यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा
“[मी] तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णीन.”—स्तो. ८६:१२.
१, २. ख्रिस्ती धर्मजगताच्या तुलनेत यहोवाचे साक्षीदार देवाच्या नावाकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहतात?
ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसनी देवाच्या नावापासून स्वतःला विलग केले आहे. उदाहरणार्थ, रिव्हाइज्ड स्टॅन्डर्ड व्हर्शन या बायबल अनुवादाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे: “एकमेव देवासाठी कोणत्याही खास नावाचा वापर करणे . . . हे विश्वव्यापी ख्रिस्ती धर्मासाठी पूर्णतः अनुचित आहे.”
२ दुसरीकडे पाहता, यहोवाच्या साक्षीदारांना देवाच्या नावाने ओळखले जाण्यास व त्या नावाचे गौरव करण्यास अभिमान वाटतो. (स्तोत्र ८६:१२ *; यशया ४३:१० वाचा. *) तसेच, आपल्याला देवाच्या नावाच्या अर्थाबद्दल व त्याच्या पवित्रीकरणासंबंधी असलेल्या वादविषयाबद्दल स्पष्ट समज मिळाली आहे, हादेखील आपण एक बहुमान समजतो. (मत्त. ६:९) पण या बहुमानाबद्दल आपली कदर कधीही कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच, आता आपण तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करू या: देवाच्या नावाची ओळख होण्याचा काय अर्थ होतो? यहोवाने कशा प्रकारे आपल्या नावाला जागून त्याच्या गौरवात आणखी भर पाडली आहे? आपण कशा प्रकारे यहोवाच्या नावाने चालू शकतो?
देवाच्या नावाची ओळख होण्याचा काय अर्थ होतो?
३. देवाच्या नावाची ओळख होण्याचा काय अर्थ होतो?
३ देवाच्या नावाची ओळख होण्याकरता फक्त “यहोवा” या शब्दाशी परिचित असणे पुरेसे नाही. तर बायबलमध्ये प्रकट केल्याप्रमाणे यहोवाची ख्याती, त्याचे गुण, त्याचा उद्देश व कार्ये, उदाहरणार्थ त्याच्या सेवकांसोबतचे त्याचे व्यवहार यांविषयी माहिती असणेही त्यात समाविष्ट आहे. अर्थात, यहोवाचा उद्देश जसजसा पूर्ण होतो, तसतशी तो आपल्या नावाविषयी ही माहिती क्रमाक्रमाने प्रकट करतो. (नीति. ४:१८) यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला आपले नाव प्रकट केले होते; म्हणूनच, काइनाला जन्म दिल्यानंतर हव्वेने देवाच्या नावाचा वापर केला. (प्रारंभ ४:, पं.र.भा.) प्राचीन काळातील विश्वासू कुटुंबप्रमुख जसे की नोहा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांनाही देवाचे नाव माहीत होते. शिवाय, यहोवाने जसजसे त्यांना आशीर्वादित केले, त्यांची काळजी घेतली आणि आपल्या उद्देशाबद्दल त्यांना माहिती दिली तसतशी देवाच्या नावाबद्दल त्यांची कदर वाढत गेली. मोशेला तर देवाने आपल्या नावाबद्दल काही खास माहिती प्रकट केली. १
४. मोशेने देवाला त्याच्या नावाबद्दल का विचारले आणि मोशेला वाटणारी काळजी समजण्याजोगी का होती?
