हृदयातील हेतूंविषयी जपा
बायबल असे म्हणते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्म. १७:९) आपल्या हृदयात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असते, तेव्हा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सहसा निमित्ते शोधतो, नाही का?
बायबल आपल्याला अशी ताकीद देते: “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.” (मत्त. १५:१९) आपले लाक्षणिक हृदय आपली फसवणूक करू शकते आणि देवाच्या इच्छेच्या विरुद्ध असलेले कार्य करणे गैर नाही असा विचार करण्यास आपल्याला प्रवृत्त करू शकते. आणि कदाचित चुकीची पावले उचलल्यानंतरच आपल्याला याची जाणीव होते की नक्की काय झाले आहे. तर मग, चुकीचे पाऊल उचलण्याआधी आपल्या अंतःकरणातील हेतू ओळखण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?
तुमचे हेतू ओळखा—कसे?
दररोज बायबलचे वाचन करा व वाचलेल्या गोष्टींवर मनन करा.
प्रेषित पौलाने असे लिहिले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे . . . आहे.” देवाचे वचन “मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री ४:१२) आपल्या अंतःकरणाचे हेतू ओळखण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास केल्यावर आपल्या विचारांचे आणि कार्यांचे परीक्षण करणे. तर मग, देवाच्या वचनाचे दररोज वाचन करणे व वाचलेल्या गोष्टींवर मनन करणे किती महत्त्वाचे आहे! असे केल्यास आपल्याला यहोवाचे विचार व त्याचा दृष्टिकोन अंगी बाणवण्यास मदत मिळेल.
शास्त्रवचनांतील सल्ल्यांचे, तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपल्या विवेकावर चांगला परिणाम होतो. विवेक हा आपल्या आतील मनुष्याचा आवाज आहे, जो “साक्ष” देतो. (रोम. ९:१) आपल्या विवेकाचा आवाज आपल्याला चुकीचे पाऊल उचलण्यापासून आणि त्यासाठी निमित्ते सांगण्यापासून आवरतो. शिवाय, बायबलमध्ये “आपल्या बोधासाठी” बरीच उदाहरणे नमूद करण्यात आली आहेत. (१ करिंथ. १०:११) या उदाहरणांतून घेतलेले धडे, चुकीचे पाऊल उचलण्यापासून आपल्याला रोखतील. तर मग, आपल्यापैकी प्रत्येकाने काय केले पाहिजे?
तुमच्या अंतःकरणातील हेतू ओळखता यावेत म्हणून मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा.
यहोवा “हृदयाची पारख” करणारा देव आहे. (१ इति. २९:१७) “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.” (१ योहा. ३:२०) आपण देवाला कधीही फसवू शकत नाही. जर आपण प्रार्थनेत उघडपणे आपल्या चिंता, भावना आणि इच्छा व्यक्त केल्या, तर आपल्या मनातील हेतू जाणून घेण्यास यहोवा आपली मदत करेल. आपण देवाला आपल्यात “शुद्ध हृदय उत्पन्न” करण्याचीही विनंती करू शकतो. (स्तो. ५१:१०) तेव्हा, आपले अंतःकरण कोणत्या गोष्टींच्या मागे लागले आहे हे ओळखण्यासाठी प्रार्थनेच्या तरतुदीकडे दुर्लक्ष करू नका.
ख्रिस्ती सभांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी एकाग्रतेने ऐका.
ख्रिस्ती सभांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी एकाग्रतेने ऐकल्याने आपल्यातील आंतरिक मनुष्याचे अर्थात आपल्या हृदयाचे प्रामाणिकपणे परीक्षण करण्यास आपल्याला मदत मिळेल. प्रत्येक सभेमध्ये आपण नवीन गोष्टी शिकणार नसलो, तरी सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपण बायबलच्या तत्त्वांशी आणखी चांगल्या प्रकारे परिचित होऊ. शिवाय, सभांद्वारे आठवण करून दिल्या जाणाऱ्या अमूल्य गोष्टी आपल्याला आपल्या अंतःकरणातील हेतूंचे परीक्षण करण्यास मदत करतील. आंतरिक व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी आपल्या बंधुभगिनींच्या उत्तरांचाही मोलाचा वाटा आहे. (नीति. २७:१७) नियमितपणे सभांमध्ये ख्रिस्ती बंधुभगिनींच्या सहवासाचा आनंद घेण्याऐवजी जर आपण इतरांपासून फटकून राहिलो तर आपलेच नुकसान होईल. आणि यामुळे आपण स्वतःच्याच इच्छा पूर्ण करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. (नीति. १८:१) तर मग, स्वतःला हा प्रश्न विचारणे सुज्ञपणाचे ठरेल: “सगळ्या सभांना उपस्थित राहण्याची व त्यांतून फायदा घेण्याची मला सवय आहे का?”—इब्री १०:२४, २५.
