डोंगरांच्या सावलीत यहोवाने त्यांना सुरक्षित ठेवले
सकाळी सकाळी एका स्त्रीला आपल्या दारात एक पार्सल आढळते. ती ते पार्सल उचलते आणि इकडेतिकडे पाहते पण तिला रस्त्यावर कोणीच दिसत नाही. रात्रीच्या वेळी एखादी अनोळखी व्यक्ती ते पार्सल ठेवून गेली असावी. ती स्त्री ते पार्सल उघडते आणि पटकन घरात जाऊन दार बंद करते. का? कारण त्या पार्सलमध्ये अशी बायबल प्रकाशने आहेत ज्यांवर बंदी आणली गेली होती. त्या पार्सलला आपल्या हृदयाशी कवटाळून ती स्त्री मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना करते आणि त्या बहुमूल्य आध्यात्मिक अन्नासाठी त्याचे आभार मानते.
अशा घटना जर्मनीमध्ये १९३० च्या दशकात घडायच्या. १९३३ मध्ये जेव्हा नात्सी सरकार सत्तेवर आले तेव्हा देशाच्या बहुतेक भागांत यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर बंदी आणली गेली. रिचर्ड रुडॉल्फ * ज्यांचे वय आता १०० पेक्षाही जास्त आहे ते म्हणतात: “आम्हाला याची खात्री होती, की यहोवा आणि त्याच्या नावाबद्दल सांगण्याचं काम कुठल्याही मानवी आदेशामुळं थांबणार नाही. बायबलची प्रकाशनं ही आमच्या अभ्यासाची आणि क्षेत्र सेवेची महत्त्वपूर्ण साधनं होती. पण, बंदीमुळं ती आता इतक्या सहजपणे मिळत नव्हती. आमचं काम आता कसं चालणार याची आम्हाला चिंता होती.” रिचर्ड यांना लवकरच समजले की ही प्रकाशने अगदी वेगळ्या प्रकारे उपलब्ध करून दिली जाणार होती आणि त्यात तेदेखील सहभाग घेऊ शकत होते. हे काम डोंगरांच्या सावलीत केले जाणार होते.—शास्ते ९:३६.
तस्करांनी वापरलेल्या मार्गांवरून
एल्ब नदीप्रवाहाच्या उलट दिशेने गेल्यास, तुम्ही जायंट पर्वतरांगांजवळ (कर्कोनोशे) पोहचाल. हे डोंगर आता चेक रिपब्लिक आणि पोलंड मधील सीमा आहेत. या डोंगरांची उंची फक्त ५,२५० फूट असली तरी या भागाला युरोपच्या मधोमध असलेले आर्क्टिक आयलंड (ध्रुवीय बेट) म्हटले जाते. कारण वर्षातील सहा महिने हे डोंगर जवळजवळ दहा फूट बर्फाने झाकलेले असतात. या डोंगरांवरील हवामान केव्हाही बदलू शकते. त्यामुळे जे लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व डोंगरांवर जातात ते अचानक येणाऱ्या दाट धुक्यात सापडण्याची शक्यता असते.
अनेक शतकांदरम्यान या पर्वतरांगांनी वेगवेगळे प्रांत, राज्ये आणि राष्ट्रे यांमध्ये नैसर्गिक सीमेप्रमाणे काम केले आहे.