४ निर्गम ३:१०-१५ वाचा. मोशे ऐंशी वर्षांचा होता, तेव्हा देवाने त्याला एक अतिशय महत्त्वाची आज्ञा दिली: “तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज यांस बाहेर काढावे.” मोशेने अतिशय आदरपूर्वक देवाला एक प्रश्न विचारला. हा प्रश्न खूप अर्थभरीत होता. एका अर्थाने मोशेने जणू देवाला असे विचारले की ‘तुझे नाव काय आहे?’ देवाचे नाव खरेतर बऱ्याच काळापासून लोकांना माहीत होते; तर मग, मोशेच्या प्रश्नाचा काय अर्थ होता? त्याच्या प्रश्नावरून दिसून येते, की ते नाव ज्याचे प्रतिनिधित्व करत होते त्याच्याबद्दल, अर्थात देवाबद्दल मोशेला आणखी जाणून घ्यायचे होते. देवाबद्दल मोशेला अशी वास्तविक माहिती जाणून घ्यायची होती, जिच्या साहाय्याने तो देवाच्या लोकांना हे आश्वासन देऊ शकेल की देव खरोखरच त्यांची सुटका करेल. मोशेला वाटणारी काळजी वाजवी होती कारण इस्राएली लोक काही काळापासून दास्यात होते. आपल्या पूर्वजांचा देव खरोखरच आपली सुटका करू शकेल का अशी शंका त्यांच्या मनात येण्याची शक्यता होती. काही इस्राएल लोक तर इजिप्तच्या दैवतांचे उपासक बनले होते.—यहे. २०:७, ८.
५. मोशेच्या प्रश्नाचे उत्तर देताना यहोवाने आपल्या नावाच्या अर्थावर कशा प्रकारे आणखी प्रकाश टाकला?
५ यहोवाने मोशेच्या प्रश्नाचे कशा प्रकारे उत्तर दिले? त्याने म्हटले: “तू इस्राएलवंशजांस सांग, ‘मी होईन याने मला तुमच्याकडे पाठवले आहे.’” * (NW) पुढे तो म्हणाला: “यहोवा, तुमच्या पूर्वजांचा देव . . . याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.” (पं.र.भा.) अशा रीतीने देवाने प्रकट केले की त्याचा उद्देश पूर्ण करण्याकरता त्याला जे काही व्हावेसे वाटेल ते तो होईल आणि त्याने दिलेला शब्द तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करेल. म्हणूनच, १५ व्या वचनात आपण खुद्द यहोवाचे हे शब्द वाचतो: “हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.” देवाच्या नावाविषयी ही माहिती मिळाल्यावर मोशेचा विश्वास किती दृढ झाला असेल आणि देवाबद्दल त्याच्या मनातील आदर किती पटीने वाढला असेल!
यहोवा त्याच्या नावाला जागला
६, ७. यहोवा कशा प्रकारे त्याच्या महान नावाला पूर्णपणे जागला?
६ मोशेशी बोलल्यानंतर थोड्याच काळाने, यहोवा इस्राएली लोकांचा मुक्तिदाता ‘होऊन’ आपल्या नावाला जागला. त्याने इजिप्तवर दहा भयानक पीडा आणल्या आणि फारो व इजिप्तच्या सर्व देवीदेवता निर्बल आहेत हे दाखवून दिले. (निर्ग. १२:१२) यानंतर यहोवाने तांबड्या समुद्राला दुभागून इस्राएल लोकांसाठी मार्ग तयार केला आणि फारो व त्याच्या सैन्याला समुद्रात बुडवून नष्ट केले. (स्तो. १३६:१३-१५) इस्राएली लोक मोठ्या व भयानक अरण्यात भटकत असताना, यहोवाने आपल्या लोकांना—ज्यांची संख्या कदाचित वीस ते तीस लाख किंवा त्यापेक्षा जास्त असावी—अन्न व पाणी पुरवले. अशा रीतीने तो त्यांचा पालनकर्ता झाला. अरण्यात भटकत असताना त्यांचे कपडे जिरणार नाहीत व त्यांचे जोडे झिजणार नाहीत असे त्याने केले. (अनु. १:१९; २९:५) खरोखर, यहोवाला त्याच्या अतुलनीय नावास जागण्यापासून कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही! नंतर यहोवाने यशयाला असे सांगितले: “मी, मीच यहोवा आहे आणि माझ्यावाचून कोणी तारणारा नाही.”—यश. ४३:११, पं.र.भा.
७ मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा यानेदेखील इजिप्तमध्ये व अरण्यात यहोवाने केलेली भयप्रेरक कार्ये पाहिली होती. म्हणूनच, त्याच्या जीवनाच्या शेवटास तो पूर्ण खातरीने आपल्या इस्राएली भाऊबंदांना असे म्हणू शकला: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकही व्यर्थ गेली नाही.” (यहो. २३:१४) खरेच, यहोवाने दिलेली सर्व अभिवचने त्याने पूर्ण केली.
