व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाला धन्यवाद द्या आणि त्याचे आशीर्वाद मिळवा

यहोवाला धन्यवाद द्या आणि त्याचे आशीर्वाद मिळवा

“यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे.”स्तो. १०६:१, NW.

१. आपण यहोवाचे आभार का मानले पाहिजेत?

यहोवा “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा आहे आणि म्हणून आपण नेहमी त्याचे उपकार मानले पाहिजे. (याको. १:१७) एका प्रेमळ मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या सर्व शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो. (स्तो. २३:१-३) त्यानं आजपर्यंत अनेक वेळा, खासकरून आपण संकटांत असताना आपल्याला साहाय्य केलं आहे. आणि अशा रीतीनं तो आपला “आश्रय” आणि “सामर्थ्य” ठरला आहे. (स्तो. ४६:१) या सर्व कारणांमुळे, आपणही स्तोत्रं लिहिणाऱ्या एका लेखकाच्या पुढील शब्दांशी सहमत आहोत: “यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे.”—स्तो. १०६:१, NW.

२०१५ सालचं वार्षिक वचन: “यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे.”—स्तोत्र १०६:१, NW.

२, ३. (क) आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांची कदर न बाळगल्यास काय होऊ शकतं? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

पण, आभार मानण्याविषयी किंवा धन्यवाद देण्याविषयी आपण चर्चा का करत आहोत? कारण बायबलमध्ये आधीच सांगण्यात आल्याप्रमाणे या शेवटल्या काळातले बहुतेक लोक उपकारांची जाण ठेवत नाहीत. (२ तीम. ३:२) अनेक जण, जीवनात ज्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात त्यांची कदर करत नाहीत. सध्याच्या जगात पैशालाच खूप महत्त्व दिलं जातं. शिवाय, जाहिरातींतून सतत नवनवीन गोष्टी विकत घेण्याचं प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे, आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानण्याऐवजी, लाखो लोक आणखी जास्त गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या असमाधानी मनोवृत्तीचा आपल्यावरही प्रभाव पडू शकतो. प्राचीन इस्राएली लोकांप्रमाणे आपल्यामध्येही उपकारांची जाणीव न ठेवण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ शकते. असं घडल्यास, यहोवासोबतचा आपला मौल्यवान नातेसंबंध आणि त्यानं आपल्याला दिलेले अनेक आशीर्वाद यांची कदर करण्याचं कदाचित आपण सोडून देऊ.—स्तो. १०६:७, ११-१३.

तसंच, जीवनात एखादा कठीण प्रसंग येतो, तेव्हा काय होऊ शकतं याचाही विचार करा. अशा वेळी त्या समस्येपुढे आपल्याला काहीच दिसत नाही आणि त्यामुळे जीवनात मिळालेल्या आशीर्वादांचा पूर्णपणे विसर पडण्याची शक्यता असते. (स्तो. ११६:३) तर मग, आपण आभार मानण्याची वृत्ती कशी उत्पन्न करू शकतो आणि ती कशी टिकवून ठेवू शकतो? आणि कठीण प्रसंगांचा सामना करतानाही अगदीच खचून न जाण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल? या प्रश्नांवर आता आपण चर्चा करू या.

यहोवानं आपल्याकरता किती अद्भुत गोष्टी केल्या आहेत!

४. आपण आभार मानण्याची वृत्ती कशी टिकवून ठेवू शकतो?

आपल्याला जर आभार मानण्याची वृत्ती उत्पन्न करायची असेल आणि ती टिकवून ठेवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? यहोवाकडून आपल्याला कोणकोणते आशीर्वाद मिळाले आहेत हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यांवर खोलवर विचार केला पाहिजे. तसंच, यहोवाच्या प्रेमळ कार्यांबद्दलही आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. यहोवानं केलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींबद्दल जेव्हा स्तोत्राच्या लेखकानं विचार केला, तेव्हा त्याचं मन कृतज्ञतेनं भरून आलं.—स्तोत्र ४०:५; १०७:४२ वाचा.

५. पौलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

उपकारांची जाणीव ठेवण्याची वृत्ती कशी उत्पन्न करता येईल याविषयी आपण प्रेषित पौलाकडून बरंच काही शिकू शकतो. पौलानं वारंवार यहोवाला धन्यवाद दिला. त्याला मिळालेल्या आशीर्वादांवर त्यानं नक्कीच खोलवर विचार केला असेल हे यावरून दिसून येतं. पौल आधी “निंदक, छळ करणारा व जुलमी” होता आणि त्याला या गोष्टीची जाणीव होती. आपण पूर्वी इतके अपराध केले तरी देवानं आणि ख्रिस्तानं इतरांना सुवार्ता सांगण्याचा बहुमान आपल्याला दिला याबद्दल त्यानं नेहमी कृतज्ञता दाखवली. (१ तीमथ्य १:१२-१४ वाचा.) पौलानं आपल्या सहविश्वासू बांधवांचीही मनापासून कदर केली आणि त्यांच्या उत्तम गुणांबद्दल आणि विश्वासू सेवेबद्दल त्यानं यहोवाचे कित्येकदा आभार मानले. (फिलिप्पै. १:३-५, ७; १ थेस्सलनी. १:२, ३) शिवाय, कठीण परिस्थितीचा सामना करताना बांधवांकडून योग्य वेळी मिळालेल्या मदतीबद्दल तो यहोवाचे आभार मानायला विसरला नाही. (प्रे. कृत्ये २८:१५; २ करिंथ. ७:५-७) म्हणूनच पौलानं इतर ख्रिश्चनांना असं उत्तेजन दिलं: “तुम्ही कृतज्ञ असा. . . . परस्परांस सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा; . . . त्याची उपकारस्तुती करा.”—कलस्सै. ३:१५-१७.

उपकारांची जाणीव ठेवण्यासाठी मनन आणि प्रार्थना करा

६. तुम्हाला विशेषतः कोणत्या गोष्टीबद्दल यहोवाचे आभार मानावेसे वाटतात?

कृतज्ञता उत्पन्न करण्याच्या आणि ती व्यक्त करण्याच्या बाबतीत आपण पौलाच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? यहोवानं व्यक्तिगत रीत्या आपल्यासाठी जे काही केलं आहे त्यावर पौलाप्रमाणेच आपणही मनन केलं पाहिजे. (स्तो. ११६:१२) ‘यहोवाकडून मिळालेल्या कोणत्या आशीर्वादांकरता तुम्ही मनापासून कृतज्ञ आहात,’ असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल? यहोवासोबत असलेल्या तुमच्या बहुमूल्य नातेसंबंधाचा तुम्ही उल्लेख कराल का? किंवा ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्वास असल्यामुळे मिळणाऱ्या क्षमेविषयी तुम्ही सांगाल का? कठीण प्रसंगांचा सामना करताना ज्या बांधवांनी आणि बहिणींनी तुम्हाला मदत केली त्यांची नावं तुम्ही घ्याल का? शिवाय तुमच्या प्रिय जोडीदाराचा आणि लाडक्या मुलांचाही तुम्ही नक्कीच उल्लेख कराल, नाही का? आपल्या प्रेमळ पित्यानं, यहोवानं दिलेल्या या सर्व उत्तम आशीर्वादांबद्दल खोलवर विचार केल्यानं तुमच्या मनात त्याच्याप्रती कृतज्ञता निर्माण होईल. आणि यामुळे त्याला धन्यवाद देण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल.—स्तोत्र ९२:१, २ वाचा.

७. (क) प्रार्थनेत आपण यहोवाचे आभार का मानले पाहिजेत? (ख) प्रार्थनेत कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे मिळतील?

यहोवानं आपल्यासाठी कायकाय केलं आहे हे जेव्हा आपल्या मनात स्पष्ट असतं, तेव्हा आपण आपोआपच त्याला प्रार्थना करून धन्यवाद देण्यास प्रेरित होतो. (स्तो. ९५:२; १००:४, ५) प्रार्थना करणं म्हणजे देवाला केवळ आपल्या मागण्या कळवणं असं अनेकांना वाटतं. पण, आपल्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींकरता जेव्हा आपण यहोवाला धन्यवाद देतो, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. बायबलमध्ये अशा अनेकांच्या हृदयस्पर्शी प्रार्थना वाचायला मिळतात ज्यांनी यहोवाला मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. यांत हन्ना आणि हिज्कीया यांच्या प्रार्थनांचाही समावेश होतो. (१ शमु. २:१-१०; यश. ३८:९-२०) तेव्हा, कृतज्ञ मनोवृत्ती दाखवणाऱ्या या विश्वासू सेवकांचं अनुकरण करा. त्यांच्याप्रमाणेच, यहोवाच्या सर्व आशीर्वादांबद्दल प्रार्थनेत त्याला धन्यवाद द्या. (१ थेस्सलनी. ५:१७, १८) असं केल्यानं तुम्हाला अनेक फायदे मिळतील. तुम्ही आनंदी राहू शकाल, यहोवाप्रती तुमचं प्रेम वाढेल आणि त्याच्यासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ होईल.—याको. ४:८.