डोंगरदऱ्यांमुळे या भागात पहारा देणे अवघड होते. यामुळेच अनेकांनी या मार्गांचा वस्तूंची तस्करी करण्यासाठी उपयोग केला. १९३० मध्ये जेव्हा हे डोंगर चेकोस्लोवाकिया आणि जर्मनी या राष्ट्रांना विभाजित करणाऱ्या सिमेप्रमाणे होते तेव्हा अनेक यहोवाचे साक्षीदार त्याच मार्गांचा उपयोग करू लागले ज्यांचा पूर्वी वस्तूंची तस्करी करण्यासाठी वापर होत असे. कशासाठी? जेथे बायबल प्रकाशने सहजपणे उपलब्ध होती तेथून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी. रिचर्ड हा तरुण साक्षीदारही त्यांपैकी एक होता.धोकादायक प्रवास
रिचर्ड सांगतात: “आठवड्याच्या शेवटी आम्ही डोंगरांकडे जायला निघायचो. आम्ही सर्व तरुण बांधव सात-आठच्या गटांत, गिर्यारोहकांसारखा पेहराव करून जायचो. जर्मनीच्या हद्दीपासून श्पिन्डलरूव मलिन या ठिकाणी जाण्यासाठी डोंगर पार करता करता जवळजवळ तीन तास लागायचे. हे पर्यटक-निवास चेक हद्दीत १६.५ किमीच्या अंतरावर होतं. त्या काळात अनेक जर्मन लोक या ठिकाणी राहायचे. तेथील एक शेतकरी बांधवांची मदत करण्यास तयार झाला. त्याच्याकडे असलेली घोडागाडी ज्यात तो सहसा पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा तिचा उपयोग तो आपल्या कामासाठी करू लागला. त्या गाडीत तो आपल्या प्रकाशनांचे बॉक्स जवळच्याच एका गावातून घेऊन यायचा. रेल्वेनं प्रागवरून आलेले हे बॉक्स तो त्याच्या शेतातील वाळलेल्या गवतांच्या पेंढ्यांत लपवायचा. मग बांधव येऊन ते जर्मनीत घेऊन जायचे.”
रिचर्ड पुढे सांगतात: “शेतात पोचल्यावर आम्ही आमच्या बॅकपॅक्समध्ये (पाठीवर नेता येणारी बॅग) प्रकाशने भरायचो, ज्यांत जास्त वजन नेता येत होतं. आम्ही प्रत्येक जण जवळजवळ ५० किलोचं वजन उचलायचो.” पकडले जाऊ नये म्हणून ते बांधव संध्याकाळी अंधार झाल्यावर निघायचे आणि सकाळ होण्याआधी घरी पोहचायचे. सुरक्षेसाठी हे बांधव काय करायचे याबद्दल अर्न्स्ट वीस्नर जे त्या वेळी जर्मनीत विभागीय पर्यवेक्षक या नात्याने काम करायचे ते म्हणतात: “दोन बांधव पुढं जायचे आणि त्यांना कोणी दिसलं की ते टॉर्चनं इशारा करायचे. टॉर्चचा प्रकाश दिसल्यास जे बांधव जड सामान घेऊन १०० मीटर मागून येत असायचे त्यांना समजायचं की आता त्यांना लपावं लागणार. जोपर्यंत ते बांधव पुन्हा मागं येऊन त्यांना एखादा पासवर्ड (विशिष्ट शब्द) सांगत नाहीत तोपर्यंत ते लपून राहायचे. हा पासवर्डही प्रत्येक आठवड्यात बदलण्यात यायचा.” पण, धोका फक्त निळा पोशाख घातलेल्या जर्मन पोलिसांकडूनच नव्हता.
रिचर्ड यांनी पुढे असे सांगितले: “एके दिवशी संध्याकाळी जास्त वेळ काम केल्यामुळं मला चेकच्या हद्दीत जाण्यासाठी निघण्यास
उशीर झाला आणि तोपर्यंत इतर बांधव निघून गेले होते. त्या दिवशी खूप अंधार आणि धुकं होतं. पाऊस पडत असल्यामुळं मी भिजत होतो आणि त्यामुळं मी थरथरू लागलो. त्यातल्या त्यात पाईन वृक्षांच्या जंगलात मी वाट चुकलो. अनेक तासांपर्यंत प्रयत्न करूनही मला वाट सापडली नाही. कित्येक गिर्यारोहक अशा प्रकारे वाट चुकल्यामुळं मरण पावले आहेत. पण, सकाळी मला बांधव परतताना दिसले आणि तेव्हा मला मार्ग सापडला.”बांधवांच्या या लहान पण धाडसी गटाने जवळजवळ तीन वर्षे, प्रत्येक आठवडी डोंगरांवरून प्रवास केला. हिवाळ्यात बर्फाने झाकलेल्या या डोंगरांवरून घसरत जाण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बुटांचा ते वापर करायचे. कधीकधी तर दिवसाही जवळजवळ २० बांधवांचे गट, खास गिर्यारोहकांसाठी असलेल्या मार्गांवरून सीमा पार करायचे. बांधवांचे गट हे फक्त गिर्यारोहक आहेत असे भासवण्याकरता काही बहिणीही त्यांच्यासोबत जायच्या. काही जण पुढे असायचे आणि काही धोका दिसल्यास ते आपली हॅट वर फेकायचे.
