व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल वाचनाचा पुरेपूर लाभ घ्या

बायबल वाचनाचा पुरेपूर लाभ घ्या

“माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो.”—रोम. ७:२२.

१-३. बायबलचे वाचन केल्यामुळे आणि शिकलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे कोणते फायदे मिळतात?

 “बायबल समजून घ्यायला मदत केल्याबद्दल मी दररोज यहोवाचे आभार मानते.” हे विधान एका वयस्कर ख्रिस्ती बहिणीचे आहे, जिने ४० पेक्षा जास्त वेळा संपूर्ण बायबल वाचून काढले आहे आणि अजूनही ते थांबवण्याचा तिचा विचार नाही. एका तरुण बहिणीने लिहिले, की बायबल वाचनामुळेच तिला यहोवाकडे एक खरी व्यक्‍ती म्हणून पाहण्यास मदत मिळाली आहे. आणि परिणामस्वरूप, तिच्या स्वर्गीय पित्यासोबतचा तिचा नातेसंबंध आणखी घट्ट झाला आहे. तिने म्हटले, “याआधी मी कधीच इतकी आनंदी नव्हते!”

प्रेषित पेत्राने सर्वांना, “वचनरूपी निऱ्‍या दुधाची इच्छा” धरण्याचे प्रोत्साहन दिले. (१ पेत्र २:२, पं.र.भा.) जे लोक बायबल अभ्यासाद्वारे आपली ही इच्छा पूर्ण करतात आणि बायबल शिकवणींनुसार चालतात त्यांचा विवेक शुद्ध असतो आणि त्यांच्या जीवनात एक उद्देश असतो. ते देवावर प्रेम करणाऱ्‍या व त्याची सेवा करणाऱ्‍या इतरांसोबत घनिष्ठ मैत्री विकसित करतात. “देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष” करण्याची ही सर्वच योग्य कारणे आहेत. (रोम. ७:२२) पण, इतरही अनेक फायदे आहेत. त्यांपैकी काही फायदे कोणते आहेत?

तुम्ही यहोवाबद्दल व त्याच्या पुत्राबद्दल जितके जास्त शिकाल, तितकेच जास्त त्यांच्याबद्दलचे व इतरांबद्दलचे तुमचे प्रेम वाढेल. तुम्ही शास्त्रवचनांचे अचूक ज्ञान घेतल्यामुळे, देव कशा प्रकारे लवकरच या दुष्ट जगाच्या अंतातून आज्ञाधारक मानवांचा बचाव करेल हे पाहण्यास तुम्हाला साहाय्य मिळते. क्षेत्र सेवेत लोकांना सांगण्यासाठी तुमच्याजवळ एक आनंददायक सुवार्ता आहे. बायबलच्या वाचनाद्वारे तुम्हाला समजलेल्या गोष्टी तुम्ही इतरांना शिकवल्यास यहोवा तुम्हाला आशीर्वादित करेल.

वाचा आणि मनन करा

४. बायबलचे मननपूर्वक वाचन करणे म्हणजे काय?

आपल्या सेवकांनी बायबलचे घाईघाईने वाचन करावे अशी यहोवाची इच्छा नाही. त्याने प्राचीन काळातील यहोशवाला असे सांगितले: “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर.” (यहो. १:८; स्तो. १:२) याचा अर्थ असा होतो का, की तुम्ही बायबल वाचन करताना उत्पत्ति ते प्रकटीकरण पुस्तकांतील एकेक शब्द अक्षरशः तोंडाने उच्चारला पाहिजे? नाही. तर, याचा अर्थ असा होतो, की तुम्ही सावकाश बायबलचे वाचन केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वाचलेल्या गोष्टींवर मनन करता येईल. तुम्ही बायबलचे मननपूर्वक वाचन करता तेव्हा तुम्हाला आपले लक्ष अशा भागांवर केंद्रित करता येईल जे त्या विशिष्ट वेळी तुमच्याकरता खासकरून उपयोगी व प्रोत्साहनदायक असतील. अशी वाक्ये, वचने किंवा वृत्तान्त आढळल्यास ते सावकाश वाचा. हे विशिष्ट भाग नुसतेच मनात न वाचता तुम्ही ते जिभेचा आणि ओठांचा वापर करून उच्चारूही शकता. असे केल्याने, एखाद्या शास्त्रवचनातील मुद्दा अगदी वैयक्‍तिक रीत्या तुमच्या मनाला स्पर्श करू शकतो. हे इतके महत्त्वाचे का आहे? कारण, देवाच्या सल्ल्याचा अर्थ समजून घेतल्याने, शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याची जोरदार प्रेरणा तुम्हाला मिळेल.

