पुष्कळ संकटे असूनही विश्वासात टिकून राहा
“आपणाला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” —प्रे. कृत्ये १४:२२.
१. देवाच्या सेवकांवर संकटे येतात तेव्हा त्यांना आश्चर्य का वाटत नाही?
सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळण्याआधी आपल्याला पुष्कळ संकटांचा सामना करावा लागेल हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटते का? खरेतर नाही. कारण आपण सत्यात नवीन असलो किंवा अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो तरी आपल्याला हे माहीत आहे की सैतानाच्या जगात संकटे ही येणारच.—प्रकटी. १२:१२.
२. (क) ख्रिश्चनांना खासकरून कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) आपल्यावर येणाऱ्या संकटांमागे कोणाचा हात आहे, आणि हे आपण कसे सांगू शकतो?
२ सगळ्याच अपरिपूर्ण मानवांवर जी संकटे येतात त्यांव्यतिरिक्त ख्रिश्चनांना एका खास प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागतो. (१ करिंथ. १०:१३) ते संकट कोणते? देवाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे होणारा तीव्र विरोध. येशूने त्याच्या अनुयायांना सांगितले होते, की “दास धन्यापेक्षा मोठा नाही . . . ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.” (योहा. १५:२०) पण, या विरोधामागे मुळात कोणाचा हात आहे? खरेतर यामागे सैतानाचाच हात आहे. बायबलमध्ये सांगितले आहे की तो “गर्जणाऱ्या सिंहासारखा” देवाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी नेहमी टपून बसलेला असतो. (१ पेत्र ५:८) येशूच्या शिष्यांना विश्वासातून पाडण्यासाठी सैतान वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतो. या संबंधाने प्रेषित पौलासोबत काय घडले त्याकडे लक्ष द्या.
लुस्त्रामध्ये झालेला छळ
३-५. (क) लुस्त्रामध्ये पौलाला कोणत्या छळाचा सामना करावा लागला? (ख) भविष्यातील संकटांविषयी पौलाचे शब्द प्रोत्साहन देणारे का होते?
३ ख्रिस्ताचा अनुयायी असल्यामुळे पौलाला अनेकदा छळाला तोंड द्यावे लागले. (२ करिंथ. ११:२३-२७) उदाहरणार्थ, लुस्त्रामध्ये जन्मापासूनच पांगळा असलेल्या एका माणसाला बरे केल्यानंतर तेथील लोक पौल व बर्णबा यांना देव म्हणून त्यांचा गौरव करू लागले. त्या लोकांना असे करण्यापासून रोखण्यासाठी या दोघांना अक्षरशः विनवणी करावी लागली! पण, तेवढ्यातच त्या ठिकाणी काही यहुदी विरोधक आले आणि खोटे बोलून त्यांनी लोकांचे मन वळवले. त्यामुळे, ज्या लोकांनी काही वेळापूर्वीच पौलाचे गौरव केले होते त्याच लोकांनी त्याला दगडमार केला आणि मेलेला समजून त्याला टाकून दिले.—प्रे. कृत्ये १४:८-१९.
४ पौल व बर्णबा यांनी दर्बे शहराला भेट दिल्यानंतर, “लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया या नगरांत ते परत आले; आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा; कारण आपणाला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” (प्रे. कृत्ये १४:२१, २२) पहिल्यांदाच हे वाक्य वाचल्यानंतर कदाचित आपण गोंधळात पडू. पुष्कळ संकटे येतील असे सांगून पौल आणि बर्णबा यांनी ‘शिष्यांची मने स्थिरावली’ हे कसे शक्य आहे, असे कदाचित आपल्याला वाटेल. कारण ‘पुष्कळ संकटे’ येतील असे सांगितल्यावर कोणालाही वाईटच वाटेल, प्रोत्साहन मिळणार नाही.
५ पण, पौलाच्या शब्दांकडे नीट लक्ष दिल्यास आपल्या मनातील गोंधळ दूर होईल. आपल्याला “पुष्कळ संकटांत टिकून” राहायचे आहे इतकेच पौलाने सांगितले नाही; तर, त्याने म्हटले की “आपणाला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” विश्वासात टिकून राहिल्यास जे बक्षीस मिळेल त्यावर जोर देण्याद्वारे पौलाने बांधवांना प्रोत्साहन दिले. हे बक्षीस काही स्वप्न नाही. कारण जो शेवटपर्यंत टिकून राहील तो “तरेल” असे येशूने म्हटले.—मत्त. १०:२२.