८. आपल्या काळात यहोवा कशा प्रकारे त्याची अभिवचने पूर्ण करत आहे?
८ त्याच प्रकारे आजदेखील यहोवा आपली अभिवचने पूर्ण करत आहे. त्याच्या पुत्राद्वारे त्याने असे भाकीत केले होते, की शेवटल्या काळी राज्याचा संदेश “सर्व जगात” गाजवला जाईल. (मत्त. २४:१४) अशा प्रकारचे एक कार्य घडेल असे भाकीत करणे, ते घडवून आणणे आणि अनेक “निरक्षर व अज्ञानी” लोकांचा वापर करून ते सिद्धीस नेणे हे सर्वसमर्थ देवाशिवाय आणखी कोणाला शक्य झाले असते? (प्रे. कृत्ये ४:१३) त्यामुळे, जेव्हा जेव्हा आपण या कार्यात सहभाग घेतो, तेव्हा तेव्हा आपण खरेतर बायबलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत सहभाग घेत असतो. आपण आपल्या पित्याचे गौरव करतो आणि पुढील प्रार्थनेतील शब्द पूर्ण व्हावेत असे आपल्याला मनापासून वाटते हे दाखवून देतो: “तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्त. ६:९, १०.
त्याचे नाव थोर आहे
९, १०. इस्राएल राष्ट्रासोबत यहोवाने ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून आपण त्याच्याविषयी आणखी काय शिकू शकतो?
९ इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडल्यावर थोड्याच काळानंतर, यहोवाने आपल्या लोकांना स्वतःविषयी आणखी माहिती प्रकट केली. नियमशास्त्राच्या कराराद्वारे तो त्यांचा “लग्नाचा नवरा” बनला आणि यासोबत आलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्याने स्वीकारल्या. (यिर्म. ३:१४) अशा रीतीने इस्राएली लोक लाक्षणिक अर्थाने त्याची पत्नी, अर्थात त्याच्या नावाने ओळखले जाणारे लोक बनले. (यश. ५४:५, ६) त्यांनी स्वेच्छेने यहोवाला अधीन होऊन त्याच्या आज्ञा पाळल्यास तो “पती” या नात्याने त्याच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडणार होता. त्याने आश्वासन दिले की तो आपल्या लोकांना आशीर्वाद देईल, त्यांचे पालनपोषण करेल आणि त्यांना शांती देईल. (गण. ६:२२-२७) अशा रीतीने यहोवाच्या महान नावाचे सर्व राष्ट्रांमध्ये गौरव होणार होते. (अनुवाद ४:५-८; स्तोत्र ८६:७-१० वाचा.) आणि खरोखरच, इस्राएलच्या सबंध इतिहासात कित्येक विदेशी खऱ्या उपासनेकडे आकर्षित झाले. एका अर्थाने त्यांच्याही भावना मवाबी रूथसारख्या होत्या, जिने नामीला असे म्हटले: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.”—रूथ १:१६.
१० जवळजवळ १,५०० वर्षांपर्यंत इस्राएल राष्ट्रासोबत यहोवाच्या व्यवहारांतून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू प्रकट झाले. इस्राएली लोक अनेकदा खऱ्या उपासनेपासून वाहवत गेले, तरीसुद्धा यहोवा “मंदक्रोध” असल्यामुळे तो त्यांच्याशी वारंवार दयाळूपणे वागला. त्याने अतिशय सहनशीलपणे त्यांच्याशी व्यवहार केला. (निर्ग. ३४:५-७) पण यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा होती आणि यहुदी राष्ट्राने त्याच्या पुत्राला जिवे मारले तेव्हा त्यांनी ही मर्यादा ओलांडली. (मत्त. २३:३७, ३८) इस्राएल राष्ट्राचे वंशज यापुढे देवाच्या नावाने ओळखले जाणार नव्हते. ते एखाद्या वाळलेल्या झाडाप्रमाणे आध्यात्मिक रीत्या मृतवत झाले होते. (लूक २३:३१) यामुळे देवाच्या नावाप्रती त्यांच्या मनोवृत्तीवर कोणता परिणाम झाला?