५-७. देवाचे वचन मननपूर्वक वाचल्याने तुम्हाला कशा प्रकारे (क) नैतिक रीत्या शुद्ध राहण्यास; (ख) इतरांशी सहनशीलपणे आणि दयाळूपणे वागण्यास; (ग) कठीण परिस्थितीतही यहोवावर भरवसा बाळगण्यास साहाय्य मिळू शकते हे उदाहरणांद्वारे स्पष्ट करा.

मननपूर्वक वाचन करणे खासकरून तेव्हा साहाय्यक ठरू शकते जेव्हा तुम्ही बायबलमधील अशी पुस्तके वाचता जी तुमच्या खास परिचयाची नाहीत. उदाहरणार्थ, पुढील तीन परिस्थितींचा विचार करा. सर्वप्रथम, एका तरुण बांधवाचा विचार करा. या बांधवाच्या वैयक्‍तिक बायबल वाचनादरम्यान तो होशेयच्या भविष्यवाणीचे वाचन करत आहे. चौथ्या अध्यायातील ११ ते १३ वचने मननपूर्वक वाचल्यावर तो काही क्षण थांबतो. (होशेय ४:११-१३ वाचा.) का? शाळेत त्याला अनैतिक दबावांचा प्रतिकार करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे ही वचने त्याचे लक्ष वेधून घेतात. या वचनांवर मनन करताना तो असा विचार करतो: ‘लोक ज्या गोष्टी लपूनछपून करतात त्यादेखील यहोवा पाहू शकतो. मला त्याचं मन दुखवायचं नाही.’ हा बांधव देवाच्या नजरेत नैतिक रीत्या शुद्ध राहण्याचा निर्धार करतो.

दुसऱ्‍या परिस्थितीत, एक ख्रिस्ती बहीण योएलच्या भविष्यवाणीचे वाचन करत-करत दुसऱ्‍या अध्यायातील १३ व्या वचनापर्यंत पोचते. (योएल २:१३ वाचा.) तेथे म्हटले आहे, की यहोवा देव “कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे.” हे वचन मननपूर्वक वाचताना ती बहीण विचार करते, की तिला यहोवाचे अनुकरण कसे करता येईल. ती निश्‍चय करते, की कधीकधी आपल्या पतीशी व इतरांशी बोलताना ती जे टोमणे मारून व आवाज चढवून बोलायची ते यापुढे करणार नाही.

तिसऱ्‍या परिस्थितीत, एका ख्रिस्ती पित्याने आपली नोकरी गमावली आहे अशी कल्पना करा. आता त्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करता येईल याची चिंता सतावत आहे. नहूम १:७ मननपूर्वक वाचताना त्याला दिसून येते, की जे यहोवावर “भाव ठेवतात त्यांस तो ओळखतो” आणि “विपत्काली तो शरणदुर्ग” होऊन त्यांचे रक्षण करतो. या विचारामुळे त्याला दिलासा मिळतो. यहोवा आपली प्रेमळपणे काळजी करतो याची त्याला जाणीव होते आणि तो अवाजवी चिंता करण्याचे थांबवतो. नंतर तो १५ वे वचन मननपूर्वक वाचतो. (नहूम १:१५ वाचा.) त्याला जाणीव होते, की कठीण परिस्थितीतही सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे तो खरोखरच यहोवाला आपला शरणदुर्ग मानतो हे तो दाखवून देऊ शकतो. तो नव्या नोकरीचा शोध सुरूच ठेवतो, पण त्यासोबतच त्याला आठवड्याच्या दरम्यान होणाऱ्‍या प्रचार कार्यात सहभागी होण्याचीही प्रेरणा मिळते.