यहोवाकडून मिळालेल्या कोणत्या आशीर्वादांसाठी तुम्हाला आभार मानावेसे वाटतात? (परिच्छेद ६, ७ पाहा)

८. यहोवाच्या आशीर्वादांचा आपल्याला कशामुळे विसर पडू शकतो?

यहोवानं केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दलची आपली कदर कमी होऊ नये म्हणून आपण काळजी का घेतली पाहिजे? कारण, उपकार विसरून जाण्याची वृत्ती जन्मतःच आपल्यात असते. आदाम आणि हव्वा यांनी काय केलं त्याचा विचार करा. त्यांना एका सुंदर नंदनवनात ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व गरजा पुरवण्यात आल्या होत्या. इतकंच नव्हे, तर त्यांच्यापुढे सदासर्वकाळ सुखासमाधानानं राहण्याची आशादेखील होती. (उत्प. १:२८) पण, दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी या सर्व आशीर्वादांची कदर केली नाही. जे मिळालं आहे त्यात समाधान मानण्याऐवजी त्यांना आणखी काहीतरी मिळवण्याची इच्छा होती. याचा परिणाम काय झाला? त्यांच्याजवळ जे काही होतं तेही ते गमावून बसले. (उत्प. ३:६, ७, १७-१९) आजच्या जगात, उपकार विसरून जाण्याची वृत्ती सगळीकडेच दिसून येते. अशा जगात राहताना आपल्यालाही यहोवानं आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याचा हळूहळू विसर पडू शकतो. कदाचित आपण यहोवासोबतच्या आपल्या मैत्रीला पूर्वीसारखं महत्त्व देणार नाही. जगभरातल्या आपल्या बांधवांसोबत मिळून यहोवाची उपासना करणं हा किती मोठा बहुमान आहे याचीही कदाचित आपल्याला जाणीव राहणार नाही. उलट, आपण हळूहळू या जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटत जाऊ. पण, या सर्व गोष्टींचा लवकरच नाश होणार आहे हे आपल्याला माहीत आहे. (१ योहा. २:१५-१७) म्हणूनच, आपण यहोवाकडून मिळालेल्या आशीर्वादांची नेहमी आठवण ठेवली पाहिजे. तसंच, यहोवाच्या लोकांपैकी एक असण्याचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे त्याकरता त्याचे नेहमी आभार मानले पाहिजेत.—स्तोत्र २७:४ वाचा.

कठीण प्रसंगांचा सामना करताना

९. कठीण प्रसंगांचा सामना करताना आपण आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांवर लक्ष का केंद्रित केलं पाहिजे?

यहोवानं दिलेल्या आशीर्वादांची नेहमी आठवण ठेवल्यानं कठीण प्रसंगांचा सामना करण्यास आपल्याला मदत होईल. आपल्यावर अचानक एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा आपण खूप गोंधळून जाऊ शकतो. काय करावं हे आपल्याला कळत नाही. शिवाय, या कठीण प्रसंगामुळे आपलं जीवन पार बदलून जाऊ शकतं. उदाहरणार्थ, विवाह जोडीदारानं केलेला विश्वासघात, जीवघेणा आजार, प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा नैसर्गिक विपत्ती. अशा प्रसंग जर आपण यहोवाकडून मिळालेल्या आशीर्वादांवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला सांत्वन आणि बळ मिळेल. पुढील उदाहरणांवर लक्ष द्या.

१०. इरीनाला तिच्या आशीर्वादांची आठवण ठेवल्यानं कशी मदत झाली?