११. यहुदी राष्ट्रासोबत देवाच्या नावाचा संबंध कशा प्रकारे तुटला?
११ इतिहासाकडे पाहिल्यास दिसून येते, की कालांतराने यहुद्यांनी देवाच्या नावाप्रती अंधश्रद्धाळू मनोवृत्ती विकसित केली. देवाच्या नावाचा उच्चार करणे अनुचित आहे असे ते मानू लागले. (निर्ग. २०:७) हळूहळू यहुदी लोकांनी देवाच्या नावाचा वापर करणे पूर्णपणे बंद केले. साहजिकच आपल्या नावाचा अशा प्रकारे अवमान झालेला पाहून यहोवाचे मन दुखावले असेल. (स्तो. ७८:४०, ४१) यहोवा आपल्या नावाप्रती “ईर्ष्यावान” आहे असे बायबल सांगते. त्यामुळे, ज्या लोकांनी त्याच्या नावाचा अव्हेर केला होता आणि त्याने स्वतःही ज्यांचा अव्हेर केला होता ते लोक नक्कीच त्याच्या नावाने ओळखले जाण्यास लायक नव्हते. (निर्ग. ३४:१४) यावरून, आपल्या निर्माणकर्त्याच्या नावाचा मनापासून आदर करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला दिसून येते.
देवाच्या नावाने ओळखण्यात आलेले नवे राष्ट्र
१२. भाकीत केल्यानुसार, यहोवाने त्याच्या नावाने ओळखले जाणारे राष्ट्र कशा प्रकारे अस्तित्वात आणले?
१२ यिर्मयाद्वारे यहोवाने एका नव्या राष्ट्रासोबत, अर्थात आत्मिक इस्राएलसोबत एक “नवा करार” स्थापित करण्याचा संकल्प प्रकट केला. यिर्मयाने भाकीत केले, की या नव्या राष्ट्रातील “लहानापासून थोरापर्यंत” सर्व सदस्य यहोवाला “ओळखतील.” (यिर्म. ३१:३१, ३३, ३४) इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला या भविष्यवाणीची पूर्णता होण्यास सुरुवात झाली. देवाने एक नवा करार स्थापित केला. देवाचे इस्राएल म्हणण्यात आलेल्या या नव्या राष्ट्रात यहुदी व विदेशी दोन्ही प्रकारचे लोक होते. हे नवे राष्ट्र “[देवाच्या] नावाकरिता” असलेले लोक बनले, व त्यांना “माझे नाव देण्यात आले आहे” असे यहोवाने म्हटले.—गलती. ६:१६; प्रेषितांची कृत्ये १५:१४-१७ वाचा; मत्त. २१:४३.
१३. (क) सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी देवाच्या नावाचा वापर केला का? स्पष्ट करा. (ख) सेवाकार्यात यहोवाच्या नावाचा वापर करण्याच्या विशेषाधिकाराविषयी तुमच्या भावना काय आहेत?
१३ या नव्या राष्ट्राचे सदस्य असणारे सुरुवातीचे ख्रिस्ती देवाच्या नावाचा वापर करायचे. उदाहरणार्थ, इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ घेताना ते नक्कीच देवाच्या नावाचा वापर करायचे. * म्हणूनच, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहुदी व यहुदी मतानुसारी यांच्या एका आंतरराष्ट्रीय जमावाला उद्देशून बोलताना प्रेषित पेत्राने अनेक वेळा देवाच्या नावाचा वापर केला. (प्रे. कृत्ये २:१४, २०, २१, २५, ३४) या सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी यहोवाचा आदर केला आणि त्यामुळे त्यानेदेखील त्यांच्या प्रचार कार्यावर आशीर्वाद दिला. त्याच प्रकारे आज यहोवा आपल्या सेवाकार्यावरही आशीर्वाद देतो. कारण, आपण देवाच्या नावाविषयी इतरांना मोठ्या अभिमानाने सांगतो आणि आस्था दाखवणाऱ्या लोकांना शक्यतो त्यांच्याच बायबलमधून देवाचे नाव दाखवतो. असे करण्याद्वारे आपण त्यांना खऱ्या देवाची ओळख करून देतो. हा त्यांच्याकरता आणि आपल्याकरताही किती मोठा विशेषाधिकार आहे! देवाला अशा प्रकारे जाणून घेणे ही त्यांच्याकरता यहोवासोबतच्या एका सुंदर नातेसंबंधाची सुरुवात असू शकते. एक असा नातेसंबंध, जो दिवसेंदिवस घनिष्ट होत जाईल आणि सदासर्वकाळपर्यंत टिकेल.