८. बायबल वाचनादरम्यान तुम्हाला सापडलेल्या एखाद्या आध्यात्मिक रत्नाविषयी थोडक्यात सांगा.

नुकतेच उल्लेख केलेले फायदेकारक मुद्दे बायबलमधील अशा पुस्तकांतील आहेत जी काहींच्या मते समजण्यास कठीण आहेत. तुम्ही होशेय, योएल आणि नहूम या पुस्तकांतून शिकून घेण्याच्या इच्छेने त्यांचे परीक्षण करत असताना त्यांतील इतर वचनेदेखील मननपूर्वक वाचू शकता. भविष्यवाण्यांच्या या पुस्तकांतून तुम्हाला सुज्ञपणाच्या किती गोष्टी शिकता येतील आणि त्यांतून किती दिलासा मिळेल याची कल्पना करा! आणि बायबलमधील उर्वरित पुस्तकांबद्दल काय म्हणता येईल? देवाचे वचन हे अशा खाणीसारखे आहे ज्यात रत्नेच रत्ने आहेत. तेव्हा ही रत्ने शोधून काढण्यासाठी परिश्रम घ्या! खरोखर, देवाच्या मार्गदर्शनाची आणि आश्‍वासनाची रत्ने मिळवण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही संपूर्ण बायबलचे वाचन केले पाहिजे.

समजबुद्धी मिळवण्यास प्रयत्नशील असा

९. देवाच्या इच्छेविषयी आपण आपली समजबुद्धी कशी वाढवू शकतो?

दररोज बायबलचा काही भाग वाचण्यासोबतच समजबुद्धी व सूक्ष्मदृष्टी प्राप्त करणेही महत्त्वाचे आहे. म्हणून, बायबलमध्ये तुम्ही ज्या लोकांविषयी, ठिकाणांविषयी आणि घटनांविषयी वाचता त्यांच्या पार्श्‍वभूमीविषयी संशोधन करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या प्रकाशनांचा चांगला उपयोग करा. किंवा बायबलमधील एखादी शिकवण आपल्या जीवनात कशी लागू करायची याविषयी तुमच्या मनात प्रश्‍न असेल, तर तुम्ही मंडळीतील एखाद्या वडिलाची किंवा एखाद्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तीची मदत घेऊ शकता. आपली समजबुद्धी वाढवणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेण्यासाठी, आपण पहिल्या शतकातील एका ख्रिस्ती व्यक्‍तीचे उदाहरण पाहू या ज्याने नेमके हेच करण्याचा प्रयत्न केला. त्याचे नाव होते अपुल्लो.

१०, ११. (क) सुवार्तेचा सेवक या नात्याने सुधारणा करण्यासाठी अपुल्लोला कशा प्रकारे मदत करण्यात आली? (ख) अपुल्लोच्या अहवालावरून आपण काय शिकू शकतो? (“तुम्ही जे शिकवता ते अलीकडील स्पष्टीकरणांच्या अनुरूप आहे का?” ही चौकट पाहा.)

१० अपुल्लो हा एक यहुदी होता जो ख्रिस्ती बनला. तो “शास्त्रपारंगत” आणि “आत्म्याने आवेशी” होता. त्याच्याविषयी प्रेषितांची कृत्ये पुस्तकात असे म्हटले आहे: “तो . . . येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता.” अपुल्लो बाप्तिस्म्याविषयी जुनी शिकवण देत होता आणि त्याला याची जाणीवही नव्हती. तो इफिसमध्ये शिकवत होता तेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला नावाच्या एका ख्रिस्ती जोडप्याने पाहिले आणि त्यांनी “त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.” (प्रे. कृत्ये १८:२४-२६) याचा अपुल्लोला कसा फायदा झाला?

