जीवन कथा
यहोवावर विसंबून राहिल्यानं मिळणारे आशीर्वाद
केव्हाकेव्हा आपल्या जीवनात अशा गोष्टी घडतात ज्यांचा आपण विचारही केला नसतो आणि त्या वेळी निर्णय घेणं खूप कठीण वाटतं. पण जे स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याऐवजी यहोवावर विसंबून राहतात त्यांना तो आशीर्वाद देतो. मी आणि माझ्या पत्नीनं हीच गोष्ट आमच्या अनेक वर्षांच्या समाधानी सहजीवनात अनुभवली आहे. सुरुवातीला आमच्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो.
१९१९ मध्ये अमेरिकेच्या ओहायो राज्यातील सीडर पॉईंट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांच्या अधिवेशनात माझे आईबाबा एकमेकांना भेटले. त्याच वर्षी त्यांनी लग्न केलं. माझा जन्म १९२२ मध्ये झाला आणि दोन वर्षांनंतर माझा भाऊ पॉल याचा जन्म झाला. माझी पत्नी ग्रेस हिचा जन्म १९३० मध्ये झाला. तिचे बाबा रॉय हावेल आणि आई रूथ हावेल बायबल विद्यार्थ्यांच्या कुटुंबात लहानाचे मोठे झाले होते. शिवाय, ग्रेसचे आजी-आजोबादेखील बायबल विद्यार्थी होते. बंधू चार्ल्स टेझ रस्सल यांच्याशी त्यांची मैत्री होती.
१९४७ मध्ये मी ग्रेसला भेटलो आणि १६ जुलै १९४९ रोजी आम्ही लग्न केलं. लग्नाआधी आम्ही आमच्या भविष्याबद्दल मनमोकळेपणानं चर्चा केली. पूर्णवेळेच्या सेवेत सहभागी होण्याचा आणि कुटुंब न वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला. १ ऑक्टोबर १९५० रोजी आम्ही दोघांनी सोबत मिळून आमची पायनियर सेवा सुरू केली. आणि नंतर, १९५२ मध्ये आम्हाला विभागीय कार्य करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं.
प्रवासी कार्य आणि गिलियड प्रशाला
या नव्या नेमणुकीत आपल्याला पुष्कळ मदतीची गरज आहे याची जाणीव आम्हा दोघांना झाली. मी अनुभवी बांधवांची मदत घेतली, शिवाय ग्रेसलासुद्धा मदत मिळावी म्हणून मी व्यवस्था केली. मी माझे मित्र मार्वेन होलन, जे अनुभवी प्रवासी पर्यवेक्षक होते त्यांना विचारलं: “ग्रेस वयानं लहान आहे आणि तिला फारसा अनुभवही नाही. तुमच्या नजरेत अशी कोणी बहीण आहे का जी तिला मदत करू शकेल?” ते म्हणाले: “हो, एडना विंकल एक अनुभवी पायनियर आहे, आणि ती ग्रेसला चांगल्या प्रकारे मदत करू शकते.” नंतर ग्रेसनं एडनाविषयी असं सांगितलं: “लोकांशी न घाबरता कसं बोलावं हे तिनं मला शिकवलं. लोक आक्षेप घ्यायचे तेव्हा ती चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळायची. शिवाय, घरमालकाशी कोणत्या गोष्टीवर बोलावं हे ठरवण्यासाठी आधी त्यांचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे हे तिनं मला शिकवलं. मला ज्या मदतीची गरज होती तीच मदत मला तिच्याकडून मिळाली.”