६. जे शेवटपर्यंत टिकून राहतील त्यांना कोणते बक्षीस मिळेल?
६ आपण जर शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहिलो, तर आपल्याला नक्कीच बक्षीस मिळेल. अभिषिक्त ख्रिश्चनांना येशूसोबत सहराजे म्हणून राज्य करण्यासाठी स्वर्गात अमर जीवन देण्यात येईल. तर “दुसरी मेंढरे” यांना “नीतिमत्त्व वास” करेल अशा पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळेल. (योहा. १०:१६; २ पेत्र ३:१३) पण, पौलाने सांगितल्याप्रमाणे ते बक्षीस मिळेपर्यंत आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. आता आपण अशा दोन प्रकारच्या संकटांवर चर्चा करू या.
थेटपणे होणारे हल्ले
७. काही ख्रिश्चनांना कोणत्या प्रकारच्या छळाला तोंड द्यावे लागेल?
७ येशूने आधीच सांगितले होते, की लोक “तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हाला मार देतील आणि सुभेदार व राजे यांच्यापुढे . . . [तुम्हाला] उभे राहावे लागेल.” (मार्क १३:९) वरील शब्दांवरून हे सूचित होते की काही ख्रिश्चनांना शारीरिक छळाचा सामना करावा लागेल. कदाचित धार्मिक किंवा राजकीय पुढारी, लोकांना हा छळ करण्यास प्रवृत्त करतील. (प्रे. कृत्ये ५:२७, २८) पण, पुन्हा एकदा पौलाच्या उदाहरणावर लक्ष द्या. शारीरिक छळाचा सामना करावा लागेल या विचारामुळे पौल घाबरला का? मुळीच नाही.—प्रेषितांची कृत्ये २०:२२, २३ वाचा.
८, ९. पौलाला कोणत्याही परिस्थितीत विश्वासात टिकून राहायचे होते हे कशावरून कळते, आणि आजच्या काळात काहींनी कशा प्रकारे त्याच्यासारखेच धैर्य दाखवले आहे?
८ सैतानाद्वारे थेटपणे केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांना पौलाने धैर्याने तोंड दिले. त्याने म्हटले: “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” (प्रे. कृत्ये २०:२४) पौलाच्या शब्दांवरून स्पष्टपणे दिसून येते की संकटांच्या भीतीमुळे त्याचे धैर्य खचले नाही. उलट, त्याला कोणत्याही परिस्थितीत विश्वासात टिकून राहायचे होते. सुवार्ता सांगण्याची जी सेवा त्याच्यावर सोपवण्यात आली होती ती पूर्ण करण्याचीच त्याला सर्वात जास्त काळजी होती.
९ आजही आपल्या बऱ्याच बंधुभगिनींनी असेच धैर्य दाखवले आहे. उदाहरणार्थ, एका देशात काही साक्षीदारांना लष्करी सेवा नाकारल्यामुळे जवळजवळ वीस वर्षे तुरुंगात राहावे लागले आहे. त्यांचा खटला कधीच न्यायालयात आला नाही कारण त्या देशात विवेकाला पटत नसल्यामुळे लष्करी सेवा नाकारणाऱ्यांसाठी कोणतीच तरतूद नव्हती. तुरुंगात असताना त्यांच्या मित्रांना, इतकेच काय तर त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांनाही त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. तसेच, कैदेत असलेल्या काहींना मारहाण करण्यात आली आणि काहींना वेगवेगळ्या मार्गांनी क्रूरपणे यातना देण्यात आल्या.
१०. अचानक एखादे संकट आल्यास आपण घाबरून का जाऊ नये?
१० काही ठिकाणी आपल्या बांधवांना अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करावा लागतो. तुमच्यावरही अचानक एखादे संकट आल्यास घाबरून जाऊ नका. योसेफाच्या उदाहरणावर मनन करा. त्याला गुलाम म्हणून विकण्यात आले होते पण यहोवाने “त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले.” (प्रे. कृत्ये ७:९, १०) तुमच्याबाबतीतही यहोवा हेच करू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा की “भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे” हे यहोवाला माहीत आहे. (२ पेत्र २:९) तुम्ही यहोवावर भरवसा ठेवणार का? तो तुम्हाला सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेतून सोडवू शकतो आणि त्याच्या राज्यात सार्वकालिक जीवन देऊ शकतो ही खात्री तुम्ही बाळगाल का? तुम्ही नक्कीच यहोवावर भरवसा ठेवून धैर्याने संकटांचा सामना करू शकता.—१ पेत्र ५:८, ९.