आपले अंतःकरण आपली फसवणूक कसे करू शकते?
आपले हृदय कपटी आहे आणि जीवनातील बऱ्याच क्षेत्रांत ते आपली फसवणूक करू शकते. यांपैकी चार क्षेत्रांचे आपण परीक्षण करू या: भौतिक गोष्टींचा पाठपुरावा, मद्यपान, सोबत्यांची निवड, आणि मनोरंजन.
भौतिक गोष्टींचा पाठपुरावा.
शारीरिक गरजा भागवण्याची इच्छा स्वाभाविक आहे. पण भौतिक गोष्टींना प्रमाणाबाहेर महत्त्व देण्याच्या बाबतीत येशूने एक इशारेवजा उदाहरण दिले. त्याने दिलेल्या एका दाखल्याचा विचार करू या. येशूने एका श्रीमंत मनुष्याविषयी सांगितले ज्याची कोठारे धान्याने खचाखच भरलेली होती. त्यामुळे दुसऱ्या हंगामात आलेले भरपूर पीक साठवण्यास त्याच्याकडे जागा नव्हती. या मनुष्याने आपली कोठारे मोडून मोठी कोठारे बांधण्याचा विचार केला. त्याने असा विचार केला: “तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.” पण या मनुष्याला एका अटळ सत्याचा विसर पडला. ते म्हणजे: त्याच रात्री त्याचा मृत्यू होऊ शकतो.—लूक १२:१६-२०.
जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे उतारवयासाठी आर्थिक तरतूद करण्याविषयी आपण चिंतातुर होऊ शकतो. आणि त्यामुळे सभांच्या दिवशी ओव्हरटाईम करण्यास किंवा आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यास काही हरकत नाही असा कदाचित आपण विचार करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे विचार करण्यापासून आपण स्वतःचे संरक्षण करू नये का? दुसरीकडे पाहता, कदाचित आपण तरुण असू आणि आपल्याला याची जाणीव असेल की पूर्णवेळची सेवा हेच सर्वात उत्तम करियर आहे. तरीही सर्वात प्रथम आर्थिक रीत्या सुरक्षित असणे
महत्त्वाचे आहे असे कारण देऊन, आपण पायनियर सेवा सुरू करण्याचे लांबणीवर टाकतो का? देवाच्या दृष्टीत धनवान बनण्यासाठी आपण आजच त्याच्या सेवेत होताहोईल ते करण्याचा प्रयत्न करू नये का? कोण जाणे, उद्या आपण जिवंत असू की नसू.मद्यपान.
नीतिसूत्रे २३:२० मध्ये म्हटले आहे, “मद्यपी” माणसांच्या “वाऱ्यास उभा राहू नको.” एका व्यक्तीला मद्यपान करण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर दररोज मद्यपान करण्यास काही हरकत नाही असा ती तर्क करू शकते. केवळ थकवा दूर करण्यासाठी मी पितो, नशेसाठी पीत नाही असे कदाचित एखादा म्हणेल. पण, जर थकवा दूर करण्यासाठी आपल्याला दारू पिण्याची गरज पडत असेल, तर मग आपल्या अंतःकरणातील हेतूंचे प्रामाणिकपणे परीक्षण करण्याची आताच वेळ आहे.
सोबत्यांची निवड.
अर्थात, अविश्वासू लोकांचा संपर्क आपण पूर्णपणे टाळू शकत नाही. उदाहरणार्थ शाळेत, कामाच्या ठिकाणी आणि सेवाकार्य करताना आपण थोड्याफार प्रमाणात त्यांच्या संपर्कात येतो. पण त्यांच्यासोबत सतत उठ-बस करणे, इतकेच काय त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री जोडण्याचा प्रयत्न करणे ही दुसरी गोष्ट आहे. त्यांच्यात बरेच चांगले गुण आहेत म्हणून त्यांच्यासोबत मैत्री करण्यास काही हरकत नाही असा विचार आपण करतो का? बायबल अशी ताकीद देते: “फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते.” (१ करिंथ. १५:३३) जसे थोडेसे दूषित पाणीसुद्धा शुद्ध पाण्याला दूषित करू शकते, तसेच जे देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नाहीत अशा लोकांशी मैत्री केल्यास आपली आध्यात्मिकता दूषित होऊ शकते आणि जगातील लोकांचा दृष्टिकोन, पेहराव, भाषा आणि आचरण अवलंबण्यास आपण प्रवृत्त होऊ शकतो.