१४, १५. धर्मत्यागाचा प्रसार झाला तरीसुद्धा यहोवाने आपल्या नावाचे स्मरण टिकवून ठेवण्याकरता काय केले आहे?
१४ काही काळाने, विशेषतः प्रेषितांच्या मृत्यूनंतर सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीत धर्मत्यागाचा शिरकाव होऊ लागला. (२ थेस्सलनी. २:३-७) खोट्या शिक्षकांनी तर यहुदी परंपरेला अनुसरून देवाचे नाव वापरण्याचेच बंद केले. पण यहोवा आपल्या नावाचे स्मरण कायमचे मिटू देणार होता का? मुळीच नाही! हे खरे आहे, की देवाच्या नावाचा नेमका उच्चार कसा असावा हे ठरवणे आज कठीण आहे. पण तरीसुद्धा देवाचे नाव आजपर्यंत टिकून राहिले आहे. गतकाळात ते अनेक बायबल अनुवादांत आणि बायबल विद्वानांच्या लिखाणांत वापरण्यात आले. उदाहरणार्थ, १७५७ साली चार्ल्झ पीटर यांनी असे लिहिले, की देवाच्या अनेक पदव्यांच्या तुलनेत, “यहोवा” हे नाव “त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात चांगल्या प्रकारे वर्णन करते.” १७९७ साली देवाच्या उपासनेवर आधारित असलेल्या एका पुस्तकात हॉप्टन हेन्झ यांनी ७ व्या अध्यायाची अशा प्रकारे सुरुवात केली: “यहोवा हे यहुद्यांच्या देवाचे वैयक्तिक नाव असून ते केवळ या एकाच देवाची उपासना करायचे; ख्रिस्त व त्याचे प्रेषितदेखील याच देवाची उपासना करायचे.” हेन्री ग्रू (१७८१-१८६२) यांनी देवाच्या नावाचा वापर तर केलाच, पण या नावावर अनेक दोषारोप लावण्यात आले आहेत आणि ते पवित्र केले जाणे गरजेचे आहे हेदेखील त्यांनी ओळखले. त्याच प्रकारे, जॉर्ज स्टॉर्झ (१७९६-१८७९) जे चार्ल्झ टी. रस्सल यांचे निकटवर्ती होते, त्यांनीदेखील रस्सलप्रमाणेच देवाच्या नावाचा वापर केला.
१५ सन १९३१ हे अतिशय खास होते, कारण त्या वर्षी देवाच्या लोकांनी, ज्यांना त्या वेळी आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी म्हटले जायचे, बायबलवर आधारित असलेले यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. (यश. ४३:१०-१२) अशा रीतीने, त्यांनी सबंध जगासमोर हे घोषित केले की त्यांना एकमेव खऱ्या देवाचे सेवक असण्याचा, त्याच्या “नावाकरिता” काढून घेतलेले लोक असण्याचा व त्या नावाची स्तुती करण्याचा अभिमान वाटतो. (प्रे. कृत्ये १५:१४) यहोवाने कशा प्रकारे आपल्या नावाचे जतन केले हे पाहिल्यावर मलाखी १:११ (पं.र.भा.) यातील यहोवाच्या शब्दांची आपल्याला आठवण होते: “सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल.”
यहोवाच्या नावाने चाला
१६. यहोवाच्या नावाने चालणे याला आपण एक बहुमान का समजावे?