११ इफिसमध्ये प्रचार केल्यानंतर अपुल्लो अखयाला गेला. “तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्‍वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडन करीत असे.” (प्रे. कृत्ये १८:२७, २८) आता अपुल्लो ख्रिस्ती बाप्तिस्म्याचा अर्थ अचूकपणे स्पष्ट करू शकत होता. त्याची समजबुद्धी वाढल्यामुळे, त्याने नवीन लोकांना खऱ्‍या उपासनेत प्रगती करण्यासाठी “फार साहाय्य केले.” या अहवालावरून आपण काय शिकू शकतो? अपुल्लोप्रमाणे आपणही बायबलमध्ये वाचलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी प्रयत्न करतो. पण, आपण आणखी परिणामकारक रीत्या कसे शिकवू शकतो याविषयी एखाद्या अनुभवी सहविश्‍वासू बंधुभगिनीने आपल्याला सुचवल्यास, आपण नम्रतेने व कृतज्ञतेने त्यांची मदत स्वीकारली पाहिजे. असे केल्यास, आपल्या पवित्र सेवेची गुणवत्ता आणखी वाढेल.

शिकलेल्या गोष्टींच्या साहाय्याने इतरांना मदत करा

१२, १३. शास्त्रवचनांचा कुशलतेने उपयोग केल्याने बायबल विद्यार्थ्यांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यास कशा प्रकारे मदत होऊ शकते हे उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.

१२ प्रिस्किल्ला, अक्विल्ला आणि अपुल्लोप्रमाणे आपण इतरांकरता एक आशीर्वाद ठरू शकतो. सत्यात आवड दाखवणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला तुमच्या प्रोत्साहनामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीतील अडथळ्यावर मात करणे शक्य होते तेव्हा तुम्हाला कसे वाटते? किंवा एखादा बंधू किंवा भगिनी येऊन तुमचे आभार मानते आणि तुम्ही बायबलमधून दिलेल्या सल्ल्यामुळे एका कठीण परिस्थितीला तोंड देणे आपल्याला शक्य झाले असे सांगते तेव्हा एक वडील या नात्याने तुम्हाला कसे वाटते? देवाच्या वचनाचा उपयोग करून इतरांना त्यांच्या जीवनात बदल करण्यास मदत केल्यामुळे समाधान व आनंद मिळतो यात शंका नाही. * तुम्ही हे ध्येय कसे साध्य करू शकता त्याकडे लक्ष द्या.

१३ एलीयाच्या दिवसांतील पुष्कळ इस्राएल लोक खऱ्‍या व खोट्या उपासनेच्या बाबतीत द्विधा मनःस्थितीत होते. एखादा बायबल विद्यार्थी जर आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्याच्या बाबतीत मागेपुढे पाहत असेल, तर एलीयाने इस्राएल लोकांना जो सल्ला दिला होता त्यामुळे त्याला मदत होऊ शकते. (१ राजे १८:२१ वाचा.) आणखी एका परिस्थितीचा विचार करा: सत्यात आवड दाखवणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला, आपले मित्र किंवा कुटुंबीय काय म्हणतील याची भीती वाटत असेल, तर तुम्ही यशया ५१:१२, १३ (वाचा.) या वचनांवर तर्क करण्याद्वारे यहोवाची उपासना करण्याचा तिचा निर्धार पक्का करण्यास मदत करू शकता.

१४. इतरांना मदत करण्यासाठी बायबलमधील उताऱ्‍यांची तुम्हाला गरज पडते तेव्हा ते आठवणीत आणण्यासाठी तुम्हाला काय मदत करेल?