मी आणि ग्रेसनं आयोवा राज्यातील दोन विभागांत सेवा केली. मिनेसोटा आणि दक्षिण डकोटा यांतील काही भागांतही आम्ही सेवा केली. नंतर आम्हाला न्यू यॉर्क विभाग १ इथं पाठवण्यात आलं. या विभागात ब्रुकलिन आणि क्वीन्स शहरांचा समावेश होता. इथं सेवा करताना आपल्याजवळ किती कमी अनुभव आहे याची जाणीव आम्हाला झाली. कारण या विभागात ब्रुकलिन हाइट्स मंडळीही समाविष्ट होती. त्यांच्या सभा बेथेलमधील राज्य सभागृहात
भरायच्या आणि त्या सभांना बेथेल कुटुंबातील बरेच अनुभवी बंधुभगिनी उपस्थित राहायचे. त्या मंडळीत पहिले सेवा भाषण दिल्यानंतर बंधू नेथन नॉर माझ्याकडे आले आणि म्हणाले: “मॅल्कम तू आम्हाला काही गोष्टींवर सल्ला दिलास तो योग्यच आहे. हे केव्हाही विसरू नको की जर असा प्रेमळ सल्ला देण्याद्वारे तू आम्हाला मदत केली नाही तर संघटनेला तुझा जास्त फायदा होणार नाही. तू जे चांगलं कार्य करत आहेस ते पुढंही करत राहा.” सभा संपल्यानंतर मी ही गोष्ट ग्रेसला सांगितली. आतापर्यंत आम्ही इतक्या तणावात होतो की बंधू नॉर यांचे शब्द ऐकताच मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं आणि त्यामुळं आम्ही वरच्या मजल्यावरील आमच्या बेथेलच्या खोलीत गेलो, तेव्हा आम्हाला रडू आवरलं नाही.“जर असा प्रेमळ सल्ला देण्याद्वारे तू आम्हाला मदत केली नाही तर संघटनेला तुझा जास्त फायदा होणार नाही. तू जे चांगलं कार्य करत आहेस ते पुढंही करत राहा”
काही महिन्यांनंतर आम्हाला एक पत्र आलं. आम्हाला गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या वर्गाचा पदवीदान समारंभ फेब्रुवारी १९५५ मध्ये होणार होता. या प्रशालेला उपस्थित राहण्याआधीच आम्हाला सांगण्यात आलं की हे प्रशिक्षण आम्हाला खास मिशनरी सेवेसाठी दिलं जात नव्हतं. तर ते प्रवासी कार्यात आणखी निपुण बनण्यास आम्हाला मदत करणार होतं. प्रशालेतून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तो अनुभव खरंच अविस्मरणीय होता!
हे प्रशिक्षण संपल्यानंतर आम्हाला प्रांतीय कार्यात नेमण्यात आलं. आम्ही ज्या प्रांतात कार्य करत होतो त्यात इंडियाना, मिशिगन आणि ओहायो या राज्यांचा समावेश होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिसेंबर १९५५ मध्ये बंधू नॉर यांचं पत्र आम्हाला मिळालं ज्यात असं म्हटलं होतं: “तुम्हाला काय वाटतं हे अगदी खुल्या मनानं सांगा आणि खरं ते सांगा. तुम्हाला बेथेलमध्ये सेवा करण्याची इच्छा असेल तर तसं सांगा . . . किंवा काही काळ बेथेलमध्ये सेवा केल्यानंतर परदेशातील नेमणूक स्वीकारण्यास तयार असाल तर तेही सांगा. तुम्हाला प्रांतीय आणि विभागीय कार्यातच राहायचं असेल तर मला तेही जाणून घ्यायला आवडेल.” आमचं उत्तर होतं, आम्हाला जिथं कुठं नेमण्यात येईल तिथं आम्ही आनंदानं सेवा करू. आणि लगेच आम्हाला बेथेलला बोलवण्यात आलं.
बेथेलमधील आनंददायक वर्षं
बेथेलमध्ये सेवा करत असतानाचा काळ खूप आनंददायक होता. त्या काळात मला सबंध अमेरिकेतील मंडळ्यांमध्ये, अधिवेशनांमध्ये व संमेलनांमध्ये भाषण देण्याची संधी मिळायची. मी बऱ्याच तरुण बांधवांना प्रशिक्षण देण्यात मदत केली. या बांधवांनी पुढे जाऊन यहोवाच्या संघटनेत मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. काही काळानंतर मी जगभरातील प्रचार कार्याची व्यवस्था पाहणाऱ्या ऑफिसमध्ये, बंधू नॉर यांचा सचिव म्हणून कार्य करू लागलो.