अप्रत्यक्षपणे होणारे हल्ले
११. अप्रत्यक्षपणे होणारे हल्ले हे थेटपणे होणाऱ्या हल्ल्यांपेक्षा कशा प्रकारे वेगळे असतात?
११ आपल्याला आणखी एका प्रकारच्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. ते संकट म्हणजे अप्रत्यक्षपणे होणारे हल्ले. हे संकट थेटपणे होणाऱ्या शारीरिक छळापेक्षा वेगळे कसे आहे? थेटपणे होणाऱ्या हल्ल्यांची तुलना एखाद्या वादळाशी करता येईल. तुमच्या शहराला वादळाचा तडाखा बसल्यास काही क्षणांतच तुमचे घर कोसळू शकते. पण, अप्रत्यक्षपणे होणारे हल्ले याच्या अगदी उलट असतात. त्यांची तुलना घराला लागणाऱ्या वाळवीशी करता येईल. वाळवी नकळत घरात शिरते आणि हळूहळू घराला इतके पोखरुन काढते की शेवटी ते पडून जाते. त्याच प्रकारे अप्रत्यक्ष रीत्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे एखाद्या व्यक्तीचा विश्वास हळूहळू कमकुवत होत जातो. आणि कधीकधी तर ही गोष्ट तिच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
१२. (क) सैतान कोणत्या चलाख युक्तीचा वापर करतो, आणि ती इतकी प्रभावी का आहे? (ख) निराशेचा पौलावर काय परिणाम झाला?
१२ यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध तुटावा अशी सैतानाची इच्छा आहे. आणि यासाठी तो एकतर थेटपणे आपला छळ करतो किंवा अप्रत्यक्ष हल्ल्यांद्वारे आपला विश्वास हळूहळू कमकुवत करतो. अप्रत्यक्ष हल्ल्यांपैकी निराशा ही सैतानाची अतिशय चलाख युक्ती आहे. प्रेषित पौलाने कबूल केले की तोही कधीकधी निराश झाला. (रोमकर ७:२१-२४ वाचा.) आध्यात्मिक रीत्या मजबूत असलेल्या व बहुधा पहिल्या शतकातील नियमन मंडळाचा सदस्य असलेल्या पौलाने स्वतःला “कष्टी माणूस” का म्हटले? अपरिपूर्णतेतून घडणाऱ्या चुकांमुळे पौलाला असे वाटले. त्याला नेहमीच जे योग्य आहे ते करण्याची इच्छा होती. पण, आपला कल वाईटाकडे जास्त असल्याचे त्याला जाणवले. तुमच्याही मनात कधी अशा भावना आल्या आहेत का? असल्यास, प्रेषित पौलालाही अशाच समस्येचा सामना करावा लागला हे जाणून तुम्हाला सांत्वन मिळत नाही का?
१३, १४. (क) देवाचे काही सेवक निराश का होतात? (ख) आपण विश्वासातून पडून जावे अशी कोणाची इच्छा आहे, आणि का?
१३ कधीकधी अनेक बांधवांच्या व बहिणींच्या मनात निराशा आणि चिंता यांसारख्या भावना येतात. आपण काहीच कामाचे नाही असेही त्यांना काही वेळा वाटते. एका आवेशी पायनियरच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. या बहिणीला आपण दिपिका म्हणू. ती म्हणते: “माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल मी पुन्हापुन्हा विचार करते आणि प्रत्येक वेळी मी आणखीनच निराश होते. आणि आतापर्यंत घडलेल्या चुकांबद्दल मी जेव्हा विचार करते तेव्हा तर मला असं वाटतं की माझ्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही, यहोवासुद्धा नाही.”