मनोरंजन.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व प्रकारचे मनोरंजन आज अगदी सहजपणे उपलब्ध आहे. यांपैकी बरेच मनोरंजन ख्रिस्ती व्यक्तीकरता अयोग्य आहे. पौलाने लिहिले: “सर्व प्रकारची अशुद्धता . . . ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.” (इफिस. ५:३) पण आपल्याला एखादी अशुद्ध गोष्ट पाहण्यास किंवा ऐकण्यास मनापासून आवडत असेल तर काय? सर्वांनाच थोड्या विश्रांतीची व विरंगुळ्याची गरज असते आणि प्रत्येक व्यक्ती आपआपल्या आवडीनुसार त्याची निवड करू शकते असा कदाचित आपण तर्क करू. पण आपण पौलाच्या सल्ल्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ या आणि अशा अशुद्ध गोष्टी पाहण्याचे किंवा ऐकण्याचे टाळू या.
आपण बदल करू शकतो
आपल्या कपटी हृदयाने आपल्याला फसवले असेल आणि आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल कारणे सांगण्याची आपल्याला सवय लागली असेल, तरीही आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो. (इफिस. ४:२२-२४) आधुनिक काळातील दोन उदाहरणांचा विचार करा.
मीगेल * यांना भौतिक गोष्टीसंबंधी असलेला त्यांचा दृष्टिकोन बदलावा लागला. ते म्हणतात: “माझी पत्नी, मुलगा व मी अशा एका देशात राहतो जिथं सर्वात आधुनिक व उत्तम प्रतीची उपकरणे व सुखसोयी मिळवण्यावर खूप भर दिला जातो. एक वेळ अशी आली की मी जगातील प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं. आणि भौतिकवादी न बनताही मी हे सर्व करू शकतो असा माझा ग्रह होता. पण लवकरच मला याची जाणीव झाली की भौतिक गोष्टींच्या मागं लागणं हे कधीही न संपणाऱ्या प्रवासासारखं आहे. माझा दृष्टिकोन बदलण्यासाठी व माझ्या अंतःकरणातील हेतू ओळखण्यासाठी मी यहोवाला प्रार्थना केली. मी त्याला अशी कळकळीनं विनंती केली की एक कुटुंब या नात्यानं आम्हाला त्याची पूर्ण मनानं सेवा करायची आहे. आम्ही आमचं जीवन साधं करण्याचा व प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेऊ शकलो. लवकरच आम्ही पायनियर सेवा सुरू केली. समृद्ध व आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला जास्त भौतिक गोष्टींची गरज नाही हे आम्ही स्वतः अनुभवलं आहे.”
स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण केल्यामुळे वाईट मित्रांची संगत सोडण्यास कशी मदत मिळू शकते हे ली यांच्या उदाहरणावरून दिसून येते. ते म्हणतात: “माझ्या कामाच्या स्वरूपामुळं मला नेहमी परदेशी व्यापाऱ्यांसोबत सहवास ठेवावा लागायचा. बिझनेस मिटिंग्समध्ये प्रमाणाबाहेर मद्यपान केलं जाईल हे मला माहीत असूनही मला तिथं जाण्याची उत्सुकता असायची. कित्येक वेळा मी जवळजवळ नशा चढेपर्यंत दारू प्यायलो. पण, नंतर मला जाणीव व्हायची की मी चूक करतोय. मला प्रामाणिकपणे माझ्या अंतःकरणातील हेतूंचं परीक्षण करण्याची गरज भासली. देवाच्या वचनातून मिळणाऱ्या सल्ल्यामुळं व वडिलांनी दिलेल्या सूचनांमुळं मला याची जाणीव झाली की खरंतर मला अशा लोकांच्या संगतीची ओढ होती जे यहोवावर प्रेम करत नाहीत. आता मी बिझनेसच्या गोष्टी शक्यतो फोनवरूनच करतो आणि व्यापाऱ्यांशी कमीतकमी संपर्क ठेवतो.”
आपण स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्या मनातील विचारांचे परीक्षण केले पाहिजे. असे करताना आपण प्रार्थनेत यहोवाची मदत मागितली पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: “तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो.” (स्तो. ४४:२१) देवाने त्याचे वचनही आपल्याला दिले आहे, जे आरशाप्रमाणे आपल्या आंतरिक मनुष्याला पाहण्यास मदत करते. (याको. १:२२-२५) आपल्या सभांद्वारे व ख्रिस्ती प्रकाशनांद्वारे आठवण करून दिल्या जाणाऱ्या गोष्टीही फार अमूल्य आहेत! या सर्व तरतुदींमुळे आपण आपल्या हृदयाचे रक्षण करू शकतो आणि नीतिमत्त्वाच्या मार्गात चालत राहू शकतो.
^ काही नावे बदलण्यात आली आहेत.