१६ संदेष्टा मीखा याने लिहिले: “सर्व लोक, प्रत्येक आपापल्या देवाच्या नावाने, असे चालतात, परंतु आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाल चालत जाऊ.” (मीखा ४:५, पं.र.भा.) यहोवाने बायबल विद्यार्थ्यांना त्याचे नाव धारण करू दिले हा एक मोठा बहुमान तर होताच; पण, त्यासोबतच त्यांना यहोवाची संमती असल्याचा हा एक पुरावा होता. (मलाखी ३:१६-१८ वाचा.) व्यक्तिशः तुमच्याविषयी काय? तुम्ही यहोवाच्या नावाने चालण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहात का? यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत याची जाणीव तुम्हाला आहे का?
१७. देवाच्या नावाने चालण्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
१७ देवाच्या नावाने चालणे यात कमीतकमी तीन गोष्टींचा समावेश होतो. सर्वप्रथम, आपण हे नाव इतरांना सांगितले पाहिजे. “जो कोणी प्रभूचे [“यहोवाचे,” NW] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल” हे आपण ओळखले पाहिजे. (रोम. १०:१३) दुसरी गोष्ट म्हणजे, आपण यहोवाच्या गुणांचे विशेषतः त्याच्या प्रेमाचे अनुकरण केले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यहोवाच्या नावाची कोणत्याही प्रकारे निंदा होऊ नये, म्हणून आपण त्याच्या नीतिनियमांचे आनंदाने पालन केले पाहिजे. (१ योहा. ४:८; ५:३) तुम्ही सदासर्वकाळ यहोवाच्या नावाने चालत राहण्याचा निर्धार केला आहे का?
१८. यहोवाच्या थोर नावाचा आदर करणारे सर्व जण भविष्याकडे आत्मविश्वासाने का पाहू शकतात?
१८ लवकरच, यहोवाला न मानणाऱ्यांना किंवा जाणूनबुजून त्याचा विरोध करणाऱ्यांना त्याला ओळखणे भाग पडेल. (यहे. ३८:२३) हे लोक फारोसारखे आहेत, ज्याने असे म्हटले होते: “यहोवा कोण आहे की मी . . . त्याचा शब्द ऐकावा?” फारोला यहोवाचा अधिकार मान्य करणे भाग पडले! (निर्ग. ५:१, २, पं.र.भा.; ९:१६; १२:२९) पण आपण मात्र स्वेच्छेने यहोवाची ओळख करून घेतली आहे. त्याच्या नावाने ओळखले जाण्याचा आणि त्याचे आज्ञाधारक लोक असण्याचा आपल्याला अभिमान वाटतो. म्हणूनच, आपण पूर्ण आत्मविश्वासाने त्या दिवसाची वाटत पाहतो जेव्हा स्तोत्र ९:१० यात नमूद असलेले शब्द पूर्ण होतील: “ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवितील, कारण, हे परमेश्वरा, [“यहोवा,” NW] जे तुझा शोध करितात त्यांस तू टाकिले नाही.”
^ स्तोत्र ८६:१२ (NW): “हे यहोवा, माझ्या देवा, मी पूर्ण मनाने तुझे गुणगान गाईन, आणि सर्वदा तुझ्या नावाचे गौरव करेन.”
^ यशया ४३:१० (NW): “यहोवाचे असे म्हणणे आहे की ‘तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर विश्वास ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी नाही हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस.’”
^ देवाचे नाव, “होणे” या अर्थाच्या इब्री क्रियापदाचे एक रूप आहे. त्याअर्थी, “यहोवा” या शब्दाचा अर्थ “तो व्हायला लावतो” असा होतो.
^ सुरुवातीचे ख्रिस्ती वापरत असलेल्या इब्री शास्त्रवचनांत देवाचे नाव होते. पुराव्यांवरून दिसून येते की इब्री शास्त्रवचनांचे ग्रीक भाषांतर असलेले सेप्ट्युजिंट याच्या सुरुवातीच्या प्रतींमध्येही देवाचे नाव होते.