१४ दिपिकासारखे यहोवाचे काही आवेशी सेवक अशा प्रकारे निराश का होतात? याची अनेक कारणे असू शकतात. काही जणांना स्वतःबद्दल व स्वतःच्या परिस्थितीबद्दल वाईटच विचार करण्याची सवय असते. (नीति. १५:१५) तर काहींना एखादी शारीरिक व्याधी असल्यामुळे तिचा परिणाम त्यांच्या भावनांवर होतो. आणि त्यामुळे ते स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतात. यांपैकी कोणतेही कारण असले, तरीही आपल्या या भावनांचा कोण गैरफायदा घेऊ इच्छितो हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. जरा विचार करा, निराश होऊन आपण विश्वासातून पडून जावे अशी कोणाची इच्छा आहे? जे अपराधीपणाचे ओझे तो वागवत आहे ते आपणही वागवावे अशी कोणाची इच्छा आहे? (प्रकटी. २०:१०) हा दुसरा तिसरा कोणी नसून सैतानच आहे. खरेतर सैतानाची हीच इच्छा आहे की आपण चिंतित व्हावे, आपला आवेश कमी व्हावा आणि शेवटी आपण सत्य सोडून द्यावे. आणि यासाठी तो आपल्यावर थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे हल्ला करतो. तेव्हा, देवाचे लोक आध्यात्मिक अर्थाने एक युद्ध लढत आहेत हे कधीही विसरू नका.
१५. निराशेमुळे आपण हार मानू इच्छित नाही हे आपण कसे दाखवू शकतो?
१५ कधीही हार मानू नका. भविष्यात मिळणारे बक्षीस नेहमी डोळ्यांसमोर ठेवा. पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांना लिहिले: “आम्ही कधीही निराश होत नाही. आमची शरीरे मरण पावत असली, तरी प्रभूच्या ठायी असलेले आमचे आंतरिक सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत आहे. तसे पाहिले तर आमची संकटे व आमचा छळ अती क्षुद्र व क्षणिक आहेत. तरी दुःखाच्या या अल्पकाळाचा शेवट आम्हावर होणाऱ्या देवाच्या सदासर्वकाळाच्या अत्यंत बहुमोल आशीर्वादाने होणार आहे.”—२ करिंथ. ४:१६, १७, सुबोधभाषांतर.
पुढे येणाऱ्या संकटांसाठी आताच तयारी करा
१६. पुढे येणाऱ्या संकटांसाठी आताच तयारी करणे सुज्ञपणाचे का आहे?
१६ आपण पाहिले की सैतान अनेक “डावपेच” वापरून आपल्यावर हल्ला करतो. (इफिस. ६:११) त्यामुळे १ पेत्र ५:९ यात जो सल्ला दिला आहे त्याचे आपल्यापैकी प्रत्येकाने पालन केले पाहिजे. त्यात म्हटले आहे: “त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा.” आपल्याला विश्वासात दृढ उभे राहता यावे म्हणून आपण आताच स्वतःला योग्य ते करण्याची सवय लावली पाहिजे. एका उदाहरणाकडे लक्ष द्या: युद्धाची कोणतीही शक्यता नसली तरीही सैनिकांची फौज सहसा कठोर लष्करी तालीम करत असते. यहोवाच्या आध्यात्मिक सैन्याबद्दलही तसेच आहे. भविष्यात आपल्यावर कोणती संकटे येतील हे आपल्याला माहीत नाही. तर मग, त्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करण्याकरता आताच मेहनत घेणे सुज्ञपणाचे ठरणार नाही का? पौलाने करिंथकरांना लिहिले: “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा.”—२ करिंथ. १३:५.
१७-१९. (क) आपण आत्मपरीक्षण कसे करू शकतो? (ख) शाळाकॉलेजांत आपल्या विश्वासांविषयी धैर्याने सांगता यावे म्हणून तरुण काय करू शकतात?
१७ पौलाच्या सल्ल्याचे पालन करण्याचा एक मार्ग म्हणजे चांगल्या प्रकारे आत्मपरीक्षण करणे. असे करण्याकरता आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारले पाहिजेत: ‘मी नियमित रीत्या प्रार्थना करतो का? जेव्हा सोबती माझ्यावर दबाव आणतात तेव्हा मी देवाला विश्वासू राहण्याचा प्रयत्न करतो का, की त्यांची मला भीती वाटते? मी नियमित रीत्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतो का? मी धैर्याने माझ्या विश्वासांबद्दल इतरांना सांगतो का? माझ्यात उणिवा असूनही बांधव माझे सहन करतात त्याच प्रकारे मीही त्यांचे सहन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो का? स्थानिक मंडळीत तसेच यहोवाच्या जागतिक संघटनेत जे पुढाकार घेतात त्यांच्या मी अधीन राहतो का?’