रात्रभर प्रवास करून ठरलेल्या ठिकाणी पोचल्यावर काय केले जायचे? आणलेली प्रकाशने लवकरात लवकर वाटली जायची. कशी? प्रकाशनांना साबणांच्या पाकिटांमध्ये पॅक केले जायचे. त्यानंतर ही पाकिटे हिर्शबर्क रेल्वे स्टेशनवर नेण्यात यायची. त्या पाकिटांना जर्मनीच्या वेगवेगळ्या भागांत पाठवले जायचे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बंधुभगिनी ती पाकिटे अगदी सुज्ञपणे आपल्या बांधवांपर्यंत पोहचवायचे. वाटप करण्याचे हे काम अतिशय गुप्तपणे चालायचे. या कामात अनेक बांधव सामील होते आणि जर एखादा बांधव पकडला गेला तर त्याचे परिणाम फार भयंकर होणार होते. आणि एके दिवशी असेच घडले.
१९३६ साली बर्लिनजवळ ज्या ठिकाणी प्रकाशने ठेवली होती त्या ठिकाणी छापा मारण्यात आला. तेथून जी पाकिटे जप्त करण्यात आली त्यांपैकी तीन पाकिटे कोणीतरी हिर्शबर्क येथून पाठवली होती. तो कोण होता याची माहिती नसल्यामुळे पोलिसांनी त्यांवर लिहिलेल्या हस्ताक्षरांवरून त्या गटातील मुख्य व्यक्तीची ओळख पटवली व तिला अटक केली. काही दिवसांतच आणखी दोन जणांना पकडण्यात आले; त्यांपैकी एक रिचर्ड रुडॉल्फ होते. या बांधवांनी पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि यामुळे पुढेही काही काळासाठी इतर जण हा धोकादायक प्रवास करू शकले.
आपण काय शिकतो?
जायंट पर्वतरांगांवरून बॅकपॅकच्या साहाय्याने आणलेल्या प्रकाशनांद्वारे जर्मनीतील साक्षीदारांना आवश्यक असलेले आध्यात्मिक अन्न पुरवण्यात आले. पण फक्त या एकाच मार्गाचा उपयोग करण्यात आला असे नाही. १९३९ मध्ये जर्मन सैन्याने चेकोस्लोवाकियावर कब्जा करण्यापूर्वी, सीमेजवळ असलेल्या दुसऱ्या मार्गांचाही उपयोग करण्यात आला. फ्रान्स, नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंड या जर्मनीला लागून असलेल्या देशांतील बांधवांनीही जीव धोक्यात घालून, छळाचा सामना करत असलेल्या आपल्या बांधवांना आध्यात्मिक अन्न पुरवले.
आज आपल्याला मुबलक प्रमाणात आणि वेगवेगळ्या स्वरूपांत बायबल प्रकाशने उपलब्ध आहेत. तुम्हाला राज्य सभागृहातून एखादे नवीन प्रकाशन मिळते किंवा तुम्ही ते jw.org या वेबसाईटवरून डाऊनलोड करता तेव्हा तुम्हाला ते प्रकाशन उपलब्ध करून देण्यासाठी जी मेहनत घेतली गेली आहे त्यावर विचार करा. मध्यरात्री बर्फाने झाकलेले डोंगर पार करून ही बायबल प्रकाशने तुमच्यापर्यंत पोहचवण्यात येत नसली, तरी तुम्हाला ती उपलब्ध करून देण्यासाठी अनेक बांधवांनी निस्वार्थपणे खूप मेहनत घेतली आहे.
^ ते सायलिशियामधील हिर्शबर्क नावाच्या एका मंडळीत सेवा करायचे. हिर्शबर्क या शहराला आता येलेन्या गूरा या नावाने ओळखले जाते जे पोलंडच्या दक्षिण-पश्चिम भागात आहे.