सेवा विभागात कार्य केलेली वर्षं मला खूप खास वाटतात. त्या विभागात मला बंधू टी. जे. (बड) सलिवन यांच्यासोबत काम करायला मिळालं. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी या विभागात पर्यवेक्षक म्हणून सेवा केली होती. पण मी इतर लोकांकडूनही बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यांपैकी एक म्हणजे फ्रेड रस्क, ज्यांना मला प्रशिक्षण
देण्यासाठी नेमण्यात आलं होतं. मला आठवतं एकदा मी त्यांना विचारलं: “फ्रेड, मी लिहिलेल्या काही पत्रांत तुम्ही इतके बदल का करता?” ते हसले पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगितली: “मॅल्कम, आपण एखादी गोष्ट तोंडी सांगतो तेव्हा आपण ती आणखी समजावून सांगू शकतो; पण आपण जेव्हा एखादी गोष्ट लिहून कळवतो आणि खासकरून जेव्हा आपण इथून पत्र पाठवतो तेव्हा ते होताहोईल तितकं अचूक आणि स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे.” ते प्रेमळपणे पुढे म्हणाले: “काळजी करू नकोस, तुला सोपवलेलं कार्य तू चांगल्या प्रकारे करत आहेस. हळूहळू तू सर्व शिकशील.”ग्रेसलासुद्धा बेथेलमध्ये वेगवेगळ्या विभागांत कार्य करायला मिळालं. खोल्यांची साफसफाई करण्याच्या विभागातही तिनं काम केलं. ती अगदी आनंदानं ते काम करायची. त्या काळात जे तरुण बांधव बेथेलमध्ये काम करायचे त्यांची आजही कधी भेट झाली तर ते ग्रेसला आनंदानं म्हणतात: “बिछाना व्यवस्थितपणे कसा घालायचा हे तुम्हीच मला शिकवलं. आणि याबद्दल माझी आई तुमची खूप आभारी आहे.” शिवाय, ग्रेसनं मॅगझीन, पत्र-व्यवहार आणि टेप ड्युप्लिकेटिंग विभागांतही आनंदानं सेवा केली. वेगवेगळ्या विभागांत काम केल्यामुळं तिला याची जाणीव झाली की यहोवाच्या संघटनेत आपण काहीही व कोठेही काम करत असलो तरी तो एक विशेषाधिकार व आशीर्वादच आहे. आणि आजपर्यंत तिला तसंच वाटतं.
आम्ही केलेले काही फेरबदल
एकोणीसशे सत्तरच्या दशकात, वाढत्या वयामुळं आमच्या आईवडिलांना आमची गरज आहे अशी जाणीव आम्हाला होऊ लागली. शेवटी आम्हाला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. आम्हाला बेथेल आणि आमच्या प्रिय बंधुभगिनींना सोडायचं नव्हतं. असं असलं, तरी आमच्या आईवडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं मला वाटलं. त्यामुळं काही काळानंतर आम्ही बेथेल सोडण्याचा निर्णय घेतला. पण, परिस्थिती बदलल्यास आपण पुन्हा बेथेलला येण्याचा प्रयत्न करू असं आम्ही ठरवलं.
घरखर्च चालवण्यासाठी मी विमा एजंट म्हणून काम करू लागलो. प्रशिक्षणादरम्यान एका मॅनजरांनी मला जे म्हटलं ते मला नेहमी आठवतं. त्यांनी म्हटलं: “या व्यवसायात संध्याकाळी लोकांच्या भेटी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण तेव्हाच लोक घरी सापडतात. म्हणून दररोज संध्याकाळी लोकांच्या भेटी घेण्याव्यतिरिक्त कोणतंही काम महत्त्वाचं नाही.” मी त्यांना म्हटलं: “साहजिकच तुम्ही ही गोष्ट तुमच्या अनुभवावरून बोलत आहात आणि त्याची मी मनापासून कदर करतो. पण उपासनेशी संबंधित काही जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत ज्यांकडे मी केव्हाही दुर्लक्ष केलेलं नाही आणि पुढेही करू इच्छित नाही. मी जमेल तेव्हा संध्याकाळी जाऊन लोकांची भेट नक्कीच घेईन, पण मंगळवारी आणि गुरुवारी संध्याकाळी मला खूप महत्त्वाच्या सभांना उपस्थित राहावं लागतं.” मी माझ्या नोकरीमुळं केव्हाही सभा चुकवल्या नाहीत आणि यासाठी यहोवानं मला खरोखर आशीर्वादित केलं आहे.
जुलै १९८७ मध्ये माझ्या आईनं जगाचा निरोप घेतला त्या वेळी इस्पितळात आम्ही तिच्याजवळ होतो. मुख्य नर्स आली आणि ग्रेसला म्हणाली: “मिसेस ॲलन तुम्ही तुमच्या सासूची सेवा करण्यात खरंच कोणतीही कसूर केली नाही. अगदी शेवटपर्यंत तुम्ही त्यांच्या जवळ होता हे सर्वांना माहीत आहे. तेव्हा आता घरी जा आणि थोडीशी विश्रांती घ्या.”