१८ वरील प्रश्नांपैकी दोन प्रश्न धैर्य दाखवून आपल्या विश्वासांबद्दल सांगणे आणि सोबत्यांच्या दबावाचा सामना करणे यांविषयी आहेत. आपल्या अनेक तरुणांना शाळाकॉलेजांत अशा दबावांचा सामना करावा लागतो. या तरुणांनी आपल्या लाजाळू स्वभावावर मात करून स्वतःच्या विश्वासांबद्दल धैर्याने सांगण्याचे शिकून घेतले आहे. या संबंधाने काही व्यावहारिक मार्गदर्शन आपल्या मासिकांत प्रकाशित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, जुलै २००९ च्या सजग होईए! नियतकालिकात सांगितले आहे की जर एखाद्या वर्गसोबत्याने असे विचारले की “तू उत्क्रांतिवादावर विश्वास का ठेवत नाही?” तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता: “मी उत्क्रांतिवादावर विश्वास का ठेवावा? ज्यांना या विषयावर बरीच माहिती आहे त्या वैज्ञानिकांचेही यावर एकमत नाही!” पालकांनो, तुमच्या मुलांना शाळेत येणाऱ्या अशा दबावांचा सामना करता यावा म्हणून वेळोवेळी त्यांच्यासोबत सराव करा.
१९ हे खरे आहे, की आपल्या विश्वासांबद्दल धैर्याने सांगणे किंवा यहोवाच्या इतर अपेक्षा पूर्ण करणे नेहमीच सोपे नसते. दिवसभर काम करून थकून गेल्यावर संध्याकाळी सभेला जाण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागू शकतो. सकाळी उठून क्षेत्रसेवेत जाण्यासाठी आपल्या उबदार अंथरुणातून बाहेर पडणे आपल्याला कठीण जाऊ शकते. पण, हे नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही आध्यात्मिक कार्यांत नियमितपणे सहभाग घेण्याची आताच सवय लावली, तर पुढे मोठमोठ्या संकटांना तोंड देणे तुम्हाला जास्त जड जाणार नाही.
२०, २१. (क) खंडणीवर मनन केल्याने आपल्याला काय करणे शक्य होईल? (ख) आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
२० अप्रत्यक्षपणे होणाऱ्या हल्ल्यांविषयी काय? आपल्या मनात येणाऱ्या निराशेवर आपण मात कशी करू शकतो? असे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे खंडणीबद्दल मनन करणे. प्रेषित पौलानेही हेच केले. तोही कधीकधी खूप निराश व्हायचा. पण, त्याने हे नेहमी लक्षात ठेवले की ख्रिस्त हा परिपूर्ण मानवांसाठी नाही तर पापी लोकांसाठी मरण पावला; आणि त्या पापी लोकांपैकी आपण एक आहोत हेही पौलाने लक्षात ठेवले. त्याने तर असेही लिहिले: “जे जीवन मी जगतो ते मी ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्याऐवजी स्वतःला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो.” (गलती. २:२०, ईझी-टू-रीड व्हर्शन) पौलाने खंडणीच्या तरतुदीचा स्वीकार केला. ही खंडणी व्यक्तिगत रीत्या आपल्याकरता देण्यात आली आहे असा दृष्टिकोन त्याने बाळगला.
२१ आपणही पौलासारखाच दृष्टिकोन बाळगला पाहिजे. खंडणी ही व्यक्तिगत रीत्या आपल्याला देण्यात आलेली भेट आहे हे आपण लक्षात ठेवले तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. पण, याचा अर्थ असा होत नाही की आपल्या मनातील निराशा लगेच निघून जाईल. खरेतर, आपल्यापैकी काहींना नवीन जग येईपर्यंत निराशेच्या भावनेशी लढत राहावे लागेल. पण लक्षात ठेवा, बक्षीस फक्त त्यांनाच मिळेल जे शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहतील. तो दिवस आता जास्त दूर नाही जेव्हा देवाच्या राज्याद्वारे या पृथ्वीवर शांती प्रस्थापित केली जाईल आणि विश्वासू मानव पुन्हा एकदा परिपूर्ण होतील. तेव्हा, पुष्कळ संकटांचा सामना करावा लागला तरीसुद्धा देवाच्या राज्यात प्रवेश करण्याचा पक्का निर्धार करा.