश. ३०:१८, मराठी कॉमन लँग्वेज.
“सिंहाच्या जबड्यातून”
१०-१२. (क) कुटुंबातील आजारी व्यक्तीची काळजी घेणं कठीण का जाऊ शकतं? (ख) कठीण प्रसंगांत यहोवावर भरवसा ठेवल्यानं, त्याच्यासोबतच्या नातेसंबंधावर याचा काय परिणाम होतो? एक उदाहरण द्या.
१० तुमच्यावर आलेली समस्या कदाचित इतकी कठीण असेल की तुम्हालाही पौलाप्रमाणे जणू ‘सिंहाच्या जबड्यात’ असल्यासारखं वाटेल. (२ तीम. ४:१७) अशा वेळी, यहोवावर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, कदाचित तुमच्या कुटुंबातील एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही काळजी घेत असाल. आणि त्याबाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी आणि खंबीर राहण्यासाठी तुम्ही यहोवाकडून प्रार्थनेत मदतही मागितली असेल. * यहोवाचं तुमच्याकडे लक्ष आहे आणि तो तुम्हाला व तुमच्या परिस्थितीला जाणतो ही गोष्ट आठवून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल. सहन करण्यासाठी आणि त्याला विश्वासू राहण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल, याची खात्री तुम्ही बाळगू शकता.—स्तो. ३२:८.
११ पण, कधीकधी तुम्हाला असं वाटेल की यहोवा आपल्याला मदत करत नाही. कारण कदाचित, डॉक्टरांकडून वेगवेगळे सल्ले मिळत असल्यामुळे तुम्ही गोंधळात पडला असाल. किंवा, नातेवाईक तुमचं सांत्वन करतील, अशी तुम्ही आशा केली असेल; पण, त्यांच्या बोलण्यामुळे तुम्ही आणखीनच दुःखी झाला असाल. अशाही परिस्थितीत निराश होऊ नका. यहोवावर नेहमी भरवसा ठेवा आणि सतत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. (१ शमुवेल ३०:३, ६ वाचा.) यहोवाने तुम्हाला कशी मदत पुरवली हे नंतर जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा त्याच्यासोबतचं तुमचं नातं आणखी घनिष्ठ होईल.
१२ अशाच कठीण परिस्थितीचा लता नावाच्या एका बहिणीनं सामना केला. * तिच्या आईवडिलांचा मृत्यू होण्याआधी तिनं बरीच वर्षं त्यांची काळजी घेतली. ती म्हणते: “त्या परिस्थितीत काय करावं हे कधीकधी मला, माझ्या पतीला आणि भावाला समजायचं नाही. काही वेळा तर आपण अगदी असहाय आहोत असं आम्हाला वाटायचं. पण, आज मागे वळून पाहताना यहोवाने आम्हाला कशी मदत केली हे स्पष्टपणे जाणवतंय. त्याने आम्हाला सहनशक्ती दिली. आणि जेव्हा काहीच आशा नाही असं आम्हाला वाटलं, तेव्हा यहोवाने आमची नेमकी गरज पूर्ण केली.”
१३. यहोवावर भरवसा असल्यामुळे रीना नावाच्या एका बहिणीला कशी मदत झाली?
१३ यहोवावर असलेल्या भरवशामुळे, समस्यांमध्ये
टिकून राहण्यासही आपल्याला मदत होते. रीना नावाच्या बहिणीचा असाच अनुभव आहे. सत्यात नसलेल्या तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. त्याच वेळी तिच्या भावाला लूपस नावाचा एक अतिशय गंभीर आजार झाला. आणि याच्या काही महिन्यांनंतर त्याच्या पत्नीचा, म्हणजेच रीनाच्या वहिनीचा मृत्यू झाला. या सर्व संकटांतून थोडं सावरल्यावर रीनानं सामान्य पायनियरिंग सुरू केली. पण, त्याच दरम्यान तिच्या आईचाही मृत्यू झाला. या सर्व कठीण प्रसंगांना तोंड देणं रीनाला कशामुळे शक्य झालं? ती सांगते: “मी दररोज यहोवाला प्रार्थना करायचे. अगदी छोटासा निर्णय घ्यायचा असला, तरी मी यहोवाला मदत मागायचे. असं केल्यामुळे यहोवा मला अगदी खरा वाटू लागला. स्वतःवर किंवा दुसऱ्या कोणावर भरवसा ठेवण्याऐवजी मी यहोवावर अवलंबून राहायला शिकले. आणि त्याने खरोखर मला खूप मदत केली. माझ्या सर्व गरजा त्याने पुरवल्या. या सर्व काळात यहोवा नेहमी माझ्या सोबत होता हे मी अनुभवलं.”१४. कुटुंबातील एखादी व्यक्ती बहिष्कृत झाल्यास तुम्ही कोणता भरवसा बाळगू शकता?
१४ आणखी एका कठीण परिस्थितीचा विचार करा. कदाचित तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला बहिष्कृत करण्यात आलं असेल. बहिष्कृत झालेल्यांसोबत कसा व्यवहार करावा यासंबंधी बायबल काय म्हणते हे तुम्हाला माहीत आहे. (१ करिंथ. ५:११; २ योहा. १०) पण, त्या व्यक्तीवर खूप प्रेम असल्यामुळे बायबलमधील आज्ञा पाळणं अतिशय कठीण आहे, किंवा अगदी अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल. * अशा वेळी, पूर्णपणे विश्वासू राहण्यास यहोवाला तुम्हाला मदत करेल असा भरवसा तुम्ही बाळगाल का? यहोवाच्या आणखी जवळ येण्याची ही संधी आहे असा विचार तुम्ही कराल का?