१४ स्पष्टच आहे, की बायबलमध्ये असे अनेक शब्द आहेत ज्यांमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते, जीवनात बदल करण्यास मदत मिळते आणि आपण आध्यात्मिक रीत्या मजबूत होतो. पण, तुम्ही कदाचित असे विचाराल, ‘गरज पडेल तेव्हा बायबलची वचनं मला लगेच आठवावीत म्हणून मी काय करू शकतो?’ दररोज बायबलचे वाचन करा आणि त्यामध्ये असलेल्या देवाच्या विचारांवर मनन करा. असे केल्यास, तुमच्याजवळ देवाच्या वचनातील शब्दांचा संग्रह तयार होईल आणि गरज पडेल तेव्हा यहोवाचा आत्मा ते शब्द आठवण्यास तुम्हाला मदत करेल.—मार्क १३:११; योहान १४:२६ वाचा.

१५. देवाच्या वचनाला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

१५ शलमोन राजाप्रमाणे, यहोवाच्या सेवेतील जबाबदाऱ्‍या पार पाडण्याकरता सुबुद्धी मिळावी म्हणून त्याला प्रार्थना करा. (२ इति. १:७-१०) प्राचीन काळातील संदेष्ट्यांप्रमाणे, यहोवाबद्दल व त्याच्या इच्छेबद्दल अचूक ज्ञान प्राप्त करण्यासाठी देवाच्या वचनात “बारकाईने शोध” करा. (१ पेत्र १:१०-१२) प्रेषित पौलाने तीमथ्याला “विश्‍वासाच्या” आणि सुशिक्षणाच्या “वचनांनी पोषण करून” घेण्याचे प्रोत्साहन दिले. (१ तीम. ४:६) असे केल्यास, इतरांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्यास तुम्ही सज्ज असाल. शिवाय, यामुळे तुमचा स्वतःचा विश्‍वासदेखील मजबूत होईल.

देवाच्या वचनात संरक्षणाचे आश्‍वासन

१६. (क) “शास्त्रात दररोज शोध” केल्याने बिरुयाच्या लोकांना कसा फायदा झाला? (ख) दररोज बायबलचे वाचन करणे आज आपल्याकरता महत्त्वाचे का आहे?

१६ मासेदोनियातील बिरुया या शहरात राहणारे यहुदी आपल्या वहिवाटीप्रमाणे “शास्त्रात दररोज शोध” करायचे. पौलाने त्यांना सुवार्ता सांगितली तेव्हा त्यांनी त्याच्या शब्दांची तुलना शास्त्रवचनांबद्दल असलेल्या त्यांच्या ज्ञानाशी केली. परिणाम? त्यांपैकी अनेक जणांची खातरी पटली की पौल सत्य शिकवत होता, आणि त्यांच्यापैकी अनेकांनी “विश्‍वास ठेवला.” (प्रे. कृत्ये १७:१०-१२) यावरून दिसून येते, की दररोज बायबलचे वाचन केल्याने यहोवावरील आपला विश्‍वास आणखी दृढ होतो. असा विश्‍वास, म्हणजेच “आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” या जगाच्या अंतातून बचावून देवाच्या नवीन जगात प्रवेश करण्यासाठी अत्यावश्‍यक आहे.—इब्री ११:१.

१७, १८. (क) मजबूत विश्‍वास आणि प्रेमामुळे एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या लाक्षणिक हृदयाचे संरक्षण कसे होते? (ख) आशा कशा प्रकारे धोक्यांपासून आपले संरक्षण करते?

१७ पौलाने लिहिले: “आपण दिवसाचे आहो त्या आपण सावध असावे, विश्‍वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.” असे लिहिण्यामागे पौलाजवळ चांगले कारण होते. (१ थेस्सलनी. ५:८) एका सैनिकाने आपल्या हृदयाचे शत्रूपासून संरक्षण करणे गरजेचे असते. त्याच प्रकारे, एका ख्रिस्ती व्यक्‍तीने आपल्या लाक्षणिक हृदयाचे पापापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. यहोवाचा एखादा सेवक त्याने दिलेल्या अभिवचनांवर मजबूत विश्‍वास बाळगण्यासोबतच त्याच्यावर व इतर मानवांवर प्रेम करतो तेव्हा काय घडते? यहोवाचा असा सेवक स्वतःच्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी जणू अत्युच्च दर्जाचे आध्यात्मिक कवच घालतो. हा सेवक अशी कोणतीही गोष्ट करणार नाही, ज्यामुळे तो देवाची स्वीकृती गमावू शकतो.