१० अमेरिकेतील इरीना * नावाच्या एका पायनियर बहिणीचा पती मंडळीत वडील म्हणून सेवा करत होता. पण, त्यानं तिचा विश्वासघात केला आणि तिला व मुलांना सोडून गेला. अशा परिस्थितीतही यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहण्यास इरीनाला कशामुळे मदत मिळाली? ती सांगते, “यहोवा माझी काळजी घेतो यासाठी मी खरोखरच त्याची खूप आभारी आहे. मी दररोज माझ्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. असं केल्यामुळे यहोवा एक व्यक्ती म्हणून मला ओळखतो आणि प्रेमळपणे माझा सांभाळ करतो याची मला जाणीव होते. तो मला कधीच सोडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.” इरीनाच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग आले आहेत. पण, तिच्या आनंदी मनोवृत्तीमुळे तिला या प्रसंगांना तोंड देणं शक्य होतं. खरंतर तिच्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळतं.

११. जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी एका बहिणीला कशामुळे मदत झाली?

११ आशियात राहणाऱ्या क्यूंग-सुक नावाच्या एका बहिणीनं २० पेक्षा जास्त वर्षं तिच्या पतीसोबत पायनियर सेवा केली होती. पण, अचानकच तिला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं समजलं. ती जास्तीतजास्त तीन ते सहा महिने जगेल असंही डॉक्टरांनी सांगितलं. तिनं व तिच्या पतीनं यापूर्वी अनेक लहानमोठ्या समस्यांचा सामना केला होता. पण, आपलं शरीर मात्र धडधाकट आहे असं त्यांना वाटायचं. ती बहीण म्हणते: “आजाराबद्दल समजल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला. आता आयुष्यात काहीच उरलं नाही असं मला वाटलं. खूप भीतीही वाटली.” मग, या प्रसंगाचा सामना करायला या बहिणीला कशामुळे मदत झाली? ती म्हणते: “रोज रात्री झोपण्याआधी मी गच्चीवर जाते आणि यहोवाला मोठ्यानं प्रार्थना करते. दिवसभरातल्या कोणत्या पाच गोष्टींसाठी मी त्याची आभारी आहे हे मी त्याला सांगते. असं केल्यानं मला खूप दिलासा मिळतो आणि यहोवाबद्दल मनात प्रेम दाटून येतं.” रोज रात्री अशा प्रकारे प्रार्थना केल्यामुळे या बहिणीला कसा फायदा झाला आहे? ती म्हणते: “आपण कठीण प्रसंगांतून जात असतो तेव्हा यहोवा आपला सांभाळ करतो हे मला जाणवलं आहे. तसंच, आपल्या जीवनात समस्यांपेक्षा आशीर्वाद कितीतरी जास्त आहेत याचीही मला जाणीव झाली आहे.”

वादळातून बचावलेला तिचा भाऊ जॉन याच्यासोबत (परिच्छेद १३ पाहा)

१२. पत्नीला गमावल्यानंतर जेसन यांना कशामुळे सांत्वन मिळालं?

१२ जेसन, हे आफ्रिकेच्या शाखा कार्यालयात तीसपेक्षा जास्त वर्षांपासून पूर्णवेळेची सेवा करत आहेत. ते म्हणतात: “सात वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. खरंच, खूप कठीण असतं हे दुःख सहन करणं. कॅन्सरशी लढा देताना तिला जो त्रास झाला तो आठवला की अजूनही खूप अस्वस्थ होतो मी.” मग, या दुःखाचा सामना करण्यास जेसन यांना कशामुळे मदत झाली? ते सांगतात, “एकदा मला माझ्या पत्नीसोबत घालवलेला एक सुंदर प्रसंग आठवला. त्या गोड आठवणीसाठी मी यहोवाचे आभार मानले. तेव्हा माझं दुःख हलकं झाल्यासारखं मला वाटलं आणि त्यानंतर या सुंदर आठवणींबद्दल मी नेहमी यहोवाचे आभार मानू लागलो. यामुळे जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. पत्नीला गमावल्याचं दुःख मला अजूनही होतं, पण यहोवानं मला जे चांगलं वैवाहिक जीवन दिलं त्यासाठी मी त्याचे नेहमी आभार मानतो. तसंच, यहोवावर नितांत प्रेम असणाऱ्या जोडीदारासोबत त्याची सेवा करण्याचा जो बहुमान मला मिळाला त्याकरताही मी यहोवाचे आभार मानतो. यामुळे मला माझ्या निराशेवर मात करायला मदत मिळाली.”

“यहोवा माझा देव आहे याबद्दल मी खूप आभारी आहे.”—शेरिल

१३. कुटुंबातल्या बहुतेक सदस्यांना गमावलेल्या शेरिलला या दुःखाचा सामना करण्यास कशामुळे मदत झाली?