डिसेंबर १९८७ मध्ये आम्ही आमच्या आवडत्या बेथेल सेवेसाठी
पुन्हा अर्ज भरला. पण काहीच दिवसांनंतर ग्रेसला आतड्यांचा कर्करोग झाल्याचं कळलं. शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यानंतर, कालांतराने तिचा कर्करोग बरा झाला असल्याचं सांगण्यात आलं. पण त्याच सुमारास आम्हाला बेथेलहून एक पत्र आलं. आम्ही ज्या मंडळीत होतो त्याच मंडळीत सेवा करण्यास आम्हाला सांगितलं गेलं. आम्ही दोघांनी आवेशाने राज्याशी संबंधित कार्य करत राहण्याचा निश्चय केला.कालांतरानं, टेक्सस इथं नोकरी करण्याची संधी माझ्यासमोर आली. तिकडचं गरम वातावरण आपल्याला मानवेल असं आम्हाला वाटलं आणि ते खरं ठरलं आहे. आम्ही इथं, टेक्ससमध्ये गेल्या २५ वर्षांपासून प्रेमळ बंधुभगिनींच्या सहवासात राहत आहोत. त्यांच्याशी आमचं खूप जवळचं नातं जुळलं आहे.
आम्ही कोणते धडे शिकलो?
काही काळाआधी ग्रेसला आतड्यांचा आणि थायरॉईडचा कर्करोग झाला आणि अलीकडे तिला स्तनांचा कर्करोग झाला. पण तिनं या समस्यांबद्दल कधीही कुरकूर केली नाही. एक पत्नी या नात्यानं तिनं नेहमीच माझा आदर केला आहे आणि मला सहकार्य केलं आहे. तिला जेव्हा असं विचारलं जातं: “तुम्ही एक आनंदी जोडपं आहात यामागचं रहस्य काय आहे?” तेव्हा ती चार कारणं सांगते: “आम्ही दोघं एकमेकांचे सर्वात जवळचे मित्र आहोत. आम्ही दोघं दररोज एकमेकांशी बोलतो. एकमेकांसोबत दररोज वेळ घालवतो. आणि जर आमच्यात मतभेद झाले असतील तर रात्री ते मिटवल्याशिवाय आम्ही झोपत नाही.” साहजिकच, केव्हाकेव्हा आमच्यात भांडणं होतात, पण आम्ही एकमेकांना क्षमा करतो आणि विसरून जातो. आणि खरंच असं केल्यामुळं चांगले परिणाम घडून येतात.
“यहोवावर नेहमी विसंबून राहा आणि तो ज्या गोष्टी घडू देतो त्या स्वीकारा”
आम्ही ज्या समस्यांचा सामना केला त्यांतून आम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकलो:
-
यहोवावर नेहमी विसंबून राहा आणि तो ज्या गोष्टी घडू देतो त्या स्वीकारा. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका.—नीति. ३:५, ६; यिर्म. १७:७.
-
तुमची समस्या कोणतीही असो, मार्गदर्शनासाठी यहोवाच्या वचनावर अवलंबून राहा. यहोवाला आज्ञाधारक राहणे व त्याच्या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण एकतर आज्ञाधारक राहू शकतो किंवा नाही. आपण मधली भूमिका घेऊ शकत नाही.—रोम. ६:१६; इब्री ४:१२.
-
जीवनात केवळ एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे यहोवासमोर एक चांगलं नाव कमवणं. त्याच्या राज्याला जीवनात प्रथम स्थान द्या, भौतिक गोष्टींना नव्हे.—नीति. २८:२०; उप. ७:१; मत्त. ६:३३, ३४.
-
यहोवाच्या सेवेत होताहोईल तितकं फलदायी आणि आवेशी बनण्यासाठी प्रार्थना करा. तुम्हाला जी गोष्ट करता येत नाही तिच्यावर नव्हे, तर जी करता येते तिच्यावर लक्ष लावा.—मत्त. २२:३७; २ तीम. ४:२.
-
केवळ हीच अशी संघटना आहे जिच्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे आणि त्याची पसंतीसुद्धा.—योहा. ६:६८.
मी आणि ग्रेसनं प्रत्येकी ७५ पेक्षा जास्त वर्षं यहोवाची सेवा केली आहे आणि एक जोडपं या नात्यानं आम्ही जवळजवळ ६५ वर्षांपासून त्याची सेवा करत आहोत. इतक्या वर्षांपासून सोबत मिळून यहोवाची सेवा करणं खूपच आनंददायक होतं. यहोवावर विसंबून राहिल्यानं आपल्या सर्व बंधुभगिनींना आमच्यासारखेच जीवनात बरेच आशीर्वाद अनुभवायला मिळावेत अशी आशा व प्रार्थना आम्ही करतो.