१८ पौलाने असाही उल्लेख केला, की “तारणाची आशा हे शिरस्त्राण” आहे. बायबल काळातील एखाद्या सैनिकाने आपल्या डोक्याचे संरक्षण न केल्यास, तो युद्धात आपला जीव गमावू शकत होता. पण, एक चांगले शिरस्त्राण धारण केल्यास, तो डोक्याला होणाऱ्‍या गंभीर इजांपासून स्वतःचे रक्षण करू शकत होता. आपण यहोवाच्या वचनाचा अभ्यास केल्यास, तो आपल्या लोकांचे नक्कीच रक्षण करतो ही आपली आशा आणखी पक्की होते. या पक्क्या आशेमुळे आपल्याला धर्मत्यागी लोकांच्या आणि सडणाऱ्‍या जखमेप्रमाणे असलेल्या त्यांच्या “रिकाम्या वटवटीपासून” दूर राहणे शक्य होते. (२ तीम. २:१६-१९) शिवाय, या पक्क्या आशेमुळे आपल्याला अशा लोकांना नकार देण्याचे बळ मिळेल जे यहोवाला न आवडणारे आचरण करण्यास आपल्याला प्रवृत्त करू शकतात.

बचावासाठी अत्यंत आवश्‍यक

१९, २०. आपण देवाच्या वचनाला मौल्यवान का लेखतो, आणि त्याबद्दल आपण कशा प्रकारे कदर व्यक्‍त करू शकतो? (“मला ज्याची गरज आहे अगदी तेच यहोवा मला पुरवतो” ही चौकट पाहा.)

१९ आपण या जगाच्या अंताच्या जितके जास्त जवळ जातो तितकेच जास्त यहोवाच्या वचनावर विसंबून राहणे गरजेचे आहे. यहोवाच्या वचनातून मिळणाऱ्‍या सल्ल्यामुळे आपल्याला वाईट सवयींवर मात करण्यास आणि पापपूर्ण प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. त्यातून मिळणाऱ्‍या प्रोत्साहनामुळे व सांत्वनामुळे, आपण सैतान व त्याच्या जगाकडून येणाऱ्‍या परीक्षांवर यशस्वी रीत्या मात करू शकू. यहोवाने त्याच्या वचनात पुरवलेल्या मार्गदर्शनामुळे आपण जीवनाच्या मार्गावर टिकून राहू शकतो.

२० हे आठवणीत असू द्या, की “सर्व माणसांचे तारण व्हावे” अशी देवाची इच्छा आहे. या सर्व माणसांमध्ये यहोवाच्या सेवकांचाही समावेश होतो. शिवाय, प्रचार करण्याद्वारे व शिकवण्याद्वारे आपण ज्यांना मदत करू शकतो अशांचाही यात समावेश होतो. पण, ज्यांना तारण मिळवण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी सत्याचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. (१ तीम. २:४) तेव्हा, या शेवटल्या दिवसांतून बचावण्यासाठी बायबलचे वाचन करणे व सोबतच त्यात असलेल्या देवप्रेरित सूचना लागू करणे गरजेचे आहे. खरोखर, आपण दररोज बायबलचे वाचन करतो तेव्हा आपण दाखवून देतो, की यहोवाच्या वचनात असलेल्या मौल्यवान सत्याची आपण खूप कदर करतो.—योहा. १७:१७.

^ अर्थातच, बायबलमधील सल्ल्याचा वापर आपण इतरांवर दबाव आणण्यासाठी किंवा त्यांचा धिक्कार करण्यासाठी करत नाही. यहोवा जसा आपल्याशी सहनशीलतेने व दयाळूपणे वागतो तसेच आपणही बायबल विद्यार्थ्यांशी वागले पाहिजे.—स्तो. १०३:८.