१३ नोव्हेंबर २०१३ मध्ये फिलिपाईन्स इथं हायान नावाचं मोठं वादळ आलं. यात शेरिल हिनं जवळजवळ सर्वकाही गमावलं. तेव्हा ती फक्त १३ वर्षांची होती. ती म्हणते, “वादळात माझं घर, आणि जवळजवळ पूर्णच कुटुंब गेलं.” या जोरदार वादळात तिच्या आई-वडिलांचा आणि तीन भावंडांचा मृत्यू झाला. अशा कठीण परिस्थितीतही अगदीच खचून न जाण्यास शेरिलला कशामुळे मदत झाली? उपकारांची जाणीव ठेवण्याच्या तिच्या मनोवृत्तीमुळे. गमावलेल्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा जे आशीर्वाद यहोवाकडून तिला मिळाले आहेत, त्यांची ती कदर करते. ती म्हणते, “संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी आपल्या बांधवांनी किती मेहनत घेतली हे मी स्वतः पाहिलं. जगभरातले सर्व बांधव माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत हे मला माहीत होतं. खरंच, यहोवा माझा देव आहे याबद्दल मी खूप आभारी आहे. त्याच्या लोकांना तो कधीच सोडत नाही.” शेरिलच्या या उदाहरणावरून काय दिसून येतं? हेच, की दुःखद प्रसंगांवर यशस्वीपणे मात करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे जीवनात मिळालेल्या चांगल्या गोष्टी नेहमी नजरेसमोर ठेवणं. उपकारांची जाणीव ठेवण्याच्या या मनोवृत्तीमुळे कोणत्याही कठीण प्रसंगात टिकून राहण्यास आपल्याला मदत मिळेल.—इफिस. ५:२०; फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.

“मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन”

१४. आपल्यासमोर कोणती रोमांचक आशा आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१४ प्राचीन काळातही यहोवाच्या सेवकांनी त्याच्या आशीर्वादांसाठी आनंद व्यक्त केला आणि त्याची उपकारस्तुती केली. इस्राएली लोकांच्या उदाहरणाचा विचार करा. तांबड्या समुद्राजवळ फारो आणि त्याच्या सैन्यापासून जेव्हा त्यांची सुटका झाली, तेव्हा त्यांनी गीत गाऊन यहोवाची मनापासून स्तुती केली आणि त्याचे आभार मानले. (निर्ग. १५:१-२१) लवकरच, आपलीही सर्व दुःखांपासून सुटका होणार आहे. ही आशा आपल्याला मिळालेल्या सर्वात मौल्यवान आशीर्वादांपैकी एक आहे. (स्तो. ३७:९-११; यश. २५:८; ३३:२४) जरा कल्पना करा, जेव्हा यहोवा त्याच्या सर्व शत्रूंचा नाश करेल आणि कोणताही अन्याय नसलेल्या एका शांतिमय नव्या जगात आपलं स्वागत करेल, तेव्हा आपल्याला किती आनंद होईल! खरोखर, त्या दिवशी यहोवाचे लोक त्याचे किती आभार मानतील!—प्रकटी. २०:१-३; २१:३, ४.

१५. या संपूर्ण वर्षादरम्यान तुम्ही काय करायचं ठरवलं आहे?

१५ या वर्षीही यहोवाची सेवा करत असताना त्याच्याकडून आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील अशी आपण आशा करू शकतो. अर्थात, अनेक समस्यांचाही कदाचित आपल्याला सामना करावा लागेल. पण, काहीही असो यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही हे आपल्याला माहीत आहे. (अनु. ३१:८; स्तो. ९:९, १०) तसंच, त्याची विश्वासूपणे सेवा करता यावी म्हणून तो आपल्याला सर्व प्रकारे मदत करत राहील. तेव्हा, आपणही हबक्कूकसारखाच निर्धार करू या. त्यानं म्हटलं: “अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यांतील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यांत गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्लास करेन.” (हब. ३:१७, १८) तर मग, या संपूर्ण वर्षादरम्यान आपण यहोवाकडून मिळालेल्या आशीर्वादांवर आनंदानं मनन करू या. असं केल्यामुळे आपल्याला २०१५ च्या वार्षिक वचनात दिलेल्या या सल्ल्याचं पालन करण्याची प्रेरणा मिळेल: “यहोवाला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे.”—स्तो. १०६:१, NW.

^ परि. 10 काही नावं बदलण्यात आली आहेत.