१५. आदामाने यहोवाची आज्ञा का मोडली?
१५ यासंदर्भात आदामाच्या उदाहरणाचा विचार करा. यहोवाची आज्ञा मोडूनसुद्धा आपण जिवंत राहू शकतो १ तीम. २:१४) पण, मग तरीसुद्धा त्यानं यहोवाची आज्ञा का मोडली? कारण त्याचं यहोवापेक्षा त्याच्या पत्नीवर जास्त प्रेम होतं आणि म्हणून तिनं दिलेलं फळ त्यानं खाल्लं. त्यानं यहोवाचं ऐकण्याऐवजी आपल्या पत्नीचं ऐकलं.—उत्प. ३:६, १७.
असं वाटत असल्यामुळे आदामाने ती आज्ञा मोडली का? नक्कीच नाही. बायबल सांगते “आदाम भुलवला गेला नाही.” (१६. आपण सर्वात जास्त कोणावर प्रेम केलं पाहिजे, आणि का?
१६ आदामाच्या उदाहरणावरून आपल्याला हेच शिकायला मिळतं, की इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे. (मत्तय २२:३७, ३८ वाचा.) यहोवावर आपलं असं मनापासून प्रेम असेल, तरच आपल्याला आपल्या नातेवाइकांना सर्वात चांगल्या प्रकारे मदत करता येईल; मग ते यहोवाची उपासना करत असोत अथवा नसोत. म्हणूनच, यहोवावर असलेलं तुमचं प्रेम आणि भरवसा वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातील बहिष्कृत झालेल्या सदस्याबद्दलची काळजी तुम्हाला सतावत असेल, तर यहोवाला प्रार्थना करा आणि तुमच्या सर्व भावना त्याला मनमोकळेपणाने सांगा. * (रोम. १२:१२; फिलिप्पै. ४:६, ७) अशा वेळी तुम्हाला खूप दुःख होत असेल हे मान्य आहे. पण तरी, यहोवासोबत तुमचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ करण्याची हीच संधी आहे असा विचार करा. असं केल्यामुळे तुम्ही यहोवावर भरवसा ठेवू शकाल आणि त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे नेहमी चांगलेच परिणाम घडून येतात हे तुम्हाला दिसून येईल.
वाट पाहत असताना
१७. आपण सेवाकार्यात व्यस्त राहिल्यास कशाची खात्री बाळगू शकतो?
१७ यहोवाने पौलाला “सिंहाच्या जबड्यातून” का सोडवलं? पौल सांगतो: “माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी,” म्हणून हे घडलं. (२ तीम. ४:१७) आपल्यावरही यहोवाने “सुवार्ता” सांगण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि तो आपल्याला त्याचे “सहकारी” म्हणतो. (१ थेस्सलनी. २:४; १ करिंथ. ३:९) आपण या कार्यात स्वतःला जमेल तितकं व्यस्त ठेवलं, तर यहोवा आपल्या सर्व गरजा पुरवेल अशी खात्री आपण बाळगू शकतो. (मत्त. ६:३३) आणि यामुळे यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल तोपर्यंत धीराने वाट पाहणं आपल्याला सोपं जाईल.
१८. यहोवावर असलेला भरवसा वाढवून त्याच्यासोबतचं नातं तुम्ही मजबूत कसं करू शकता?
१८ तेव्हा, यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी घनिष्ठ करण्याचा दिवसेंदिवस प्रयत्न करा. तुमच्यावर जेव्हा एखादं संकट येतं आणि तुम्ही चिंतित होता, तेव्हा ही यहोवाच्या आणखी जवळ येण्याची संधी आहे असा विचार करा. बायबलचं वाचन करा, त्याचा अभ्यास करा आणि त्यावर खोलवर विचार करा. यहोवाला नियमितपणे प्रार्थना करत राहा आणि त्याच्या सेवेत स्वतःला व्यस्त ठेवा. या सर्व गोष्टी केल्या, तर तुम्ही हा भरवसा बाळगू शकता की यहोवा तुम्हाला आता आणि भविष्यातही सर्व संकटांचा सामना करण्यास मदत करेल.
^ परि. 2 या ठिकाणी पौल खरोखरच्या सिंहांपासून किंवा इतर भयंकर परिस्थितीतून झालेल्या सुटकेविषयी सांगत असावा.
^ परि. 10 आजारपणाचा सामना करणाऱ्यांना आणि काळजी घेणाऱ्यांना मदत करण्यासाठी काही लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. यासाठी टेहळणी बुरूज १५ डिसेंबर २०११, पृष्ठ २९ आणि १५ मे २०१०, पृष्ठ १७ पाहा.
^ परि. 12 काही नावं बदलण्यात आली आहेत.
^ परि. 14 याच अंकातील “बहिष्कृत करणे—एक प्रेमळ तरतूद” हा लेख पाहा.
^ परि. 16 कुटुंबातील एखादी व्यक्ती यहोवाला सोडून जाते, तेव्हा या परिस्थितीला तुम्ही कसं तोंड देऊ शकता याविषयी काही लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. टेहळणी बुरूज १५ जुलै १९९५, पृष्ठ २५ आणि देवाच्या प्रेमात टिकून राहा, पृष्ठ २३७ पाहा.